सुनेत्रा पवारांकडे 'या' खात्यांची जबाबदारी, एक खातं वगळलं; शपथविधीनंतर काय म्हणाल्या?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

फोटो स्रोत, X/Governor of Maharashtra

फोटो कॅप्शन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
वाचन वेळ: 12 मिनिटे

सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत.

राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती सोपवली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, अर्थमंत्री खातं वगळण्यात आलं आहे. हे खातं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राहणार आहे.

सुनेत्रा पवार खाती

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना 'शिव -शाहू-फुले-आंबेडकर' यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.

"दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन," असं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं.

त्या पुढे म्हणाल्या, "या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन.

"शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल."

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुनेत्रा पवार

फोटो स्रोत, X/Devendra Fadnavis

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत 2047' या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहिन. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू."

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे असा संकल्प आहे", असंही त्यांनी नमूद केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना सदिच्छा दिल्या आहेत. 'महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील', अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या घडामोडीवर सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.

'राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू!

डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही!' अशी प्रतिक्रिया रोहित पवार 'एक्स'वर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली.

सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घडामोडीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल, म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही, असं राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हटलं.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना सदिच्छा दिल्या आहेत. फडणवीस म्हणाले, "प्रसंग कठीण होता. पण, ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे."

पुढे फडणवीस म्हणाले, "शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही. पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत."

आतापर्यंत काय-काय घडामोडी घडल्या, त्याचा घटनाक्रम जाणून घ्या -

आतापर्यंतचा घटनाक्रम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी तयार झाली आहे.

त्यांच्या जाण्यानंतर आता उपमुख्यमंत्रिपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडण्यात यावं, अशा मागणी झाली. यानंतर आज (31 जानेवारी) दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत त्यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर लगेचच शपथविधी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडला आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

विधिमंडळ बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली असून आणि, विधिमंडळातले सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे.

बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठरावाचं पत्र देण्यात आलं आहे.

दरम्यान, एकीकडे, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते 'विलीनीकरणाची इच्छा अजित पवार यांची होती आणि आम्हाला या शपथविधीबाबत कोणतीही कल्पना नसल्याची' विधानं करत आहेत तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते विलीनीकरणाच्या प्रश्नांवर बोलणं टाळताना दिसत आहेत.

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी

एकीकडे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली असून त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आहे. याच्या काही वेळेआधी सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाल्या.

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी दाखल

अजित पवार यांच्या आई आशा पवार यांची भेट घेण्याकरिता सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी आल्या होत्या.

आशा पवारांना भेटल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना शपथविधीबद्दल आपल्याला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, "मी दिल्लीला जात आहे. अधिवेशनात मी फ्लोअर लीडर आहे. पार्थ त्यांच्या आजी आजोबांना भेटायला आला होता. बाकी काही नाही." शपथविधी बद्दल आपल्याला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली होती.

मंजुर झालेले दोन ठराव

राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दोन ठराव मंजूर झाले.

  • सुनेत्रा अजितदादा पवार यांची विधीमंडळ पक्षनेता, महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
  • सुनेत्रा अजितदादा पवार यांना महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढण्याचे तसेच विधीमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार देण्यात येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठरावाचं पत्र दिलं गेलं
फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठरावाचं पत्र दिलं गेलं

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ठरावाचं पत्र सोपवण्यात आलं आहे. त्यानंतर पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. असं झाल्यास त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठक सुरू झाली असून विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला असून छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे. त्यानुसार आता सुनेत्रा पवार यांच्या हातात राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आलं आहे.

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला असून दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले.

विधिमंडळ बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली असून आणि, विधिमंडळातले सर्वाधिकार सुनेत्रा पवार असे हे दोन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

सुनेत्रा पवार

फोटो स्रोत, Facebook/@Sunetra Ajit Pawar

अजित पवार यांच्या निधनानंतर आता पक्षाची सुत्र कोणाकडे येतील, याबाबत बरीच चर्चा सुरु होती. कालपासून राष्ट्रवादीचे नेतेमंडळींमध्ये चर्चा आणि बैठका सुरू होत्या. आज सुनेत्रा पवार यांच्या नावावर अनुमोदन मिळालं असून आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी पार पाडली जाणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी सर्वांत आधी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. त्यातूनच अनेक प्रश्नही निर्माण झालेले आहेत.

या पत्रकार परिषदेनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी-एससीपी नेत्यांची बैठक सुरू आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर सध्या काहीही बोलायचं नाहीये, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

"जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केली जात आहे," असं विधान त्यांनी केलं आहे.

आतापर्यंत काय काय घडलंय आणि कुणी कोणती विधानं केली आहेत, ते पाहूयात.

दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही अजित पवारांची इच्छा होती - जयंत पाटील

जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "अलीकडच्या काळात दादा स्वत: माझ्या घरी आठ-दहा वेळा आले होते आणि विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चा सुरू होत्या. बरेचदा ते म्हणायचे की, साहेबांच्या देखतच मला हे दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत. माझ्याबद्दल जे जनमानसात आहे ते सगळं पुसून जावं यासाठी मी पुन्हा साहेबांच्यासोबत यायला तयार आहे. विलीनीकरण व्हावं, ही त्यांची अंतिम आणि तीव्र अशी भूमिका होती."

"त्यांनी मला हेदेखील सांगितलं होतं की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि पक्षातील इतर आमदारांनादेखील त्यांनी याची कल्पना दिलेली आहे. माझे सगळे सहकारी मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय करतील," अशीही माहिती जयंत पाटील यांनी दिली.

सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल 'मला माहिती नाही', या शरद पवारांच्या विधानावर सुनील तटकरे काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images

पुढे, सुनेत्रा पवार यांच्या तातडीने होत असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्याशिवाय शपथविधी करता येत नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करू इच्छित नाही."

"त्यांचा पक्ष कागदोपत्री स्वतंत्र आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असे नेते घेत आहेत," असंही त्यांनी म्हटलं आहे.

विलिनीकरणासाठीच्या अंतिम बैठकीचा व्हीडिओ प्रसारित

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एका बैठकीचा व्हीडिओ प्रसारित केला असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

त्यानुसार, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच 17 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली होती.

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे की, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाबाबत ही अंतिम बैठक होती.

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विलिनीकरणासाठीच्या अंतिम बैठकीचा व्हीडिओ प्रसारित केला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
फोटो कॅप्शन, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विलिनीकरणासाठीच्या अंतिम बैठकीचा व्हीडिओ प्रसारित केला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार, शशिकांत शिंदे हे नेते उपस्थित होते.

याच बैठकीची माहिती देणारं विधान शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही केलं आहे.

ते म्हणाले आहेत की, "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा नक्कीच झाल्या होत्या. म्हणून तर आम्ही आता घड्याळावर लढतोय. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती," असं त्यांनी म्हटलंय.

या व्हीडिओबाबत बोलताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय की, "आज आम्ही एक व्हिडिओ पाहिला, त्यात बैठक दाखवण्यात आली आहे. ही बैठक बारामती येथे कृषी प्रदर्शनावेळी चहापानासाठी झाली होती. त्यानंतर अजित दादांनी एक पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचं त्यावेळी म्हटलं होतं. ज्या दिवशी चर्चा झाली त्याबाबत अजितदादांनी स्वतः माहिती घेऊन पत्रकारांना दिली होती. आज बैठका झाल्यानंतर सविस्तर आम्ही आपल्याशी बोलू," असंही त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

एकीकडे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, अशा स्वरूपाच्या सगळ्या हालचाली मुंबईमध्ये सुरू झालेल्या असताना दुसरीकडे बारामतीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबद्दलची कोणतीही चर्चा आमच्याशी झालेली नाही. तसा प्रस्तावही नाही आणि विचारणाही झालेली नाही. कदाचित तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असू शकतो. पण मला याबद्दल काहीही माहिती नाही."

आता सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरूये, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रस्ताव नाही, विचारणा, चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, Sunetra Ajit Pawar/Facebook

फोटो कॅप्शन, आता सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरूये, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रस्ताव नाही, विचारणा, चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर ते म्हणाले की, "अशा स्वरूपाची सकारात्मक चर्चा गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील याबद्दल चर्चा करत होते. गेल्या 12 तारखेला हा निर्णय जाहीर करण्यात येणार होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही दादांची इच्छा होती. ती पूर्ण व्हावी, हीच आमची इच्छा आहे," असंही ते म्हणाले.

मात्र, आता जे उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरूये, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. प्रस्ताव नाही, विचारणा, चर्चा नाही, हेदेखील ते म्हणाले.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे निर्णय आता त्यांच्या अनुपस्थितीत भाजपकडून घेतले जात आहेत का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मला याबद्दल काहीही माहिती नाही.

पुढे, विलिनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय, असंही ते म्हणाले आहेत. आमची चर्चा झाली होती, त्यात भाजपसोबत जायचा संबंध नव्हता, असंही एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे.

याशिवाय, सुप्रिया सुळे, रोहीत पवार यांना मंत्रिपदं देण्यात येणार, या चर्चांना अर्थ नाही. शिवाय, सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा निर्णय त्यांच्या पक्षाकडून घेण्यात येत असेल, असंही ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत आमच्याशी कसलीही चर्चा करण्यात आलेली नाही. सुनेत्रा पवारांना नेता निवडण्यात घाई का करण्यात येतेय, याबाबत मला माहिती नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा नक्कीच झाल्या होत्या. म्हणून तर आम्ही आता घड्याळावर लढतोय. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार होती," असं त्यांनी म्हटलंय.

शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर सध्या काहीही बोलायचं नाहीये, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

"जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केली आहे," असं विधान त्यांनी केलं आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांवत तसेच विलीनीकरणाच्या इतर कोणत्याही प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर सध्या काहीही बोलायचं नाहीये, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

फोटो स्रोत, Sunil Tatkare/Facebook

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर सध्या काहीही बोलायचं नाहीये, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

ते म्हणाले की, "आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. आम्ही सर्वजण बसू. मग त्यानंतर आम्हाला बोलता येईल."

शरद पवार यांनी केलेल्या विधानांवर प्रश्न विचारल्यावर ते पुन्हा एकदा म्हणाले की, "जे आमच्या बैठकीत घडेल आणि निर्णय होईल तो आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवू. तो त्यांच्या अखत्यारितला विषय आहे."

शपथविधी सोहळ्याला शरद पवारांना बोलवणार का, या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी मौन बाळगलं.

सुनेत्रा पवार यांच्या नावाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबद्दलच्या चर्चांबद्दल विचारलं असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढे ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल."

सुनेत्रा पवार यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे नेते काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "उद्या विधिमंडळ नेते निवडीच्या बैठकीनंतर पत्र मुख्यमंत्र्यांना देणार. त्यानंतर शपथविधीची वेळ ठरणार आहे."

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी यासंदर्भात म्हटलंय की, महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "सुनेत्राताईंना हे पद देण्याची मागणी माध्यमांमध्ये आणि अनेक लोकांकडून होत आहे. त्या चूक आहेत असं मला वाटत नाही पण शेवटी उद्याच्या (31 जानेवारी) बैठकीतच हा निर्णय होईल."

या बैठकीनंतर लगेचच शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, या बैठकीनंतर लगेचच शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"आम्ही आज (30 जानेवारी) मुख्यमंत्री यांना भेटायला गेलो होतो, तिथे टेन्टेटीव्ह असे ठरले होते की सीएलपीची मिटिंग बोलवायची आणि उद्या करायचे. पण दुखवटा असतो तर त्यामुळे अजून असे काही पत्र काढण्यात आलेले नाही."

पुढे ते म्हणाले की, "आज आमच्या समोर सीएलपी लिडर यांची नेमणुक करणे म्हणजेच उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे हे महत्वाचे आहे. आधी प्राधान्य काय आहे की सीएलपी नेमणे . त्यामुळे त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे. पुढल्या एक दोन तासात निर्णय होईल."

सुनेत्रा पवार

फोटो स्रोत, Sunetra Ajit Pawar/Facebook

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी या विषयावर बीबीसीशी बोलताना म्हटलंय की, "पवार कुटुंबियांनी एकत्र बसून शरद पवार यांच्या कार्यानुभवाचा उपयोग करून योग्य तो निर्णय घ्यावा. पदं कोणाला द्यायची. सुनेत्रा पवार वहिनींना काही जबाबदारी द्यायची का? पक्षाध्यक्षाच्या बाबतीत काय करायला पाहीजे असे सगळेच निर्णय पवार कुटुंबियांनी घ्यायला पाहीजेत. मर्जरबाबत बैठका सुरू होत्या यात तथ्य आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत ही अजित पवार यांची अंतिम इच्छा होती."

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा केलेली नाही. पण पक्षाचा निर्णय, आमदारांचा निर्णय आणि आमची स्वतःचीही भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहीजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू. अजून तसा विषय आलेला नाही. अजून राजकीय दुखवटा आहे. आज तिसरा दिवस आहे. पवार परिवारातही त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत.

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "सुनेत्रा वहिनींशीही बोलावं लागेल, पार्थ पवार जय पवार यांच्याशी बोलावं लागेल. आजचा दिवस जाऊदे. आम्ही रात्री किंवा उद्या त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. आमचीही भावना आहे हे पुन्हा पुन्हा सांगतो. योग्य निर्णय व्हावा."

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी ठाकरे बंधू बारामतीत दाखल

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजेच अजित पवार यांना निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना पक्षाचा उत्तराधिकारी कोण असेल, याबद्दल महत्त्वाचं विधान केलं होतं.

एकप्रकारे त्यांनी या चर्चेला अधिकृतरीत्या तोंड फोडलेलं होतं.

"अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे," असं नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.

आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच, असल्याचंही झिरवाळ म्हणालेत. आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथून पुढे एकत्रच असणार यात शंका नाही, असंही झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे.

लोकमत (नागपूर आवृत्ती) चे संपादक श्रीमंत माने यांच्याशीही बीबीसीने चर्चा केली.

ते म्हणतात, " 'पवार' कुटुंबाबाहेर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस चालवणं कठीण आहे. अजित पवार हे पक्षाचा मुख्य चेहरा होते आणि पवार कुटुंबाशी संबंधित असलेला सदस्यच हा पक्ष चालवू शकतो," असं ते सांगतात.

(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)