10 महिन्यांच्या चिमुकलीने वाचवले 5 जणांचे प्राण, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

10 महिन्यांची आलिन

फोटो स्रोत, Amrita institute of medical sciences, Kochi

फोटो कॅप्शन, 10 महिन्यांची आलिन
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

केरळमध्ये अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकलीनं पाच जणांचे प्राण वाचवले आहेत. ब्रेनडेड घोषित झाल्यानंतर तिच्या वडिलांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळं हे शक्य झालं. यामुळे देशात अवयवदान चळवळीला प्रोत्साहन मिळू शकतं.

वडील अरुण अब्राहम यांच्या मनात कॉलेजच्या काळातील एका व्याख्यानातील गोष्टी मनात घर करून होत्या, आणि त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली.

जेव्हा डॉक्टरांनी मुलीला 'ब्रेन डेड' घोषित केलं, तेव्हा वडील अरुण अब्राहम यांनी त्या कठीण प्रसंगी हा निर्णय घेतला.

आलिन शेरिन अब्राहम केरळमधील सर्वात लहान अवयवदाता ठरली आहे. आलिन एका कार अपघातात गंभीर जखमी झाली होती.

तिचं लीव्हर (यकृत) आणि एका किडनीचे आधीच दोन गंभीर आजारी मुलांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहे. तर तिच्या हृदयाचे व्हॉल्व, दुसरी किडनी आणि डोळे कोची आणि तिरुवनंतपुरमच्या तीन हॉस्पिटल्समधील गरजूंशी जुळवण्याची प्रक्रिया केली जात आहे.

केरळ

फोटो स्रोत, Amrita institute of medical sciences, Kochi

फोटो कॅप्शन, हृदयाचे व्हॉल्व आणि लीव्हर तिरुवनंतपुरममधील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये पाठवले गेले.

33 वर्षीय अब्राहम यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला मुलगी ब्रेन डेड आहे असं सांगितलं, तेव्हा मोठा धक्का बसला.

निर्णय घेणं खूप कठीण होतं, पण मी पत्नी शेरीन अ‍ॅन जॉनला विचारलं आणि तिने लगेच यासाठी होकार दिला. इतरांचा जीव वाचवण्यासाठी अवयवदान करायला हवं, असं माझ्या पत्नीने सांगितलं."

त्यांनी सांगितलं की, "2013 मध्ये किडनी फाउंडेशनचे फादर डेव्हिस यांनी कॉलेजमध्ये अवयवदानावर एक व्याख्यान दिलं होतं. मला त्यातून प्रेरणा मिळाली. तेव्हा मी बी.कॉमचं शिक्षण घेत होतो. त्या दिवशी मी ठरवलं होतं की, जर माझ्यासोबत काही झालं, तर मी माझे सर्व अवयव दान करेन."

तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीमधील न्युरोसर्जरीचे प्राध्यापक डॉ. ईश्वर एच. व्ही. यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "हे मृत डोनरकडून अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठी एक मोठे प्रोत्साहन आहे. आलिनने देशात अवयव प्रत्यारोपणाबाबत लोकांच्या दृष्टिकोनात बदल घडवला आहे."

हा देखील एक योगायोग आहे की, गेल्या महिन्यात तिरुवनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नव्याने केरळ स्किन बँक सुरु झाली आहे.

येथे 91 वर्षीय आनंदवल्ली अम्माल यांनी आपल्या मृत्यू पश्चात त्वचा आणि कॉर्निया दान केले.

'आलिनला नेमकं काय झालं?'

या अपघातात आलिनला गंभीर अंतर्गत दुखापत झाली होती. बाहेरून तिच्या शरीरावर एक ओरखडाही नव्हता, कुठं खरचटलंही नव्हतं.

कोट्टायम-तिरुवल्ला रस्त्यावर 5 फेब्रुवारी रोजी आलिन तिच्या आई आणि आजी-आजोबांसोबत कारने जात होती. त्यावेळी समोरून आलेल्या कारने त्यांना सरळ धडक दिली. या अपघातात उर्वरित प्रवाशांना फक्त किरकोळ दुखापती झाल्या.

पण आलिनला गंभीर दुखापत झाली. तिला आधी चंगानाशेरी आणि तिरुवल्ला येथील हॉस्पिटल्समध्ये नेलं गेलं. त्यानंतर तिला कोचीच्या अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही तिचे प्राण वाचू शकले नाही. त्यामुळं 6 फेब्रुवारीला तिला ब्रेन डेड घोषित केलं गेलं. त्या दिवशीच तिच्या आई-वडिलांनी अवयवदानासाठी संमतीपत्रावर सही केली.

तिच्या दोन्ही किडनी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आल्या.

हृदयाचे व्हॉल्व आणि लीव्हर तिरुवनंतपुरममधील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पाठवले गेले. डोळे कोचीतील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या आय बँकेकडे सुपूर्द करण्यात आले.

केरळ

फोटो स्रोत, Amrita institute of medical sciences, Kochi

फोटो कॅप्शन, 5 फेब्रुवारी रोजी कोट्टायम-तिरुवल्ला रस्त्यावर एका अपघातात आलिन जखमी झाली होती.

पहिली लाभार्थी सहा महिन्यांची ध्रिया होती. तिला लिव्हर फेल्युलरची (यकृत निकामी) समस्या होती.

केआयएमएस हेल्थच्या माहितीनुसार, ती तीन महिन्यांची असताना तिच्यावर उपचार झाले होते. पण ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर तिचे लीव्हर फेल झाले आणि जीव वाचवण्यासाठी तिच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शिफारस करण्यात आली होती.

13 फेब्रुवारीला रात्री 10.30 वाजता सुरू झालेली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पूर्ण झाली. ध्रियाची प्रकृती स्थिर आहे. मात्र नवीन अवयव शरीराशी पूर्णपणे जुळायला थोडा वेळ लागतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.

ध्रियाचे काका विनोद हे मजूर आहेत. त्यांनी सांगितलं की, "जन्माच्या एक महिन्यातच ध्रियाचे डोळे पिवळे झाले होते. स्कॅनमध्ये तिचं यकृत निकामी झाल्याचे दिसून आले. ध्रियाचे वडील दगड खाणीत काम करतात."

आलिनची एक किडनी तिरुवनंतपुरम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील 10 वर्षांच्या मुलावर प्रत्यारोपित करण्यात आली आहे.

'रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यास किती वेळ लागतो?'

डॉ. ईश्वर यांच्या मते, मुलांना ब्रेनडेड घोषित करणं हे प्रौढांपेक्षा अधिक अवघड आहे. प्रौढांच्या बाबतीत सहा तासांच्या दरम्यान निर्णय घेता येतो.

डॉ. ईश्वर यांच्या मते, "एक वर्षाखालील मुलाला ब्रेनडेड घोषित करण्यासाठी सुमारे 12 तास लागतात. मूल एक महिन्याचं असेल तर अंदाजे 24 तासही लागतात."

डॉ. ईश्वर यांनी त्यांच्याच 91 वर्षांच्या आईचं उदाहरणही दिलं. त्यांचं घरीच निधन झालं होतं. त्यांनी आधीच त्वचा आणि कॉर्निया दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

"त्यांच्या मृत्यूच्या सहा तासांच्या आत, स्किन बँकेतील प्लास्टिक सर्जन घरी आले आणि दोन्ही मांड्यांमधून 20 सेमी, 1 मिमी जाडीची त्वचा सुरक्षितपणे काढली. ही त्वचा गंभीर भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते," असे त्यांनी सांगितलं.

अवयव दान

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. ईश्वर म्हणाले की, "ही त्वचा द्रवरुपी नायट्रोजनमध्ये उणे सहा अंश तापमानात स्किन बँकेत जतन केली जाते. रुग्णाला गंभीर भाजलं जातं, तेव्हा प्रक्रिया केलेली त्वचा जळलेल्या भागावर प्रत्यारोपित केली जाते. ती काही महिने प्रभावी राहते आणि नंतर नैसर्गिक त्वचा वाढल्यानंतर आपोआप गळून पडते."

त्यांनी असंही म्हटलं की, जर व्यक्ती डिहायड्रेशन किंवा त्वचेच्या संसर्गाने ग्रस्त नसेल तर दात्याच्या वयाचा संबंध राहत नाही.

आलिनला समाजाच्या विविध घटकांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत असताना, केरळ सरकारनं तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले.

रविवारी तिच्या मूळ गावी पथानामथिट्टा मधील सीएसआय स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. अनेक मंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मंत्री व्ही.एस.वसवन म्हणाले की, कुटुंबाने त्यांच्या निर्णयाने मानवतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.