ओसीडी म्हणजे नक्की काय? 'नको असलेले विचार' कसे ओळखायचे? असे विचार सारखे का येतात?

ओसीडी म्हणजे नक्की काय? नको असलेल्या विचारांना कसं ओळखाल?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, यास्मिन रुफो
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

हे वाचायला थोडे विचित्र वाटेल, पण आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी असे वेडेवाकडे विचार येतात. समजा, तुम्ही एका शांत मीटिंगमध्ये बसला आहात आणि अचानक डोक्यात विचार येतो की, "मी आता जोरात ओरडलो तर?" किंवा गाडी चालवताना वाटते की, "गाडी समोरच्या भिंतीवर धडकली तर?"

या त्रासदायक प्रसंगांना 'नको असलेले विचार' म्हणतात. आपल्यापैकी बहुतेक जण वेळोवेळी याचा अनुभव घेतात आणि या विचारांना सहज झटकून टाकू शकतात.

पण काही लोकांसाठी हे विचार एक मोठे वेड किंवा ध्यास होऊ शकतात, जे त्यांना काही विशिष्ट प्रकारच्या कृती करायला भाग पाडतात.

संशोधनातून असं दिसून येतं की अनेकांना वेळोवेळी नको असलेले विचार डोक्यात येतात (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संशोधनानुसार, आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी 'नको असलेले विचार' सतावतात. हे अगदी सामान्य आहे (प्रातिनिधिक फोटो)

डॉ. नीना हिग्सन-स्वीनी जेव्हा लहान होत्या, तेव्हा त्यांच्या मनात एक विचित्र भीती असायची. त्यांना वाटायचं की शाळेतून घरी येताना जर मनात एखादाही वाईट विचार आला, तर त्यांच्या घरच्यांना काहीतरी इजा होईल.

त्या म्हणतात, "चालताना चुकून जरी एखादा वाईट विचार मनात आला, तर मी थांबायचे आणि बस स्टॉपपासून पुन्हा चालायला सुरुवात करायचे. मला मनात सारखं असं वाटायचं की, जर मी असं केलं नाही आणि घरी कोणाचं काही वाईट झालं, तर त्याला मीच जबाबदार असेन."

जगातील 1 ते 3% लोकांना ओसीडीचा त्रास असतो.

नीना जेव्हा 10 वर्षांच्या होत्या, तेव्हाच त्यांना ओसीडी असल्याचे समजले होते. आज त्या इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत मानसशास्त्र विषयावर संशोधन करत असून लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या तज्ज्ञ आहेत.

नीना यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, "मनात वारंवार येणारे वेडेवाकडे विचार हे आपल्या इच्छेविरुद्ध आणि नको असतानाही येतात. दुसरीकडे, या विचारांमुळे होणारी भीती किंवा अस्वस्थता कमी करण्यासाठी आपण ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो, त्यांना 'कंपल्शन' म्हणतात."

जगातील 1 ते 3 टक्के लोक ओसीडीच्या त्रासाला तोंड देत असावेत, असा एक अंदाज आहे.

हे नको असलेले विचार माणसाला खूप मानसिक ताण देतात. विशेष म्हणजे, तुम्ही प्रत्यक्षात जसे आहात किंवा तुमचे जे विचार आहेत, त्याच्या अगदी उलट आणि विचित्र विचार तुमच्या मनात डोकावतात.

काही लोकांना तेच तेच विचार डोक्यात येऊन त्यांचं वागणं एका विशिष्ट प्रकारचं बनतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेव्हा हे विचित्र विचार माणसाच्या मनावर ताबा मिळवतात, तेव्हा तो त्याच त्याच कृती वारंवार करायला मजबूर होतो

नीना सांगतात की, "कधीकधी आपल्या माणसांना इजा पोहोचवण्याचे विचार मनात येतात. काही वेळा स्वतःच्या लैंगिक ओळखीबद्दल शंका निर्माण होतात, जसे की 'माझे आकर्षण चुकीच्या दिशेला तर नाही ना? अगदी 'मी लहान मुलांचे शोषण करणारा गुन्हेगार तर नाही ना? इथपर्यंत भयंकर विचार मनात येऊ शकतात."

त्या असं ही म्हणतात की, "अस्वच्छता, जंतूंची भीती किंवा स्वतःमुळे कोणाला आजार पसरेल का, ही काळजी ओसीडीमध्ये खूप सामान्य आहे."

साधारणपणे वयात येताना या त्रासाची सुरुवात होते. पण लोक ही गोष्ट खूप वर्षं लपवून ठेवतात, त्यामुळे अनेकांना या आजाराबद्दल खूप उशिरा समजतं.

बहुतांश लोकांच्या डोक्यात अचानक आलेले विचार लवकर निघूनही जातात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बहुतांश लोकांच्या डोक्यात मनात असे नको असलेले विचार येतात, पण ते लगेच निघूनही जातात(प्रातिनिधिक फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संशोधनातून असं समोर आलंय की, ओसीडी हा त्रास अनुवांशिक असू शकतो. किंवा लहानपणी सोसावा लागलेला मानसिक ताण, कोणाचा मृत्यू किंवा घरातील वादविवाद या गोष्टींमुळेही हा त्रास सुरू होऊ शकतो.

मानसशास्त्रज्ञ किम्बरली विल्सन म्हणतात की, जगातल्या जवळजवळ 80 टक्के लोकांना असे विचित्र आणि नको असलेले विचार येतात. फरक एवढाच की, सामान्य लोक या विचारांकडे "काय वेडेपणा आहे हा" असं म्हणून दुर्लक्ष करतात आणि पुढे जातात.

पण जेव्हा तुम्ही या विचारांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, तेव्हा मदतीची गरज असते.

त्यांच्या मते, "ओसीडीचे विचार सहज जात नाहीत, ते डोक्यात घर करून बसतात. हे विचार कधीच चांगले नसतात, उलट ते भीतीदायक आणि हिंसक असतात. जेव्हा हे विचार तुमच्यावर ताबा मिळवतात, तेव्हा मन शांत करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी वारंवार करू लागता."

या गोष्टी दोन प्रकारच्या असू शकतात एक म्हणजे मानसिक जसे की मनातल्या मनात सतत आकडे मोजणे. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष कृती जसे की गाडीचे टायर नीट आहेत हे माहीत असूनही ते पुन्हा पुन्हा चेक करणे किंवा कुलूप नीट लावले आहे का हे सारखे पाहणे.

ओसीडीवर नियंत्रण कसं मिळवायचं?

नीना सांगतात की, अशा परिस्थितीत एखादा तज्ज्ञ डॉक्टरच तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो. डॉक्टरांच्या मदतीबरोबर तुम्ही स्वतः काही साध्या गोष्टी करू शकता.

जसे की तुमच्या विचारांना ओळखा- सगळ्यात आधी मनाला हे सांगा की, "हा फक्त एक विचार आहे, मी स्वतः तसा नाही." असं केल्याने त्या विचाराची भीती थोडी कमी होते.

डॉ. नीना

फोटो स्रोत, Dr Nina Higson-Sweeney

फोटो कॅप्शन, ओसीडी असूनही डॉक्टर नीना एक सामान्य आयुष्य जगत आहेत, कारण त्यांनी या विचारांना नियंत्रित करण्याची कला शिकली आहे

दुसरं म्हणजे ओसीडीला स्वतःपासून वेगळं माना- कल्पना करा की तुम्ही वेगळे आहात आणि ओसीडी ही तुमच्या शरीरातली एक वेगळी गोष्ट आहे. ओसीडीला एखादं कार्टून किंवा चित्रासारखं रूप दिल्याने त्याचं दडपण कमी व्हायला मदत होते.

तिसरं म्हणजे स्वतःची काळजी घ्या- चांगलं जेवण, पुरेशी झोप आणि थोडा व्यायाम खूप गरजेचा आहे. नीना म्हणतात, "जेव्हा मी खूप टेन्शनमध्ये असते किंवा स्वतःकडे लक्ष देत नाही, तेव्हा माझा हा त्रास वाढतो."

नीना सांगतात, "मी या त्रासातून पूर्णपणे बाहेर पडलेय असं नाही, पण आता मी माझं आयुष्य अगदी आरामात जगू शकते. आता मला कधीकधीच असे विचित्र विचार येतात आणि त्यांना कसं शांत करायचं, हे मला आता चांगलंच उमजलंय. पण हो, जेव्हा मी खूप टेन्शनमध्ये असते, तेव्हा मात्र या विचारांकडे दुर्लक्ष करणं थोडं जड जातं आणि मन मला पुन्हा त्याच जुन्या सवयींकडे ओढू शकतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)