ट्वेन्टी 20 वर्ल्ड कप : राजकारणाच्या सावटाखाली स्पर्धा, भारत 'हा' इतिहास बदलणार?

फोटो स्रोत, Getty Images
कोण म्हणतं, क्रिकेट हा फक्त एक खेळ आहे? अजिबातच नाही.
मैदानावरची दोन संघांमधली लढत हा एवढासाच काय तो यातला खेळाचा भाग. मैदानाबाहेर मात्र राजकारणापासून अर्थकारणापर्यंत सगळं काही या खेळाशी जोडलं गेलं आहे.
यंदाचा पुरुषांचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप हे या सगळ्या समीकरणांचं उत्तम उदाहरण बनला आहे.
साडेचार वर्षांत चौथ्यांदा या स्पर्धेचं आयोजन होतंय, तेही भारत आणि श्रीलंका मिळून करतायत.
त्यात गतवेळच्या विजेत्या टीम इंडियाचा नव्या दमाचा, नव्या नेतृत्त्वातला संघ यावेळेस आपलं विजेतेपद राखणार की नाही, याची उत्सुकता आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चेचा भाग बनलं आहे भारताचं शेजारी देशांसोबतचं नातं आणि आंतरराष्ट्रीय राजकारण.
कारण बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डानं तिथल्या सरकारसोबत बैठकीनंतर सुरक्षेचं कारण देत स्पर्धेतून माघार घेतली.
आपल्या टीमचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवले जावेत, अशी मागणी त्यांनी केली होती, जी जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीनं नाकारली. त्यानंतर बांगलादेशच्या ऐवजी स्कॉटलंडचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला.
पण मग पाकिस्ताननं बांगलादेशला पाठिंबा दर्शवत भारतासोबतच्या सामन्यात खेळायला नकार दिला आहे.
आयसीसीमधल्या बीसीसीआयच्या वर्चस्वाचीही त्यानंतर चर्चा झाली. स्पर्धा सुरू होण्याआधीच तिला अशा वादांचं गालबोट लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर क्रिकेटसाठी यावेळेसचा ट्वेन्टी20 वर्ल्ड कप मागच्या विश्वचषकासारखाच महत्त्वाचा आहे. कारण हा खेळ ऑलिंपिकमध्ये पुनरागमनाच्या उंबरठ्यावर आहे.
2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला आहे. त्या ऑलिंपिकपूर्वी सध्याचा वर्ल्ड कप ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. भारताला त्यात इतिहास बदलण्याची संधीही आहे.
अशी असेल स्पर्धा
7 फेब्रुवारी ते 8 मार्च अशी साधारण महिनाभर ही स्पर्धा रंगणार आहे. आधी साखळी फेरी, मग सुपर 8 आणि मग नॉकआऊट (उपांत्य आणि अंतिम फेरी) अशा पद्धतीनं हे सामने होतील.
भारतात मुंबईचं वानखेडे स्टेडियम, कोलकात्यातलं ईडन गार्डन्स, चेन्नईचं एम. ए. चिदंबरम स्टेडियम, दिल्लीतलं अरुण जेटली स्टेडियम आणि अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम इथे हे सामने भरतील.
तर श्रीलंकेतील कोलंबोमधल्या आर. प्रेमदासा आणि सिंहलीज स्पोर्टस क्लबच्या मैदानात तसंच कँडीमधील पालेकेले स्टेडियम्समध्ये हे सामने खेळवले जातील.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एक उपांत्य सामना खेळवला जाईल. तर फायनल अहमदाबादमध्ये आयोजित आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण भारत-पाकिस्तानमधल्या तणावामुळे पाकिस्तानचे सगळे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. म्हणजे उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान आमने-सामने आले किंवा पाकिस्तान अंतिम फेरीत गेलं, तर ती लढत श्रीलंकेत होईल.
हा आहे 'ग्रुप ऑफ डेथ'
या स्पर्धेत एकूण 20 संघांचा समावेश असून, त्यांची 4 गटांत विभागणी करण्यात आली आहे. इटलीचा संघ या स्पर्धेतून वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे.
चारही गटांतून प्रत्येकी 2 टॉप टीम्स सुपर 8 फेरीत प्रवेश करतील. ट्वेन्टी20च्या जागतिक क्रमावरीनुसार (रँकिंग) प्रत्येक टीमला सीडींग म्हणजे मानांकन दिलेलं आहे. त्यानुसारच सुपर एट फेरीमध्ये टीम्सची 2 गटांत विभागणी केली जाईल.
त्यातून प्रत्येकी 2 संघ नॉकआऊट स्टेजमध्ये 2 उपांत्य सामन्यांत खेळतील आणि त्यातून फायनलमध्ये स्थान मिळवायचा प्रयत्न करतील.
ग्रुप ए – भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलँड्स, नामिबिया
ग्रुप बी – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान
ग्रुप सी – इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ, इटली, स्कॉटलंड
ग्रुप डी – न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्येक गटातून दोनच संघ पुढच्या फेरीत जाणार असल्यामुळे अनेक जण 'ग्रुप डी'ला 'ग्रुप ऑफ डेथ' म्हणत आहेत. कारण या गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे तीन बलवान संघ या दोन जागांसाठी झुंजणार आहेत.
ग्रुप स्टेजमध्ये भारताचं वेळापत्रक
7 फेब्रुवारीला दुपारी नेदरलँड्स आणि पाकिस्तानमधल्या सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. त्याच दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडिया यूएसएविरुद्ध लढतीनं टी20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करेल.
15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नियोजित आहे, पण पाकिस्तान या सामन्यात खेळणार नाही.
7 फेब्रुवारी – भारत विरुद्ध यूएसए – मुंबई
12 फेब्रुवारी – भारत विरुद्ध नामिबिया – नवी दिल्ली
15 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान – कोलंबो (पाकिस्तानची माघार)
18 फेब्रुवारी – भारत विरुद्ध नेदरलँड्स – अहमदाबाद
भारताला विक्रमाची संधी
पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या इतिहासात आजवर यजमान देशाला कधीच विजेतेपद मिळवता आलेलं नाही. तसंच कोणतीही टीम सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकू शकलेली नाही.
भारताला या दोन्ही गोष्टी बदलून नवा विक्रम रचण्याची संधी आहे.
टीम इंडियानं 2007 साली पाकिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला वहिला ट्वेन्टी20 वर्ल्ड कप जिंकला होता.
त्यानंतर 17 वर्षांनी 2024 साली वेस्ट इंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून ही ट्रॉफी जिंकली होती.
पण दोन वर्षांपूर्वी त्या अविस्मरणीय विजयात वाटा उचलणारे रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.
आता प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानात विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
असा आहे भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक फलंदाज), संजू सॅमसन (यष्टीरक्षक फलंदाज), रिंकु सिंग, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
स्पर्धेचे नियम
ट्वेन्टी20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक डावाची सुरुवात 6 षटकांच्या पॉवरप्लेने होईल – म्हणजे या काळात क्षेत्ररक्षणावरचे निर्बंध लागू असतील. बहुतांश वेळा फलंदाज याचा जास्तीत जास्त फायदा उचलताना दिसतात.
20 षटकांनंतर दोन्ही संघांच्या धावा समान असतील, तर सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल आणि 6-6 चेंडूंच्या या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता ठरेल. जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली, तर निकाल लागेपर्यंत आणखी सुपर ओव्हर्स खेळवल्या जातील.
या स्पर्धेत सामना एकूण 3 तास आणि 10 मिनिटे चालणार आहे. म्हणजे प्रत्येक डावासाठी 1 तास 25 मिनिटे आणि दोन्ही डावांमध्ये 20 मिनिटांचा मध्यांतर असणार आहे. वेळेचं बंधन न पाळल्यास टीमला दंड ठोठवला जाऊ शकतो.
तसंच इतर मर्यादित षटकांच्या सामन्यांप्रमाणे या स्पर्धेतही स्टॉप-क्लॉक नियम लागू असेल. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाने एक ओव्हर संपल्यानंतर 60 सेकंदांच्या आत पुढील ओव्हर टाकण्यासाठी तयार व्हायला हवे. तसं नसल्यास, टीमला दंड ठोठावला जाऊ शकतो.
अंपायरच्या निर्णयावर रीव्ह्यू घेण्याची संधी इथेही मिळेल. प्रत्येक संघाला प्रति डाव दोनदाच अयशस्वी रीव्ह्यू करता येईल.
पण पावसाने किंवा खराब हवामानामुळे सामना थांबला तर काय होईल?
तर सामना थांबल्यास डीएलएस (डकवर्थ–लुईस–स्टर्न) पद्धतीने निकाल लावला जाईल, मात्र त्यासाठी आवश्यक किमान षटके पूर्ण होणं गरजेचं आहे.
साखळी फेरीत प्रत्येक बाजूने किमान 5 षटके सामना खेळणं गरजेचं आहे, तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत किमान 10 षटकं खेळ होणं गरजेचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











