सौदी अरेबियाचा लाखो उंटांना पासपोर्ट देण्याचा निर्णय, काय आहे त्यामागचं कारण?

सौदी अरेबिया, देशातील लाखो उंटांना पासपोर्ट जारी करतो आहे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सैयद अब्दुल्लाह निजामी
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

सौदी अरेबियानं जाहीर केलं आहे की देशातील लाखो उंटांना पासपोर्ट दिला जाणार आहे.

सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे देशातील या मौल्यवान प्राण्यांचं पालनपोषण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.

तिथल्या अधिकाऱ्यांनुसार, या पावलांमुळे उंट पालनाचे फायदे वाढतील. त्याचबरोबर प्राण्यांची ओळख पटवण्याबाबत आणि त्यांच्या मालकांसंदर्भात एक विश्वासार्ह डेटाबेस तयार होईल.

सौदी अरेबियाच्या, पर्यावरण, जल आणि कृषी मंत्रालयाकडून सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हीडिओमध्ये याच्याशी संबंधित कागदपत्रंदेखील देण्यात आले आहेत.

यामध्ये एक हिरवा पासपोर्ट दाखवण्यात आला आहे. त्यावर देशाचा 'कोट ऑफ आर्म्स' (राजचिन्ह) आणि उंटाचा सोनेरी शिक्कादेखील आहेत.

सौदी अरेबिया, देशातील लाखो उंटांना पासपोर्ट जारी करतो आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरेबिया, देशातील लाखो उंटांना पासपोर्ट जारी करतो आहे

सौदी अरेबियाच्या सरकारनं 2024 मध्ये अंदाज लावला होता की सौदी अरेबियामध्ये जवळपास 22 लाख उंट आहेत.

हे उंट दरवर्षी सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत 2 अब्ज रियालहून (अंदाजे 4,836 कोटी रुपये) अधिकचं योगदान देतात.

'अरब न्यूज'नुसार जगभरात जवळपास 3.5 कोटी उंट आहेत. त्यापैकी 1 कोटी 70 लाख उंट अरब देशांमध्ये आहेत. याबाबतीत अरब देशांमध्ये सोमालिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सुदान, मॉरिटानिया, सौदी अरेबिया आणि येमेन यांचा क्रमांक लागतो.

उंट सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय प्रतीकाचा भाग आहे. सौदी अरेबियात उंटांच्या सौंदर्यस्पर्धा आणि शो यांचंदेखील आयोजन केलं जातं. तिथे सर्वोत्तम उंटांना बक्षीसे दिली जातात.

राष्ट्रीय दिवस, विशेष आणि ऐतिहासिक प्रसंगी सौदी अरेबियातील कार्यक्रम उंटांशिवाय अपूर्ण मानली जातात. सौदी अरेबिया आणि अरब आखातातील देशांमध्ये उंटांच्या भूमिकेचा प्रदीर्घ इतिहास आहे.

उंटांचा इतिहास आणि त्याचं महत्त्व

जर आपण संक्षिप्त इतिहास पाहिला तर आपल्याला 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात असे फोटो दिसतात, ज्यात दिसतं की मक्का आणि मदिना या इस्लाम धर्मातील पवित्र शहरांपर्यंतचा प्रवास करण्यासाठी उंट हे एकमेव साधन होतं.

अफगाणिस्तान, मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि इतकंच काय, अति पूर्वेतून धार्मिक प्रवास किंवा तीर्थयात्रांसाठी निघालेल्या लोकांचे तांडे लांबचा प्रवास केल्यानंतर सौदी अरेबियात पोहोचायचे. आखातातील ओसाड वाळवंटातून प्रवास करण्यासाठी उंटाचा वापर करण्याची परंपरा शतकानुशतकं जुनी आहे.

एका संशोधनातून समोर आलं आहे की सौदी अरेबियात खडकांवर कोरण्यात आलेली उंटांची शिल्प, ही जगातील प्राण्यांची सर्वात जुनी चित्रं असू शकतात.

सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधपासून जवळपास 150 किलोमीटर पूर्वेला असलेल्या रामाहमध्ये वार्षिक उत्सवात आलेले उंटावरील स्वार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधपासून जवळपास 150 किलोमीटर पूर्वेला असलेल्या रामाहमध्ये वार्षिक उत्सवात आलेले उंटावरील स्वार

ज्यावेळेस 2018 मध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा उत्खनन करण्यात आलं, तेव्हा संशोधकांनी अंदाज लावला की खडकांवर कोरण्यात आलेली ही शिल्प जवळपास 2 हजार वर्षांपूर्वीची असावीत.

असा अंदाज व्यक्त करण्यात आला की खडकांवर कोरण्यात आलेली ही शिल्पं, पेट्रा या जॉर्डनमधील प्रसिद्ध प्राचीन शहरात सापडलेल्या पुरातन कलाकृतींसारखीच होती. अर्थात नंतरच्या संशोधनात उंटांची ही शिल्पं 7 हजार ते 8 हजार वर्षे जुनी असल्याचं सांगण्यात आलं.

खडकांवर कोरण्यात आलेल्या शिल्पांचा योग्य कालखंड निश्चित करणं हे संशोधकांसाठी अत्यंत आव्हानात्मक असतं. कारण गुहेतील चित्रांच्या उलट याप्रकारच्या नमुन्यांमध्ये किंवा शिल्पांमध्ये अनेकदा कोणतेही जैविक घटक नसतात. या भागात या स्तराचा 'रॉक आर्ट' मिळणंदेखील दुर्मिळ आहे.

1930 साली मक्केकडे जात असलेला एक तांडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1930 साली मक्केकडे जात असलेला एक तांडा

सप्टेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका टीमनं त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष 'जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्स'मध्ये प्रसिद्ध केले होते.

त्यांनी या मूर्ती किंवा शिल्पांची नवीन तारीख निश्चित करण्यासाठी या प्रदेशात आढळलेले धूप होण्याचे पॅटर्न, खुणा आणि प्राण्यांच्या हाडांचं विश्लेषण केलं.

अशी शिल्पं पाषाण युगाहून अधिक प्राचीन असल्याचं सांगितलं जातं. ती 5 हजार वर्षे जुनी असू शकतात. ती इजिप्तमधील गिझाच्या पिरॅमिडपेक्षाही जुनी असू शकतात. हे पिरॅमिड साडेचार हजार वर्षे जुने आहेत.

ही शिल्प, उंटांचा वापर पाळीव प्राणी म्हणून करण्यापूर्वी तयार करण्यात आली होती. हे उंट या प्रदेशाच्या आर्थिक विकासाचं एक महत्त्वाचं प्रतीक होती.

जेव्हा ही शिल्पं तयार करण्यात आली होती, त्याकाळचा सौदी अरेबिया आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. आजच्या वाळवंटाऐवजी तिथे तलावांसह अनेक हिरवेगार आणि गवताळ प्रदेश होते.

उंटांची ही शिल्प का तयार करण्यात आली होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र संशोधकांना वाटतं की हे भटक्या जमातींचं भेटण्याचं ठिकाण असावं.

'उंटांशिवाय वाळवंटात जिवंत राहणं अशक्य होतं'

सौदी इतिहासकार आणि रियाध वृत्तपत्रातील स्तंभलेखक बदर बिन सौद यांचं म्हणणं आहे की शतकानुशतकं अरब द्वीपकल्पात, उंट हे जीवनाचा अविभाज्य भाग राहिले आहेत.

त्यांचं म्हणणं आहे, "उंटांशिवाय या रणरणत्या वाळवंटात जिवंत राहणं अशक्य होतं."

याच वैशिष्ट्यामुळे अरब जगताची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि जीवनाच्या इतर पैलूंमध्ये उंटाचा समावेश राहिला आहे.

बदर बिन सौद म्हणतात त्याप्रमाणे, "इस्लामपूर्व काळात तरफा इब्न अल-अब्द सारख्या कवींनी त्यांच्या कवितांमध्ये उंटांचा उल्लेख केला होता."

विसाव्या शतकाच्या मध्यात, सौदी अरेबिया आणि एका अमेरिकन कंपनीच्या संयुक्त उपक्रमातील कच्च्या तेलाच्या विहिरीजवळ असलेला उंटांचा कळप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विसाव्या शतकाच्या मध्यात, सौदी अरेबिया आणि एका अमेरिकन कंपनीच्या संयुक्त उपक्रमातील कच्च्या तेलाच्या विहिरीजवळ असलेला उंटांचा कळप

डॉक्टर बदर बिन सौद यांच्या मते, "उंटांनी मानवी जीवनात जी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याच कारणामुळे इस्लामचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याकडे देखील एक उंट होता. त्याचं नाव 'कस्वा' होतं."

अर्थात प्रवासी वाहतूक किंवा मालाची वाहतूक करण्यासंदर्भातील उंटांची आवश्यकता आता कमी झाली आहे. मात्र अरब नेते आणि त्यांच्यामधील प्रेम आणि ऐतिहासिक संबंध अबाधित आहेत.

आधुनिक सौदी अरेबियाचे संस्थापक शाह अब्दुल अजीज यांच्याकडे उंटांचा एक कळप होता. त्याला 'अल-रमात' म्हटलं जायचं. तसंच त्यांच्याकडे एक विशेष उंटदेखील होता. त्याला 'अल-दुवैला' म्हटलं जायचं.

शाह सलमान यांनादेखील उंटांची प्रचंड आवड

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बदर बिन सौद म्हणतात, "एकदा बादशाहनं, प्रिन्स सौद बिन मोहम्मद यांना त्यांच्या सुंदर उंटांपैकी एक असलेल्या 'मुनकिया'ला मेजवानीसाठी पाठवण्यास सांगितलं होतं. सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे 'अल-शरफ' नावाचा एक सुंदर आणि उत्तम जातीचा उंटदेखील आहे."

उंटाला 'वाळवंटातील जहाज' म्हटलं जातं. कारण प्रत्येक उंट 400 किलोपर्यंत वजन वाहू शकतो.

गाड्या आणि आधुनिक साधनं नसतानाच्या काळात मक्केतील कुरैश सरदारांचे तांडे याच उंटांवरून सीरिया आणि येमेनला जात असत.

'उकलात' म्हणून ओळखले जाणारे व्यापारी 400 वर्षांपूर्वी भारत, तुर्किये, मोरक्को आणि नायजेरियापर्यंत उंटांचा व्यापार करायचे. काही दशकांपूर्वीपर्यंत, उंटांचा वापर तेल काढण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी देखील केला जात असे.

रंगांच्या आधारे उंटांची विभागणी अनेक प्रकारांमध्ये करण्यात आली आहे. उंट तपकिरी रंगांपासून ते लाल रंगापर्यंतचे असतात. उंटांच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ओमान आणि सुदानमधील उंट त्यांच्या धावण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. तर सौदी अरेबियाच्या किनारपट्टीच्या भागातील उंटांच्या माद्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत.

किंग अब्दुल अजीज उंट महोत्सवात 2018 मध्ये 30,000 उंट आणण्यात आले होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किंग अब्दुल अजीज उंट महोत्सवात 2018 मध्ये 30,000 उंट आणण्यात आले होते

तसं तर, श्रीमंत सौदी अरेबिया आता तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिक जगाबरोबर वाटचाल करण्यासाठी प्रचंड भांडवली गुंतवणूक करतो आहे. मात्र त्याचबरोबर, उंटांचं ऐतिहासिक मूल्य आणि सांस्कृतिक महत्त्व यांचाही समावेश त्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सध्या, 'सवानी' नावाची कंपनी उंटाचं दूध आणि पावडर उद्योगात गुंतवणूक करते आहे. कंपनीनं आधीच 25 देशांमध्ये त्यांच्या उत्पादनांची निर्यात केली आहे. ही कंपनी उंटाच्या दुधापासून आईसक्रीमदेखील बनवते.

'अबील' हा ब्रँड, उंटाची लोकर आणि कातड्यापासून कपडे, हस्तनिर्मित बॅग किंवा पिशव्या आणि बूट बनवतो. मगरीच्या कातड्यानंतर उंटाच्या कातड्याला सर्वात मजबूत आणि टिकाऊ कातडं मानलं जातं.

सौदी अरेबियाच्या 'व्हिजन 2030' अंतर्गत, तेल उद्योगानंतर उंटावर आधारित उद्योग, देशासाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत बनेल.

उत्पन्नाशिवाय, उंटाबरोबर इतिहास, धार्मिक परंपरा आणि चालीरिती, प्रथा देखील जोडलेल्या आहेत. सौदी अरेबियाच्या नागरिकांसाठी ती कमाईबरोबरच अभिमानाचीही बाब आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.