सुनील ग्रोव्हर: फक्त मिमिक्रीच नव्हे, तर संपूर्ण कॅरेक्टर कवेत घेणारा अभिनेता कसा घडला?

सुनील ग्रोव्हर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनील ग्रोव्हर
    • Author, कल्पना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"जेव्हा त्याला (सुनील ग्रोव्हर) आम्ही पाहत होतो, तेव्हा मला असं वाटलं होतं की, मी स्वत: किती अपात्र आहे. तो कॉमेडी करायचा प्रयत्न करत नाही तर तो ते पात्र निभावतो," सलमान खानने 2017 साली हे वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर जवळपास 9 वर्षांनंतर, म्हणजे आता सलमान खानच्या याच वक्तव्याची आठवण पुन्हा काढली जात आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर येणाऱ्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका एपिसोडमध्ये 'फादर खान' नावाचं एक पात्र स्टेजवर एंट्री करतं आणि सगळ्यांचेच डोळे आश्चर्याने भरून जातात.

प्रेक्षक टाळ्या वाजवत उठून उभे राहतात.

त्या एपिसोडमध्ये पाहुणा म्हणून आलेले चित्रपट निर्माते डेव्हीड धवन सलमानच्या त्याच वक्तव्याची आठवण काढत म्हणतात, "भाईजान की याद दिला दी."

सुनील ग्रोव्हरनं साकारलेलं 'फादर खान'चं पात्र पाहून फक्त डेव्हीड धवनचं नव्हे, तर त्यांचा मुलगा वरूण धवन देखील सुखद धक्क्यात दिसून येतो.

स्टेजच्या समोर बसलेल्या अर्चना पूरन सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धूदेखील आ वासून आश्चर्याने सुनील ग्रोव्हरच्या त्या अॅक्टकडे पाहत होते.

एकीकडे, सुनील ग्रोव्हरने साकारलेली हा जादू पाहून सारे प्रेक्षक अविरत टाळ्या वाजवत होते, तर दुसरीकडे सुनील ग्रोव्हर एक क्षणही चलबिचल न होता अंगीकारलेलं 'फादर खान' हे पात्र लीलया साकारत होता.

खरं तर सुनील ग्रोव्हरनं याआधी अशी अनेक पात्रं कमालीनं साकारली आहेत. त्या पात्रांवरही तितकाच कौतुकाचा वर्षाव झालेला आहे.

पण, यावेळी सुनील ग्रोव्हरनं असं काही करून दाखवलंय, ज्याला फक्त 'मिमिक्री' म्हणता येणार नाही.

फक्त एवढा एकच शब्द त्याच्या कलेसाठी अपुरा ठरेल, असं वाटतं.

कादर खान यांचं पात्र इतक्या खुबीनं साकारलं जाणं, ही अर्थातच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरली आणि म्हणूनच सुनील ग्रोव्हरच्या अभिनयाचा हा व्हीडिओ लागलीच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

अभिनेता गजराज रावने आपल्या एका पोस्टमध्ये लिहिलं, "सुनील ग्रोव्हर फक्त नक्कल करत नाही, तर तो त्या व्यक्तीच्या आत्म्यामध्ये प्रवेश करतो. त्या व्यक्तीचं बोलणं, तिचा लहेजा, तिचे हावभाव अशा सगळ्याच गोष्टी तो आत्मसात करतो. त्याची ही कला दिव्य आहे, तो अद्भूत आहे."

परकायाप्रवेश... परंतु हे कसं शक्य आहे?

नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होणाऱ्या याच शोमध्ये याआधी सुनील ग्रोव्हरने आमिर खानचीही मिमीक्री इतक्या लीलया पद्धतीनं साकारली होती की, तिचंही प्रचंड कौतुक झालं होतं.

आपण आरशासमोर उभे आहोत की काय, असं वाटून स्वत: आमिर खान त्याला पाहून अचंबित झालेला.

सुनील ग्रोव्हरचं तोंडभरून कौतुक करताना आमिर म्हणाला होता, "तो फक्त तुमच्या आवाजाची वा हावभावाची नक्कल करत नाही, तर तो त्यापुढे जातो. तो तुमचा 'भावविचार' समजून घेतो."

त्यानंतर आमिर खान प्रोडक्शनचा चित्रपट 'हॅप्पी पटेल'साठी सुनील ग्रोव्हर आणि आमिर खान एकत्र आले.

आणि त्यांनी सुनीलच्या याच मिमीक्रीचा अत्यंत चलाखीनं वापर करून घेत चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता वीर दाससोबत चित्रपटाचं प्रमोशन केलं.

नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होणाऱ्या याच शोमध्ये याआधी सुनील ग्रोव्हरने आमिर खानचीही मिमीक्री इतक्या लीलया पद्धतीनं साकारली होती की, तिचंही प्रचंड कौतुक झालेलं होतं.

फोटो स्रोत, Pramod Thakur/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होणाऱ्या याच शोमध्ये याआधी सुनील ग्रोव्हरने आमिर खानचीही मिमीक्री इतक्या लीलया पद्धतीनं साकारली होती की, तिचंही प्रचंड कौतुक झालेलं होतं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इतकंच नाही, तर त्याआधीही कपिल शर्माच्या याच शोमध्ये सुनील ग्रोव्हरनं प्रचंड बारकाईनं सलमान खानला देखील हुबेहुब साकारून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

त्यानं सलमान खानची बॉडी लँग्वेज अगदी चिमटीत पकडावी तशी पकडली होती आणि त्याची बोलण्याची एक विशिष्ट ढब हुबेहुब चितारली होती.

त्याच्या या अभिनयाचंही त्यावेळी प्रचंड कौतुक झालं होतं.

काही वर्षांपूर्वी स्वत: सलमान खाननं म्हटलं होतं, "तो कॉमेडी करायचा प्रयत्न करत नाही, तर तो ते पात्र साकारतो. जेव्हा मी आणि सोहेल त्याला पाहत होतो, तेव्हा मला वाटलं होतं की, मी स्वत: किती अपात्र आहे."

याच शोमध्ये सुनील ग्रोव्हरनं काही वर्षांपूर्वी गुत्थी नावाचं एक पात्र साकारलं होतं. ते सुपरहिट झाल्यानंतर सुनील ग्रोव्हरनं टप्प्याटप्प्यानं अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगणपर्यंत अनेक पात्रांना प्रतिबिंबासारखं साकार केलं.

सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांचंही त्यानं साकारलेलं पात्र असंच काहीसं होतं.

शोमध्ये 'फुलजार' होऊन आलेला सुनील सगळ्यांना अचंबित करून गेला.

सुनील ग्रोव्हरच्या या सगळ्या अभिनयांकडे पाहिलं की वाटतं तो एखादं पात्र अंगावर चढवत नाही, तर तो स्वत:च त्या पात्रामध्ये प्रवेश करतो. परकाया प्रवेश म्हणतात तो हाच.

सुनील ग्रोव्हरच्या या सगळ्या अभिनयांकडे पाहिलं की वाटतं तो एखादं पात्र अंगावर चढवत नाही, तर तो स्वत:चं त्या पात्रामध्ये प्रवेश करतो. परकाया प्रवेश म्हणतात तो हाच.

फोटो स्रोत, Raajessh Kashyap/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, सुनील ग्रोव्हरच्या या सगळ्या अभिनयांकडे पाहिलं की वाटतं तो एखादं पात्र अंगावर चढवत नाही, तर तो स्वत:चं त्या पात्रामध्ये प्रवेश करतो. परकाया प्रवेश म्हणतात तो हाच.

पण प्रश्न असा पडतो की, सुनील ग्रोव्हरला हे कसं काय शक्य होतं?

वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यानं या प्रश्नावर उत्तर दिलेलं आहे.

त्या सगळ्याचा सार इतकाच की, सुनील ग्रोव्हर या पात्रांना फक्त बारकाईनं पाहतच नाही, तर तो या पात्रांचा अनुभव घेतो. तो या पात्रांचं जे चरित्र आहे, त्यामध्ये असा काहीसा विरघळून जातो की, मग ते साकारलेलं पात्र पाहताना लोकांची बोटे अंचब्याने आपोआप तोंडात जातात.

'द कपिल शर्मा शो'नं सुनील ग्रोव्हरला एक असा मुक्काम मिळवून दिला, जो इतर कोणत्याही शोला मिळवून देता आला नाही.

मध्यंतरी सुनील ग्रोव्हरनं कपिल शर्माच्या टीममधून बाहेर पडून स्वत:हून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मात्र, तो त्यामध्ये यशस्वी झाला नाही.

कपिल शर्मासोबतचे मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप यांमुळे सुनील ग्रोव्हर मधला बराच मोठा काळ या कॉमेडी शोपासून दूर होता. या दरम्यान सुनीलने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, त्याला प्रसिद्धी मिळाली ती कपिल शर्मा शोमध्येच.

शरद जोशी आवडते लेखक

हरियाणातील मंडी डबवालीमध्ये जन्मलेल्या सुनील ग्रोव्हरसाठी इथवरचा प्रवास तितकाही सोपा नव्हता.

चंदीगडच्या जीजीडीएसडी कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्यासाठी अभिनयाचे दरवाजे उघडले.

'जिस्ट' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनील सांगतो की, कशाप्रकारे त्याची जसपाल भट्टी यांच्या 'फुल टेन्शन' या शोमधून कॉमेडीशी ओळख झाली.

1995 मध्ये आलेल्या या व्यंगात्मक विनोदी कार्यक्रमासाठी जसपाल भट्टी काही कलाकारांच्या शोधात होते.

जेव्हा सुनील ग्रोव्हरला याबद्दल कळलं, तेव्हा त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, 'तो तोंड घेऊन तसाच निघून गेला.'

शोसाठी त्याची निवड झाली होती. पण सुनील सांगतो की, पहिल्या दिवशी त्याला पाहिल्यानंतर 'क्लर्क टाइप' भूमिकेसाठी त्याची निवड करण्याचं ठरलं होतं, हे त्याला भट्टी यांच्याकडून खूप नंतर कळालं.

या शोमध्ये सुनील ग्रोव्हर पहिल्यांदा टीव्ही स्क्रीनवर दिसला होता.

'द कपिल शर्मा शो'मुळे सुनील ग्रोव्हरला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images

फोटो कॅप्शन, 'द कपिल शर्मा शो'मुळे सुनील ग्रोव्हरला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

त्याला पाहण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब टीव्हीसमोर बसलं होतं.

'डाकू आ गए, डाकू आ गए, डाकू आ गए...'

फक्त एवढाच संवाद सुनीलचा त्या शोमध्ये होता. खरं तर तो पहिल्यांदाच टीव्हीवर दिसणार होता. पण अगदी काही सेकंदापुरताच. मात्र, तेवढंदेखील त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना पाहता आलेलं नव्हतं. कारण, त्यावेळी ते बाथरूम वा किचन वा घरात दुसरीकडे कुठेतरी होते.

29 वर्षांनंतर, सुनील एका यूट्यूब शोमध्ये त्याच्या मुंबईतील सुंदर घराचं दर्शन घडवताना दिसतो.

त्यामध्येच त्याचं पुस्तकांबद्दल किती प्रेम आहे, हेदेखील दिसून येतं.

त्याच्या कपाटात ठेवलेल्या इंग्रजी-हिंदी पुस्तकांमध्ये, श्रीलाल शुक्ला यांनी लिहिलेली 'राग दरबारी' ही अजरामर कादंबरीसुद्धा दिसून येते.

सुनील या शोमध्ये सांगतो की, व्यंग्यकार शरद जोशी हे त्याचे आवडते लेखक आहेत. तसेच त्यांचं 100 व्यंग्यांचा संग्रह असलेलं पुस्तक कदाचित त्यांच्या सर्वात आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे.

ही माहिती फार नाही, पण एवढं नक्कीच सांगते की, शरद जोशींप्रमाणेच ग्रोव्हरच्या विनोद कलेतही समाजाची नाडी अचूकपणे ओळखण्याची जादू आहे.

फरक फक्त एवढाच आहे की, जोशी व्यंग्यात्मक विनोद करायचे तर सुनील 'ऑब्झर्व्हेशनल कॉमेडी' करतो.

मायक्रो ऑब्झर्व्हेशनची जादू

सुनील ग्रोव्हरची नजर सामान्य लोकांवरही असते. तो त्यांनाही बरोबर टिपून घेतो.

हे त्याच्या 2008 च्या रेडिओ शोमधून दिसून येतं. या शोमध्ये तो सुदर्शन उर्फ 'सूड' या नावाचं एक पात्र साकारायचा.

हे पात्र कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होतं.

रेडियो मिर्चीवर साकारलेल्या 'सूड'च्या या पात्रानेच त्याला पहिल्यांदा ओळख मिळवून दिली होती, असं सुनील सांगतो.

'हंसी के फव्वारे' या काल्पनिक विनोदी पुस्तकातून अत्यंत बोरिंग आवाजात विनोद वाचून दाखवणारं त्याचं लोकप्रिय पात्र त्याच्याच डोक्यातून तयार झालेलं होतं, असं तो सांगतो.

सुनील ग्रोव्हरची नजर सामान्य लोकांवरही असते. तो त्यांनाही बरोबर टिपून घेतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनील ग्रोव्हरची नजर सामान्य लोकांवरही असते. तो त्यांनाही बरोबर टिपून घेतो.

त्या वेळी, रेडिओ मिर्चीचे नॅशनल क्रिएटिव्ह हेड असलेल्या रणजीत मडगावकर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सुनीलसोबत काम केलं होतं.

ग्रोव्हरचा खास गुण म्हणजे त्याच्याकडे असलेलं 'मायक्रो ऑब्झर्व्हेशन', असं मडगावकर बीबीसीशी बोलताना सांगतात.

प्रत्येक गुरुवारी चहाच्या टपरीवर 'सूड'च्या पटकथेवर चर्चा व्हायची. तेव्हा मडगावकरांच्या लक्षात आलं की सुनील एखाद्या व्यक्तीच्या अगदी बारीक-सारीक हावभावांचंही कसं बारकाईनं निरीक्षण करतो.

एखादी व्यक्ती चहा कसं मागवते, घड्याळाकडे कसं पाहते, आपल्या कुटुंबाबद्दल कसं बोलते. कोणतीही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटत नसे आणि मग जणू काही एखादं बटण दाबलं जायचं आणि सुनील स्वत: सुनील न राहता, अगदी हुबेहुब ते पात्रचं होऊन जायचा.

सुनीलच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाचं बारकाईनं निरीक्षण केलेल्या मडगावकर यांनी सांगितलं की, "कुठंतरी अंतर्मनात मला हे ठाऊक होतं की, माझा जोडीदार हेच करत राहिल. कारण, लोकांच्यात दडलेली पात्रं बाहेर काढणं सुनीलला नैसर्गिकरित्या जमतं."

कदाचित म्हणूनच सुनील ग्रोव्हरची इंस्टाग्राम आयडी @whosunilgrover म्हणजेच 'सुनील ग्रोव्हर कोण आहे?' अशी असावी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)