अंत्यसंस्कार केले अन् वडील जिवंत परतले, सांत्वन करायला आलेल्या नातलगांना काय दिसलं?

- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तमिळ
- वाचन वेळ: 4 मिनिटे
तामिळनाडूत एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील पोल्लाची येथील एका व्यक्तीने आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले. परंतु, नंतर त्यांचे वडील जिवंत परतल्याचे प्रकरण समोर आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार केलेला मृतदेह कोईम्बतूरच्या ईएसआय मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलकडे सोपवला आहे.
अंत्यसंस्कार करण्यात आलेली व्यक्ती आणि संबंधित मुलाचे वडील दोघेही एकसारखे दिसत असल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितलं. शेतमजूर असलेल्या मुलाने या अंत्यसंस्कारासाठी हजारो रुपये खर्च केल्याचेही ते म्हणाले.
ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे ठरवून केलेलं नाही, त्यामुळे संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जर हे नियोजित असतं, तर कायदेशीर सल्ला घेऊनच पावलं उचलली असती, असं कोट्टूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी जगदीशन यांनी बीबीसी तमिळला सांगितलं.
चेहऱ्यातील साम्यामुळे उडाला गोंधळ!
पोल्लाचीतील पेट्टानायक्कानूर येथील कालिदास यांनी गेल्या शनिवारी बेपत्ता असलेले आपले वडील मारुदामुथु यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. त्यांनी याची तक्रारही दाखल केली होती.
शोध घेत असताना त्यांना समजलं की, ते रस्त्याच्या कडेला पडले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं. पण त्यांना कुठं नेण्यात आलं हे मात्र समजू शकलं नव्हतं.
कालिदासच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुदामुथु यांना कालिदाससह तीन मुले आहेत. पण ते कुणाच्याही घरात न राहता, केंगमपलयम येथे एकटेच राहत होते.
वडिलांचा शोध घेत फिरत असणाऱ्या कालिदास यांना गेल्या रविवारी कोट्टूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं.
कालिदास पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना एक फोटो दाखवला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच हा मृतदेह कोईम्बतूर येथील सरकारी रुग्णालयाच्या शवागारात असल्याचे सांगितले.
पोलिसांकडे ओळख न पटलेल्या मृत व्यक्तीचा फोटो काढण्याची, तो विविध पोलीस ठाण्यांना पाठवण्याची आणि लोकांना पाहण्यासाठी ठाण्यांमधील सूचना फलकांवर लावण्याची पद्धत आहे.
कोट्टूर पोलिस ठाण्यात लावलेला फोटो पाहून काही लोकांनी हे केंगमपलयमचे रहिवासी मारुदामुथु असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कालिदास यांना बोलावलं.

फोटो स्रोत, Getty Images
मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन कालिदास यांचे कुटुंबीय कोईम्बतूर सरकारी रुग्णालयात गेले.
तिथे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पेटनायक्कनूर येथे आणून त्यावर अंत्यसंस्कारही केले.
"सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून पोल्लाचीहून आमच्या घरी येत असलेल्या नातेवाईकाला, समथूरजवळ माझे सासरे फिरताना दिसले. त्यांना पाहून त्याला धक्काच बसला. त्याने लगेच व्हीडिओ काढून आम्हाला पाठवला. आम्हालाही विश्वास बसला नाही. त्या नातेवाईकाने माझ्या सासऱ्यांना ऑटोने घरी आणले," असं कालिदासची पत्नी वैदेगी यांनी सांगितलं.
"तो येईपर्यंत आम्हाला विश्वासच नव्हता. तो आल्यानंतर आम्हाला मोठा धक्काच बसला. माझे पती कोईम्बतूर सरकारी रुग्णालयात गेले. कारण त्यांनी माझ्या सासऱ्यांचा फोटो कोट्टूर पोलीस ठाण्यात दाखवून घटनेची तक्रार केली होती."
"त्यांनी सांगितलं की, आईसबॉक्समधील मृतदेह दाखवण्यात आला. त्यावेळी मृतदेहाचा चेहरा खराब झाला होता. याबाबत विचारणा केली असता, तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण त्यांनी सांगितलं. मृतदेहाच्या कपड्यांबद्दलही जेव्हा विचारलं होतं, तेव्हा आधीचे कपडे खूप खराब झाले होते, त्यामुळे लोकांनी ते कपडे दिले असतील, असं उत्तर संबंधित लोकांनी दिले. त्यांच्यावर माझ्या पतीने विश्वास ठेवला," असं वैदेगी म्हणाल्या.
रस्त्यावर पडल्यानंतर रुग्णवाहिकेने त्यांना पोल्लाची येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे उपचारानंतर बरं वाटल्याने मारुदामुथु हे घरी परतण्याऐवजी एका नातेवाईकाच्या घरी गेले होते.
मारुदामुथुंचा शोध त्यांचे कुटुंबीय घेत होते. परंतु त्यांच्याकडे मोबाइल नसल्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे त्यांना समजलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
मारुदामुथु यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचा मुलगा कालिदास यांनी, "ते मानसिक तणावात आहेत, त्यामुळे त्यांची बोलण्याची इच्छा नाही," असं म्हटलं.
मृतदेहाचे दहन केले असते तर, काय कारवाई झाली असती?
शेतमजूर म्हणून नारळ फोडण्याचं काम करणाऱ्या कालिदास यांनी अंत्यसंस्कारावर हजारो रुपये खर्च केल्याचे त्यांची पत्नी वैदेगी यांनी सांगितलं.
मृत व्यक्ती मारूदामुथु नसल्याचं समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर मृतदेह कोईम्बतूरच्या ईएसआय रुग्णालयाकडे सोपवण्यात आला.
तपास अधिकारी जगदीशन यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं की, "यात पोलिसांची कोणतीही चूक नाही. मुलांनी सांगितलं की, हा त्यांच्या वडिलांचा मृतदेह आहे म्हणून पोलिसांनी कायदेशीर कागदपत्रे तयार करून दिली. नंतर समजलं की ते त्यांचे वडील नाहीत, त्यामुळे पोलिसांनी अज्ञात मृतदेह म्हणून त्याची नोंद केली आणि तो रुग्णालयाकडे सुपूर्द केला."
जो मृतदेह मारुदामुथु यांचा आहे म्हणून त्यांनी ताब्यात घेतला होता. नंतर कोईम्बतूर रुग्णालयात त्याची अज्ञात मृतदेह म्हणून नोंद करण्यात आली.
आता तो त्यांचा मृतदेह नाही हे समजल्यानंतर कोट्टूर पोलीस ठाण्यातही त्याची नोंद अज्ञात व्यक्तीचा मृतदेह म्हणून करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोइम्बतूर येथील ईएसआय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी मणिवन्नन म्हणाले, "9 मार्च रोजी सायंकाळी 7 नंतर हा मृतदेह एका अज्ञात व्यक्तीचा असल्याचे नोंदवण्यात आले आणि कोट्टूर पोलीस ठाण्यातून तो येथे पाठवण्यात आला. आज शवविच्छेदन करण्यात आले. आम्ही असे अज्ञात मृतदेह एक किंवा दोन आठवडे जतन करतो. त्यानंतर, आम्ही शवविच्छेदन करून तो पोलिसांच्या ताब्यात देतो."
अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. कदाचित तो रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या भिकारी व्यक्तीचा असू शकतो, असं पोलिसांनी सांगितलं.
जर मारुदामुथु यांच्या कुटुंबाने या मृतदेहाचे दहन केले असते तर, या प्रकरणात काय कायदेशीर कारवाई केली असती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
"सुदैवाने, असं काहीही घडलं नाही. जर घडलं असतं तर पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेतला असता आणि त्यानुसार कारवाई केली असती. फक्त चेहऱ्यातील साम्यामुळे असा गोंधळ निर्माण झाला. दुसऱ्याचा मृतदेह मिळवून अंत्यसंस्कार करण्यामागे त्यांचा कोणताही हेतू नसल्यामुळे, या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही," असं पोलीस निरीक्षक जगदीशन यांनी बीबीसी तमिळला सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











