पांढरा नव्हे तपकिरी कापूस! रंगीत कापूस उत्पादनाचा प्रयोग नागपुरात यशस्वी; यामुळे किती, कसा फायदा?

कापूस
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

आपल्या रोजच्या वापरातील जीन्ससाठी आपण किती पैसे मोजले आहेत, याचं उत्तर जवळपास सगळ्यांनाच लगेचच सांगता येईल.

पण, जीन्सच्या एक जोडीसाठी पर्यावरणाला किती मोठी किंमत मोजावी लागते याचा काही अंदाज आहे का?

United Nations Environment Programme नुसार, कापसाचं उत्पादन होऊन जीन्स शोरुममध्ये येईपर्यंत तब्बल 3781 लिटर पाणी लागतं.

एवढ्या जास्त प्रमाणातील पाण्याच्या वापराची तुलना करायचीच झाली तर हे 33.4 किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनाच्या बरोबर आहे.

जीन्सच्या एका जोडीसाठी जर इतकं पाणी लागत असेल तर एकूण कापड उद्योगासाठी किती पाणी खर्च होत असेल, याचा अंदाजही लावणं कठीण होईल.

त्यातही या उद्योगांमध्ये सर्वाधिक पाणी वापरलं जातं ते कपड्यांना विशिष्ट रंग देण्यासाठी. अमेरिकेतील नॉन प्रॉफीट रिसर्च सेंटर, वर्ल्ड इन्स्टिट्यूटच्या मते, कापड उद्योगांना दरवर्षी कापड रंगविण्यासाठी अंदाजे पाच ट्रिलियन लिटर पाणी लागतं.

जगातील औद्योगिक जल प्रदूषणाच्या 20 टक्के प्रदूषणासाठी हा उद्योग जबाबदार आहे. तसेच यामधून जगातील एकूण कार्बन उत्सर्जनापैकी 10 टक्के उत्सर्जन या उद्योगांतून होतं.

पण, कापड उद्योगातील हे प्रदूषण कमी करता येईल का? यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. असाच प्रयत्न नागपुरातील कापूस संशोधन संस्थेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे यांनी केला आहे.

विनिता गोतमारे यांनी जंगली जातींचा वापर करून तपकिरी (ब्राऊन) कापसाचं वाण शोधून काढलं आहे. म्हणजे जमिनीतून नैसर्गिकरित्याच तपकिरी रंगाचा कापूस उगवतो.

रंगीत कापसाचे चार भारतीय वाण सध्या समोर आलेले आहेत. तसंच बियाणं शेतकऱ्यांनाही देण्यात आलं असून त्यापासून कापडही तयार केलं जात आहे.

कसा शोधला रंगीत कापूस?

डॉ. गोतमारे या कापसाच्या संशोधनाबद्दल सांगताना म्हणाल्या की, "मी सुरुवातीपासूनच जंगली जातींवर काम केलेलं आहे. या जंगली जातींचा वापर करून शेतकऱ्यासांठी उपयुक्त वाण मी तयार करते.

जंगली जातींचं जे वाण शेतकरी लावतात त्यासोबत क्रॉसिंग करून नवीन प्रकारचं वाण तयार करण्याचं काम करताना रंगीत कापसाचे काही डेरिव्हेटीव्हज मला मिळाले. त्यानंतर या रंगीत कापसाचं व्यावसायिक महत्व बघता त्याला स्टेबल करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं.

त्याचा रंग फिका पडू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले. या कामासाठी भरपूर मेहनत आणि वेळ द्यावा लागतो.

जंगली वाणाचं क्रॉसिंग करताना आपल्याला अनेक प्रकारचे वाण मिळतात. पण, त्यातून एकाची निवड करून त्याला स्टेबल करणं मोठं काम असतं."

तपकिरी कापूस

त्यांनी हिरूसुटम (Hirsutum), थर्बेरी (Thurberi), बारबाडन्स (Barbadense) आणि रायमोंडी (Raimondii) या जंगली जातींचा क्रॉस करून त्यामधून प्रोजिन्स मिळवले.

2013 मध्ये वैदही 95 जेनेटीक स्टॉक म्हणून रजिस्टर केला. त्यानंतर पहिलं वाण रिलिज व्हायला 2021 उजाडलं.

डॉ. गोतमारे आणि कापूस संशोधन संस्थेच्या टीमला यासाठी जवळपास 25 वर्ष लागले. त्यांनी 2021 मध्ये वैदही 1 नावाचं पहिलं रंगीत कापसाचं वाण रिलिज केलं. हे वाण खूप गडद तपकिरी रंगाचे आहे. दक्षिणेतल्या राज्यांसाठी ते रिलिज करण्यात आलं होतं.

त्यानंतर आतापर्यंत त्यांनी रंगीत कापसाच्या चार व्हरायटी शोधल्या. ते वाण सेंट्रल आणि साऊथ झोनमध्ये रिलिजही झालं. यामध्ये गडद तपकिरी, फिकट तपकिरी असे शेड्स येतात. अलिकडेच त्यांचं CNH 18529 हे वाण रिलिज झालं.

जगभरात काही देशांमध्ये असे रंगीत कापूस शोधलेले आहेत. पण, हे रंगीत कापसाचे भारतीय वाण जंगली जातींपासून मिळवलेले आहेत हे याचं वेगळेपण असल्याचं डॉ. गोतमारे सांगतात.

विनिता गोतमारे

कापूस संशोधन संस्थेच्या जमिनीवर याचं उत्पादन घेतलं जातं. तसेच सेंद्रीय शेती करणाऱ्या सात ते आठ शेतकऱ्यांनाही त्यांनी बियाणं दिलं आहे. त्याचं कारण म्हणजे, या कापसाला रासायनिक फवारणीची गरज नाही. वर्ध्याच्या खादी ग्रामोद्योगात सुद्धा या तपकिरी रंगाच्या कापसाचं उत्पादन घेतलं जातं.

या कापसाचं उत्पादन घेणाऱ्यांपैकी एक असलेले शेतकरी हरीभाऊ कुंभरे सांगतात, "गेल्या दोन वर्षांपासून आम्ही अर्ध्या एकरात हा कापूस लावतो. पांढऱ्या कापसापेक्षा याचं उत्पन्न कमी आहे. पण, याला रासायनिक फवारणीची गरज नाही. सेंद्रीय फवारणीमध्येच याचं उत्पन्न होतं."

रसायन न वापरता तयार होते कापड

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कापूस संशोधन केंद्र आणि हा तपकिरी कापूस पिकवणारे शेतकरी या सगळ्यांकडून वर्ध्यातील गोपुरीचं खादी ग्रामोद्योग केंद्र कापूस खरेदी करतं.

याला पांढऱ्या कापसापेक्षा जास्त भाव दिला जातो. या कापसापासून सूत काढणं, कापड तयार करणं, त्यापासून फॅशननुसार कपडे तयार करणं असं काम इथं चालतं.

खादी ग्रामोद्योग वसंत फुटाणे यांच्या मार्गदर्शानात काम करतं. ते सांगतात की, "तपकिरी रंगाचा कापूस आमच्यासाठी महत्वाचा आहे. आधी आम्ही कर्नाटकातून हा कापूस घेत होतो. पण, आता येत नाही.

आता नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रातून आमच्यासाठी हा कापूस उपलब्ध झाला आहे. तसेच काही शेतकऱ्यांकडूनही आम्ही कापूस घेतो. हे कापड कमीत कमी प्रदूषण करणारं आहे.

याला पाणी कमी लागतं. ब्लिचिंगसाठी डिटर्जंटची गरज नाही. हायड्रोजन परॉक्साईड वगैरे कुठल्याच रसायनांची गरज नाही. असं म्हणुयात की माणसाकडून पर्यावरणाची होणारी हानी कमी करण्यासाठी हा कापूस अतिशय महत्वाचा आहे. अशा प्रकारचे आणखी रंगीत कापूस आल्यास टेक्सटाईल इंडस्ट्रीमधील प्रदूषण कमी होईल."

कापड रंगवण्यासाठी खूप जास्त पाणी लागतं आणि हेच रसायनिमिश्रित पाणी जिथं सोडलं जातं त्या जमिनीचं किंवा पाण्याच्या स्त्रोताचंही प्रदूषण होतं.

हे प्रदूषण थांबवण्यासाठी रंगीत कापूस महत्वाचा मानला जातो. त्याचं कारण म्हणजे कापसाच्या उत्पादनासाठी फक्त पावसाच्या पाण्याची गरज असते. त्यानंतर या कापसापासून तुमच्या अंगावरील कापड तयार होईपर्यंत याला कुठल्याही रसायनाची किंवा पाण्याची गरज नसते. हे कापड गरम पाण्यातून धुवून थेटही वापरता येतं.

कापूस

हा कापूस नैसर्गिकरित्या रंगीत असल्यानं कुठल्याही प्रकारचे डाय करायची गरज पडत नाही. धुवायला ब्लिंचिंगची गरज नाही. त्यामुळं ते त्वचेसाठीही अधिक चांगलं असतं, असं वर्ध्याचे अनिल फरसोले सांगतात. अनिल हे या कापसापासून बनलेले कपडे वापरतात.

त्यांच्या मते, "आम्ही गेल्या वर्षभरापासून तपकिरी रंगाच्या कापसाचे कपड वापरतो आहोत. खादीचं कापड थोडं आकसलं जातं. पण या कापडाचं तसं झालं नाही. तसेच दोन रंगही एकमेकांमध्ये मिसळले जातात.

पण, याला खादीसोबत वापरलं तरी रंग मिसळत नाही. हे पाहून मला खूप बरं वाटलं.

आपण नैसर्गिक डायपासून रंगवलेले कपडे वापरतो म्हटलं तरी काही ना काही त्रास होतो. पण, नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रंगीत कापसापासून तयार झालेलं कापड मला खूप आवडलं."

फरसोले यांचा मुलगा आणि सून या रंगीत कापसाचे कपडे त्यांच्याबरोबर नेदरलँडला घेऊन गेले. तसंच खादी ग्रामोद्योगातून या रंगीत कापसाच्या कापडाला देशभरात मागणी आहे. पण, त्यासाठी कापसाचं उत्पादन कमी पडत असल्याचं वसंत फुटाणे सांगतात.

ते म्हणतात, "आमचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असं झालं आहे. या तपकिरी रंगाचा कापूस पिकवणारे काही मोजके शेतकरी आहेत.

पण, हा कापूस पर्यावरणस्नेही असल्यानं याचा प्रचार-प्रसार आणखी वाढायला पाहिजे. तसेच यासाठी धोरण ठरवायला हवं. त्यामुळं शेतकरीही कापूस पिकवण्यासाठी पुढाकार घेतील."

या कापसाच्या मर्यादा काय आहेत?

सध्या उत्पादीत होणारा हा रंगीत कापूस फक्त तपकिरी रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत. पण, हा कापूस इतर रंगांमध्ये उपलब्ध का नाही?

त्याचं कारण म्हणजे, सद्या तपकिरी रंग स्टेबल करण्यात यश मिळालं आहे. म्हणजे उन्हात या कापसाचा रंग फिका न पडता आणखी गडद होतो, असं डॉ. गोतमारे सांगतात.

त्या म्हणतात, प्रयोग करताना इतरही रंग मिळाले होते. पण, तपकिरी रंग स्टेबल करण्यात यश मिळालं. आता इतर रंग स्टेबल करून त्या रंगाचा कापूस घेता येईल का? यावरही संशोधन सुरू आहे.

तसेच हा तपकिरी रंगाचा कापूस फक्त हातमागासाठी वापरला जातो. कारण, याच्या लांबी-रुंदीच्या मर्यादा आहेत.

पण, त्यामध्ये सुधारणा करून हाय स्पीड मशिनसाठी हा कापूस कसा वापरता येईल यासाठी डॉ. गोतमारे प्रयत्न करत आहेत.

त्यातून भविष्यात आणखी सुधारित वाण तयार झालं तर पर्यावरणाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं काम त्या माध्यमातून होऊ शकतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)