खूप प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमुळे पोटावर काय परिणाम होऊ शकतो?

प्रोसेस्ड फूड तोटे/प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो
    • Author, मेलिसा होगनबूम
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

नाश्त्याला ब्रेड, दुपारच्या जेवणात पॅक्ड फूड आणि संध्याकाळी असेच काहीतरी पदार्थ… आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात हे सर्व अगदी सामान्य झालं आहे.

परंतु, आपण खात असलेल्या या सोयीस्कर अन्नामागे आपल्या पोटात नेमकं काय घडतं, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? चव, मऊपणा आणि टिकाऊपणासाठी अन्नात मिसळले जाणारे घटक आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करतात, हे कधी जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) जास्त काळ ताजे राहण्यासाठी त्यात घालण्यात येणारे पदार्थ आपल्या पोटातील चांगल्या सूक्ष्मजंतूंना हानी पोहोचवू शकतात.

आपल्या शरीरात लाखो-कोट्यवधी पेशींचे सूक्ष्मजीव राहतात, जे आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. याला आपण 'मायक्रोबायोम' म्हणतो.

"आपल्या पोटातील सूक्ष्मजीवांच्या विविधतेला आपण जंगलासारखं समजू शकतो. जंगलात जसं जितके अधिक आणि वेगवेगळे जीव असतात, तितके ते संकटांशी लढण्यासाठी सक्षम असतात, तसेच आपल्या शरीरातील सूक्ष्मजीव जितके अधिक विविध असतात, तितकं आपलं आरोग्य मजबूत राहतं," असे डीकिन युनिव्हर्सिटीच्या पोषणतज्ज्ञ मेलिसा लेन सांगतात.

शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, आरोग्यदायी आणि वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबायोम आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे आपल्या मूडपासून, पचनक्रिया, आणि मेंदूपर्यंत सर्वकाही प्रभावित करतं.

पोटातील बॅक्टेरियांची विविधता कमी असलेल्या लोकांना झोपेची समस्या, पचनाचा त्रास आणि जळजळ होण्याची शक्यता जास्त असते. तर ज्या लोकांच्या पोटात बॅक्टेरियांची विविधता जास्त असते, त्यांचं आयुष्य दीर्घ आणि आरोग्य चांगलं राहतं.

किंग्ज कॉलेज लंडनच्या पोषणतज्ज्ञ प्रा. सारा पेरी म्हणतात, "ही एक संपूर्ण प्रणाली किंवा परिसंस्था आहे. आपल्या शरीरातील हे एक अतिरिक्त अवयवासारखं आहे."

परंतु, संशोधनातून दिसतं की, आपण रोज जे अन्न खातो त्यातील काही गोष्टी आपल्या पोटातील या सूक्ष्मजीवांच्या प्रणालीस हानी पोहोचवू शकतात. विशेषतः जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड्स खाल्ल्याने पोटातील मायक्रोब्स (सूक्ष्मजंतू) बाधित होऊ शकतात, बदलू शकतात.

यामागचं एक कारण म्हणजे आपल्या अन्नात जास्त प्रमाणात असलेले अ‍ॅडिटिव्ह्ज (पदार्थ) आहेत. यावरून, हे अ‍ॅडिटिव्ह्ज आपल्या पोटावर कसे परिणाम करतात?, हा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला.

आपण अन्नात काय घालतो आणि ते काम काय करतं?

आता जेव्हा तुम्ही सुपरमार्केटमधील अन्नपदार्थांच्या घटकांची यादी वाचाल, तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल की, त्यात किती फूड इमल्सीफायर्स (तेल आणि पाणी यांसारख्या सहसा न मिसळणाऱ्या पदार्थांना एकत्र ठेवणारे आणि त्यांचे मिश्रण स्थिर करणारे सक्रिय घटक), आर्टिफिशियल स्वीटनर्स आणि फूड कलर्स मिसळले जातात.

ते अन्नाला चवदार बनवण्यासाठी, कुरकुरीत ठेवण्यासाठी आणि जास्त काळ टिकवण्यासाठी अनेक मार्ग वापरतात.

उदाहरणार्थ- मी अन्नातील पोषण तपासण्यासाठी (पौष्टिक गुणवत्ता) एका अ‍ॅपचा वापर करतो. त्या अ‍ॅपनुसार, अलीकडे मी एक आरोग्यदायी चिकन सॅलड घेतलं, त्यात उच्च जोखीम असलेले अ‍ॅडिटिव्ह्ज होते.

त्यात भरपूर इमल्सीफायर्स होते. इमल्सीफायर्स म्हणजे असे पदार्थ जे तेल आणि पाणी मिक्स म्हणजे एकत्रित होण्यास मदत करतात. सामान्यतः जास्त प्रोसेस केलेल्या अन्नपदार्थात हे आढळून येतात.

जास्त प्रोसेस केलेल्या अन्नात वापरले जाणारे इमल्सीफायर्स पोटाच्या आजारांशी, जसं की इन्फ्लेमेटरी बाउल डिसिजशी (दाहक आतड्यासंबंधीचा आजार) जोडले जाऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जास्त प्रोसेस केलेल्या अन्नात वापरले जाणारे इमल्सीफायर्स पोटाच्या आजारांशी, जसं की इन्फ्लेमेटरी बाउल डिसिजशी (दाहक आतड्यासंबंधीचा आजार) जोडले जाऊ शकतात.

तोंडात जाऊन वितळणाऱ्या आणि मऊ असलेल्या तुमच्या आवडत्या आइस्क्रीमचे टेक्स्चर इमल्सीफायर्समुळे असते. त्यामुळेच आइस्क्रीम जास्त काळ टिकते.

इमल्सीफायर्स ब्रेडला जास्त काळ मऊ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे घरी बनवलेल्या केकपेक्षा दुकानातून घेतलेला केक जास्त काळ मऊ राहतो.

एका अभ्यासानुसार, ब्रिटिश सुपरमार्केटमधील 6,640 वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये इमल्सीफायर्स आहेत. लक्षात घ्या की, हे त्या अभ्यासात तपासल्या गेलेल्या अन्नपदार्थांच्या निम्मे आहे.

मग, याबद्दल चिंता का आहे? संशोधन सांगतं की हे, अ‍ॅडिटिव्ह्ज पोटातील सूक्ष्मजीवांवर वाईट परिणाम करू शकतात. त्यांना इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज, चिडचिडेपणा आणि कोलन कॅन्सरशी जोडले जाते.

प्राण्यांवर आणि माणसांवर केलेल्या अभ्यासातून इमल्सीफायर्स आणि खराब आरोग्य यांच्यात थेट संबंध असू शकतो, असं दिसून येतं.

मायक्रोबायोमवर कसा परिणाम होतो?

फ्रान्समधील पॅरिस येथील इन्स्टिट्यूट पाश्चरमध्ये उंदरांवर अभ्यास केला गेला. हा अभ्यास बेनोइट चेजिंग यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यात आढळलं की, दोन सामान्य इमल्सीफायर्सचे कमी प्रमाणही पोटातील बॅक्टेरियाला पोटाच्या भिंतीजवळ पोहोचू देते. त्यामुळे सूज आणि आजाराची लक्षणे दिसू शकतात.

ज्या उंदरांना आधीच पोटाचा त्रास होता, त्यांच्यात सूज, जळजळ जास्त गंभीर आणि तीव्र स्वरूपाची दिसली.

साधारणपणे, पोटाच्या भिंतीवर असलेली लाळ किंवा श्लेष्मा पोटातील सूक्ष्मजीवांना सुरक्षित ठेवते आणि त्यामुळे सूज, जळजळ कमी करण्यास मदत होते.

जेव्हा बॅक्टेरिया लाळेच्या संरक्षणात्मक थराला नुकसान पोहोचवतात, तेव्हा दीर्घकालीन दाहक आजार होऊ शकतात, असे चेजिंग म्हणाले.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अनेक अभ्यासात असं दिसून आलं की, हे मानवी आरोग्यावरही परिणाम करू शकते. फ्रान्समध्ये 2024 मध्ये 1 लाखांहून अधिक लोकांवर अभ्यास केला गेला. त्यात आढळलं की, इमल्सीफायर्सचा जास्त संपर्क असलेल्या लोकांमध्ये टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

90 हजारहून अधिक लोकांवर आणखी एका अभ्यासात इमल्सीफायर्स आणि स्तन तसेच प्रोस्टेट कॅन्सर यांच्यातील संभाव्य संबंध आढळून आला.

अर्थात, हे फक्त सहसंबंध होते. चेजिंग आणि त्यांच्या टीमने पोटाचे नमुने गोळा केले. एका लहान मानवी अभ्यासात त्यांनी पाहिलं की, जर एखाद्या निरोगी व्यक्तीने अन्नात थिकनर (पदार्थ घट्ट करणे) म्हणून इमल्सीफायर्स घेतले, तर ते पोटातील सूक्ष्मजीवांना म्हणजेच मायक्रोबायोटाला अडथळा आणतात. यामुळे निरोगी सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते.

किंग्ज कॉलेज लंडनमधील पोषणतज्ज्ञ प्रा. केव्हिन व्हेलन आणि चेजिंग यांनी क्रोहन रोगाने ग्रस्त लोकांवर अलीकडेच एक क्लिनिकल चाचणी केली होती.

या चाचणीमध्ये, इमल्सीफायर-प्रतिबंधित आहार घेणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या आहाराचा भाग म्हणून इमल्सीफायर घेणे सुरू ठेवणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट जास्त लक्षणे आढळून आली होती.

इमल्सीफायर्सबद्दल काळजी असूनही, त्यांना पूर्णपणे टाळावे का, याबाबत कुठलीही साधी मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. व्हेलन यांच्या मते, याचं एक कारण आहे की आपल्या अन्नात खूप अ‍ॅडिटिव्ह्ज आहेत.

त्यातील कोणते इमल्सीफायर्स हानिकारक आहेत किंवा त्यांचे मिश्रण काही नुकसान करते का, हे शास्त्रज्ञांना अजून निश्चितपणे माहिती नाही.

चेजिंग स्पष्ट करतात की, आपण जे सर्व इमल्सीफायर्स खातो, ते अन्नउद्योगाने मान्य केले आहेत. ते म्हणतात, "त्यांची चाचणी फक्त विषारीपणा किंवा डीएनएमध्ये दोषांसाठी केली जाते. हे दोन्हीबाबतीत चांगले आहेत. परंतु, पोटातील सूक्ष्मजीवांवर त्यांचा थेट परिणाम होण्यासाठी यापूर्वी त्यांची चाचणी घेण्यात आलेली नाही."

युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी म्हणते, "युरोपियन युनियनमध्ये सर्व अन्न अ‍ॅडिटिव्ह्जना 'ई नंबर' दिला जातो. अन्नात वापरण्यापूर्वी त्यांची सुरक्षितता तपासली जाते."

त्याचप्रमाणे, अमेरिकेचे फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणते, "बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या खाद्यपदार्थात अ‍ॅडिटिव्ह वापरण्यापूर्वी एफडीएची (अन्न आणि औषध प्रशासन) मान्यता असणे आवश्यक आहे."

चेजिंग म्हणतात की, "त्यांचे संभाव्य परिणाम नक्की असतात. ही रासायनिक द्रव्ये आणि पोषणतत्त्वे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतात, त्याला 'कॉकटेल इफेक्ट' म्हणतात.

खूप बदल असल्यामुळे एका अ‍ॅडिटिव्हचा परिणाम दुसऱ्यापासून वेगळा ओळखणे कठीण आहे. लॅबमध्ये मानवी पेशींवर केलेल्या अभ्यासातून दिसतं की, सामान्य प्रमाणात घेतलेल्या अनेक अ‍ॅडिटिव्ह्जच्या एकत्रित परिणामांचा पेशींवर अधिक नुकसानाशी संबंधित आहे."

याव्यतिरिक्त, अलीकडील एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, अन्न प्रक्रिया करण्याची पद्धत देखील पोटाच्या म्हणजेच आतड्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

एका अनिश्चित (यादृच्छिक) नियंत्रित चाचणीत, लेन आणि त्यांच्या टीमला समजलं की, जास्त प्रोसेस केलेल्या अन्नामुळे पोटातील सूक्ष्मजीवांची विविधता कमी होते. टीमने तीन आठवडे लोकांच्या दोन गटांची तुलना केली. दोन्ही गटांनी कमी कॅलरी असलेला आणि पोषणतत्त्वे जवळपास सारखाच असलेला आहार घेतला.

थोडक्यात, एका गटाने शेक, सूप आणि बारसारख्या जास्त प्रोसेस केलेले 'मील रिप्लेसमेंट फूड्स' घेतले. दुसऱ्या गटाने कमी प्रोसेस केलेला, ताज्या बनवलेल्या अन्न पदार्थाचा आहार घेतला आणि जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड टाळले.

दोन्ही गटांतील लोकांचे वजन जवळपास समान प्रमाणात कमी झाले. तरीही, पोटातील बॅक्टेरियात मोठा फरक होता. ज्यांनी कमी ते जास्त प्रोसेस केलेलं अन्न घेतले, त्यांचे मायक्रोबायोम विविध होते.

जास्त प्रोसेस केलेले अन्न खाणाऱ्या गटात विविधता कमी होती आणि त्यांना बद्धकोष्ठतेसारखा त्रास अधिक होता.

ज्यांच्या पोटातील बॅक्टेरियांची विविधता कमी होती, त्यांना पोट फुगणे आणि पोटदुखी यासारख्या समस्या आल्या.

टीमने नेमकं कारण सांगितलेलं नसलं, तरी लेन म्हणतात की, हे फायबरच्या वेगवेगळ्या प्रकारामुळे घडलं असावं.

त्यांच्या मते, "जास्त प्रोसेस केलेल्या आहारात खूप अ‍ॅडिटिव्ह्ज होते आणि कमी प्रोसेस केलेले अन्न होते. तर कमी ते मध्यम प्रोसेस केलेल्या आहारात संपूर्ण धान्यापासून मिळणारे वेगवेगळे फायबर होते आणि खूप कमी अ‍ॅडिटिव्ह्ज होते."

ताज्या घरच्या अन्नाची निवड करा

दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, जास्त प्रोसेस केलेल्या अन्नात शरीराला लागणारी पोषणतत्त्वे कमी असतात, ज्यामुळे आतड्यांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सर्वांना माहितीच आहे की, तंतू आणि पॉलीफेनॉलने समृद्ध आहार पोटातील बॅक्टेरियाला पोषण देतो. पॉलीफेनॉलमध्ये सूज कमी करणारे म्हणजे दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

पुरावे वाढत गेले, तसेच मी ज्या लोकांशी बोललो, त्यांना विचारले की इमल्सीफायर्सच्या काही हानिकारक परिणामांपासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे?

पेरी म्हणतात की, शक्य असल्यास ताजे घटक वापरून जेवण तयार करणे सर्वोत्तम आहे. ते म्हणतात की, जास्त प्रोसेस केलेले अन्नपदार्थ पूर्णपणे टाळणं शक्य नाही.

व्हेलन यांनीही सहमत दर्शवत म्हटलं की, "मी असं म्हणत नाही की, अ‍ॅडिटिव्ह्ज असलेलं अन्न कधीही खाऊ नये. मी स्वतःही तसं करत नाही, आणि लोकांनाही असं करण्याचा सल्ला देत नाही. पण आपण निरोगी आहाराबद्दल विचार करू शकतो. आपल्या आयुष्यात अन्न खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे."

स्पष्ट शब्दांत सांगायचं झाले, तर संयम दाखवणं आवश्यक आहे. केरी म्हणतात की, "काय खाऊ नये यावर लक्ष देण्यापेक्षा, काय खावं याचा विचार करावा."

हे विशेषतः नाश्त्यासाठी जास्त लागू होतं, कारण नाश्त्यातून आपल्याला रोजच्या कॅलरींचा मोठा भाग मिळतो.

शेवटी, शक्य तितकं ताजं अन्न खाणं हा एक चांगला नियम आहे. यामुळे आपल्या शरीराला आणि पोटातील सूक्ष्मजीवांना फायदा होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)