वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया किती धोकादायक, चेन्नईतील तरुणाचा मृत्यू का झाला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शारदा व्ही
- Role, बीबीसी तमिळ
चेन्नईमध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या तरुणाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
पुद्दुचेरी येथील रहिवासी आलेला हेमचंद्रन 26 वर्षांचा होता. त्याचं वजन 142 किलो होतं.
त्याचं वजन कमी करण्यासाठी तो चेन्नईच्या क्रोमपेटाई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर तेथील डॉक्टर त्याच्यासह पम्मल येथील दुसऱ्या खासगी रुग्णालयात गेले.
हेमचंद्रनचे वडील सेल्वानाथन सांगतात, "सर्जरीसाठी घेऊन गेल्यानंतर काही मिनिटांतच त्याचा रक्तदाब कमी झाला. त्यामुळे क्रोमपेटाई येथील रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली. त्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी माझा मुलगा व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मला दिली. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
हेमचंद्रनच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने दोन सह-संचालकांची समिती स्थापन केली आहे.
वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया कशी केली जाते?
वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेला बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया असं म्हणतात.
यात अन्ननलिका तात्पुरत्या स्वरूपात बांधली जाते जेणेकरून व्यक्ती कमी प्रमाणात अन्न घेईल. या शस्त्रक्रियेमुळे वजन त्वरित कमी होत नाही.
अन्न सेवनाची पद्धत आणि व्यायाम करून शरीर हळूहळू गोष्टी जुळवून
घेऊ लागतं. या शस्त्रक्रियेनंतर शरीरात फरक दिसण्यासाठी किमान दोन महिने जावे लागतात. ही सर्जरी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जनद्वारे केली जाते.
रवींद्र कुमारन हे चेन्नईतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आहेत. ते म्हणाले, "ही शस्त्रक्रिया वाटते तितकी सामान्य मुळीच नाही. ती एखाद्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसारखी असते. एका दिवसात डॉक्टरांची भेट घेऊन पुढच्या आठवड्यात थेट शस्त्रक्रिया केली. हे प्रकरण फसलेलं दिसतंय."
"शस्त्रक्रियेपूर्वी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक असतं. मधुमेहतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यांची 100% परवानगी आवश्यकता असते. लठ्ठ व्यक्तीवर कोणतीही शस्त्रक्रिया करणं ही उच्च जोखमीची प्रक्रिया असते. शरीरात नळी टाकणे, रुग्णाला बेडवर नेणे हे देखील आव्हानात्मक असतं. कोणत्याही टप्प्यावर चुका होऊ शकतात."
'त्यांनी सांगितलं साधारण शस्त्रक्रिया असेल'
बीबीसी तमिळशी बोलताना हेमचंद्रनचे वडील सेल्वनाथन म्हणाले, "माझ्या मुलाने यूट्यूबवर डॉक्टरांचे व्हिडिओ पाहिले होते आणि त्याला अशी शस्त्रक्रिया करून घ्यायची होती.
"गेल्या वर्षी आम्ही पुद्दुचेरीहून चेन्नईच्या क्रोमपेटाई येथील एका खाजगी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी एका कागदावर आम्हाला सगळी प्रक्रिया समजावून संगितली. ते म्हणाले ही साधारण शस्त्रक्रिया आहे. यात घाबरण्यासारखं काहीच नाही. "
"त्यानंतर आम्ही गावाकडे परतलो. पण वाटेतच आम्हाला फोन सुरू झाले. हे फोन डॉक्टरांचे सहाय्यक करत होते. तुम्ही शस्त्रक्रिया कधी करणार आहात, लवकरात लवकर करून घ्या म्हणून कित्येक फोन आले. गेल्या महिन्यात आम्ही डॉक्टरांना पुन्हा भेटलो."
"22 एप्रिलला शस्त्रक्रिया करायचं ठरवलं होतं. त्याच हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी फिटनेस चाचण्या झाल्या. माझ्या मुलाला मधुमेह होता. त्यामुळे डायबेटोलॉजिस्टने त्याला इन्सुलिन लावायला सांगितलं. पण सर्जननं इन्सुलिन नाही म्हटलं."
"आम्ही हृदय शल्यचिकित्सकांचा सल्ला घेतला. आम्हाला शेवटपर्यंत भूलतज्ज्ञ दिसला नाही. ते म्हणाले की शस्त्रक्रियेसाठी क्रोंबेताईच्या रुग्णालयात 8 लाख रुपये खर्च येईल. ते म्हणाले की तेच उपचार खाजगी रुग्णालयात होऊ शकतात. पम्मलमध्ये त्याच डॉक्टरकडे 4 लाख रुपये खर्च येईल म्हणून आम्ही 21 तारखेला पम्मलच्या रुग्णालयात मुलाला दाखल केले."
काय म्हणाले तामिळनाडूचे वैद्यकीय मंत्री?
तामिळनाडूच्या वैद्यकीय मंत्र्यांनी हेमचंद्रन यांच्या पालकांशी फोनवर चर्चा केली आहे. तसेच मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हे एक माप आहे. एखाद्याचं वजन त्याच्या उंचीसाठी योग्य आहे की नाही हे यातून समजतं.
35 ते 40 च्या दरम्यान बीएमआय असलेल्या व्यक्तीला वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज असल्याचे मानले जाते. तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारखा आजार असल्यास, ही शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
आधीच वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया झालेल्या एखाद्या व्यक्तीला परत शस्त्रक्रिया करता येते का?
चेन्नईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 30 वर्षीय पुरुषोत्तम यांच्यावर सहा वर्षांपूर्वी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि तेव्हा त्यांचे वजन खूप कमी झाले होते.
ते सांगतात, "मी चोविशीचा असताना माझं वजन 143 किलो होतं. माझ्या शरीरावर खूप चरबी होती. चालताना मला धाप लागायची. पायऱ्या चढता येत नव्हत्या. मला माझ्या घरात आवश्यक असलेल्या सर्व सुखसोयी होत्या, त्यामुळे घराव्यतिरिक्त कुठेही जाणं अवघड होतं. भविष्यात हृदयाच्या समस्या आणि मधुमेह होण्याची दाट शक्यता होती."
"चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी माझं वजन 77 किलोपर्यंत कमी झालं."
"डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रियेपूर्वी मला पाच किलो वजन स्वतः कमी करावं लागेल. मी तीन किलोपर्यंत वजन कमी करू शकलो. शस्त्रक्रियेपूर्वी मी दहा इडल्या एकाच वेळी खायचो. शस्त्रक्रियेनंतर मला दोन पेक्षा जास्त इडल्या खाणं शक्य नसायचं.
"मी थोड्या अंतराने जेवायचो. मी माझं जेवण कमी केलं आणि पौष्टिक पदार्थच खाल्ले. आता माझी चरबी कमी झाली आहे. यामुळे लग्नासारख्या बंधनात मला येता आलं."
'हे लिपोसक्शन नाही'
कधीकधी ही शस्त्रक्रिया लिपोसक्शन शस्त्रक्रिया म्हणून सांगितली जाते. लिपोसक्शन ही एक अशी शस्त्रक्रिया आहे जी शरीरातील चरबी त्वरित काढून टाकते.
या उपचाराद्वारे देखील वजन कमी करणं शक्य आहे. याद्वारे शरीराचा ओटीपोटाचा भाग, मांडीचा मागचा भाग, कधीकधी हातातील चरबी काढून टाकता येते
चेन्नईतील प्लास्टिक सर्जन रमादेवी म्हणाल्या, "जर एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल तर ते वजन कमी करण्यासाठी प्रथम वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करू शकतात. त्यानंतर आवश्यक असल्यास लिपोसक्शनचे उपचार केले जाऊ शकतात. सर्व चरबी टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याऐवजी एकाच वेळी काढून टाकल्यास, अनावश्यक गुंतागुंत टाळता येईल."
डॉ. रमादेवी या उपचारांच्या जोखमींचे स्पष्टीकरण देताना सांगतात, "बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेदरम्यान, शरीर सुन्न करण्यासाठी सामान्य भूल दिली जाते. ती योग्य प्रमाणात न दिल्यास उपचार जीवघेणे ठरू शकतात."
तसेच, लिपोसक्शन उपचारादरम्यान शरीरातील रक्तवाहिन्या कापल्या जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी, एड्रेनालाईन मिश्रित द्रव दिले जाते. काहीवेळा, जर या द्रवाचे प्रमाण खूप जास्त झाले तर त्याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो."
त्या सांगतात "ज्यांना आधीपासूच हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ती अतिरिक्त जोखीम असू शकते. याव्यतिरिक्त, काही लोकांना शरीरात इंजेक्ट केलेल्या औषधांमुळे ऍलर्जी होऊ शकते, जी जीवघेणी असू शकते."
तामिळनाडूतील सरकारी रुग्णालयांमध्ये या सेवा दिल्या जात नाहीत. या उपचारांसाठी सुमारे 2 लाख ते 8 लाख रुपये खर्च येऊ शकतो.











