महाराजा रणजीत सिंह यांचा पेशावरचा ऐतिहासिक विजय, ज्यामुळे थांबले अफगाणांचे भारतावरील हल्ले

महाराजा रणजीत सिंह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार, संशोधक
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

मार्च 1823, वसंत ऋतू होता. सिंधू नदीतील पाण्याची पातळी कमी झालेली होती.

त्यामुळे महाराजा रणजीत सिंह यांनी हुंड गावाजवळच्या एका ऐतिहासिक घाटावरून नदी ओलांडण्याचं ठरवलं. याच घाटावरून त्यांच्या आधी अनेक विजेते गेले होते.

ओलाफ कारो यांनी 'द पठान्स' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी म्हटलं आहे की 18 व्या शतकाच्या मध्यापासून राज्य करत असलेल्या दुर्रानी अफगाणांचं 1818 मध्ये मुल्तानवरील नियंत्रण संपलं होतं. तसंच पुढील वर्षी काश्मीरबरोबरच सिंधू नदीच्या पूर्वेकडील प्रदेशावरील त्यांचं नियंत्रण पूर्णपणे संपुष्टात आलं होतं.

लाहोरमधून राज्य करणारे शीख राजे रणजीत सिंह यांनी नदीच्या अफगाणिस्तानकडील भागावर भक्कम वर्चस्व निर्माण केलं होतं.

पुढील 2 वर्षांमध्ये, रणजीत सिंह यांचं राज्य आणखी बळकट झालं. त्यांनी डेरा गाजी खान आणि डेरा इस्माईल खानचा प्रदेशदेखील त्यांच्या राज्यात आणला.

तसंच हसन अब्दालच्या उत्तरेला असणाऱ्या हजारा या जमातींवरदेखील विजय मिळवत त्यांना स्वत:च्या अधिपत्याखाली आणलं. या जमातींनी काश्मीरला जाणाऱ्या मार्गांपैकी एकावर कब्जा केलेला होता.

या आव्हानाला प्रत्युत्तर देणं, दुर्रानी राजवटीसाठी आवश्यक होतं.

ओलाफ कारो यांच्यानुसार, 1822 मध्ये अजीम खान बराकजई हा अफगाण राज्यपाल, जय सिंह अटारीवाला या पलायन केलेल्या शीख सरदाराबरोबर खैराबादवर हल्ला करण्यासाठी आणि रणजीत सिंहांना सिंधू नदीच्या पलीकडे रेटण्यासाठी पेशावरला आला होता. मात्र अंतर्गत समस्यांमुळे ही मोहीम सुरू होण्याआधीच त्याला परत जावं लागलं होतं.

महाराजा रणजीत सिंहाची मोहीम

कारो यांनी लिहिलं आहे, "रणजीत सिंह यांनी अजीम खान यार मोहम्मद खान याच्याकडे कर मागितला. मात्र यार मोहम्मदनं त्यांना मौल्यवान घोडे भेट देऊन त्यांची नाराजी तात्पुरती टाळली होती."

"नंतर रणजीत सिंहाना खबर मिळाली की अजीम खान पेशावरला येतो आहे. तर यार मोहम्मदनं, महाराजा रणजीत सिंहांचा रोष टाळण्यासाठी स्वातमध्ये युसूफजई लोकांकडे आश्रय घेतलेला आहे."

महाराजा रणजीत सिंह यांच्या पेशावरवरील विजयामुळे, थांबले भारतावरील अफगाण हल्ले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराजा रणजीत सिंह

त्यामुळे मार्च 1823 मध्ये रणजीत सिंह यांनी अजीम खानवर पुन्हा हल्ला केला.

कारो यांनी लिहिलं आहे की टोळीवाल्यांचे गट सिंधू नदीच्या युसूफजई तटावर गोळा झाले. त्यांनी शीख घोडेस्वारांना आव्हान देणाऱ्या घोषणा दिल्या.

ते ऐकून शीख सैनिक संतापले. त्यांनी त्यांचे घोडे नदीत घातले. त्यांनी अर्धे अंतर पोहून आणि अर्धे अंतर चालून नदी ओलांडली. मात्र अनेक सैनिक आणि घोडे नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले.

'त्यानंतर रणजीत सिंह यांनी त्यांच्या मुख्य सैन्याला गोळा करून पुढे कूच केलं. त्यांनी होड्या गोळा केल्या आणि हत्तीच्या मदतीनं तोफा नदीपलीकडे नेल्या. यादरम्यान जवळपास 20 हजारांचं युसूफजई आणि खट्टक सैन्यदेखील गोळा झालं. या सैन्याचं नेतृत्व सैयद अकबर शाह करत होते. ते बनिरमधील पीर बाबाचे वंशज होते.'

ऐतिहासिक लढाई

कारो यांनी लिहिलं आहे की अजीम खान बराकजई काबूलहून त्याच्या सैन्यासह पेशावरहून मुख्य रस्त्यानं पुढे चालले होते. मात्र नदी ओलांडण्याऐवजी त्यांनी मुख्य रस्त्याच्या पूर्वेला जवळपास 5 किलोमीटर अंतरावर तळ ठोकला. आता जिथे नौशेरा छावणी आहे तेच हे ठिकाण.

'या लढाईला सध्याच्या नौशेरा छावणीच्या नावानं ओळखलं जात नाही. कारण त्यावेळेस तिथे कोणतीही छावणी नव्हती. त्यामुळे ही लढाई लांदई नदीच्या उत्तरेकडील तटावरील नौखर नावाच्या प्राचीन गावाच्या नावानं ओळखली गेली.'

'या लढाईतील सर्वात तुंबळ संघर्ष पीर साबच्या डोंगराजवळ झाला होता. त्यामुळे या लढाईला कधीकधी त्या नावानं देखील ओळखलं जातं.'

या लढाईनंतर रणजीत सिंह यांनी पेशावर ताब्यात घेतलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या लढाईनंतर रणजीत सिंह यांनी पेशावर ताब्यात घेतलं

अलेक्झांडर गार्डनर यांनी 'सोल्जर अँड ट्रॅव्हलर: मेमॉयर्स ऑफ अलेक्झांडर गार्डनर, कर्नल ऑफ आर्टिलरी इन द सर्व्हिस ऑफ महाराजा रणजीत सिंह' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की प्रचंड हल्ले होऊन देखील, रणजीत सिंहांचं सैन्याला सिंधू नदी ओलांडण्यात यश आलं.

त्यानंतर टोळीवाल्यांचं सैन्य पीर साब डोंगरावर मागे हटलं. तिथे त्यांचं सैन्य पुन्हा एकटवलं. अजीम खानची दुर्रानी फौज आणि तोफखाना मदतीसाठी येतील अशी त्यांना आशा होती. मात्र काही अज्ञात कारणांमुळे अजीम खाननं लगेचच काबूल नदी ओलांडून टोळीवाल्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यांनी पुढे लिहिलं आहे की रणजीत सिंह यांनी टोळीवाल्यांच्या सैन्याच्या विरोधात त्यांच्या तोफा आणि पायदळाची मोर्चेबांधणी केली. त्यांनी फौजेतील एक छोटी तुकडी नदीच्या उजव्या (दक्षिण) किनाऱ्यावर अजीम खानला रोखण्यासाठी पाठवली.

रणजीत सिंह स्वत: रणांगणात उतरले

कारो यांनी लिहिलं आहे, टोळीवाल्यांमध्ये आणि शीख अकालींच्या सैन्यामध्ये समोरासमोरची तुंबळ लढाई सुरू झाली. अमृतसरच्या धार्मिक समूहाचे नेते फूला सिंह मारले गेले. शिखांचं घोडदळ टोळीवाल्यांच्या पायदळाविरोधात फारसं प्रभावी ठरलं नाही. कारण टोळीवाल्यांचं सैन्य मैदानात विखुरलेल्या खडकाळ टेकड्यांमध्ये चांगल्या रितीनं तैनात करण्यात आलेलं होतं.

'लढाईचं पारडं शीखांच्या विरोधात जाण्यास सुरुवात झाली. युसूफजई आणि त्यांच्या सैन्यानं जबरदस्त शौर्य दाखवत शिखांच्या प्रशिक्षित पायदळाला मागे रेटलं.'

त्यांनी लिहिलं आहे, 'टोळीवाल्यांच्या सैन्यानं उत्साहानं पुढे मुसंडी मारण्यात सुरुवात केली. मात्र महाराजा रणजीत सिंहांच्या फौजेतील गोरखा तुकडीनं त्यांना एका बाजूला अडवलं. या तुकडीनं स्क्वॉयर फॉर्मेशन बनवून पुढे येत असलेल्या टोळीवाल्यांच्या सैन्यावर सतत गोळीबार केला.'

रणजीत सिंह स्वत: रणांगणात उतरले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रणजीत सिंह

'दुसऱ्या बाजूला शीख तोफखान्यानं देखील नदीच्या पलीकडच्या तीरावरून परिणामकारक मारा केला. यामुळे टोळीवाल्यांच्या सैन्याची आगेकूच रोखली गेली.'

टोळीवाले या खडकाळ टेकड्यांच्या मागे हटले. मग शीख सैन्यानं पुन्हा गोळा होत पीर साबचा महत्त्वाचा डोंगर ताब्यात घेण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केले. मात्र प्रत्येक वेळेस त्यांना मागे रेटण्यात आलं.

कारो यांनी लिहिलं आहे, 'चौथ्या प्रयत्नात शिखांना डोंगर ताब्यात घेता आला. तेदेखील शक्य झालं, कारण स्वत: महाराजा रणजीत सिंह, उरलेले गोरखा सैनिक आणि आपल्या घोडेस्वार अंगरक्षकांचं नेतृत्त्व करत, मैदानात उतरले. त्यांनी सैन्याचं मनोधैर्य वाढवलं.'

त्यांनी लिहिलं आहे, या तुंबळ लढाईत टोळीवाल्यांच्या सैन्याचं जे नुकसान झालं, त्यांचं किती सैन्य मारलं गेलं, याचा अंदाज नौशेराजवळ असणाऱ्या विशाल कब्रस्तानांकडे पाहून लावला जाऊ शकतो.

पेशावर रणजीत सिंहांच्या ताब्यात

कारो यांच्यानुसार, यादरम्यान नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या अजीम खाननं नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही. तसंच त्यानं शिखांच्या तोफखान्याचा मारा कमी करण्यासाठीदेखील कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही.

त्यावेळेस त्याचं सैन्य नदीच्या दक्षिण तटावर होतं. त्याच संध्याकाळी अजीम खान मागे हटला. त्यानं लढाईत फारसा सहभाग घेतला नाही. यामागचं कोणतंही ठोस कारण देण्यात आलेलं नाही.

जोनाथन एल ली यांनी 'अफगाणिस्तान: अ हिस्ट्री फ्रॉम 1260 टू द प्रेझेंट' (अफगाणिस्तान: 1260 ते वर्तमानापर्यंतचा का इतिहास) हे पुस्तक लिहिलं आहे.

पेशावर रणजीत सिंहांच्या ताब्यात

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यात त्यांनी लिहिलं आहे की काहीजणांना वाटतं की अजीम खानला खात्री होती की त्याचा भाऊ शिखांच्या सांगण्यावरून पेशावर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी येत होता. तर काहीजण याकडे भित्रेपणा किंवा शीख हल्ल्याच्या तडाख्यात सापडण्याची भीती म्हणून पाहतात.

कारो यांनी लिहिलं आहे, "नऊ वर्षांनी अलेक्झांडर बर्न्स यांना पेशावरमध्ये सांगण्यात आलं की अजीम खानला त्याचा खजिना लुटला जाण्याची भीती होती. किंवा उत्तरेकडच्या किनाऱ्यावर अकाली सैन्याच्या जोरदार घोषणा, आरोळ्यांनी त्याचे सैनिक सतर्क झाले होते. शिखांच्या या आरोळ्यांमुळे त्यांना वाटलं की नवीन फौजेनं हल्ला केला आहे."

या लढाईनंतर थोड्याच दिवसांनी, अजीम खानचा कोणतीही दुखापत न होता मृत्यू झाला.

कारो यांनी लिहिलं आहे की, या मृत्यूमुळे 20 जिवंत भावांमधील शेवटचा एकजुटीचा धागाही संपला.

अजीम खानचा सावत्र भाऊ यार मोहम्मद यानं काबूलमध्ये अजीम खानची जागा घेतली. नंतर 1826 मध्ये तो अफगाणिस्तानचा राज्यकर्ता झाला आणि पेशावरचा राज्यकर्ता झाला.

अलेक्झांडर गार्डनर यांनी 'सोल्जर अँड ट्रॅव्हलर: मेमॉयर्स ऑफ अलेक्झांडर गार्डनर, कर्नल ऑफ आर्टिलरी इन द सर्व्हिस ऑफ महाराजा रणजीत सिंह' या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की 'रणजीत सिंह यांनी दुर्रानी राजवटीच्या उरलेल्या खुणा संपवत पेशावर उद्ध्वस्त केलं. खैबर खिंडीतून दुर्रानी सैन्याच्या मदतीला कुमक पोहोचू नये म्हणून खैबर खिंडदेखील त्यांनी नियंत्रणाखाली आणली.'

कारो यांनी लिहिलं आहे की बाला हिसारच्या किल्ल्यावर तोफगोळ्यांचा मारा झाला. त्याच्या आत असलेला सुंदर महाल लुटण्यात आला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बागेतील झाडं कापण्यात आली. कुंडांमधील पाणी खराब करण्यात आलं. त्यांच्या घोडेस्वारांनी पेशावरच्या सर्व बाजूला कित्येक मैलांपर्यंत असलेल्या आलू बुखारा, पीच, जर्दाळू आणि नाशपातीच्या उत्तम बागा नष्ट करण्यात आल्या.

इंग्रजांचं आगमन

व्ही. नालवा यांनी 'हरी सिंह नालवा' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की शीख सैन्याचे सेनापती हरी सिंह नालवा यांनी लवकरच या किल्ल्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरू केलं.

रणजीत सिंह यांना या लढाईत मिळालेला विजय हा त्यांच्या सर्वात विजयांचा कळस ठरला. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार आता पश्चिमेला खैबर खिंडीपासून उत्तरेला काश्मीर आणि दक्षिणेला मुल्तानपर्यंत झाला होता.

कारो यांच्यानुसार, रणजीत सिंह तिथे फार दिवस थांबले नाहीत. त्यांनी यार मोहम्मदकडून देण्यात आलेली स्वत:च्या शरणागतीची विनंती स्वीकारली आणि ते दक्षिणेकडे परतले.

'महाराजा रणजीत सिंह यांना आता पेशावरबरोबरच कोहाट, बन्नू आणि डेरा जाट नाममात्र नियंत्रणाखाली आणण्यात यश आलं होतं. मात्र त्यांच्या फौजेच्या सातत्यानं टोळीवाल्यांविरुद्ध भीषण लढाया होत राहायच्या. इतकंच काय ज्या प्रदेशात दुर्रानी राज्यपालांनी त्यांचं अधिपत्य मान्य केलं होतं, तिथंदेखील सतत लढाया होत राहायच्या.'

राजमोहन गांधी यांनी 'पश्तूनों के अहिंसक राजा' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून समोर येतं की त्यांच्यानंतर उत्तर भारतातील धार्मिक नेता सय्यद अहमद आला. तो 1827 मध्ये पेशावरला पोहोचला. चारसद्दा हे त्याच्या सत्तेचं केंद्र होतं.

त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की 'पेशावरच्या गव्हर्नरने आपल्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न केला असा आरोप सय्यद अहमदने केला. त्यानंतर त्यांनी पेशावर वर हल्ला केला. त्यात यार मोहम्मद खान मारल्या गेला.

'जर फ्रेंच कमांडर जनरल वेंचुरा याच्या नेतृत्वाखालील शिखांची तुकडी तिथे नसती, तर यार मोहम्मदचा छोटा भाऊ सुल्तान मोहम्मद खानला पेशावर वाचवता आलं नसतं.'

सय्यद अहमदनं पुन्हा एकदा पेशावर वर हल्ला केला. बराकजईंचा पराभव झाला आणि सय्यद अहमदनं 1830 च्या उन्हाळ्याच्या शेवटी 2 महिने पेशावर ताब्यात ठेवलं होतं. मात्र 1831 मध्ये बालाकोटमध्ये शिखांच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं, 1849 मध्ये शिखांचा पराभव केला. त्यानंतर ब्रिटिशांनी, कधीकाळी महाराजा रणजीत सिंह यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पेशावरसह पंजाब ताब्यात घेतला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)