उधारीचे 1100 रुपये घेऊन मुंबईत आलेला कोलकात्याचा केदार असा बनला 'कुमार सानू'

फोटो स्रोत, Getty Images
"आई मला मांडीवर घेऊन मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायची. जसं वडिलांचं गाणं, तसंच आईच्या हातचं जेवणं."
हिंदी गाण्यांच्या विश्वातील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या या भावना आहेत. कुमार सानू यांचं खरं नाव केदारनाथ भट्टाचार्य आहे.
कुमार सानू यांची गायनाची कारकीर्द जवळपास 40 वर्षांची आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास 25,000 गाणी गायली आहेत.
'आशिकी', 'साजन', 'बाजीगर' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी आजदेखील लोकांच्या स्मरणात आहेत. लोक आजदेखील ती गाणी ऐकतात, गुणगुणतात.
कुमार सानू यांची आशिकी या चित्रपटातील 'अब तेरे बिन जी लेंगे हम' आणि 'दीवाना' चित्रपटातील 'सोचेंगे तुम्हें प्यार, करें कि नहीं' ही गाणी प्रचंड हिट झाली.
मात्र कुमार सानू यांनी फक्त हिंदी भाषेतच नाही, तर इतरही भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
बीबीसीच्या 'कहानी जिंदगी की' या विशेष कार्यक्रमात इरफान यांनी गायक कुमार सानू यांच्याशी संवाद साधला.
लहानपणापासून संगीताची आवड
कुमार सानू यांना जन्म पश्चिम बंगालमधील कोलकात्यात झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील देखील संगीतकार होते.
कुमार सानू सांगतात, "माझे वडील संगीत शिक्षक होते. ते घरीच मुलांना संगीत शिकवायचे. ते पाहत पाहतच आम्ही मोठे झालो. त्यामुळे लहानपणीच संगीत अंगात भिनलं होतं."
कुमार सानू यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांचा कल संगीताकडेच होता. त्यामुळे त्यांनी बी.कॉमचं शिक्षण मध्येच सोडलं होतं.
मात्र आज त्यांना संगीत क्षेत्रात आल्याचा आनंदच आहे. त्यावेळेस त्यांनी योग्य निर्णय घेतला होता असं त्यांना वाटतं.
पहिल्यांदा ते जेव्हा व्यासपीठावर गायले तेव्हा त्यांच्या गायनाला प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली होती. त्यातून कुमार सानू यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांना वाटलं होतं की याच क्षेत्रात आपण पुढे गेलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
करियरच्या सुरुवातीच्या काळात कुमार सानू कोलकात्यातील हॉटेलमध्ये गाणी गायचे. त्यांना चांगले पैसे मिळत होते. मात्र त्यांना संगीतात करियर करायचं असल्यामुळे त्यांनी मुंबईला जायचं ठरवलं. त्यांना चित्रपटसृष्टीत नाव कमवायचं होतं.
ते म्हणाले, "कोलकात्यात त्यावेळेस चांगले पैसे देखील मिळत होते. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत गाणं गायचं हे माझं उद्दिष्टं होतं."
मुंबईत जाण्यापूर्वी त्यांनी कोलकात्यात संगीत विश्वात नाव कमावण्याचा प्रयत्न केला.
गाण्याची संधी मिळावी म्हणून कोलकोत्यात असताना कुमार सानू त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगची कॅसेट बनवून बंगाली संगीतकारांना पाठवायचे. मात्र त्यांना बंगाली म्युझिक इंडस्ट्रीत कोणीही संधी दिली नाही. त्यामुळे मुंबईत जाण्याचा त्यांचा विचार आणखी पक्का झाला.
कुमार सानू म्हणतात, "त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की हाच संघर्ष आपण मुंबईत जाऊन केला पाहिजे. त्यावेळेस मला मुंबईत अनेक शक्यता दिसत होत्या. मला वाटलं की मी मुंबईत जाऊन प्रयत्न करायलाच हवेत."
"मी मोठ्या भावाकडून 1,100 रुपये उसनवार घेतले आणि ट्रेन पकडून थेट मुंबई गाठली."
मुंबईत कशी मिळाली पहिली संधी?
1986 साली कुमार सानू दुसऱ्यांदा मुंबईत आले. आल्यानंतर त्यांना फक्त सहा दिवसांतच एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली.
तो रविवारचा दिवस होता. कुमार सानू आराधना गेस्ट हाऊसवर गेले. तिथे गेल्यावर त्यांनी गेस्ट हाऊसच्या मालकाकडे गायकाच्या नोकरीबद्दल विचारणा केली.
कुमार सानू म्हणतात, "तिथे जाऊन मी तिथल्या मालकाला सांगितलं की मला एकदा गाणं गायची संधी द्या. ते ऐकून त्यांनी मला तिथे गाण्याची संधी दिली. तिथे मी 'हंगामा क्यों हैं बरपा' हे गाणं गायलो."
त्यांनी हे गाणंदेखील विचारपूर्वक निवडलं होतं. कारण मुंबईत येण्याआधी कोलकात्यात त्यांनी हॉटेलमध्ये काही वर्षे गाणी गायली होती. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये येणाऱ्यांच्या मन:स्थितीचं चांगलं आकलन होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कुमार सानू यांच्या गाण्याला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यांचं गाणं आराधना गेस्ट हाऊसमधील ग्राहकांना आणि त्याच्या मालकांना आवडलं.
या गाण्यानंतर त्यांना 14,000 रुपये टिप किंवा बक्षीसापोटी मिळाले. शिवाय त्यांचं गाणं त्या मालकाला आवडल्यामुळे त्याच दिवशी त्यांना ती नोकरीदेखील मिळाली.
या नोकरीमुळे त्यांना मुंबईत आधार नक्कीच मिळाला होता. मात्र, मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत गायक होणं, हेच त्यांचं स्वप्नं होतं.
किशोर कुमारांच्या प्रभावातून बाहेर पडत निर्माण केली स्वत:ची शैली
प्रत्येक कलाकाराचं एक प्रेरणास्थान असतं. सुरुवातीच्या काळात तो कलाकार या प्रेरणास्थानाची नक्कल करतो. कुमार सानू यांचं प्रेरणास्थान होते प्रसिद्ध गायक किशोर कुमार.
ते म्हणतात, "आपल्यावर कोणाचा तरी प्रभाव असतोच, आपण कोणाची तरी नक्कल करतोच. तशी मी किशोरदांची नक्कल करायचो."
"उदाहरणार्थ, अनेक मोठे कलाकारांवर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात इतरांचा प्रभाव असायचा. मोहम्मद रफी साहेबांवर दुराणी साहेबांची छाप होती."
"किशोर कुमार साहेबांवर सैगल साहेबांचा प्रभाव होता. मुकेशजींवर सैगल साहेबांची छाप होती. लतादीदींवर नूरजहान यांचा प्रभाव होता. आशाताईंवर गीता दत्त यांचा प्रभाव होता."
मात्र जेव्हा कुमार सानू यांना स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती. ती म्हणजे, जर ते फक्त 'किशोर कंठी' गायक राहिले, तर त्यांचा समावेश देखील इतर अशा अनेक गायकांमध्ये होईल जे येतात आणि जातात. त्यांची दखल कोणीही घेणार नाही.
मोठ्या कलाकारांकडून चांगल्या गोष्टी शिकाव्यात, मात्र स्वत:ची शैलीदेखील असावी असं कुमार सानू सांगतात.
तिथूनच कुमार सानू यांनी स्वत:च्या शैलीत, गायनात बदल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणं खूप आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कुमार सानू म्हणतात, "मी जेव्हा किशोरदांची गाणी गायचो, तेव्हा त्यात मी थोडीफार माझी शैली मिसळायचो. तीच गोष्ट हळूहळू मी व्यवस्थित पुढे नेत स्वत:ची शैली विकसित केली."
"त्यावेळेस मला ज्या संधी मिळाल्या, त्यात मी जीव तोडून काम केलं."
आणि मग तो क्षण आला, जेव्हा त्यांना 'आशिकी' या चित्रपटातील गाणी गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील गाण्यांमुळे कुमार सानू यांची फक्त एक वेगळी ओळख निर्माण झाली नाही, तर ते संगीत विश्वातील एक नवीन आवाज, गायक म्हणून पुढे आले.
कुमार सानू सांगतात, "तुम्हाला माझ्या गाण्यांमध्ये किशोरदा यांची झलक देखील दिसेल आणि कुमार सानू देखील दिसेल."
त्यांना वाटतं की कोणत्याही गायकानं गाण्यामध्ये त्याचं म्हणून काहीतरी योगदान दिलं पाहिजे. जर गायक फक्त दिलेल्या सूचनांप्रमाणेच गाणं गात राहिला आणि त्यानं त्यात स्वत:च्या शैलीची किंवा इतर कोणतीही भर घातली नाही, तर मग त्याची प्रगती होत नाही.
कुमार सानूंना वाटतं की गाण्यामध्ये गायकानं त्याचं योगदान देणं महत्त्वाचं असतं. ते म्हणतात, "संगीतकारानं सांगितलं आहे तितकंच तुम्ही केलं तर ते गाणं खुलत नाही. अर्थात ते बऱ्याच वेळा संगीतकारावर देखील अवलंबून असतं."
"उदाहरणार्थ बप्पी लाहिरी मला म्हणायचे, सानूदा हे तुझं गाणं आहे, तू तु्झ्या पद्धतीनं गा. "
ते म्हणाले, "माझी अशी अनेक गाणी आहेत, ज्यात मी माझं इनपुट दिलं आहे. ज्या गाण्यांमध्ये मी इनपुट देऊ शकत नाही, किंवा माझ्याकडून काही भर घातली गेली नाही. ती गाणी स्टेजवर सादर करताना मी माझं सर्व इनपुट त्यात टाकतो."
'गुलशन कुमार यांच्यामुळे हक्काचे पैसे मिळू लागले'
गुलशन कुमार यांची आठवण करत कुमार सानू सांगतात, "गुलशन कुमार हे वेगळंच व्यक्तिमत्वं होतं. त्यांनी म्युझिक इंडस्ट्रीला त्यांचा हक्क मागण्यास शिकवलं."
"संगीतकार असो की गायक असो की गीतकार असो, गुलशन कुमार स्वत:देखील पैसे द्यायचे. त्यांनी या सर्वांना त्यांच्या हक्काचे पैसे घेण्याची सवय लावली होती."

कुमार सानू म्हणतात की सुरुवातीला कलाकाराला किंवा गायकाला त्यांच्या मोबदल्याबद्दल आग्रही राहता येत नाही. मात्र जेव्हा त्यांचं स्थान निर्माण होतं, त्यानंतर ते मोबदल्याविषयी मागणी करू शकतात. अर्थात त्यात इतरही घटक महत्त्वाचे ठरत असतात.
कुमार सानू त्यांच्या यशस्वी करियरचं श्रेय गुलशन कुमार यांना देतात.
ते सांगतात, "गुलशनजींमुळेच मला 'धीरे-धीरे से मेरी ज़िंदगी में आना' हे गाणं मिळालं. त्याच गाण्यामुळे मी आज कुमार सानू आहे."
'आशिकी' चित्रपटामुळे झाले स्टार
कुमार सानू म्हणतात की त्यांनी ज्या गोष्टींची अपेक्षा केली नव्हती, त्या सर्व त्यांच्या बाबतीत घडल्या, ते सर्व त्यांना मिळालं. तसंच संघर्षामुळे ते अधिक तावून सुलाखून निघाले.
संघर्षाकडे ते नेहमीच सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं करियर घडवणारा चित्रपट म्हणजे 'आशिकी'.
'आशिकी' चित्रपटानं कुमार सानू एका रात्रीत स्टार झाले होते.
90 च्या दशकातील संगीताबद्दल कुमार सानू सांगतात, "त्या वेळेस संगीताला प्रचंड महत्त्व होतं. म्हणून संगीताला खूप किंमत होती. चित्रपटाचं संगीत विकून इतके पैसे मिळायचे की त्यातून निम्म्या चित्रपटाचं चित्रीकरण व्हायचं. त्यावेळचे चित्रपटदेखील सिल्व्हर जुबली असायचे."

फोटो स्रोत, Getty Images
'आशिकी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, कुमार सानू मुंबईतील प्रसिद्ध चंदन टॉकीजमध्ये चित्रपट पाहायला गेले.
तो प्रसंग आठवत ते सांगतात, "मी चित्रपटगृहात जाऊन पाहिलं की चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यावर प्रेक्षक चित्रपटगृहाच्या पडद्यावर पैसे फेकत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर सर्व लोक माझ्याबद्दल बोलत, माझ्याच शेजारून जात होते."
"कारण त्यावेळेस आजच्याप्रमाणे गायकांबद्दल इतकं माहित नसायचं. सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे मला कोणीही ओळखत नव्हतं. मात्र फक्त माझं नाव माहित होतं. त्यामुळे चित्रपटगृहातून बाहेर पडताना लोक माझ्या नावाची चर्चा करत होते."
त्या अनुभवानंतर त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की त्यांचा आवाज लाखो लोकांच्या मनाला भावला आहे.
संघर्ष न विसरलेले कुमार सानू
जगजीत सिंह, प्रकाश मेहरा, कल्याणजी आनंदजी यांनी करियरच्या सुरुवातीच्या काळात खूप मदत केल्याचं कुमार सानू सांगतात. कुमार सानू ही बाब विसरलेले नाहीत.
ते देखील ग्रामीण भागातील किंवा उदयोन्मुख कलाकारांना मदत करतात. त्यांच्याबरोबर गाणी गातात. त्यांना करियरसाठी प्रोत्साहन देतात.
कुमार सानू यांनी त्यांची अनेक हिट गाणी नव्या कलाकारांबरोबर गायली आहेत.
उदाहरणार्थ, 'दिल कहता है चल उन से मिल' हे गाणं त्यांनी बेला साळुंखे या नवख्या कलाकार असताना त्यांच्याबरोबर गायलं होतं. तर 'चोरी चोरी दिल तेरा चुराएंगे' हे गाणं देखील एका नव्या गायिकेबरोबर गायले होते.

बंगालीचा प्रभाव दूर करण्यासाठी शब्दफेक, उच्चारणावर घेतली मेहनत
कुमार सानू बंगाली आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर बंगाली छाप दिसून येते. मात्र त्यांच्या गाण्याच्या बाबतीत तसं होत नाही. त्यांनी हिंदीबरोबरच विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांना बंगाली आणि इतर प्रांतांमधील लोकगीतांची देखील उत्तम समज आहे.
त्या गाण्याचा आणि भाषेचा बाज ते अचूक पकडतात. यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. मुंबईत आल्यावर त्यांनी उर्दूची शिकवणी लावत उच्चारांवर बरंच काम केलं आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यातील शब्दफेक उत्तम झाली.
उच्चारणावरील या प्रभुत्वामुळे ते वेगवेगळ्या भाषांमध्ये अतिशय सहजतेनं आणि अतिशय उत्तमरित्या गाणी गातात. त्यात कुठेही बंगालीचा प्रभाव दिसत नाही.
संगीत क्षेत्रातील बदलांबद्दलचं मत
कुमार सानू यांची गायनाची कारकीर्द जवळपास 40 वर्षांची आहे. आजदेखील ते गात आहेत. मात्र त्यांना बदलत्या काळाची, बदलत्या ट्रेंडची जाणीव आहे.
ते सांगतात की, "काळ बदलत असतो, प्रेक्षकांच्या, चित्रपटसृष्टीच्या आवडीनिवडी बदलत असतात. आधी माझा आवाज लोकांना आवडायचा. नंतर इतर गायक लोकप्रिय झाले. आता अरिजीत सिंगचं गाणं लोकांना आवडतं."
"मी मोठमोठा ऑर्केस्ट्रा, वादकांचा ताफा असलेल्या वातावरणातदेखील गाण्याचं रेकॉर्डिंग केलं आहे. नंतर ट्रॅकवर गाणी रेकॉर्ड करण्याचा काळ आला. मग ऑटो ट्यूनचा ट्रेंड आला. त्याहून पुढे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
तरीदेखील त्यांना वाटतं की 90 च्या दशकातील रोमँटिक, हळूवार गाणी हाच चित्रपटसृष्टीच्या संगीताचा आत्मा आहे.
मात्र या सर्व बदलांशी जुळवून घेत आले आणि तरीदेखील स्वत:च्या गायनाची छाप सोडत आहेत.
स्वयंपाकाची प्रचंड आवड असलेला कलाकार
कुमार सानू यांना संगीताचं, गायनाचं वेड असलं तरी त्यांना स्वयंपाकाचीदेखील तितकीच आवड आहे. ते उत्तम स्वयंपाकी आहेत.
ते सांगतात, "मला सर्व प्रकारचा स्वयंपाक करता येतो. चायनीज असो, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, इटालियन सर्वप्रकारचं जेवण मला बनवता येतं. विशेषकरून मी बंगाली पदार्थ अतिशय उत्तम बनवतो. मात्र मी स्वयंपाकात प्रयोगदेखील करतो."
"लोक प्रत्येक डीशसाठी नेहमीचे ठरलेले मसाले वापरतात. माझी रेसिपी मात्र थोडी वेगळी असते. अलका आग्निक, शान हे माझ्या घरी येऊन जेवण करायचे. त्यांना माझ्या हातचा स्वयंपाक फार आवडतो.
आजदेखील त्यांचा हा छंद कायम आहे. ते काहीही वेगळं कॉम्बिनेशन करून पदार्थ तयार करतात. त्यांना सर्वाधिक समाधान स्वयंपाक करताना मिळतं. त्यामागं कारणदेखील आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्वयंपाकाची इतकी आवड असण्याबद्दल ते सांगतात, "लहानपणी परिस्थिती बेताचीच, गरीबीचीच होती. आई मला कड्यावर घेऊन स्वयंपाक करायची. मी खूप लहान होतो. आई मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायची."
"त्यामुळे मी पाहायचो की आई कशाप्रकारे स्वयंपाक करते आहे, काय बनवते आहे. त्यामुळे आईचा स्वयंपाक आणि वडिलांचं संगीत माझ्या अंगात भिनलं आहे."
"थोडा मोठा झाल्यावर मी आईला विचारायचो की हे काय बनवते आहे. अमूक गोष्ट त्यात का टाकली, हे काय आहे. त्यातून माझी स्वयंपाकाची आवड वाढत गेली.
आयुष्यात महत्त्वाची मानलेली मूल्यं
चित्रपटसृष्टीत गटबाजी असल्याचं म्हटलं जातं. मात्र कुमार सानू अशा गटबाजीपासून दूर राहतात. ते म्हणतात की मी अतिशय सकारात्मक व्यक्ती आहे. त्यामुळे मी गाणं गातो आहे की गात नाही याचा विचार करत नाही.
आयुष्याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट आहेत.
ते म्हणतात की "तुम्ही तत्वानं जगलं पाहिजे. दोनतीन मुद्दे नेहमीच आपण लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला म्हणजे अगदीच जिवावर बेतणार नसेल तर कधीही खोटं बोलू नये."
"दुसरा म्हणजे जेव्हा एखाद्या पैशांची खूपच गरज असते आणि तो तुमच्याकडे पैशांची मदत मागतो. तेव्हा त्याला पैसे उसनवार देऊ नका, त्याला थेट मदतच करा. ते पैसे त्याला देऊनच टाका."
"तिसरा मुद्दा म्हणजे कधीही कोणा पुढे हात पसरू नका. जितकं आयुष्यं जगाल ताठ मानेनं जगा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











