टी-20 वर्ल्डकप : भारत-पाकिस्तान सामना होणार; BCCI आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू काय म्हणाले?

भारत पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 5 मिनिटे

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात खेळण्याची परवानगी दिली आहे.

15 फेब्रुवारी 2026 रोजी पाकिस्तानचा भारताविरोधात सामना होणार आहे. हा निर्णय घेण्याची विनंती पाकिस्तानला मित्र राष्ट्रांनी केली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

याआधी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शहबाज शरीफ यांना पीसीबी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रतिनिधी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयांची औपचारिकदृष्ट्या माहिती दिली.

बीबीसी उर्दूनुसार, पाकिस्तानने आपल्या निवेदनात म्हटले आहे की बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पीसीबीला केलेली औपचारिक विनंती त्याच बरोबर संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका आणि अन्य सदस्य देशांकडून करण्यात आलेल्या विनंतीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवेदनानुसार पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोमवारी संध्याकाळी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी फोनवर चर्चा केली.

यावेळी त्यांनी ही गोष्ट स्वीकार केली की 'पाकिस्तान आणि श्रीलंकेला नेहमी एकमेकांच्या सोबत राहिलं पाहिजे. त्यातही जेव्हा कठीण परिस्थिती असेल तेव्हा. पंतप्रधान शरीफ यांचा खेळासाठी नकार होता. या परिस्थितीवर सौहार्दपूर्ण पद्धतीने समाधान कसे मिळेल याचा गांभीर्याने विचार करावा याची विनंती केली.'

पाकिस्तानच्या निवेदनानुसार, "मित्र राष्ट्रांची विनंती लक्षात घेऊन, पाकिस्तान सरकारने पाकिस्तानी टीमला ICC T-20 Men's World Cup मध्ये 15 फेब्रुवारी, 2026 रोजी होणाऱ्या सामन्यात खेळण्याची सूचना केली आहे."

पाकिस्तानने यापूर्वी भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानने यापूर्वी भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिला होता.

निवेदनात पुढे म्हटले आहे की क्रिकेटची भावनेचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेम्यात आला आहे. तसेच सर्व सहभागी देशांनी या वैश्विक खेळाची निरंतरता कायम राहावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की जेव्हा हा वाद पेटला तेव्हा बांगलादेशच्या टीमने आपल्या टीमच्या सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशचे सामने भारताबाहेर करावेत अशी विनंती केली होती. ही विनंती ICC ने फेटाळली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारने घोषणा केली होती की 15 फेब्रुवारी रोजी भारताविरोधात होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकेल.

बांगलादेशाच्या समर्थनात हा निर्णय घेतला होता असं शहबाज शरीफ यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू काय म्हणाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पाकिस्तानने भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता, आता पाकिस्तानने या भूमिकेवरून यु-टर्न घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात खेळण्याची परवानगी दिली आहे.

अखेर आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार असं ठरल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

जिओ न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलताना माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रशीद लतीफ म्हणाले, "श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी या निर्णयाबद्दल पाकिस्तानचे आभार मानले. याचा अर्थ असा होता की हा विषय खेळाच्या पलीकडे गेला होता, कारण या प्रकरणात वेगवेगळ्या देशांची सरकारं सहभागी होत होती. पाकिस्तानचा हा निर्णय बांगलादेश आणि आमच्या इतर सहयोगी क्रिकेट सदस्यांच्या हितासाठी आवश्यक होता, कारण या सदस्य देशांना भारत-पाकिस्तान सामन्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून पैसे देखील मिळतात."

लतीफ म्हणाले, "आम्ही त्यांच्यासाठी हे केले. पाकिस्तानने आयसीसीला गुडघे टेकायला भाग पाडलं. आता जरी याचा परिणाम दिसला नाही तरी भविष्यात मात्र निश्चितच याचे परिणाम दिसून येतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमचं महत्त्व आणखी वाढेल."

कार्ड

माजी क्रिकेटपटू अहमद शहजाद म्हणाला, "आम्ही खूप परिपक्व निर्णय घेतला. बांगलादेशचं जे नुकसान झालं होतं त्याची भरपाई त्यांना मिळणं गरजेचं होतं आणि अखेर त्यांना ती मिळाली आहे. आम्ही आमच्या मित्र देशांसाठी भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमची भागीदारी किंवा आम्हाला मिळणारा महसूल देखील वाढवून मागू शकलो असतो पण आम्ही तसं न करण्याचा निर्णय घेतला."

अहमद शहजाद म्हणाला, "आता या मुद्द्यावर कुणीही राजकारण करू नये आणि हा विषय इथेच थांबला पाहिजे. कोणीही असं म्हणू नये की आम्ही जिंकलो किंवा ते जिंकले."

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सिकंदर बख्त म्हणाले, "जर भारताला आमच्यासोबत सामना खेळायचा नसता तर त्यांनी आधीच नकार दिला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. आयसीसीला हे माहिती होतं की पाकिस्तानशिवाय क्रिकेट चालू शकत नाही म्हणूनच त्यांनी आम्हाला सामना खेळण्याची विनंती केली. आम्ही क्रिकेटसाठी खूप गरजेचे आहोत. आम्ही आमच्या मित्र देशांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला. हा खूप चांगला निर्णय आहे आणि आम्ही या प्रकरणात जिंकलो आहोत."

आयसीसीने काय म्हटलं?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (ICC) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून याला दुजोरा दिला.

आयसीसीने म्हटलं की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आयसीसी यांच्यातील यशस्वी चर्चेनंतर पाकिस्तान टी-20 विश्वचषकातील आपले सर्व सामने खेळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटलं की, "आयसीसी आणि पीसीबी यांच्यातील चर्चा ही व्यापक संवाद प्रक्रियेचा भाग होती. ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी रचनात्मक पद्धतीने काम करण्याची गरज मान्य करण्यात आली आणि खेळाच्या हितासाठी प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि सहकार्याच्या भावनेने एकत्रित राहण्यावर सहमती दर्शवण्यात आली.

आयसीसी

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेशबाबत आयसीसीने निवेदनात म्हटलं की, भारतीय उपखंडात खेळले जाणारे बांगलादेशचे सामने सामान्यपणे टीव्हीवर अधिक प्रेक्षकांना आकर्षित करतात. आणि हे लक्षात घेऊन आयसीसीने बांगलादेशमध्ये क्रिकेटच्या विकासाला सतत चालना देण्याची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

बांगलादेशमध्ये क्रिकेटचे 20 कोटींहुन अधिक चाहते आहेत. आणि म्हणून क्रिकेट स्पर्धेत न उतरण्याच्या निर्णयाचा देशातील क्रिकेटवर दीर्घकालीन परिणाम होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचंही आयसीसीने म्हटलं आहे.

तसेच, बांगलादेशने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यांच्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. असंही आयसीसीने या निवेदनात स्पष्ट केलं.

बांगलादेशचं पाकिस्तानला आवाहन

दरम्यान, सोमवारी (9 फेब्रुवारी) बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळावा, असं आवाहन पाकिस्तानला केलं होतं.

एका निवेदनात, बीसीबीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन रझा नक्वी, पीसीबी आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले.

या काळात पीसीबीने उत्कृष्ट क्रीडाभावना आणि एकजुटीचे दर्शन घडवले असल्याचंही जारी केलेल्या निवदेनात म्हटलं..

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमिनुल इस्लाम. बीसीबीनंदेखील पाकिस्तानला क्रिकेट सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.

फोटो स्रोत, Munir UZ ZAMAN / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमिनुल इस्लाम. बीसीबीनंदेखील पाकिस्तानला क्रिकेट सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.

बीसीबी अध्यक्ष मोहम्मद अमिनुल इस्लाम म्हणाले की, "या काळात बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने घेतलेल्या भक्कम भूमिकेमुळे आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. आमचा बंधुभाव दीर्घकाळ बहरत राहो.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या संक्षिप्त दौऱ्यानंतर आणि चर्चेतील संभाव्य निष्कर्ष लक्षात घेता, क्रिकेटच्या हितासाठी पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध आयसीसी टी-20 विश्वचषकाचा सामना खेळावा, अशी आम्ही विनंती करत आहोत.

पाकिस्तानने बांगलादेशला दिला होता पाठिंबा

सुरक्षा कारणांमुळे बांगलादेशने भारतात टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी स्पर्धेत स्कॉटलंडला सहभागी करण्यात आले.

यानंतर पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आयसीसीचा निर्णय चूक आणि दुटप्पीपणा असल्याचा आरोप केला होता.

ते म्हणाले होते, "बांगलादेशवरही तेच नियम लागू झाले पाहिजेत, जे इतर कोणत्याही देशावर होतात. जर एखादा देश सुरक्षा कारणांमुळे दुसऱ्या देशात खेळण्यास नकार देतो, तर बांगलादेशलाही तो अधिकार असायला हवा."

मोहसीन नक्वी यांनीही शाहबाज शरीफ यांची भेट घेतली होती

फोटो स्रोत, X/MOHSIN NAQVI

फोटो कॅप्शन, मोहसीन नक्वी यांनीही शाहबाज शरीफ यांची भेट घेतली होती

"या परिस्थितीत सरकार वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेत टीम पाठवण्याचा निर्णय घेईल. जर बांगलादेशला न्याय मिळाला नाही, तर आयसीसीने हवे असल्यास 22 व्या टीमला सहभागी करून घेऊ शकते", असं ते म्हणाले होते.

मोहसिन नक्वी यांना विचारण्यात आले, "जर पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप खेळत नसेल, तर प्लॅन बी काय आहे?" यावर त्यांनी उत्तर दिले होते, "आधी निर्णय होऊ द्या. आमच्याकडे प्लॅन ए, बी, सी आणि डी आहेत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.