मुरली नाईक: शहिद अग्निवीराच्या आईची याचिका; न्यायालयाने केंद्र सरकारला का फटकारलं?

फोटो स्रोत, BBC\Apleshkarkare
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या अग्निवीर मुरली नाईकच्या आईच्या याचिकेला प्रतिसाद देण्यास विलंब केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या अग्निवीर मुरली नाईक यांच्या आईने ही याचिका दाखल केली होती.
कारवाईत शहीद झालेल्या नियमित सैनिकांप्रमाणे मरणोत्तर लाभ मिळावेत, या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेला उत्तर देण्यात विलंब केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला फटकारले आणि मोठा दंड आकारण्याचा इशारा दिला.
या याचिकेला उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला 6 मे पर्यंतची मुदत दिली आहे.
न्यायालयाने नमूद केलं आहे की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणि पुन्हा जानेवारीमध्ये केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली होती, परंतु आजपर्यंत कोणतेही उत्तर दाखल करण्यात आलेले नाही.
"ही याचिका गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर याचिकाकर्त्याने गेल्या वर्षी जुलैमध्ये सरकारला लिहिलेल्या पत्रात भाष्य केले आहे. प्रतिज्ञापत्रात उत्तर देणे तातडीचे आहे. पुढील तारखेपर्यंत उत्तर वप्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास, आम्ही मोठा दंड आकारू," असा इशारा न्यायमूर्ती घुगे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
न्यायालयानं असं सांगितलं की, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
तसेच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आपले प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणीसाठी 18 जून ही तारीख निश्चित केली.
याचिकेत काय म्हटलंय?
मुरली नाईक यांच्या आईने वकील संदेश मोरे, हेमंत घडीगावकर आणि हितेंद्र गांधी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत युक्तिवाद करताना म्हटलं की, "अग्निवीर नियमित सैनिकांप्रमाणेच कर्तव्ये पार पाडतात आणि त्याच धोक्यांना सामोरे जातात, तरीही या अल्पकालीन भरती कार्यक्रमांतर्गत भरती झालेल्यांच्या कुटुंबीयांना दीर्घकालीन निवृत्तीवेतन आणि इतर कल्याणकारी लाभांपासून वंचित ठेवले जाते."
"सरकारने सुरू केलेली अग्निपथ योजना, नियमित सैनिकांना सामान्यतः उपलब्ध असलेल्या सेवा-पश्चात निवृत्तीवेतन आणि इतर दीर्घकालीन कल्याणकारी हक्कांपासून अग्निवीरांना स्पष्टपणे वगळते," असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
या याचिकेनुसार, नाईक कुटुंबाला सुमारे 1 कोटी रुपयांची सानुग्रह रक्कम मिळाली, परंतु नियमित कौटुंबिक निवृत्तीवेतन किंवा इतर कोणतेही लाभ मिळाले नाहीत.
या याचिकेत, सेवेत असताना निधन पावलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन, संस्थात्मक मान्यता आणि कल्याणकारी उपाययोजनांसह समान मरणोत्तर लाभ मिळावेत, यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, हे लाभ तिच्या कुटुंबीयांनाही मिळावेत, या याचिकाकर्तीच्या विनंतीचा विचार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या याचिकेत म्हटलं आहे की, नाईक यांची जून 2023 मध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात भरती झाला होता.
त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या आईने अनेक अधिकाऱ्यांना पत्रे पाठवून, कर्तव्य बजावत असताना निधन पावलेल्या सामान्य सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या लाभांप्रमाणेच आपल्या कुटुंबीयांनाही लाभ मिळावेत, अशी विनंती केली.
मात्र, त्यांना अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या याचिकेत पुढे म्हटले आहे की, जरी संपूर्ण अग्निपथ योजनेच्या वैधतेला आव्हान दिले जात नसले तरी, हा उपक्रम "भेदभावपूर्ण" होता आणि त्याने मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले.
कोण होते मुरली नाईक?
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, पाकिस्तानने 8 मे रात्री जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भारतीय लष्करी ठिकाणे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
या हल्ल्यात मुंबई येथील जवानाचा मृत्यू झाला होता. मुरली श्रीराम नाईक (वय 23) असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव होतं. मुरली नाईक हे घाटकोपर येथील कामराज नगर येथील रहिवासी होते.
मुरली नाईक यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील उरी येथे होती. मुरली नाईक अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते.
त्यांच्या निधनाची बातमी मिळाल्यावर बीबीसी मराठीने मुरली नाईक यांचे मामा लक्ष्मण नाईक यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.
"आमच्या घरातला हसता खेळता मुलगा देशासाठी लढला. आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान आहे. मात्र, मुरलीच्या निधनानं कुटुंबाचा आधार हरपला", असं ते म्हणाले होते.
लक्ष्मण नाईक पुढं म्हणाले होते की, "मुरली अत्यंत शांत आणि आनंदी मुलगा होता. अत्यंत हुशार आणि कमी वयात देशसेवेसाठी रुजू झाला होता. तो लष्करी सेवेत भरती झाल्यानं कुटुंब आनंदात होतं.
मात्र, ही त्याची जाण्याची वेळ नव्हती. त्याच्या घरी फक्त आई-वडील आहेत. आता त्यांना कोणीही नाही, त्यांचं काय होईल?"

फोटो स्रोत, BBC\Apleshkarkare
मुरली यांचा जन्म मुंबईतच झाला होता. मुरली यांचं कुटुंब आंध्र प्रदेशमधील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील कल्की तांडा येथील आहे.
त्यांचे वडील श्रीराम नाईक आणि आई ज्योतीबाई नाईक हे कामानिमित्त मुंबईत आले होते.
मुंबईतील घाटकोपरमधील कामराज नगर परिसरामध्ये ते राहत होते. श्रीराम नाईक मुंबईत बिगारी काम करायचे, तर आई ज्योतीबाई या घरकाम करतात.
मुरली नाईक यांचा जन्म 23 ऑक्टोबर 2000 साली मुंबईतील राजावाडी रुग्णालयात झाला होता.
मुरली यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण आंध्र प्रदेशमध्ये घेतलं. हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं.
'आम्ही अनाथ झालो'
मुरली यांचे वडील श्रीराम नाईक म्हणाले होते की, "सकाळी 9 वाजता एका अधिकाऱ्याने फोन केला. जम्मू आणि काश्मीर सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात गोळी लागल्याने मुरलीचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं."
ते पुढं म्हणाले होते की, "आम्ही मुंबईत राहत होतो. मुरली तीन महिन्यांपूर्वी घरी आला.तो 20 दिवसांनी पुन्हा ड्युटीवर गेला. मुलगा देशासाठी लढला. आम्हाला एकच मुलगा आहे, आम्ही त्याच्यावर अवलंबून होतो. आता तो नाही, मी आणि माझी पत्नी अनाथ झालो."
माझी एकच इच्छा आहे. माझ्या मुलाचा पुतळा जिल्ह्यात बसवावा. त्याला कोणीतरी अभिवादन करताना पाहिलं तर मला आनंद होईल, असंही ते म्हणाले होते.
तर, मुरली यांच्या आई ज्योतीबाईंनीही मुलगा गेल्याचं दुःख व्यक्त केलं होतं.
"तो कालच व्हीडिओ कॉलवर बोललला होता. ठिक आहे का? जेवण केलं का? अशी विचारपूस त्यानं केली होती. पण, माझा एकुलता एक मुलगा गेला," असं बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
अग्निवीर अंतर्गत सैन्यदलात
मुरली नाईक डिसेंबर 2022 मध्ये अग्निवीर योजनेंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते. त्यानंतर नऊ महिने त्यांनी नाशिक येथील देवळालीमध्ये ट्रेनिंग घेतलं.
ट्रेनिंग झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांची पोस्टिंग आसाममध्ये करण्यात आली होती.
आसाममध्ये काही महिने सेवा दिल्यानंतर पंजाब येथे ते रूजू झाले होते. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये त्यांची पोस्टिंग करण्यात आली होती.
मुरली नाईक बंजारा समाजातील होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच घाटकोपरमधील मुत्तू मारी अम्मा मंदिरामध्ये समाजबांधवांनी आणि घाटकोपरकवासीयांनी गर्दी केली होती.

फोटो स्रोत, BBC\Apleshkarkare
यावेळी नाईक यांचे शेजारी आणि निकटवर्तीयांनी मुरली नाईक यांच्या आठवणी सांगत भावना व्यक्त केल्या.
मुत्तू मारी अम्मा मंदिराचे पुजारी आणि बंजारा समाजाचे प्रमुख पी. रवी नाईक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "मुरली हा अत्यंत हुशार आणि कुटुंबवत्सल मुलगा होता. लहानपणापासून तो शिक्षणासाठी आंध्र प्रदेशात होता. मुंबईत तो सुट्टी निमित्ताने यायचा. त्यावेळी या मंदिर परिसरामध्ये खेळायचा.
जेव्हा तो लष्करात भरती झाला होता, तेव्हा आम्हाला आनंद झाला होता. आज त्याच्या निधनानं खूप दुःख झालं आहे."
आई-वडील यात्रेसाठी मूळ गावी
मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक हे गेल्या 40 वर्षापासून मुंबईतील घाटकोपरमध्ये कुटुंबासह राहत आहेत.
ते राहत असलेल्या कामराज नगरमधील त्यांची वस्ती काही महिन्यांपूर्वीच पुनर्विकासासाठी गेली. त्यामुळं ते दुसऱ्या वस्तीत भाड्यानं राहतात.
मुरली यांचे आई-वडील काही दिवसांपूर्वीच मूळ गावी एका कार्यक्रमानिमित्ताने गेले आहेत.
पाकिस्तानच्या हल्ल्यात मुरली नाईक यांचा मृत्यू झाल्याचं सैनिक महामंडळाकडून आणि भारतीय नौदलाच्या वतीने कुटुंबाला कळवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, BBC\Apleshkarkare
लग्नासाठी मुलगी पाहणे सुरू होते
जवान मुरली नाईक यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच घाटकोपर येथील त्यांचे शेजारी सतीश नाईक यांना धक्का बसला होता.
बीबीसी मराठीशी बोलताना सतीश नाईक म्हणाले होते की, "नाईक यांचं कुटुंब मेहनती आहे. मुलगा, आई आणि वडील या तिघांनी खूप स्वप्नं पाहिली होती.
दोन महिन्यापूर्वीच मुरली मुंबईत घरी आला होता. मात्र असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं."
पुढे सतीश नाईक म्हणाले की, "लवकरच त्याचं लग्न करण्याचं नियोजन कुटुंबीयांनी केलं होतं. त्यासाठी मुलगी शोधण्याचा कार्यक्रम देखील आई-वडिलांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी हाती घेतला होता.
मात्र त्यापूर्वीच अशी घटना घडल्याने फार दुःख झाले आहे."
'आमचं लेकरु गेलं'
मुरलीचे आणखी एक शेजारी तिप्पा नाईक भावूक झाले होते.
ते म्हणाले की, "आमचं लेकरू गेलं, यावर विश्वास बसत नाही. तो अत्यंत शांत, हसतमुख होता. लहानपणापासून आम्ही त्याला खेळताना, शिकताना पाहिलं."

फोटो स्रोत, BBC\Alpeshkarkare
"आज त्याला देशासाठी मरण पत्करावं लागलं आहे, याचा अभिमान आहे, पण काळीज तुटलंय. त्याच्या आई-वडिलांचं दुःख शब्दांत सांगता येणार नाही.
आम्ही सगळे घाटकोपरवासीय त्यांच्या पाठीशी आहोत. आज आमचं घर शून्य झालंय आणि आमचं मनही." असंही पुढं ते म्हणाले.
चंद्राबाबू नायडूंकडून शोक व्यक्त
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वविट करुन जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे मूळचे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील होते.
मुरली नाईक यांना नायडू यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
तसेच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि अनेक मान्यवरांनी मुरली नाईक यांना सोशल मीडियाच्या माध्यमांतून श्रद्धांजली वाहिली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























