इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध अजूनही सुरू, हे युद्ध कधी आणि कसं संपेल?

- Author, जेरेमी बोवेन
- Role, आंतरराष्ट्रीय संपादक
- वाचन वेळ: 8 मिनिटे
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या नव्या युद्धाला काही फार दिवस उलटले नाहीयेत.
इराणने अमेरिकेचे मित्र असलेल्या अरब देशांवर, तसेच आखातातील शेजारी देशांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे युद्ध आता फक्त दोन देशांपुरतं न राहता संपूर्ण प्रदेशात पसरलं आहे. दरम्यान, अमेरिकेला आपल्या लष्करी तळांचा वापर करू देणार नाही, हा आधीचा निर्णय युनायटेड किंगडमने आता मागे घेतला आहे.
युद्ध अजूनही वाढतच चाललं आहे आणि माझ्या फोनवर सतत नवीन अलर्ट येत आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेलं एक प्रसिद्धीपत्रक मी नुकतंच वाचलं. त्यात म्हटलं आहे की, कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेकडून चुकून झालेल्या हल्ल्यात अमेरिकेची तीन US F-15E लढाऊ विमाने पाडली गेली आहेत.
ही 'मित्रांकडूनच झालेली चूक' असा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे.
मी हा लेख पूर्ण करेपर्यंत आणखी क्षेपणास्त्रं डागली जातील आणि आता जिवंत असलेले काही लोक तोपर्यंत मारले गेलेले असण्याचीही शक्यता आहे.
हे युद्ध कधी आणि कसं संपेल, याचा अंदाज आत्ताच लावणं फारच घाईचं ठरेल. युद्ध एकदा सुरू झालं की, ते नियंत्रणात ठेवणं कठीण होतं. तरीही, या संघर्षात सहभागी असलेले देश युद्धाचा शेवट कसा व्हावा, याबाबत काय इच्छा ठेवतात, हे पाहावं लागेल.
ट्रम्प यांच्या मते 'विजय' म्हणजे नेमकं काय?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणेच, अमेरिकेच्या सामर्थ्याबाबत विश्वास दर्शवला आहे. त्यांनी युद्ध सुरू झाल्याचं जाहीर करताना फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील त्यांच्या निवासस्थानातून व्हीडिओ संदेश दिला. इतर राष्ट्राध्यक्षांनी असं करताना ओव्हल ऑफिसमधील 'रिझॉल्यूट डेस्क'च्या मागून गंभीर भाषण देणं पसंत केलं असतं.
ट्रम्प यांनी उघड्या गळ्याचा कॉलर शर्ट आणि पांढरी बेसबॉल कॅप घातली होती. त्यांनी 1979 मधील इस्लामिक क्रांतीपासूनच इराण अमेरिकेसाठी सतत धोका ठरत आला आहे, असा युक्तिवाद यावेळी केला.

फोटो स्रोत, US Navy via Getty Images
ट्रम्प नेहमीच आपला विचार बदलू शकतात, पण त्या भाषणात त्यांनी 'विजय' म्हणजे काय, याची आपली संकल्पना सांगितली. ते जवळजवळ एका चेक लिस्टसारखंच आहे.-
"आम्ही त्यांच्या क्षेपणास्त्रांना नष्ट करू, त्यांचा क्षेपणास्त्र उद्योग पूर्णपणे मोडून टाकू. त्यांच्या नौदलालाही नष्ट करू. तसेच या भागातील दहशतवाद्यांना आता प्रदेशात किंवा जगात अराजकता पसरवता येणार नाही, ते आमच्या सैनिकांवर हल्ला करू शकणार नाहीत, आणि ते रस्त्यांवर बॉम्ब (आइडी) पेरून अमेरिकन नागरिकांसह लोकांना मारू किंवा जखमी करू शकणार नाहीत."
ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराण अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतील असे क्षेपणास्त्र विकसित करत आहे, परंतु अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी (इंटेलिजन्स) असा काही पुरावा दिलेला नाही.
ट्रम्प यांनी असंही म्हटलं की, इराण जवळजवळ अण्वस्त्रं तयार करायला लागले आहे. पण हे वक्तव्य त्यांच्या आधीच्या विधानाशी अगदी विसंगत आहे. कारण त्याआधी इराणची अण्वस्त्रं तयार करणारी ठिकाणं 'पूर्णपणे नष्ट' केल्याचा त्यांनी दावा केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका आणि इस्रायल मिळून तेहरानमधील सरकार खूप कमकुवत करू शकतात, असा ट्रम्प यांना विश्वास आहे. जर सरकारने नाही मानलं, तर इराणी लोकांना रस्त्यावर उतरून सत्ता हातात घेण्याची मोठी संधी मिळेल, असं ट्रम्प यांना वाटतं.
"जेव्हा आम्ही हे काम संपवू, तेव्हा तुम्ही तुमच्या देशाची सत्ता घेऊ शकता. ही तुम्हाला संधी असेल, कदाचित अनेक पिढ्यांमध्ये एकदाच येणारी. अनेक वर्षे तुम्ही अमेरिकेची मदत मागत होता, पण तुम्हाला ती कधीही मिळाली नाही."
"जे मी आज रात्री करायला तयार आहे, ते पूर्वीचे कोणतेही राष्ट्राध्यक्ष करण्यास तयार नव्हते. आता तुम्हाला असा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे, जो तुम्हाला हवं ते देतोय. पाहूया तुम्ही कसा प्रतिसाद देता."
ट्रम्प इराणच्या लोकांना सरकार बदलण्याची जबाबदारी देत आहेत, त्यांना प्रोत्साहित करत आहेत. यामुळे जर सरकार टिकले तर त्यांना नंतर स्वतःला काही प्रमाणात बाहेर काढण्याची संधी मिळेल.
परंतु, काही लोक म्हणतात की अमेरिकेची नैतिक जबाबदारी आहे की हे काम त्यांनी पूर्ण करावं. पण नेहमीच 'डील' पूर्ण करता येईल असा मानणाऱ्या ट्रम्प यांच्यावर या गोष्टीचा प्रभाव किती पडतो हा देखील एक प्रश्नच आहे.
केवळ हवाई शक्तीचा वापर करून सत्ता बदलण्याची किंवा सुसज्ज शत्रूविरुद्ध युद्ध जिंकण्याचे कुठलेही उदाहरण नाही. 2003 मध्ये सद्दाम हुसेनला हटवण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनसह त्याच्या मित्र राष्ट्रांनी इराकमध्ये मोठे भूदल पाठवले.
2011 मध्ये, लिबियाचे कर्नल मुअम्मर गद्दाफीला नाटो आणि आखाती देशांनी सशस्त्र बंडखोर सैन्यांनी हटवलं आणि त्यांच्या हवाई दलाने संरक्षण दिले. ट्रम्प यांना आशा आहे की, इराणचे लोक हे काम स्वतः करू शकतात.

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images
ट्रम्प यांची योजना हा मोठा जोखमीचा खेळ आहे. केवळ हवाई हल्ल्यांमुळे सरकार बदलेल, अशी शक्यता अल्प आहे.
इराणमध्ये आतूनच पाश्चात्य समर्थक लोक सत्ता बदलू शकतात का? अशक्य नाहीये, पण युद्धाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत पाहता याची शक्यता फारच धूसर आहे.
आता जे लोक इराणचं सरकार चालवत आहेत, ते अधिक काळ टिकून राहतील, अजून क्षेपणास्त्रांचा मारा करतील. कारण त्यांना त्यांच्या विचारसरणीवर विश्वास आहे की, ते अमेरिका, इस्रायल किंवा गल्फ देशांपेक्षा जास्त त्रास सहन करू शकतात.
परंतु, सर्वात जास्त हा त्रास इराणमधील सामान्य लोकांना भोगावा लागेल, पण त्यांना या बाबतीत काही निर्णय घेण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही.
नेतन्याहू यांचं गणित काय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही इराणमधील लोकांना प्रोत्साहित करून स्वतःहून पुढे यायला सुचवलं आहे.
पण जर ते सरकारच्या निर्दयी सुरक्षा दलांना पराभूत करू शकले नाहीत, तर नेतन्याहू यांचे मुख्य लक्ष इराणचे सैन्य आणि त्याची ताकद तोडण्यात आहे. जेणेकरून ते इस्रायलसाठी धोका निर्माण करणारे गट पुन्हा तयार करू शकणार नाहीत.
अनेक दशकांपासून बेंजामिन नेतन्याहू इराणला इस्रायलचा सर्वात मोठा धोकादायक शत्रू मानत आले आहेत. इस्लामिक रिपब्लिकच्या राज्यकर्त्यांना ज्यू राष्ट्राचा नाश करण्यासाठी अण्वस्त्रं तयार करायची आहेत, असा त्यांचा विश्वास आहे.

फोटो स्रोत, GPO HANDOUT/EPA/Shutterstock
युद्धाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी नेतन्याहू तेल अवीवमधील एका छतावर उभे राहिले, कदाचित शहराच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर... आणि तेथून त्यांनी हे युद्ध संपताना कसं दिसेल हे सांगितलं.
त्यांनी म्हटलं की, "इस्रायल आणि अमेरिका एकत्र येऊन ते करू शकतील ज्याची आशा मी गेल्या 40 वर्षांपासून करत आहे. ते म्हणजे दहशतवादी सरकारला पूर्णपणे चिरडून टाकणं."
त्यांनी म्हटलं की, ही एक वचनबद्धता आहे जी ते पूर्ण करतील, याची खात्री आहे.
युद्धांचा नेहमी देशांतर्गत राजकारणाशी संबंध असतो. ट्रम्प यांच्याप्रमाणेच नेतन्याहू यांना देखील या वर्षी निवडणुकांना सामोरे जावं लागणार आहे. पण ट्रम्प यांच्यापेक्षा विरुद्ध परिस्थिती म्हणजे नेतन्याहूंची नोकरी धोक्यात आहे.
अनेक इस्रायली लोक नेतन्याहू यांना 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासला हल्ला करण्याची संधी दिल्याबद्दल दोषी धरतात. जर त्यांनी इस्रायलला इराणविरुद्ध निर्णायक विजय मिळवून दिला, तर निवडणुकीत लोक त्यांना माफ करतील आणि ते जिंकूही शकतील.
टिकून राहणं म्हणजे जिंकणं
सर्वोच्च नेते आणि त्यांच्या प्रमुख लष्करी सल्लागारांचा मृत्यू सरकारसाठी मोठा धक्का होता. पण याचा अर्थ असा नाही की, सरकार लगेचच कोसळेल.
अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी आणि इतर संस्थापकांनी जवळपास 50 वर्षांपूर्वी इराणची सत्ता अशी बनवली होती की ती युद्ध, हल्ले आणि नेत्याच्या मृत्यूपासून पण टिकून राहू शकेल.
त्यांनी फक्त एका व्यक्तीवर चालणारी सत्ता तयार केली नाही, तर सरकार चालवण्यासाठी विविध संस्था, धार्मिक मंडळी आणि सैन्य यांचं असं एक मजबूत जाळं तयार केलं, जे एकत्र काम करतं आणि देश चालवतं. त्यामुळे फक्त एका माणसाचा मृत्यू झाल्याने सरकार आपल्या जागेवरून कोसळणार, असं होणार नाही.
इराणची राजवट एक जटिल, गुंतागुंतीची व्यवस्था आहे ज्यामध्ये राजकीय आणि धार्मिक संस्था एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामांच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे ही राज्य रचना इतकी मजबूत बनवण्यात आली आहे की, ही रचना युद्ध आणि नेत्यांच्या हत्येइतकं मोठं संकटही सहन करू शकेल.
याचा अर्थ असा नाही की, सरकार लगेचच कोसळेल. इस्लामिक रिपब्लिकसमोर आता मोठं आव्हान आहे, पण त्यांनी या परिस्थितीची आधीपासूनच तयारी केली आहे.

फोटो स्रोत, Reuters
सरकारचा विजय म्हणजे फक्त टिकून राहणे. हे साध्य करण्यासाठी त्यांनी स्वतःभोवती खूप मजबूत सुरक्षा घालून ठेवली आहे.
सरकारकडे खूप ताकदवान आणि निर्दयी सुरक्षा यंत्रणा आहे. जानेवारीत त्यांच्या लोकांनी रस्त्यावर येऊन हजारो आंदोलकांना मारण्याचे आदेश पाळले.
आतापर्यंत- आणि मी वारंवार म्हटल्याप्रमाणे, मी हे लिहित असताना युद्धाचा आता फक्त तिसरा दिवस आहे. सरकारच्या लष्करी दलांचे सामर्थ्य घटत आहे, असं अद्याप कोणतंही चिन्ह दिसत नाहीये.
सीरियातून असद मॉस्कोला पळून गेल्यावर डिसेंबर 2024 मध्ये जे चित्र दिसलं होतं, तसं इथं सध्या दिसत नाही.
सरकारकडे सशस्त्र सैन्यदल आणि सुसज्ज पोलीस यंत्रणा आहे. त्याबरोबरच इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) आहे, यांचं मुख्य काम सरकारचे देशात आणि देशाबाहेर सुरक्षा करणे आहे.
हे दल 'विलायत-ए फकिह' किंवा न्यायशास्त्रज्ञांचं रक्षण करण्यासाठी अस्तित्वात आहे. हेच इराणच्या इस्लामिक क्रांतीचे मुख्य तत्त्वज्ञान आहे, जे शिया धार्मिक नेत्यांच्या (धर्मगुरू) सत्तेला न्याय्य ठरवते.
आयआरजीसीमध्ये सुमारे 1 लाख 90 हजार सक्रिय सैनिक आणि 6 लाखांपर्यंत राखीव सैनिक आहेत असं मानलं जातं. धार्मिक तत्त्वज्ञानाशिवाय, हा गट देशातील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग देखील हाताळतो. त्यामुळे त्यांचे नेते फक्त विचारसरणीमुळेच नाही तर आर्थिक फायद्यासाठीही सरकारला निष्ठावान राहतात.
आयआरजीसीला बासीज या स्वयंसेवी निमलष्करी दलाचा पाठिंबा आहे. या दलात अंदाजे 4 लाख 50 हजार सदस्य आहेत, जे सरकारप्रती निष्ठावान आणि गुंडगिरीसाठी ओळखले जातात.
मी 2009 च्या वादग्रस्त निवडणुकीनंतर तेहरानमध्ये झालेल्या आंदोलनावेळी ते पाहिलं. ते सरकारच्या संरक्षणाची पहिली फळी म्हणून रस्त्यावर उतरले, लोकांना ढकलून, लाठीचार्ज करून धमकावत होते.
त्यांच्या मागे सशस्त्र पोलीस आणि आयआरजीसीचे सैनिक होते. बासीजकडे मोटरसायकलवरून शहरभर फिरणारे 'फ्लायंग स्क्वॉड' देखील होते, जे विरोध दिसला की लगेच तिथेच दडपत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आयआरजीसी आणि बासीजला धमकी दिली की, त्यांनी शस्त्रं सोडली नाही तर त्यांचा नाश होईल - त्यांनी म्हटलं की 'हे चांगलं नसेल'. परंतु, त्यांच्या या धमक्यांमुळे सरकारच्या सैन्यातील अनेक लोकांचे मत बदलण्याची शक्यता कमी आहे.
इस्लामिक रिपब्लिक आणि शिया इस्लाम या हौतात्म्याच्या कल्पनेने भारावलेले आहेत. रविवारी, सर्वोच्च नेता सुरक्षित असल्याच्या दाव्यानंतर काही तासांतच सरकारी टीव्हीवरील वृत्तनिवेदकाने रडत रडतच खामेनी शहीद झाल्याची घोषणा केली.
काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, खामेनींनी तेहरानमधील घरात बैठक घेतली. ते वरिष्ठ सल्लागारांबरोबर होते. बाकी जगाला वाटत होतं की, हल्ला होणार आहे. खामेनींना शहीद होण्याची इच्छा होती.
सरकारला सामान्य लोकांचा पाठिंबा आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर, 40 दिवसांच्या शोकाच्या पहिल्याच दिवशी, हजारो लोक तेहरानमध्ये रस्त्यावर आले. त्यांनी सार्वजनिक चौकांमध्ये जमून मेणबत्त्या आणि मोबाइल फोनचा टॉर्च लावला. त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे आकाशात धुराचे लोट उठले होते.

आधीचे वाईट अनुभव
अमेरिकन लोकांना असा विश्वास आहे की, या वेळी, त्यांच्या थेट पाठिंब्याने आणि इस्रायलच्या मदतीने, ते शत्रू सरकार बदलू शकतात. आणि यामुळे मोठा अपाय किंवा आपत्तीही होणार नाही.
यापूर्वीची उदाहरणं चांगली नाहीत. 2003 मध्ये इराकमधील सद्दाम हुसेनला हटवल्यामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली. अनेक वर्षे युद्ध सुरू राहिले आणि त्यातून जिहादी अतिरेकी गट निर्माण झाले, जे आजही अस्तित्वात आहेत.
लिबिया, आपल्या लहान लोकसंख्येला पाश्चात्य जीवनमान देण्यासाठी पुरेसं तेल असलेला देश. गद्दाफीला मारून 15 वर्षे झाली. त्यानंतरही हा देश अपयशी, विस्कळीत आणि गरीब राहिला आहे. ज्या पाश्चात्य देशांनी त्याचा आनंद साजरा केला आणि हे घडवून आणलं. त्यांनी देश फुटल्यानंतर जबाबदारीपासून हात वर केले.

इराण हा इराकपेक्षा खूप मोठा देश आहे आणि सुमारे 9 कोटी लोक इथे राहतात, ज्यामुळे इराकच्या तुलनेत जवळपास तीन पट जास्त लोकसंख्या असलेला हा देश आहे.
जर इराणमधील सरकार पडलं, तर देशात गोंधळ, अराजकता आणि हत्या-हिंसाचार सुरू होऊ शकतो. असं वातावरण हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या सीरिया आणि इराकमध्ये झालेल्या गृहयुद्धांसारखं भयानक ठरू शकतं.
अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य कारवाईमुळे इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. त्यामुळे जरी सरकार टिकून राहिलं तरी मध्यपूर्वेतील परिस्थिती बदलत आहे.
सरकार पडलं तर बहुतांश इराणींना आनंद होईल. पण जबरदस्तीने, बळाने हटवलेलं सरकार शांततापूर्ण आणि सुसंगत पर्यायाने बदलणं फार मोठं आव्हान असेल.
ट्रम्प यांना वाटतं त्यांचं हे पाऊल यशस्वी होईल आणि पश्चिम आशिया अधिक चांगलं आणि सुरक्षित होईल. पण असं होणे हे फारच आव्हानात्मक आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











