चीन : ऑफिसमध्ये जाण्यासाठी तरुण स्वतःच देत आहेत पैसे, वाढत्या बेरोजगारीमुळं सुरू झाला विचित्र ट्रेंड

ऑफिसमध्ये जाण्यासाठी आपणच द्यायचे पैसे...चीनमध्ये वाढत्या बेरोजगारीतून पुढे येतो आहे एक विचित्र ट्रेंड
फोटो कॅप्शन, शुई झोऊ
    • Author, सिलव्हिया चांग
    • Role, बीबीसी न्यूज चायनीज, हाँगकाँग
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

सर्वसाधारणपणे आपण नोकरी करतो ती पैसे कमावण्यासाठी. पगार न घेता कोणालाही काम करायचं नसतं. पण नोकरी करण्यासाठी बॉसला पैसे द्यावं लागत असतील तर? चीनमध्ये असाच काहीसा विचित्र ट्रेंड वाढतो आहे.

चीनमध्ये बेरोजगारी दर खूपच वाढला आहे. अशा परिस्थितीत चीनमधील बेरोजगारीला तोंड देणारे तरुण ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचं नाटक करण्यासाठी पैसे देत आहेत. तिथे हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.

या विचित्र ट्रेंडमधून तिथे वेगळ्याच प्रकारच्या कंपन्यांचं पीक आलं आहे. काम करत असल्याचा निव्वळ दिखावा करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या अशा कंपन्यांमध्ये तेजी आली आहे.

चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे, त्यामुळे तिथे नोकऱ्या किंवा रोजगारावर विपरित परिणाम झाला आहे. त्यातून हा नवीन ट्रेंड अस्तित्वात आला आहे.

प्रत्यक्षात नोकऱ्या मिळणं कठीण होत चालल्यामुळे, काहीजण घरी राहण्यापेक्षा ऑफिसमध्ये जाऊन काम करत असल्याचं दाखवण्यासाठी पैसे देण्यास प्राधान्य देत आहेत.

'खोट्या ऑफिसमध्ये येऊन आनंदी'

शुई झोऊ हा 30 वर्षांचा तरुण आहे. त्याचा फूड बिझनेस होता. मात्र तो गल्या वर्षी बंद पडला.

मग यावर्षी एप्रिल महिन्यात शुईनं, 'प्रीटेंड टू वर्क कंपनी' नावाच्या एका कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्यास सुरुवात केली.

या कंपनीकडून चालवल्या जात असलेल्या एका बनावट ऑफिसमध्ये जाण्यासाठी दररोज 30 युआन (अंदाजे 360 भारतीय रुपये) मोजण्यास सुरुवात केली. हाँगकाँगच्या उत्तरेला 114 किमी अंतरावर डोंगगुआन शहरात हे ऑफिस आहे.

या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत पाच आणखी 'सहकारी' आहेत. तेही असंच करत आहेत.

"मी खूप आनंदी आहे. एखाद्या ग्रुपमध्ये आपण एकत्र काम करत असल्यासारखं वाटतं," असं झोऊ म्हणाला.

'या बनावट ऑफिसमध्ये येऊन मी आनंदी आहे'

फोटो स्रोत, Getty Images

शेन्झेन, शांघाय, नानजिंग, वुहान, चेंगडू आणि कुनमिंगसह चीनमधील प्रमुख शहरांमध्ये आता असेच प्रकार होत आहेत.

बहुतांशवेळा हे बनावट ऑफिस एखाद्या पूर्णपणे कार्यरत असलेल्या ऑफिससारखीच दिसतात. तिथे कॉम्प्युटर्स, इंटरनेट, मीटिंग रुम आणि टी रुम असतात.

तिथे हे कर्मचारी फक्त बसून राहण्याऐवजी नोकरी शोधण्यासाठी कॉम्प्युटर्सचा वापर करू शकतात किंवा त्यांचा स्वत:चा व्यवसाय किंवा स्टार्ट-अप सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतात.

या अशा बनावट ऑफिसमध्ये राहण्यासाठी सर्वसाधारणपणे दररोज 30 ते 50 युआन मोजावे लागतात. त्यात दुपारचं जेवण, स्नॅक्स आणि ड्रिंक्सचा समावेश असतो.

चीनमधील बेरोजगारीचा प्रचंड दर आणि रोजगाराचं संकट

चीनमध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी दर 14 टक्क्यांहून अधिक आहे. तो कमी करणं कठीण झालं आहे. त्यामुळे अशा बनावट ऑफिस चालवणाऱ्या कंपन्या किंवा व्यवसायांची लोकप्रिया वाढली आहे.

याचा अर्थ असा की, विद्यापीठातील उच्चशिक्षित पदवीधरांना देखील नोकरी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी नोकरीच्या शोधात बाहेर पडणाऱ्या अशा पदवीधरांची संख्या 1.22 कोटीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ही विक्रमी संख्या असेल.

डॉ. ख्रिश्चन याओ, न्यूझीलंडमधील व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑफ वेलिंग्टन्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत. ते चीनच्या अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ आहेत.

चीनमध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी दर 14 टक्क्यांहून अधिक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनमध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी दर 14 टक्क्यांहून अधिक आहे.

डॉ. ख्रिश्चन याओ म्हणतात, "काम करण्याचं नाटक करण्याची संकल्पना आता खूप सामान्य झाली आहे. आर्थिक बदलांमुळे आणि शिक्षण आणि नोकरीच्या संधीमधील विसंगतीमुळे, पुढील टप्प्याविषयी विचार करण्यासाठी किंवा संक्रमण काळ म्हणून विचित्र स्वरुपाची कामं करण्यासाठी तरुणांना अशा प्रकारच्या बनावट ऑफिसेसची आवश्यकता आहे."

ते म्हणतात, "काम करण्याचं नाटक करणाऱ्या ऑफिसच्या कंपन्या (प्रीटेंड ऑफिस कंपन्या) या अशा संक्रमण काळातील उपायांपैकी एक आहेत."

शुई झोऊ शियाओहोंगशू नावाच्या सोशल मीडिया वेबसाईटवर ब्राऊझिंग करत असताना त्याला प्रीटेंड टू वर्क कंपनी सापडली. तो म्हणतो की, ऑफिसच्या वातावरणात त्यांच्यातील शिस्त सुधारेल. तो या ऑफिसमध्ये तीन महिन्यांहून अधिक काळापासून जातो आहे.

तरुणांना फेक ऑफिसचा दिलासा

शुई झोऊ यानं त्याच्या या ऑफिसचे फोटो त्याच्या पालकांना पाठवले. शुई म्हणतो की, बेरोजगारीच्या स्थितीत हे फोटो पाहून त्यांना खूप बरं वाटलं.

या बनावट ऑफिसमधील कर्मचारी त्यांना हवं तेव्हा येऊ शकतात आणि जाऊ शकतात. शुई झोऊ सर्वसाधारणपणे सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान ऑफिसमध्ये येतो. काहीवेळा तो रात्री 11 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतो. त्याचा मॅनेजर गेल्यानंतरच तो ऑफिसबाहेर पडतो.

शुई झोऊ यानं त्याच्या या ऑफिसचे फोटो त्याच्या पालकांना पाठवले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुई झोऊ यानं त्याच्या या ऑफिसचे फोटो त्याच्या पालकांना पाठवले.

शुई झोऊ पुढे म्हणतो की, ऑफिसमध्ये असणारे इतर जण आता मित्रांसारखे झाले आहेत. तो म्हणतो की, जेव्हा एखादा नोकरी शोधण्याच्या कामात व्यस्त असतो, तो त्यावर खूप मेहनत घेत असतो.

मात्र जेव्हा ते मोकळे असतात तेव्हा ते गप्पा मारतात, विनोद करतात आणि खेळतातही. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर ते अनेकदा रात्रीचं जेवणही एकत्र करतात.

शुई झोऊ म्हणतो की, त्याला याप्रकारचं टीमवर्क आवडतं. इथे येण्यास सुरुवात करण्याच्या आधीच्या तुलनेत तो आता जास्त आनंदी आहे.

इंटर्नशिपचा पुरावा देण्यासाठीचा मार्ग

शिओवेन तांग ही 23 वर्षांची पदवीधर आहे. गेल्या वर्षी तिला पदवी मिळाली. मात्र तिला अजूनही पूर्णवेळ नोकरी मिळालेली नाही. शांघायमध्ये, तिनं अशाच एका बनावट कंपनीत वर्कस्टेशन भाड्यानं घेतलं आहे. म्हणजेच ती बनावट ऑफिसमध्ये जाते.

तिनं ज्या विद्यापीठातून पदवी घेतली, तिथे एक अलिखित नियम आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांनी पदवी घेतल्यानंतर एका वर्षांच्या आता एखाद्या नोकरी-रोजगाराच्या करारावर सही केली पाहिजे किंवा इंटर्नशिपचा पुरावा दिला पाहिजे. नाहीतर त्यांना ती पदवी मिळणार नाही.

ती आता ज्या बनावट ऑफिसमध्ये जाते आहे, तिथले फोटो तिनं इंटर्नशिपचा पुरावा म्हणून तिच्या विद्यापीठात पाठवले. प्रत्यक्षात त्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी तिनंच दररोज पैसे मोजले होते. त्या ऑफिसमध्ये बसून पैसे मिळवण्यासाठी ती ऑनलाइन कादंबऱ्या लिहित होती.

"तुम्हाला बनाव तयार करायचा असेल, तर शेवटपर्यंत पूर्ण बनाव करा," असं तांग म्हणाली.

नैराश्यातून उदयाला आला विचित्र ट्रेंड

डॉ. बिआओ शिआंग जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँथ्रोपोलोजीचे संचालक आहेत.

नैराश्यातून उदयाला आला विचित्र ट्रेंड

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणतात, चीनमध्ये जो काम करत असल्याचं नाटक करण्याचा ट्रेंड निर्माण झाला आहे, तो रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे 'नैराश्य आणि असहायतेच्या' भावनेतून आला आहे.

"काम करण्याचं नाटक करणं हे तरुणांनी स्वत:साठी शोधलेलं कवच आहे. त्यातून ते समाजाच्या मुख्यप्रवाहापासून थोडंसं अंतर राखतात आणि स्वत:साठी जागा निर्माण करतात," असं डॉ. बिआओ म्हणतात.

बेरोजगार तरुण बनला कंपनीचा मालक

30 वर्षांचा फियू (टोपणनाव) डोंगगुआन शहरातील, 'प्रीटेंड टू वर्क कंपनी'चा मालक आहेत.

तो म्हणतो, "मी काही कामाचं ठिकाण विकत नाही. नोकरी नसल्यामुळे निरुपयोगी व्यक्ती असल्याची जी भावना निर्माण होते, ती दूर करणारा हा सन्मान आहे."

कोरोनाच्या संकटकाळाच्या आधी त्याचा स्वत:चा एक रिटेल व्यवसाय होता. मात्र त्या संकटात तो बंद पडला. त्यानंतर तोदेखील काही काळ बेरोजगार होता.

तो म्हणतो, "मी खूप निराश झालो होतो आणि काहीसा स्वत:लाच त्रास देत होतो. तुम्हाला परिस्थिती बदलायची असते. मात्र तुम्ही असहाय असता."

बेरोजगार तरुणच झाला फेक ऑफिस कंपनीचा मालक
फोटो कॅप्शन, फियू

यावर्षी एप्रिल महिन्यात त्यानं त्याच्या प्रीटेंड टू वर्क कंपनीची जाहिरात करण्यास सुरुवात केली. महिनाभरातच त्याचे सर्व वर्कस्टेशन भरले होते. तिथं नव्यानं जॉईन होणाऱ्यांना अर्ज करावा लागतो.

फियू म्हणतो की, त्याचे 40 टक्के ग्राहक हे अलीकडेच विद्यापीठातून पदवी घेतलेले तरुण आहे. त्यांना त्यांच्या शिक्षकांना इंटर्नशिपचा पुरावा देण्यासाठी कामाच्या ठिकाणाचे फोटो द्यायचे असतात. ते फोटो घेण्यासाठी ते इथे येतात.

तर त्यांच्यातील काहीजण पालकांच्या दबावातून मार्ग काढण्यासाठी इथे येतात.

फियू म्हणतो, इतर 60 टक्के ग्राहक फ्रिलान्सर्स आहेत. त्यातील बरेचजण डिजिटल नोमॅड आहेत. त्यातील काहीजण मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांसाठी काम करणारे आहेत, तसंच सायबर स्पेसमध्ये लिखाण करणारे आहेत.

ग्राहकांचं (ऑफिसमध्ये येणाऱ्यांचं) सरासरी वय जवळपास 30 वर्षे आहे. यातील सर्वात तरुण ग्राहक 25 वर्षांचा आहे.

सन्मान आणि करियरचा मार्ग मिळवून देणारा प्रयोग?

अधिकृतपणे या फेक ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना 'फ्लेक्झिबल एम्प्लॉयमेंट प्रोफेशनल्स' म्हटलं जातं. यात राईड-हेलिंग (ॲपद्वारे वाहनांची सेवा पुरवणारे) आणि ट्रकचालकांचा देखील समावेश आहे.

दीर्घकाळाचा विचार करता, फियू म्हणतो की हा व्यवसाय फायदेशीर राहील की नाही, याबद्दल शंका आहे. नफा कमावणाऱ्या व्यवसायाऐवजी तो याकडे एक सामाजिक प्रयोग म्हणून पाहणं अधिक पसंत करतो.

तो म्हणतो, "या बनावट ऑफिसेसमध्ये बेरोजगार तरुणांचा सन्मान राखण्यासाठी खोटेपणा वापरला जातो. मात्र यातून काहीजणांना वास्तव शोधण्याची संधी निर्माण होते. जर आम्ही युजर्स किंवा ग्राहकांना फक्त त्यांचा हा बनाव पुढे नेण्यास मदत केली, तर आम्हीदेखील या सौम्य फसवणुकीचा भाग होतो."

अधिकृतपणे या फेक ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना 'फ्लेक्झिबल एम्प्लॉयमेंट प्रोफेशनल्स' म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अधिकृतपणे या फेक ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना 'फ्लेक्झिबल एम्प्लॉयमेंट प्रोफेशनल्स' म्हटलं जातं.

फियू पुढे म्हणतो, "या तरुणांना त्यांच्या बनावट कामाच्या ठिकाणाचं रुपांतर त्यांच्या खऱ्या करियरमध्ये रुपांतरित करण्यासाठी मदत करूनच हा सामाजिक प्रयोग त्याच्या आश्वासनांची पूर्तता करतो."

शुई झोऊ आता त्यांचा बहुतांश वेळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कौशल्यं सुधारण्यात घालवतो आहे.

तो म्हणतो की त्याच्या लक्षात आलं आहे की काही कंपन्या नोकरभरती करताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलमधील कौशल्याचा उल्लेख करत आहेत.

त्यामुळे त्याला वाटतं की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कौशल्यं मिळवल्यामुळं त्याला पूर्णवेळ नोकरी मिळवणं 'सोप होईल'.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)