'मेट्रोत भेटलेल्या एका महिलेला मी माझं स्त्री बीज दान केलं'

फोटो स्रोत, Gini Bhogal
- Author, व्हिक्टोरिया कूक
- Role, बीबीसी लंडन
- वाचन वेळ: 6 मिनिटे
गिनी भोगल जेव्हा मागे वळून, त्यांचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या लंडनच्या त्या अंडरग्राऊंड ट्रेन (मेट्रो) प्रवासाबद्दल विचार करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं.
ते 90 च्या दशकाचे सुरुवातीचे दिवस होते. गिनी त्यांच्या मैत्रिणींबरोबर व्यग्र पिकॅडिली लाईन मेट्रोतून प्रवास करत होत्या.
एक मूल सर्वांना हसवत होतं. त्यातून गिनी आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेमध्ये संभाषण सुरू झालं. त्या महिलेचं नाव अनिता होतं.
मग लवकरच त्या मुलांबद्दल बोलू लागल्या. त्यांनी गिनी यांच्या त्यावेळेस 2 वर्षांच्या असणाऱ्या मुलाबद्दल चर्चा केली.
अनिता यांनी सांगितलं की त्यांच्या स्त्री बीजासंबंधी समस्या असल्यामुळे त्यांना मूल होऊ शकत नाही. त्या पुढे म्हणाल्या की त्या स्त्री बीज दात्याच्या म्हणजे एग्ज डोनरच्या शोधात होत्या. त्यानंतर गिनी यांना लगेचच अनिताला मदत करायची तीव्र इच्छा झाली.
गिनी म्हणाल्या, "मला नेहमीच असं वाटत आलं आहे की मला कुणाची तरी मदत करायची आहे, किमान एका तरी व्यक्तीची मदत करायची आहे."
'कोणतीही शंका नव्हती'
पुढच्या स्टेशनवर दोघीजणी मेट्रोतून उतरल्या. त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले.
गिनी यांना आठवतं की, त्यावेळेस अनिता यांनी त्यांच्याकडे पाहत त्यांना विचारलं होतं, "तुम्ही खरोखरंच मला मदत कराल का?"
त्यांना स्त्री बीज दान करण्यात येणार आहे, यावर विश्वास ठेवणं त्यांना जवळपास खूप कठीण झालं होतं.
मात्र गिनी म्हणाल्या की त्यांची इतरांना मदत करण्याच्या तीव्र इच्छेनी त्या इतक्या भारावल्या होत्या की ही कृती केल्याशिवाय त्यांना चैनच पडू शकत नव्हता.
"ही गोष्ट करणे माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. त्या जागी इतर कोणतीही महिला असती तरी मी मदतीसाठी मागे हटले नसते."
गिनी यांच्या पतीला सुरुवातीला याविषयी शंका वाटत होती.
"त्याला वाटलं की मी वेडी झाले आहे. त्यानं विचारलं की, जर 13 वर्षांनी हे मूल आपल्या दारात आलं तर काय? त्यावेळेस तू काय करशील? आणि तुझी मुलं त्यावर कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील?," असं गिनी त्यावेळच्या संभाषणाबद्दल म्हणाल्या.
पतीला याबाबतीत चिंता वाटत असूनही गिनी म्हणाल्या की "माझ्या मनात त्याबद्दल कधीही शंका नव्हती."
त्या पुढे म्हणाल्या की त्यांचे पती अखेर हळूहळू यासाठी तयार झाले.
आयव्हीएफच्या प्रक्रियेचा प्रवास
गिनी यांनी सांगितलं की त्या निर्णयानं फक्त त्यांच्यासाठीच नाहीतर अनिता यांच्यासाठी देखील कशाप्रकारे एक विशेष प्रवास सुरू झाला.
गिनी यांनी औषधोपचारास सुरुवात केली. अखेरीस त्यांना 17 स्त्री बीजं दान करता आली. त्यातील 10 बीजांचं रूपांतर भ्रुणात झालं. मात्र पहिल्या 9 प्रयत्नांमध्ये अनिता यांच्या गर्भाशयात हस्तांतरित झालेले भ्रुण वाचू शकले नाहीत. अखेरीस, 10 वा आणि शेवटचा भ्रूण टिकला आणि अनिता गरोदर झाल्या.
नऊ महिन्यांनी, अनिता आणि त्यांच्या पतीनं त्यांच्या बाळाचं म्हणजे ख्रिस्तोफरचं स्वागत केलं.

फोटो स्रोत, Christopher Wedick
गिनी म्हणाल्या, "आमच्यात यासंदर्भात कोणताही करार झालेला नव्हता. त्यामुळे सर्व झाल्यानंतर ती निघून जाऊ शकली असती."
मात्र या महिला एकमेकांच्या संपर्कात राहिल्या. गिनी बनल्या 'आंटी गिनी'. अगदी ख्रिस्तोफर यांचं कुटुंब कामानिमित्त जगभरात फिरत असतानाही ते संपर्कात होते.
"ते मला नेहमीच ईमेल पाठवत असतं. मी त्याच्या पहिल्या वाढदिवसासाठी त्याला भेटवस्तू पाठवली होती," असं गिनी म्हणाल्या.
"आणि मग तिथून पुढे अनिता मला नेहमीच ईमेल पाठवायची किंवा फोटोंसह पत्र पाठवायची," असं गिनी म्हणाल्या.
गिनी पुढे म्हणाल्या की, अनिता आणि त्यांचं कुटुंब जेव्हा जेव्हा लंडनला येत असे, "ते नेहमीच मला भेटायचे. अगदी ते दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक रात्रीसाठी जरी विमानतळावर थांबणार असले, तरीदेखील ते मला भेटायचे."
त्या म्हणाल्या की यामुळे त्यांचे 'संबंध कायम राहिले'.
मात्र, ख्रिस्तोफरला कधीच कळलं नाही की गिनी खरोखर कोण होत्या.
मग, 3 वर्षांपूर्वी गिनी यांचा फोन वाजला. फोनवर अनिता होत्या. त्यांनी गिनी यांना सांगितलं की त्या ख्रिस्तोफरला त्याच्या जन्मामागचं सत्य सांगणार आहेत.
'तो एक चमत्कारच'
ज्या क्षणी हे ख्रिस्तोफरला समजलं होतं त्या क्षणाच्या आठवणींने ख्रिस्तोफरच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटतं.
तो सध्या मियामी काम करत आहे. ऑफिसच्या खिडकीतून त्याच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश पडतो. त्याचं घर मात्र एल साल्वाडोर इथं आहे.
ख्रिस्तोफर म्हणाला, "मोठं होत असताना, मला कशातही रस नव्हता किंवा काही करण्याकडे माझा कल नव्हता."
तो म्हणाला की दोन्ही महिला भारतीय वंशाच्या असल्यामुळे हे सत्य सहजपणे दडलेलं होतं. "अनिता गोव्याच्या आहेत. तर गिनी पंजाबच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग सारखाच आहे."
तो म्हणाला की ज्या दिवशी त्याच्या आईवडिलांनी त्याला हे सत्य सांगितलं, त्या दिवशी तो आंटी गिनी उपस्थित असताना व्हीडिओ कॉलवर होता.
त्यावेळेस कोरोनाचं संकट होतं आणि ख्रिस्तोफरची मेडिकल हिस्ट्री सांगण्याची इच्छा असल्यामुळे त्याच्या आईवडिलांना अखेरीस त्याला सत्य सांगावं लागलं, असं तो म्हणतो.
"तो एक खरोखरंच विलक्षण अनुभव होता. आम्ही जेव्हा हे सत्य मांडलं किंवा त्याची जाणीव झाली, तेव्हा तो माझ्यासाठी, माझ्या आईसाठी आणि गिनी यांच्यासाठी निश्चितच एक भावनिक क्षण होता."

फोटो स्रोत, Gini Bhogal
क्रिस्तोफरचं नव्या कुटुंबात स्वागत
हे एक आणखी मोठं कुटुंबं आणि 'दुसरी आई' ही क्रिस्तोफरसाठी एका नवीन आयुष्याची सुरुवात होती.
क्रिस्तोफर म्हणतो, "ते मला एक चमत्कारातून झालेलं बाळ मानतात. कारण ती प्रक्रिया मुळातच खूप कठीण आणि गुंतागुंतीची आहे. विशेषकरून 90 च्या दशकात तशी ती होती."
"त्यामुळे ती खरोखरंच एक चमत्कारासारखी प्रक्रिया होती. तुम्हाला माहितेय का, एका बाळाला जन्म देण्यासाठी तीन जणांची गरज पडली."
नंतर क्रिस्तोफर त्याच्या नव्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी युकेला गेला. तो त्यांच्यासोबत सुट्ट्या घालवण्यासाठीही गेला.
त्याला गिनी यांच्याशी ओळख होतानाचं आठवतं. त्यांच्या साम्य पाहून तो प्रभावित झाला होता.

फोटो स्रोत, Christopher Wedick
तो म्हणाला, "आम्हाला आवडणारा संगीतकार देखील एकच होता. तो म्हणजे सेड. आम्ही एकाच प्रकारची कॉफी प्यायचो. म्हणजेच नेहमीच काळी कॉफी प्यायचो. आमची विनोदबुद्धीदेखील सारखीच होती. थोडा डार्क ह्युमर."
"मला वाटतं की माझं आयुष्य आणि माझं संगोपन हे निसर्ग विरुद्ध पालनपोषणासारखंच आहे. माझं पालनपोषण, संगोपन माझी आई अनितानं केलं आणि माझा स्वभाव गिनीसारखा आहे," असं तो म्हणाला.
ख्रिस्तोफरसाठी हा अनुभव सकारात्मक होता. दोन्ही विस्तारित कुटुंबांना अतिशय गुप्त ठेवण्यात आलेलं सत्य कळताच, त्यांनी त्याचं स्वागत खुल्या दिलानं केलं.
"तिच्या कुटुंबाकडून काय अपेक्षा बाळगावी हे मला माहीत नव्हतं. मात्र मला कोणत्याही संकोचाशिवाय खुलेपणाचा मोकळेपणाचा अनुभव आला," असं क्रिस्तोफर म्हणाला.
आईवडिलांना गिनी यांनी सत्य कसं सांगितलं?
तर गिनी यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं, ते त्यांच्या आईवडिलांना सांगण्याचं. ते परंपरावादी शीख कुटुंबातून येतात.
सुरुवातीला गिनी यांनी त्यांच्या आईवडिलांना ख्रिस्तोफरची ओळख एका जवळच्या किंवा कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध असलेल्या मैत्रिणीचा मुलगा म्हणून करून दिली. मात्र नंतर, गिनी त्यांच्या सहा भावंडांची मदत घेत आईवडिलांबरोबर बसल्या आणि त्यांनी त्यांना सर्व कहाणी सांगितली.
"माझ्या वडिलांनी माझी कहाणी ऐकली. मग त्यांनी ख्रिस्तोफरकडे पाहिलं आणि म्हणाले, 'बेटा, मी तुझा आजोबा आहे.' तर माझ्या आईनं ख्रिस्तोफरला मिठी मारली आणि म्हणाली, 'माझं बाळ'."
त्यांनी कुटुंबात ख्रिस्तोफरचं लगेचच स्वागत केलं.
गिनी आणि ख्रिस्तोफर यांच्यातील नातं आणखी दृढ होतं आहे. ख्रिस्तोफर याला, एक 'बोनस कुटुंब' असं म्हणतो.
आणि, अनिता आणि त्यांच्या कुटुंबाच्या आशीर्वादानं त्यांची ही कहाणी शेअर करण्याची वेळ आता आली आहे, असं त्यांनी ठरवलं आहे.
गिनी म्हणाल्या की ही कहाणी शेअर केल्यापासून, त्यांच्याशी अनेक लोक संपर्क साधत आहेत, विशेषकरून दक्षिण आशियाई महिला मला सांगतात की माझ्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बोलण्याची परवानगी मिळाली आहे.
त्या म्हणाल्या, "कोणीही वंध्यत्वाबद्दल बोलत नाही. कोणीही स्त्री बीज दानावर चर्चा करत नाही. कारण त्यातून होणारं बाळ अनुवांशिकरीत्या त्या कुटुंबातील नसतं. त्यामुळे ते बोलणं टाळतात."

फोटो स्रोत, Christopher Wedick
ख्रिस्तोफरचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन
ख्रिस्तोफर पुन्हा पिकॅडिली लाईनवर गेला होता. त्याला अजूनही विश्वास बसत नाही की लंडनच्या अंडरग्राऊंड ट्रेनमध्ये झालेल्या एका अपघाती संभाषणानं तो जन्माला येण्यास कशी मदत झाली.
ख्रिस्तोफर म्हणतो, "त्या क्षणानं माझ्या आयुष्याची सुरुवात केली होती, हा विचार करणं खूप रंजक आहे."
"तेव्हापासून, मी अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात मदत करू शकलो आहे. मला लवकरच बाळ होणार आहे, त्यामुळे जीवनाचं हे चक्र असंच सुरू राहतं."
ख्रिस्तोफर पुढे म्हणतो, "मला वाटतं, आपल्यापैकी प्रत्येकजण या ग्रहावर चांगल्या गोष्टी करण्यासाठी, एकमेकांना मदत करण्यासाठी, प्रेम वाटण्यासाठी आणि नातेसंबंध जोडण्यासाठी आणि या जगात खरोखरच चांगला बदल घडवण्यासाठी आलो आहोत."
तो म्हणतो, "आणि मला वाटतं की ते माझ्या जीवनाच्या उद्देशांपैकी एक आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











