दारूचा पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त परिणाम का होतो? पुरुषांपेक्षा महिलांना दारूचं व्यसन लगेच का लागतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मारिसा टेलर
- Role, फीचर्स प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
आजकाल स्त्रियांमध्येही दारूच्या व्यसनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. पण त्यांच्या या समस्येकडे आणि गरजांकडे वैद्यकीय क्षेत्राने आजवर म्हणावं असं लक्ष दिलेलं नाही.
एक काळ असा होता जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये फक्त पुरुषच जास्त दारू प्यायचे.
'मॅड मेन' सारख्या मालिकांमध्ये असंच काहीसं चित्रण असायचं. या मालिकांमध्ये डॉन ड्रेपरसारखे लोक ऑफिसमध्ये लपवलेल्या दारूच्या बाटल्यांमधून पेग भरून प्यायचे, दुपारी जेवताना तीन-तीन मार्टिनीचे पेग रिचवायचे आणि कामावरून सुटल्यावर अशा ठिकाणी जाऊन बसायचे जिथे स्त्रिया फिरकायची हिंमतही करायच्या नाहीत.
आपल्या बॉलिवूड सिनेमांमध्ये अजूनही दारू पिणारी स्त्री क्वचितच दाखवली जाते.
पण आता तज्ज्ञांच्या असं लक्षात आलंय की, स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवून केल्या जाणाऱ्या दारूच्या जाहिराती आणि समाजातील बदललेल्या भूमिकांमुळे हे चित्र आता हळूहळू बदलत चाललंय.
तसं पाहिलं तर पुरुष अजूनही स्त्रियांच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात 'बिंज ड्रिंकिंग' म्हणजे एकाच वेळी खूप जास्त दारू पितात.
पण तरुणाईच्या बाबतीत मात्र हे गणित बदलतंय. खरं सांगायचं तर 1991 ते 2000 या काळात जन्मलेल्या मुली आता त्यांच्या वयोगटातील मुलांइतकीच दारू पितात आणि लवकरच त्या मुलांच्याही पुढे निघून जातील अशी चिन्हं आहेत.
या दारूच्या वाईट परिणामांचा त्रासही स्त्रियांना पुरुषांसारखा होऊ लागलाय. अमेरिकेतील आकडेवारी सांगते की, 2000 ते 2015 दरम्यान 45 ते 64 वयोगटातील स्त्रियांमध्ये लिव्हरच्या आजाराने (सिरोसिस) मरणाऱ्यांचं प्रमाण चक्क 57% ने वाढलंय तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 21% होतं.
तसंच 25 ते 44 वयोगटातील स्त्रियांमध्ये हा धोका 18% ने वाढलाय पण याच वयोगटातील पुरुषांमध्ये मात्र तो 10% ने कमी झालाय. इतकंच नाही, तर दारूच्या ओव्हरडोसमुळे हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या स्त्रियांची संख्याही झपाट्याने वाढतेय.
पण खरी अडचण फक्त स्त्रिया जास्त दारू पितात ही नाहीये. संशोधकांना असं आढळलंय की, स्त्रियांच्या शरीरावर दारूचा परिणाम पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने होतो.
शास्त्रज्ञांना संशोधनात माहिती मिळाली आहे की, स्त्रियांच्या शरीरात 'अल्कोहोल डिहायड्रोजनेज' (ADH) नावाचं एक पाचक (Enzyme) कमी प्रमाणात तयार होतं. हे लिव्हरमध्ये असतं आणि शरीरातली दारू पचवण्याचं काम करतं.
दुसरी गोष्ट म्हणजे शरीरातली चरबी दारूला धरून ठेवते तर पाणी तिला शरीरात पसरवून सौम्य करायला मदत करतं. स्त्रियांच्या शरीरात नैसर्गिकरित्या चरबीचं प्रमाण जास्त आणि पाण्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे त्यांच्या शरीरात दारूचा परिणाम खूप जास्त आणि तीव्र होतो.

फोटो स्रोत, Getty Images
हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉन शुगरमन म्हणतात, "स्त्रियांची हीच शारीरिक रचना त्यांना अधिक दारुबाबत नाजूक बनवते. म्हणूनच दारूचं व्यसन असलेल्या स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आरोग्यविषयक समस्या दिसून येतात."
ज्या स्त्रिया खूप जास्त दारू पितात त्यांना पुरुषांपेक्षा खूप लवकर व्यसन लागतं आणि इतर आजारही पटकन जडतात. याला संशोधक 'टेलिस्कोपिंग' (Telescoping) म्हणतात.
म्हणजे काय? तर स्त्रिया पुरुषांपेक्षा आयुष्यात उशिरा दारू प्यायला सुरुवात करतात पण त्यांना व्यसन लागण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. स्त्रियांच्या यकृताला, हृदयाला आणि मज्जातंतूंना पुरुषांपेक्षा लवकर इजा पोहोचते.
शरीरावर होणाऱ्या परिणामांमधील हे लिंग-आधारित फरक आपल्याला अलीकडच्या काळातच समजले आहेत. उदाहरणार्थ, ADH मधील हा फरक सांगणारा पहिला अभ्यास 1990 मध्ये प्रसिद्ध झाला होता.
खरं तर 1990 पर्यंत मद्यपानाशी संबंधित जवळपास सर्वच वैद्यकीय संशोधनं ही केवळ पुरुषांवरच करण्यात आली होती.
शास्त्रज्ञांना असं वाटायचं की संशोधनात जितक्या कमी गोष्टी बदलू तितकं चांगलं आणि लिंग हा त्यातलाच एक मोठा बदल होता.
शिवाय, दारू पिणं ही फक्त पुरुषांचीच समस्या आहे असं मानलं गेल्यामुळे स्त्रियांवर अभ्यासच झालेला नाहीये. तो न झाल्याने काय राहून जातंय याचा कोणी विचारच केला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) सारख्या सरकारी संस्थांनी एक कठोर नियम लागू केला. त्यांनी अनिवार्य केलं की, कोणत्याही वैद्यकीय संशोधनात स्त्रिया आणि अल्पसंख्याक समुदायांचा समावेश असणं बंधनकारक आहे. या एका निर्णयामुळे वैद्यकीय संशोधनातील जुनी आणि गंभीर लिंगभेदाची दरी भरून निघाली आणि स्त्रियांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास खऱ्या अर्थाने सुरू झाला.
लोकांनी कधी स्त्रियांचा गांभीर्याने विचारच केला नाही, असं युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ डकोटाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमधील मानसोपचार आणि वर्तणूक शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका शॅरॉन विल्नॅक सांगतात. त्या सांगतात की , "ज्या थोड्याफार प्रमाणात स्त्रियांचा विचार केला जायचा तिथेही गृहीत धरलं जायचं की पुरुषांवर अभ्यास केला की तो स्त्रियांनाही लागू होईल.
1970 च्या दशकात विल्सनॅक यांनी स्त्रिया आणि दारूवर आपला प्रबंध लिहिला होता तेव्हा त्यांना लायब्ररीत या विषयावरचे फक्त सात अभ्यास सापडले होते.
पुढे त्यांनी आणि त्यांच्या पतीने मिळून स्त्रियांच्या दारू पिण्याच्या सवयींवर पहिला मोठा अभ्यास केला.
त्यांना असं आढळलं की, स्त्रियांच्या व्यसनाची कारणं पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात. बऱ्याचदा लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे त्या मद्याचा आधार घेतात.
व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या स्त्रियांना त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी आज हा निष्कर्ष अत्यंत महत्वाचा ठरला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर झालेल्या संशोधनातून आणखी गोष्टी समोर आल्या आहेत.
2000 सालाच्या दरम्यान मेंदूच्या तपासणीतून असं दिसून आलं की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मेंदू मद्याच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतो.
पण डॉ. मार्लेन ऑस्कर-बर्मन यांना एक वेगळीच गोष्ट सापडली.
जेव्हा त्यांनी दीर्घकाळ दारू पिणाऱ्यांच्या मेंदूचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मद्यपी पुरुषांच्या मेंदूतील 'रिवॉर्ड सेंटर' (आनंद देणारा भाग) लहान झालं होतं. हा भाग निर्णय घेण्यासाठी आणि जगण्यासाठी महत्त्वाचा असतो.
पण मद्यपी स्त्रियांमध्ये मात्र हा भाग दारू न पिणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत मोठा होता म्हणजे त्यांच्या मेंदूला पुरुषांच्या तुलनेत कमी इजा झाली होती.
डॉ. ऑस्कर-बर्मन म्हणतात, "हे पाहून आम्ही थक्क झालो. स्त्रियांच्या मेंदूला जास्त इजा होते या आजवरच्या समजुतीला हे निकाल छेद देणारे होते." शास्त्रज्ञांना अजूनही याचं नेमकं कारण शोधता आलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. शुगरमन यांच्या मते, या सगळ्यावरून हेच सिद्ध होतं की स्त्रियांसाठी वेगळे अभ्यास होणं किती गरजेचं आहे.
त्या सांगतात की, "जेव्हा दारूचं व्यसन असलेल्या स्त्रियांना फक्त स्त्रियांच्याच ग्रुपमध्ये उपचार दिले जातात तेव्हा त्याचे निकाल खूप चांगले येतात. तिथे त्यांना त्यांच्या व्यसनाची खरी कारणं आणि शरीरावर होणारे परिणाम नीट समजतात."
पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या दारू पिण्याची कारणं वेगळी असतात. स्त्रिया अनेकदा आपलं भावनिक दुःख विसरण्यासाठी दारू पितात तर पुरुष लोकांच्या आग्रहाखातर किंवा दबावाखाली दारू पितात.
शुगरमन म्हणतात, "काही स्त्रियांनी याआधी 10-10 वेळा ट्रीटमेंट घेतली होती पण त्यांना ही माहिती कधीच मिळाली नव्हती की स्त्रियांना दारूचा फटका जास्त बसतो किंवा त्यांच्या शरीरावर याचे वेगळे परिणाम होतात."
स्त्रियांची दारू पिण्याची वेगळी कारणं त्यांची शारीरिक रचना आणि त्यांचा जुना 'ट्रॉमा' पाहता त्यांच्यासाठी उपचाराच्या पद्धतीही वेगळ्या असायला हव्यात. उदाहरणार्थ, ज्या स्त्रीवर अत्याचार झाला आहे तिला अशा ग्रुपमध्ये सुरक्षित वाटणार नाही जिथे 70% पुरुष आहेत.
अशा स्त्रियांना जेव्हा दुसऱ्या स्त्रियांचे अनुभव ऐकायला मिळतात तेव्हा त्यांना 'आपण एकट्या नाही आहोत' याची जाणीव होते आणि त्या लवकर बऱ्या होतात.
थोडक्यात सांगायचं तर, जे पुरुषांसाठी लागू होतं तेच स्त्रियांसाठीही चालेल, ही जुनी विचारसरणी आता कायमची सोडून द्यायला हवी.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











