विदर्भातील या तिघींनी मृत तलावांना जिवंत करुन दिला अनेक महिलांना रोजगार, हे कसं घडलं?

- Author, नितेश राऊत आणि प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी
बीबीसी मराठीची 'कणखर बायांची गोष्ट' ही मालिका. आदर्श समाजासाठी एक आदर्श जाहीरनामा कसा असावा याचा वस्तुपाठ या महिलांनी आपल्या कार्यातूनच दिला आहे. अशा महिलांची ओळख तुम्हाला या मालिकेतून आम्ही करुन देत आहोत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिला आत्मनिर्भर होण्यासाठीचा जाहीरनामा सांगत आहेत.
शालू कोल्हे, सरिता मेश्राम, कविता मौजे यांना चूल आणि मूल याशिवायचं जग माहिती नव्हतं. त्या मूळ ढिवर समाजातल्या. या समाजातील महिलांचा लग्नसमारंभात धुणं-भांडी करुन पोट भरणं इतकाच काय तो बाहेरच्या जगाशी संबंध.
या महिला दुहेरी भेदभावाचा सामना करत होत्या. एक म्हणजे ढिवर समाजाला जातिभेद सहन करावा लागत होता आणि दुसरं म्हणजे लिंगभेद- समुदायाने बाई असल्याने नाकारलेला अधिकार. या तिघींना समाजातील महिलांना मानाचं स्थान मिळवून द्यायचं होतं.
या तिघींचा आत्मसन्मान मिळवण्याचा प्रवास तलावांच्या संवर्धनातून सुरू झाला. तलावांना जिवंत करण्याची कहाणी ही एका अर्थाने त्यांच्या आत्मसन्मानाची कहाणी आहे.
“मला 100 टक्के वाटतं की मी आता तलावांची डॉक्टर आहे. तलावांची कोणतीही कामं सांगा मी करायला तयार आहे. आधी मला तलावात पाय ठेवायला पण भीती वाटायची. माझ्या मासेमारी करणाऱ्या समाजाकडे जे ज्ञान आहे ते कोणाकडेच नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की यात महिलांना घुसवलं तर आपण काय करू शकतो.”
गोंदिया जिल्ह्यातील निमगावच्या शालू कोल्हे सांगत होत्या.

विदर्भात विमुक्त जातींमधील ढिवर समुदाय प्रामुख्याने मत्सव्यवसाय करतो. पण आठ वर्षांपूर्वी हा मत्सव्यवसाय फक्त पुरूषांच्याच हातात होता. आणि त्याचं उत्पन्न कमी होत चाललं होतं.
फीड (FEED) या तलावाचं पुनरुज्जीवन करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून आणि कमिटी ऑफ रिसोर्स ऑर्गनायझेशन म्हणजेच कोरोच्या प्रशिक्षणातून तलावांना जिवंत करण्याचा संकल्प या ढिवर महिलांनी उचलला.
तलाव मृत कोणत्या माशांमुळे झाले?
तलावांवर जिवंत करण्याची वेळ का आली, याविषयी सांगताना फीड (FEED) संस्थेचे संचालक मनिष राजनकर सांगतात- “भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे नैसर्गिक तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. सिंचनासोबतच, मासेमारीसाठी या तलावांचा उपयोग होतो. महाराष्ट्राच्या इतर तलावांप्रमाणेच इथेही प्रति हेक्टरी माशांचं उत्पादन कमी होत चाललं होतं. त्यामुळे यावर अवलंबून असणारा समाजही चिंतेत होता.”
“पूर्वी स्थानिक मासे असताना महिला मासेमारी करत असाव्यात, पुढे जास्त उत्पन्न देणाऱ्या परदेशी प्रजाती आल्याने आणि व्यावसायिक विक्री वाढल्याने महिलांचा सहभाग कमी होत गेला. मच्छिमार सोसायट्यांमध्येही पुरुषच होते. परदेशी माशांच्या प्रजातींमुळे तलावांची नैसर्गिक व्यवस्था धोक्यात आली.”

फोटो स्रोत, BNVSAM
मनिष यांना स्थानिकांशी बोलताना यावरचा उपायही सापडला. ते सांगतात- याच समाजातील लोकांकडे तलाव जिवंत करण्याचं पारंपरिक ज्ञान होतं, त्याची मदत झाली.
तलावांच्या संवर्धनाचं कामात मनिष राजनकर 1996 पासून आहेत. 2014 मध्ये त्यांना शालू कोल्हेंच्या मदतीने तलावांना जिवंत करण्याचा सूर सापडला.
“समाजात शेती आहे. पण बहुतांश शेती सावकाराकडे गहाण ठेवलेली असायची. दोन वेळेची भूक भागेल इतकंच काम ते करायचे. त्यामुळं समाजाच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं गरजेचे होतं, त्यात महिलांचा सहभाग वाढवणं गरजेचं होतं” शालू सांगत होत्या.

सामाजिक विरोध पत्करुन शालू आणि त्यांच्या सहकारी कामाला भिडल्या.
त्या सांगतात “आपल्या मूलभूत हक्कांना ग्रामसभेत स्थान असतं. मग आपले प्रश्न मांडण्यासाठी किमान पाच महिला तरी सोबत असाव्यात. त्यासाठी घरोघरी जाऊन महिलांना आपल्या समाजाची बिकट परिस्थितीची जाणीव करुन त्यांना एकत्रित कराव लागलं.”
पाण्यात उतरल्यावर माहिलांना पोहता येईल का इथपासून लोकांना प्रश्न पडले होते. अशात महिलांनी परिसरातल्या तलावांच्या अभ्यासाला सुरूवात केली.
शाकाहारी आणि मांसाहारी मासे
महिलांनी जिल्ह्यातल्या 43 गावांमध्ये जाऊन 63 तलावांची माहिती गोळा केली. आणि निमगावचा तलाव प्रयोगासाठी लोकांकडून मागून घेऊन राखीव करुन घेतला. निमगावच्या तलावातील जैवविविधतेचा समतोल बिघडला होता.
“आमची टीम तलावांचे सर्व्हे करायला लागली. तलावात पूर्वी काय होतं, आता काय आहे?, वनस्पती का आणि कशी संपली? या प्रश्नांची उत्तरं अभ्यासात शोधायला लागलो.” शालू कोल्हे सुरूवातीच्या दिवसांबद्दल सांगत होत्या.
“ग्रामसभेत प्रश्न मांडतानाही अनेक अडचणी येत होत्या. त्या पार करत आम्ही एका गावात 16 महिलांचा गट स्थापन केला. त्यानंतर सोसायटीकडे राखीव असणाऱ्या 4 तलावांपैकी 1 तलाव आमच्यासाठी राखीव ठेवण्याचा ठराव मांडला,” शालू सांगत होत्या.

“ठराव मान्य झाला, पण तलाव मृत झाला होता आणि त्यात मोठ्या प्रमाणात गाळ होता. आणि तलावात वनस्पती नसल्यामुळे मासेमारीचा व्यवसाय तोट्यात होता. गाळ काढण्याची मोठी अडचण नव्हती, अडचण होती ती वनस्पती जगवण्याची. पाण्यातली वनस्पती मृत होण्यामागील कारणांचा आम्ही अभ्यास करायला सुरूवात केली”
तलावातली वनस्पती नष्ट होत होती म्हणून मासेही जगत नव्हते, हे अभ्यासात समोर आलं.
“त्यात आमच्या लक्षात आलं की, बंगाली मासे मांसाहारी सोबतच शाकाहारी असल्यामुळे त्यांच्या वजनाच्या चौपट वनस्पती खातात. तर शिपणास जातीचे मासे गवत खातात, तर काल्प मासा मुळं खातो त्यामुळे वनस्पती वेगाने संपते. मत्स्य संवर्धनात ही मोठी बाधा होती,” शालू तलावाच्या जैविविधतेला बाधा आणणाऱ्या प्रजातींबद्दल सांगत होत्या.
तलावाची नांगरणी आणि लागवड
तलाव जिवंत करण्यासाठी पुढला टप्पा होता तलावाच्या नांगरणीचा. पहिला पाऊस यायच्या आधी निमगावच्या तलावाची नांगरणी करण्यात आली.
शालू कोल्हे यांच्या गटाने निमगावचा तलाव नांगरुन काढल्यावर लागवड हाती घेतली . माशांना धोकादायक असणाऱ्या बेशरम वनस्पती काढल्या. तर स्थानिक माशांना पोषण देणाऱ्या स्थानिक वनस्पतीची लागवड केली. साखऱ्या चिल्या, डेहंगो, पत्तेवाली चिऊल, चौरा, पोवन या वनस्पतीची लागवड त्यांनी केली.

शालू सांगतात, या लागवडीसाठी महिला आणि पुरूष दोघांना समान वेतन देण्यात आलं. पण ही लागवड यशस्वी करण्यासाठी पुरूषांपेक्षा महिलांची जास्त मदत झाली.
निमगाव तलावाची बचतगट आणि ग्रामपंचायतीने एक वर्ष नीट राखण केल्यानंतर पहिल्याच वर्षी त्याचे परिणाम दिसायला लागले. उत्पन्न वाढलं होतं.
“निमगावच्या बंधारा तलावामध्ये जिथे पूर्वी 50 हजाराची मासेमारी व्हायची तिथे पहिल्या वर्षी 2 लाख 75 हजार रुपयांची मासेमारी झाली. ती ही स्थानिक माशांची.
65 तलावांना जीवदान
या यशस्वी प्रयोगानंतर महिलांनी तलावासाठीच्या पोषक वनस्पतीच्या बीज संवर्धनाचं काम हाती घेतलं. तलावांना जिवंत केल्यानंतर त्यात मुलकी म्हणजेच स्थानिक मासे सोडण्यात येतात.
“मुलकी मासे नैसर्गिकरित्या वाढतात. बाराही महिने उत्पन्न मिळतं. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होते. आम्ही जिरा माशांऐवजी बोटकुली माशांची बीजं वापरली. सृष्टी आणि मकाम या संस्थेच्या माध्यमातून बांबूचे पिंजरे तयार करून बोटकुली माश्यांच संवर्धनाच काम केलं”.
“माशांची चोरी होऊ नये म्हणून आम्ही रात्री तलावावर पहारा द्यायचो. एक-एक मासा 1.50 ते 2 किलो वजना इतका वाढायला लागला. त्यामुळे जे पुरुष आमचा विरोध करायचे ते बोटकुली माशांचं बीज आमच्याकडून खरेदी करायला लागले” शालू सांगत होत्या.

शालू कोल्हे, सरिता मेश्राम, कविता मौजे या स्वतः मासे पकडण्यासाठी तलावात उतरू लागल्या, जेणे करून इतर महिलाही मासेमारीसाठी पुढे येतील. आज मत्स्य व्यवसायाचे संपूर्ण व्यवहार महिलाच करतात. त्यांनी जिवंत केलेल्या तलावात माशांच्या 29 प्रकारच्या प्रजातींची नोंद केल्याचं त्या सांगतात.
आतापर्यंत फीड या संस्थेच्या मदतीने त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 65 मृत तलावांना जीवदान दिलंय. मासेमारीच्या माध्यमातून स्थानिक महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिला आहे.
ढिवर समाज हा विमुक्त जमातीमध्ये मोडतो. मुख्य प्रवाहाबाहेरचा हा समाज ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सोय-सुविधांपासून वंचित होता.
त्यांनी जेव्हा ग्रामसभा गाठली तेव्हा त्यांना तिथे जातिभेद दिसून आला.
ग्रामसभेतल्या सहभागाचा फायदा
कविता मौजे सांगतात- “उच्च जातीच्या उपसरपंचाला मोठी खुर्ची तर मागासवर्गीय समाजातील सरपंचाला लहान खुर्ची, हे खटकत होतं. आम्ही खुर्ची बदलून भेदभाव मिटवण्यासाठी सुरुवात केली.
“ढिवर समाजाची आमच्या गावात 50 कुटुंब आहेत. ती शासकीय योजनेपासून वंचित होती. मान-सन्मान तर सोडाच कोणीही त्यांना अबे ढिवऱ्या असं बोलायचे, अपमानस्पद वागणूक मिळायची. शालू कोल्हे यांच्या संपर्कात आल्यानंतर ग्रामसभेतून माझी लीडरशिप वाढली आणि त्यातून कायद्याचा अभ्यास झाला. महिलांच्या आणि मासेमारीच्या समस्या ग्रामसभेत पोहचवल्या”, सरिता मेश्राम सांगत होत्या.

आधी मजुरांना आठच दिवस हाताला काम मिळायची. 100 दिवस हक्काचा रोजगार मिळवा म्हणून त्यांनी मजूर संघटना स्थापन केली. आणि आठ दिवसांचा रोजगार 100 दिवसांवर आला. रोजगार हमी योजनेमधून ही काम काढणं शक्य होत होतं.
महिलांचा बचतगटातही त्यांचा समावेश नव्हता, कारण समाजाच्या मुख्य रोजगारातही त्याचं स्थान नव्हतं. कमाईच नाही तर बचत कशी करणार.
“ढिवर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्हाला बदलायचा होता. समाजाची सामाजिक स्थिती चांगली करण्यासाठी महिलांना सक्षम करण्याकडे भर दिला पाहिजे, हे आम्हाला कळलं. आम्ही ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढवल्यानंतर एकूणच महिलांचे प्रश्न काय आहे, त्यावर आम्ही काम केलं. महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल किंवा मासेमारीचा प्रश्न असेल त्यावर लक्ष दिलं”.
लढाई महिला सन्मानाची...
सरिता मेश्राम यांचं 18 व्या वर्षातच लग्न झालं होतं. अगदी कमी वयातच कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. शालूताई जेव्हा त्यांच्या संपर्कात आल्या. तेव्हा पहिला विरोध कुटुंबातून झाला.
त्या सांगतात “जेव्हा मासेमारी करण्याचा निर्णय पतीला सांगितला, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की नोकरी आणि या व्यवसायात महिला नकोच. तेव्हा काहीशी निराशा पदरात पडली. पण कुटुंबातून बंड करुन मी बाहेर पडले आणि आज स्वतंत्र ओळख निर्माण करुन कुटुंबालाही सहकार्य करते”.
हे सगळं करत असतांना शालू, सरिता आणि कविता यांना संस्थांची मदत झाली. संघटनात्मक कार्य करण्याची शैली त्या अनुभवाने शिकत गेल्या. मजुरांच्या रोजगाराचा, मासेमारीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा, एकल महिलांची ग्रामसभेत वेगळी नोंद, अशा कामांना गती मिळाली.
सुजाण नागरिक म्हणून या महिलांच्या सरकारकडून काही अपेक्षा आहेत.

सध्या जवळपास 12 तलावांमध्ये नैसर्गिक पद्धतीने मत्स्य संवर्धनाचं काम सुरू आहे. 7 गावांमध्ये 16-16 महिलांच्या गटांमधून मासेमारी केली जाते. त्यातून त्यांना हक्काचा रोजगार मिळतो.
महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला
आज 11 गावांमध्ये मजूर संघटना स्थापन झाली आहे. जवळपास 200 ते 250 महिला मजूर संघटनेत आहेत. त्यांना हक्काचा रोजगार मिळतोय. तसंच जंगलाच्या उपजीविकेवर अवलंबून असणाऱ्या 12,300 महिला जोडलेल्या आहेत, त्यातून त्या स्वावलंबी झाल्या आहेत.

याचा परिणाम म्हणून समाजाचा महिलांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदललाय. कारण महिलांना मिळणारी मिळकत बचतीच्या रुपाने दिसतेय. या महिला सांगतात- पुरुष मजूर बहुतांश मिळकत व्यसनात गमावतात आणि कौटुंबिक कलह वाढतो. आता त्यालाही आळा बसलाय.
अनेक दशकं मासेमारी करणारे पतिराम तुमसरे सांगतात “एका महिलेला मिळणारी संपूर्ण कमाई ती घरी आणते. तर पुरुष 200 रुपये रोज मिळाला की त्यातले 100 रुपये व्यसनात उडवतात. त्यामुळे महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. सुरुवातीला समाजाचा विरोध होता. पण आता या महिला पुरुषांनाही मागे टाकतात”.
या तिघींमुळे गावातील महिला संघटन निर्भीड बनलंय. फक्त दोन वेळेच्या अन्नासाठी काम करणारा ढिवर समाज त्यांच्याकडून प्रेरणा घेतोय.
त्यांना मिळणारा मानसन्मान इतका वाढलाय की तलावांचं आरोग्य बिघडलं असेल किंवा तलाव मृत झाला असेल तर, जिवंत करायला त्यांना महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यांतूनही बोलावलं जातं.
(या लेखासाठी अत्त दीप या ग्रासरुट लिडरशीप अकॅडमीच्या रिसर्चची मदत झाली)











