AI मुळे 10 वर्षातच माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल? नव्या संशोधनाचा खळबळजनक अंदाज

फोटो स्रोत, Getty Images
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे केवळ चॅटबॉट्स किंवा रोबोट नव्हे, तर माणसाइतकं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त बुद्धिमान बनू पाहणारी शक्ती.
AI-2027 नावाच्या एका संशोधनाने असा धक्कादायक इशारा दिला आहे की, येत्या काही वर्षांत एआय माणसाला हाताळू शकणार नाही आणि ही गोष्ट मनुष्यासाठी मोठा धोका ठरण्याची शक्यता आहे.
एका संशोधनात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, एआय 2027 पर्यंत नियंत्रणाबाहेर जाईल आणि येत्या दहा वर्षांत माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल. या भविष्यवाणीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
'AI2027' नावाचा एक तपशीलवार अहवाल काही प्रसिद्ध एआय तज्ज्ञांनी यावर्षी मार्च महिन्यानंतर प्रकाशित केला.
या अहवालामुळे अनेक व्हीडिओ व्हायरल झाले आहेत आणि लोक यावर चर्चा करत आहेत की खरंच असं काही घडू शकतं का?
'बीबीसी'ने या भविष्यातील काही दृश्यांची कल्पना तयार केली आहे, तेही प्रसिद्ध जनरेटिव्ह AI टूल्सचा वापर करून. या भीषण भाकिताचं चित्र उभं करण्यासाठी हे केलं आणि काही तज्ज्ञांशी बोलून या अहवालाचा परिणाम काय होत आहे हेही जाणून घेतलं.

काही लोक AI2027 ला फक्त विज्ञानकथेचा भाग मानत आहेत, पण हे लिहिणारे लेखक खूप अनुभवी आणि सन्मानित आहेत. ते 'एआय फ्युचर्स प्रोजेक्ट' या ना-नफा संस्थेचे सदस्य आहेत, जी एआयचा भविष्यातील परिणाम समजून घेण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
AI2027 चे मुख्य लेखक डॅनियल कोकोताज्लो यांना याआधीही एआयच्या विकासातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा अचूक अंदाज लावल्याचे श्रेय देण्यात येतं.
AI2027 वर टीका करणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे अमेरिकेचे संज्ञानात्मकशास्त्रज्ञ आणि लेखक गॅरी मार्कस. या कथेत सांगितलेली गोष्ट अशक्य नाही, पण लवकरच असं घडेल, अशी शक्यताही फारच कमी आहे, असं ते म्हणतात.
"या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ती खूप जिवंतपणे सांगितली गेली आहे, त्यामुळे लोक विचार करायला लागतात ही एक चांगली गोष्ट आहे. पण मी याला खरंच अशी शक्यता आहे किंवा लगेच गांभीर्याने घेण्यासारखी ही गोष्ट आहे, असं मानणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
मार्कस म्हणतात की, एआयमुळे माणसाच्या अस्तित्वाला धोका आहे, यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याचा नोकऱ्यांवर होणारा परिणाम, ही समस्या अधिक निकडीची आहे.
"माझ्या मते, लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की एआय संदर्भात अनेक वेगवेगळ्या गोष्टी चुकू शकतात. मुळात आपण याचे नियम तयार करताना आणि आंतरराष्ट्रीय करार करताना योग्य पद्धतीनं काम करत आहोत का, हाच खरा मोठा प्रश्न आहे."
ते आणि इतर समीक्षक असंही म्हणतात की, या अहवालात एआय एवढी मोठी झेप कशी घेतो, हे नीट स्पष्ट केलेलं नाही.
ते उदाहरण देतात की, ड्रायव्हरलेस कार्सचं तंत्रज्ञान खूप वेळ घेतं आणि त्याचं प्रमाणापेक्षा जास्त (ओव्हरहाइप) कौतुक केलं गेलं आहे. परंतु, अजूनही ते अपेक्षेप्रमाणे काम करत नाही, हे वास्तव आहे.

किंग्ज कॉलेज लंडनमधील अर्थशास्त्रज्ञ आणि नवोन्मेषाच्या सहयोगी प्रा. डॉ. युंडन गाँग यांच्या मते, चीनमध्ये AI2027 अहवालाचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही.
त्या म्हणाल्या, "AI2027 बद्दलची चर्चा चीनमध्ये प्रामुख्याने अनौपचारिक फोरम्स किंवा वैयक्तिक ब्लॉग्जवरच होताना दिसते आणि तिथेही लोक त्याला अर्धवट विज्ञानकथेप्रमाणेच पाहत आहेत.
अमेरिका जसं या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा करत आहे किंवा धोरणं ठरवत आहे, तसं काही चीनमध्ये होताना दिसत नाही."
चीन आणि अमेरिकेच्या एआय स्पर्धेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक आहे, असंही डॉ. गाँग सांगतात.
या आठवड्यात शांघायमध्ये झालेल्या वर्ल्ड AI कॉन्फरन्समध्ये चीनचे पंतप्रधान ली किआंग यांनी अशी कल्पना मांडली की, जगभरातल्या देशांनी एकत्र येऊन एआयसाठी सहकार्य करावं.

फोटो स्रोत, Getty Images
चीनला हे तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरण्यासाठी आणि त्याचे नियम बनवणं यासाठी पुढाकार घ्यायचा आहे, असंही त्यांनी म्हटलं.
हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला 'AI अॅक्शन प्लॅन' जाहीर केला. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अमेरिका एआय क्षेत्रात आघाडीवर राहावी, याची खात्री करणं.
या दस्तऐवजात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात, "संपूर्ण जगात टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिका अग्रेसर राहणं आणि कुणीही तिच्या स्थानाला प्रश्न न विचारणं, ही देशाच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे."
या अॅक्शन प्लॅनचा उद्देश हा, अमेरिका एआय क्षेत्रात पुढे जावं, त्यासाठी अडथळे निर्माण करणारे नियम (रेड टेप) आणि जास्त कठोर नियम दूर करणं आहे.
AI2027 या कथेत जसं दाखवलं आहे, तसंच इथंही अमेरिकन नेते एआयची शर्यत जिंकणं हेच सर्वाधिक महत्त्वाचं मानतात आणि मशीनवरचा ताबा गमावण्याचा धोका ते दुर्लक्षित करतात. ही वास्तवातील परिस्थिती आणि कथानक खूपच एकसारखी वाटते.

या अहवालाकडे मोठ्या एआय कंपन्यांचे सीईओ फारसं लक्ष देताना दिसत नाहीत किंवा मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचे वाटतं.
कारण ते सगळे एकमेकांशी स्पर्धा करत आहेत आणि सतत नवीन, अधिक बुद्धिमान (स्मार्ट) एआय मॉडेल्स बाजारात आणण्याच्या घाईमध्ये आहेत.
या मोठ्या टेक कंपन्या एआयचं जे भविष्य दाखवतात, ते AI2027 मधील कल्पनेपेक्षा खूपच वेगळं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ChatGPT चे निर्माते सॅम ऑल्टमन यांनी अलीकडेच असं म्हटलं आहे की, "माणसं लवकरच अशी डिजिटल सुपरइंटिलिजन्स तयार करतील, ज्यामुळे एक 'शांत' क्रांती घडेल आणि तंत्रज्ञानाचं 'एक सुंदर भविष्य' निर्माण होईल, ज्यात माणसांना कोणताही धोका नसेल."
गमतीची गोष्ट म्हणजे, सॅम ऑल्टमन स्वतःही मान्य करतात की एक मोठी अडचण आहे आणि ती म्हणजे 'अलाइन्मेंट प्रॉब्लेम'. म्हणजेच, ही सुपरइंटिलिजेंट मशीन्स माणसाच्या हितासाठीच काम करत राहावीत, यासाठी काही समस्या सोडवणं मात्र गरजेचं आहे.
पुढची दहा वर्षं कशी जातील ते सांगता येणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे माणसापेक्षा जास्त बुद्धिमान मशीन्स तयार करण्याची शर्यत मात्र वेगानं सुरू झाली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











