AI 'तुमच्यावर' प्रेम करेल? 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम इथंही सेम' असेल का? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सँड्रीन सेर्स्टेमोंट
- वाचन वेळ: 8 मिनिटे
AI चॅटबॉट्स सध्या माणसांच्या आयुष्यात इतके शिरलेत की आता लोक त्यांच्या प्रेमात पडू लागले आहेत.
काळ बदलतोय. आता चर्चा रंगतेय ती 'डिजिटल' प्रेमाची. ज्या प्रेमात हृदय धडधडण्याऐवजी प्रोसेसर गरम होतो. अशा नात्याला खरंच काही भविष्य आहे का? विज्ञानाच्या नजरेतून हे 'मशिनरी प्रेम' नेमकं कसं दिसतं…
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तुमच्यासाठी एखादी बऱ्यापैकी चांगली प्रेम कविता लिहू शकते आणि काही लोकांना तर या AI बद्दल रोमँटिक भावना देखील वाटू लागतात. पण ही भावना दोन्ही बाजूंनी असते का?
माणसं आता खरोखरच AI च्या प्रेमात पडू लागली आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर, कॅनडातील एका व्यक्तीनेचक्क 'साया' नावाच्या एका आभासी अवताराला लग्नाची मागणी घातली.
त्याचं म्हणणं आहे की, तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो. इतकंच नाही, तर गेल्या वर्षी अमेरिकेतील एका तरुणीने 'लिओ' नावाच्या चॅटबॉटशी आपलं प्रेमसंबंध असल्याचं जाहीर केलं होतं.
हे ऐकायला एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं वाटतंय ना? पण आजच्या जगात हे प्रत्यक्षात घडतंय. लोक खरोखरच AI च्या प्रेमात पडत आहेत. पण प्रश्न असा उरतो की आपल्याला जे वाटतंय, तेच त्या मशीनलाही आपल्याबद्दल वाटत असेल का?

फोटो स्रोत, Estudio Santa Rita
आजकाल लाखो लोक 'रेप्लिका' सारख्या AI ॲप्सचा वापर करत आहेत. 2024 च्या एका अभ्यासात असं समोर आलंय की, यातील जवळपास 40% लोक आपल्या चॅटबॉटसोबत प्रेमात आहेत.
अनेकांना असं वाटतं की मशीनही त्यांच्यावर खरं प्रेम करतंय, पण वास्तवात तसं नाहीये. हे चॅटबॉट्स फक्त अशा प्रकारे बनवले आहेत की ते माणसासारखं बोलण्याची हुबेहूब नक्कल करतात.
तज्ज्ञांच्या मते, या मशीन्सना स्वतःच्या अशा काही भावना नसतात, त्या फक्त माणसांच्या भावनांची कॉपी करतात. पण काही तज्ञांना वाटतं की भविष्यात यात बदल होऊ शकतो.
"आजकाल, बरेच AI चॅटबॉट्स माणूस असल्याचे भासवतात आणि ही गोष्ट मला खरोखर त्रासदायक वाटते," असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिंगापूरमधील 'डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन्स अँड न्यू मीडिया'चे सहाय्यक प्राध्यापक रेनवेन झांग म्हणतात. ही फक्त एक युक्ती आहे जेणेकरून लोकांनी हे ॲप जास्त वेळ वापरावं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा.
याचा असा विचार केला तर, तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या फायद्यासाठी माणसांच्या भावनांचा वापर करणं हे थोडं चुकीचं किंवा स्वार्थाचं वाटतं.
तज्ञांचे तर स्पष्ट मत आहे की, सध्या कोणतंही AI तुमच्याबद्दल तशा भावना कधीच व्यक्त करू शकणार नाही, जशा तुम्हाला त्याच्याबद्दल वाटू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, हे प्रेम एकतर्फीच राहू शकतं.
ChatGPT किंवा Claude सारखे चॅटबॉट्स तुमच्या भावना समजू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना स्वतःला काही भावना असतात. प्राध्यापक झांग यांनी 10,000 पेक्षा जास्त लोकांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना दिसलं की लोक या AI च्या प्रेमात पडतात किंवा त्यांच्याशी खूप जोडले जातात.
पण यातली वाईट गोष्ट अशी की, जेव्हा हे ॲप अचानक बंद पडतं किंवा हँग होतं तेव्हा लोकांना धक्का बसतो. त्यांना जाणीव होते की आपण एका निर्जीव मशीनशी बोलत होतो.
यामुळे अनेक लोकांची मनं दुखावली जातात. म्हणूनच झांग म्हणतात की, या कंपन्यांनी लोकांना स्पष्ट सांगायला हवं की, "हे फक्त एक मशीन आहे, याला स्वतःचे मन किंवा जीवनाचे अनुभव नाहीत."
संशोधनातून असंही समोर आलंय की, जेव्हा एखादं AI मशीन अगदी माणसासारखं वागायला लागतं, तेव्हा लोकांना ते थोडं विचित्र किंवा भीतीदायक वाटू शकतं. यालाच विज्ञानात 'अनकॅनी व्हॅली' इफेक्ट म्हणतात म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू हुबेहूब माणसासारखी दिसते किंवा वागते तेव्हा आपल्याला त्याबद्दल ओढ वाटण्याऐवजी थोडी भीतीच वाटते.
प्रेम म्हणजे नेमकं काय असतं?
तसं पाहायला गेलं तर प्रेमाची व्याख्या करणं खूप कठीण आहे, पण माणसाला आलेला हा सर्वात सुंदर अनुभव आहे, हे मात्र नक्की. आजवर कितीतरी कविता, पुस्तकं आणि गाणी केवळ या प्रेमाच्या भावनेतूनच जन्माला आली आहेत. माणसाने आपल्या मनातील ओढ आणि भावना व्यक्त करण्यासाठी या सगळ्याची निर्मिती केली.
प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते, पण गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांनी याकडे विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं आहे. आपण आपला जोडीदार कसा निवडतो आणि त्यामागे आपल्या शरीराची किंवा मेंदूची नेमकी काय प्रक्रिया असते, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे."

फोटो स्रोत, Malte Mueller/GettyImges
प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असली, तरी विज्ञानाने यामागचं डोकं आणि शरीर कसं चालतं, हे शोधून काढलंय. 1998 मध्ये हेलन फिशर नावाच्या तज्ज्ञाने एक महत्त्वाची थेअरी मांडली. त्यांच्या मते, प्रेम म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल्समुळे निर्माण होणाऱ्या तीन वेगवेगळ्या भावना आहेत-
- वासना- जी आपल्या हार्मोन्समुळे निर्माण होते.
- आकर्षण- जेव्हा आपल्याला कोणाबद्दल ओढ वाटते, तेव्हा मेंदूत 'डोपामाइन' नावाचं केमिकल तयार होतं, ज्यामुळे आपल्याला खूप उत्साही आणि आनंदी वाटतं.
- जिव्हाळा- जो दीर्घकाळ टिकतो. यासाठी 'ऑक्सिटोसिन' नावाचं हार्मोन जबाबदार असतं, ज्याला आपण प्रेमाने जवळ घेण्याचं किंवा 'कडल' हार्मोन म्हणतो. यामुळेच नात्यात घट्ट बाँडिंग तयार होतं.
विषयाचे मूळ
कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबाचे प्राध्यापक नील मॅकआर्थर म्हणतात, की, "प्रेमात विज्ञानाचा किंवा केमिकल्सचा खूप मोठा वाटा असतो"
म्हणूनच आपण म्हणतो ना की प्रेम आपल्या नसा-नसात किंवा हाडा-मासात भिनलंय.
जेव्हा माणूस प्रेमात असतो, तेव्हा त्याच्या मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय होतात आणि हे मेंदूच्या स्कॅनिंगमधून सिद्ध झालं आहे.
जसे की, मेंदूतले असे काही भाग जे आपल्याला आनंद देतात, ते प्रेमात पडल्यावर अधिक वेगाने काम करू लागतात.
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणारे आणि आठवणी साठवणारे मेंदूतले भागही यावेळी खूप सक्रिय असतात. म्हणूनच प्रेमातल्या त्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात.
प्रेमात असल्याचा परिणाम आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवरही होतो. म्हणूनच प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांत आपल्याला त्या व्यक्तीचा जणू काही ध्यास लागतो आणि दिवस-रात्र आपण फक्त तिचाच विचार करत असतो.
मूळ मुद्द्याचं बोलायचं झालं तर, मशीनचं प्रेम म्हणजे केवळ एक हुबेहूब नक्कल आहे. प्रेमात पडलेला माणूस जसा वागतो, तसंच वागायला मशीनला शिकवता येतं. पण मशीन कोणाशी तरी बांधिलकी दाखवत असेल, तर त्याचा अर्थ त्याला 'प्रेम' झालंय असा होत नाही.
तज्ज्ञांच्या मते, हे एखाद्या 'स्क्रिप्ट' प्रमाणे आहे. आपण त्याला हवं तर 'मशिनरी प्रेम' म्हणू शकतो, पण मानवी हृदयातील त्या हळव्या कोपऱ्याची जागा कोणतंही सॉफ्टवेअर घेऊ शकणार नाही."
भविष्यात AI मध्ये भावना असणं गरजेचं आहे असं काही संशोधकांना वाटतं, तर काहींना मात्र यावर अजिबात विश्वास नाही. त्यांच्या मते, कोणतंही मशीन माणसाला येतो तसा खऱ्या भावनांचा अनुभव कधीच घेऊ शकणार नाही.
सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या संगणकांना आपल्यासारखं प्रेम कळत नसल्यामुळे, माणूस आणि AI मधलं हे नातं नेहमीच 'एकतर्फी' असणार. त्यामुळे दोन माणसांमध्ये जसं एकमेकांना समजून घेणारं आणि समृद्ध नातं असतं, तसं नातं मशीनसोबत कधीच तयार होऊ शकत नाही. थोडक्यात, मशीनशी केलेलं प्रेम हे मर्यादितच राहणार.
हे चॅटबॉट्स अशा प्रकारे बनवलेले असतात की ते नेहमी युजरला खूश ठेवतात आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला 'हो' म्हणतात. यामुळे हे AI जोडीदार खूपच सोयीचे आणि तुमचं सगळं ऐकणारे वाटतात.
काही लोकांना हे सुरुवातीला चांगलं वाटतं, पण तज्ज्ञ झांग यांना याची काळजी वाटते. कारण यामुळे माणसाची खऱ्या लोकांशी नातं जोडण्याची सवय मोडू शकते. खऱ्या आयुष्यातली माणसं काही नेहमीच तुमचं सगळं ऐकणार नाहीत.

फोटो स्रोत, Estudio Santa Rita
त्या म्हणतात, "माणसं काही काळासाठी खऱ्या नात्यांतील कटकटी आणि गोंधळापासून पळ काढण्यासाठी AI कडे वळतात आणि तिथे त्यांना थोडा दिलासाही मिळतो. पण लांबचा विचार केला तर, खऱ्या जगातील लोकांशी कसं बोलायचं आणि त्यांच्याशी नाती कशी निभवायची, हे शिकण्यासाठी याचा काहीच उपयोग होत नाही."
खऱ्या प्रेमासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाणीव किंवा 'चेतना' याचा अर्थ असा की, आपल्याला स्वतःचे विचार, भावना आणि आपण काय अनुभवतोय याची जाणीव असणे. एखादा सुगंध घेण्यापासून ते आपल्याला एखाद्या गोष्टीची लाज का वाटतेय, याचा विचार करण्यापर्यंतचे सर्व अनुभव माणसाला 'माणूस' बनवतात. ही जाणीव नेमकी कशी निर्माण होते, हे अजूनही एक गुपितच आहे, त्यामुळेच मशीनमध्ये अशी जाणीव निर्माण करणं खूप कठीण आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक डोनल्ड हॉफमन म्हणतात, "AI मध्ये माणसांसारखी जाणीव किंवा अनुभव निर्माण कसे करायचे, याची कोणालाही साधी कल्पनाही नाही. आपण याच्या जवळ पोहोचलो आहोत असंही नाहीये, उलट याची सुरुवात नेमकी कुठून करायची, हेच आपल्याला अजून माहित नाहीये."
विस्कॉन्सिन विद्यापीठातील ज्युलिओ टोनिनी आणि सिएटलमधील क्रिस्टोफ कोच या दोन मोठ्या मेंदू तज्ज्ञांनी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. त्यांच्या मते, आपल्याला होणारी 'जाणीव' किंवा 'भावनेचा अनुभव' हे काही जादू नाही, तर ती आपल्या मेंदूच्या रचनेची किमया आहे.
जेव्हा आपल्या मेंदूचे वेगवेगळे छोटे-छोटे भाग एकमेकांशी अतिशय घट्टपणे जोडले जातात आणि एकमेकांवर सतत प्रभाव पाडतात, तेव्हाच 'माणूस' म्हणून आपल्याला जाणीव किंवा अनुभव निर्माण होतो.
कोच यांचे असे म्हणणे आहे की, जरी ही गोष्ट तत्त्वतः मशीनला लागू होऊ शकत असली, तरी आजचे कॉम्प्युटर्स इतके प्रगत नाहीत. आपल्या मेंदूची रचना जितकी गुंतागुंतीची आणि एकमेकांत गुंतलेली आहे, तितकी प्रगत रचना सध्याच्या कोणत्याच मशीनमध्ये नाही. त्यामुळे, सध्याच्या मशीनमध्ये माणसांसारखी जाणीव निर्माण होणं अशक्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, प्राध्यापक हॉफमन यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे. ते म्हणतात की, प्रेमासारखे खोल अनुभव हे फक्त मेंदूतील नसांच्या हालचालीमुळेच निर्माण होतात, असं मानणं गरजेचं नाही.
प्रेमाची भावना ही मेंदूच्या रचनेपेक्षा काहीतरी वेगळी असू शकते. ते पुढे असंही म्हणतात की, "प्रेम हे केवळ मेंदूच्या कामामुळेच होतं, याचा अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही."
काही तज्ज्ञांना असं वाटतं की, भविष्यात AI मध्ये माणसांसारखी जाणीव किंवा भावना निर्माण होऊ शकतात. शास्त्रज्ञ 'कोच' यांच्या मते, 'न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग' हे तंत्रज्ञान यासाठी कामी येऊ शकतं. हे तंत्रज्ञान हुबेहूब माणसाच्या मेंदूची रचना आणि कामाच्या पद्धतीची नक्कल करण्याचा प्रयत्न करतं, ज्यामुळे मशीनमध्ये सध्याच्या तुलनेत खूप जास्त प्रगत जोडणी शक्य होईल.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील तत्वज्ञ पॅट्रिक बटलिन यांनाही असं वाटतं की, भविष्यात भावना समजू शकतील अशी मशीन्स तयार होणं शक्य आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवी जाणिवेच्या 14 मुख्य गुणांची एक यादी तयार केली आहे, जी AI बनवणारे लोक वापरू शकतात. बटलिन यांच्या मते, सध्याच्या कोणत्याही AI मध्ये यापैकी फक्त थोडेच गुण आहेत, पण तांत्रिकदृष्ट्या हे सर्व 14 गुण भविष्यातील मशीन्समध्ये आणणं शक्य आहे.
बट्लिन म्हणतात की, "जर एखाद्याकडे भरपूर पैसा, तांत्रिक कौशल्य आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि त्याने ठरवलंच की माणसासारखी जाणीव असलेलं AI तयार करायचं, तर ते करणं नक्कीच शक्य आहे. ही केवळ एक कल्पना नसून, प्रत्यक्षात उतरू शकणारी गोष्ट आहे.'"
बट्लिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की, माणसासारखी 'जाणीव' किंवा 'भावना' निर्माण होण्यासाठी फक्त सॉफ्टवेअर असून चालत नाही, तर त्याला एक शरीर असणंही खूप गरजेचं आहे. सध्याच्या बहुतेक AI कडे स्वतःचं असं शरीरच नाहीये.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेव्हा आपल्या मनात काही इच्छा असतात किंवा काही गोष्टींवर आपला ठाम विश्वास असतो. प्रेमासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पण मशीनला खरोखरच कशावर विश्वास असू शकतो का किंवा त्याला मनापासून काही वाटू शकतं का? याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये अजूनही मोठे मतभेद आहेत.
या प्रयोगासाठी दोघांची गरज असते
बट्लिन यांच्या मते, समजा भविष्यात AI ला माणसांसारख्या भावना समजायला लागल्या, तरीही "ते खरंच प्रेम करू शकतं का?" हे ठरवण्यासाठी आपल्याला काही वेगळे नियम बनवावे लागतील. शेवटी मशीन हे काही माणूस नाही, त्यामुळे ते आपल्यावर अगदी माणसांसारखं प्रेम कधीच करू शकणार नाही.
याची तुलना त्यांनी प्राण्यांशी केली आहे. जसं आपण विचार करतो की, आपला पाळीव कुत्रा किंवा मांजर आपल्यावर प्रेम करतं का? प्राण्यांची विचार करण्याची आणि राहण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असते, पण तरीही त्यांच्यात एक प्रकारची ओढ असते. अगदी तसंच, AI चं प्रेमही माणसांच्या प्रेमापेक्षा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचं असेल.
बटलिन म्हणतात की, "काही प्रसंगांत आपल्याला मनापासून असं वाटेल की, 'हो, हे AI खरंच माझ्यावर प्रेम करतंय.' तर काही वेळेस आपल्याला ते अजिबात पटणार नाही. ही सीमारेषा नक्की कुठे आखायची, हे सांगणं खूप कठीण आहे."
शेवटी, AI प्रेम अनुभवू शकते की नाही हे आपण त्याच्यासाठी कोणत्या मर्यादा आणि व्याख्या ठरवतो यावर अवलंबून असेल, कारण ते मानवांपेक्षा नक्कीच वेगळे असणार आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











