घर चालवताना मेंदूचं काय होतं? न दिसणारं 'मानसिक ओझं' थेट आरोग्यावर कसा परिणाम करतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मेलिसा होगनबूम
- वाचन वेळ: 8 मिनिटे
दिवसभर काम करूनही रात्री असं वाटतं की अजून बरीच कामं बाकी आहेत... आणि या विचारांमुळेच तुमच्या शरीरापेक्षा मन जास्त थकतं.
बीबीसीच्या वरिष्ठ आरोग्य प्रतिनिधी मेलिसा होगनबूम यांनी समाजशास्त्रज्ञ लिया रुपानर यांच्याशी संवाद साधताना एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आहे.
घर सांभाळण्याचा बहुतांश मानसिक भार अजूनही महिलांच्याच खांद्यावर का आहे?
हा मानसिक ताण आणि त्यातून येणारा थकवा कमी करण्यासाठी घरातील 'न दिसणाऱ्या' कामांचे स्वरूप समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आजच्या या धावपळीच्या जगात अनेक महिला एका अशा न दिसणाऱ्या ओझ्याखाली दबल्या गेल्या आहेत ज्याला 'मेंटल लोड' म्हणजेच 'मानसिक ओझे'
असं म्हणतात. हे काम घराच्या चौकटीत असूनही कोणाला दिसत नाही.
मुलांची शाळा सांभाळण्यापासून ते सकस आहार काय द्यायचा आणि सुट्टीत काय मजेशीर उपक्रम करायचे? याचं सतत नियोजन करणं म्हणजे केवळ शारीरिक कष्ट नसून ते एक मोठं 'मानसिक ओझं' आहे. घर आणि कौटुंबिक आयुष्य सुरळीत चालवण्यासाठी हे काम सतत बॅकग्राउंडला सुरू असतं पण त्याची दखल मात्र घेतली जात नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि 'Drained' या पुस्तकाच्या लेखिका लिया रुपानर सांगतात की, घराचे हे मानसिक ओझे फक्त एका प्रकारचे नसते तर त्याचे 8 वेगवेगळे प्रकार आहेत.
यामध्ये मुलांसाठी काहीतरी खास 'सरप्राईज' प्लॅन करण्यापासून ते घरातील प्रत्येकाच्या तब्येतीची आणि सगळ्या सोयींची पूर्वतयारी करण्यापर्यंत अनेक गोष्टी येतात. या कामांना कोणतीही वेळेची मर्यादा नसते आणि ती कधीच संपत नाहीत.
आजकाल पुरुष घरात थोडीफार मदत करत असले तरी या न दिसणाऱ्या कामांचा सगळा भार अजूनही महिलांवरच जास्त आहे. यामुळेच त्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो.
पण हे चित्र बदलू शकतं जेव्हा आपण हे मान्य करू की हे 'मानसिक ओझं' वाटून घेतल्याने आपलं आरोग्य, मनःशांती आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात तेव्हाच खऱ्या अर्थाने पती-पत्नीमधील जबाबदाऱ्यांचा समतोल साधला जाईल.
बीबीसीच्या मेलिसा होगनबूम यांनी प्राध्यापक लिया रुपानर यांच्याशी संवाद साधला.
त्यांच्याशी बोलताना हेच सांगतात की, लोक काय म्हणतील किंवा समाज आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतो या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमुळेच महिलांच्या डोक्यावरचं हे टेन्शन कसं वाढत जातं.
मेलिसा - लिया, सध्या 'मेंटल लोड' (मानसिक ओझं) बद्दल बरीच चर्चा ऐकायला मिळतेय तर तुमच्या मते नक्की याची व्याख्या काय?
लिया - सोप्या भाषेत सांगायचं तर नुसते विचार थकवत नाहीत पण जेव्हा त्यात भावनांचा गुंता होतो तेव्हा खरी दमछाक होते.
कधी कधी एखादं काम चांगलं झालं की आपल्याला छान वाटतं पण हे मानसिक ओझे याच्या नेमकं उलट असते. हे असं मानसिक काम आहे जे सतत डोक्यात चालू असतं. ते कधी थांबतच नाही
तुम्ही बाहेर फिरायला जाताना कपड्यांची बादली सोबत घेऊन जात नाही पण या कामांचं टेन्शन मात्र तुमच्या सोबत सतत असतं.

फोटो स्रोत, Getty Images
मेलिसा- तुम्ही शेकडो लोकांशी बोलून या मानसिक टेन्शनचे 8 वेगवेगळे प्रकार शोधलेत तर नक्की काय आहेत ते?
लिया - मला प्रत्येक मुलाखतीत एकच गोष्ट सारखी जाणवली की बायका त्यांच्या कामाचं वर्णन करताना म्हणतात की हे काम कोणाला दिसत नाही, याला वेळेचं बंधन नाही आणि हे कधीच संपत नाही.
यामुळेच त्यांना प्रचंड थकवा जाणवतो. जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही की नेमकं टेन्शन कशाचं आहे तोपर्यंत ते हलकं करणं कठीण आहे. म्हणूनच मी या कामांचे हे 8 भाग केले आहेत -
1. घराचं नियोजन
हे काम कोणाला दिसत नाही पण त्याशिवाय घर चालूच शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घराचं जे नियोजन डोक्यात असतं त्यालाच हे ओझं म्हणतात.
2. भावनिक आधार
यात तुम्ही सतत दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत असता. कुटुंबातले लोक, मित्र-मैत्रिणी किंवा सोबत काम करणारे लोक कसे आहेत याची चौकशी करणं, कोणाचा मूड खराब आहे का, कोणाला काही त्रास होतोय का, हे ओळखून त्यांना छोट्या-मोठ्या गोष्टींत साथ देणं यातच खूप मानसिक ऊर्जा खर्च होते.

फोटो स्रोत, Getty Images
3. नात्यांची गुंफण
मुलांशी, मित्र-मैत्रिणींशी, जोडीदाराशी आणि नातेवाईकांशी आपली नाती टिकवून ठेवणं आणि ती घट्ट करणं म्हणजे हे काम.
ऑफिसमध्ये याला आपण नेटवर्किंग म्हणतो पण घरात मात्र हे त्यापेक्षा खूप जास्त असतं. कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला आपली खास दखल घेतली जातेय आणि आपल्यावर प्रेम केलं जातंय असं वाटत राहण्यासाठी जी धडपड लागते ते म्हणजे हे ओझं.
4. सण-वार आणि आनंदाचे क्षण सजवणं ( मॅजिक मेकिंग)
प्रत्येक सण उत्साहात साजरा करणं, घरच्या परंपरा जपणं आणि आयुष्यातले छोटे-छोटे क्षण खास बनवणं या मागे जे नियोजन असतं ते म्हणजे हे काम.
विचार करा दिवाळी असो किंवा मुलांचा वाढदिवस घरात ते आनंदाचे क्षण तयार करण्यासाठी पडद्यामागे नक्की कोण झटत असतं? हे आनंदाचे क्षण उभे करण्यासाठी जी प्रचंड मानसिक ओढाताण होते तेच हे मानसिक ओझं असतं.
5. स्वप्नांना बळ देणं ( ड्रीम बिल्डिंग)
आपल्या जवळच्या माणसांना त्यांच्या आवडीनिवडी आणि स्वप्नं पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळवून देणं म्हणजे हे काम.
मुलांच्या छंदांसाठी त्यांना योग्य क्लासला लावणं असो किंवा पतीला त्याच्या करिअरसाठी किंवा गोल्फसारख्या छंदासाठी वेळ मिळावा म्हणून घराची जबाबदारी स्वतःवर घेणं असो... दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण व्हावीत म्हणून जी मानसिक ओढाताण आणि जुळवाजुळव करावी लागते यालाच स्वप्नांना बळ देणं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
6. स्वतःची काळजी घेणे
आपण स्वतः फिट आणि फ्रेश राहण्यासाठी आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी जी सततची धडपड लागते ते म्हणजे हे ओझं.
यात केवळ मनाला बरं वाटणं महत्त्वाचं नसतं तर दुसऱ्यांसमोर वावरताना आपण कायम फ्रेश आणि नीटनेटके दिसायला हवं याचं मानसिक दडपण आपल्यावर असतं त्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे हे ओझं.
7. सुरक्षिततेची काळजी
यात आपल्या माणसांच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेचा सतत विचार करावा लागतो मग ते संकट समोर असो किंवा फक्त मनातली भीती. ही एक अशी टांगती तलवार आहे जी कधीच पाठ सोडत नाही.
महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पालकांसाठी हे ओझं सारखं नसतं. जे लोक वेगळ्या समाजातून येतात किंवा ज्यांच्या घरात दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्या डोक्यावर हे ओझं खूप जास्त असतं. आपल्या कुटुंबाला काही होईल का या काळजीतच त्यांची निम्मी शक्ती खर्च होते.
8. आपली मूल्यं जपणं (मेटा-केअर)
आपण ज्या समाजात राहतो तो आपल्याला हवा तसा आहे का? की तो बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करायला हवं? याचा जो सतत विचार डोक्यात चालू असतो त्यालाच 'मेटा-केअर' म्हणजेच आपली मूल्यं जपणं म्हणतात.
सोप्या भाषेत सांगायचं तर आपण कसं जगावं आणि आपली मुलं कशी घडवावीत याबद्दलच्या आपल्या तत्त्वांशी आपण प्रामाणिक आहोत का? उदाहरणार्थ मला माझ्या मुलाला अशाच पद्धतीने वाढवायचं आहे असं ठरवणं आणि त्याप्रमाणे वागणं... यासाठी जी वैचारिक कसरत लागते तीच ही 'मेटा-केअर'

फोटो स्रोत, Getty Images
मेलिसा - या विषयाचा अभ्यास करणं इतकं महत्त्वाचं का वाटतं?
लिया - मी 'मेंटल लोड'(मानसिक ओझं)चा अभ्यास करायला सुरुवात केली कारण मला असं सारखं जाणवायचं की काहीतरी असं आहे जे आपण नीट समजावून घेत नाहीये.
मी कित्येक दशकं जेंडर (स्त्री-पुरुष), नोकरी, कुटुंब आणि घरकामाच्या वाटणीचा अभ्यास केला. या काळात असं दिसलं की पुरुष आता घरात जास्त मदत करू लागलेत म्हणजे सुधारणा तर होत होती पण तरीही काहीतरी असं होतं जे आपल्याला मोजता येत नव्हतं किंवा जे समोर दिसत नव्हतं.
ते काहीतरी म्हणजेच हा 'मेंटल लोड' म्हणजेच डोक्यातलं टेन्शन. मला हेच नक्की करायचं होतं की हे नेमकं काय आहे हे सर्वांना स्पष्टपणे समजावून सांगता येईल.
मेलिसा - तुम्ही ज्या महिलांशी बोललात त्या नक्की किती थकलेल्या होत्या?
लिया - मानसिक ताण या मुळे येणारा थकवा मोजण्यासाठी मी थकव्याची मोजपट्टीच तयार केली. मी महिलांना काही साधे प्रश्न विचारले जसे की आयुष्यात एखादी आणीबाणीची परिस्थिती आली तर तिचा सामना करायला तुमच्यात ताकद उरते का? दिवसभराच्या या विचारांमुळे तुम्ही रात्री पूर्णपणे गळून जाता का? तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावर गरजेपेक्षा जास्त ओझं लादलं गेलंय?
यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे वडिलांकडे स्वतःसाठी पुरेशी ऊर्जा शिल्लक होती पण मी ज्या ज्या मातांशी बोलले त्या प्रत्येक जणींची अवस्था मात्र याच्या उलट होती.
त्यांच्याकडे एखादं संकट आलं तर त्याला तोंड देण्यापुरती ताकद कशीबशी शिल्लक असायची पण जेव्हा मी त्यांना विचारलं की, "तुमच्या आयुष्यात एखादी चांगली संधी चालून आली तर तिचा आनंद घ्यायला किंवा त्यावर काम करायला तुमच्याकडे शक्ती उरते का?" तेव्हा त्यांचं उत्तर नाही असंच होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मेलिसा - मग हा विचारांचा गुंता आणि हा मानसिक थकवा आपण कसा कमी करू शकतो?
लिया - सगळ्यात आधी तर हे समजून घ्या की, स्वतःच्या भावनांना किंमत देणं खूप गरजेचं आहे. हे डोक्यातून काढून टाका की तुम्ही कुणी सुपरवुमन आहात.
तुम्ही अख्ख्या जगाच्या किंवा घरच्यांच्या भावनांची जबाबदारी घ्यायलाच हवी असं काही नाही. प्रत्येकाचं मन जपण्याचं आणि एक परफेक्ट फॅमिली बनवण्याचं कंत्राट तुम्ही घेतलेलं नाही.
तसं पाहायला गेलं तर आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं की मुलींनी समजूतदार असायला हवं, नम्र असायला हवं आणि पदर पसरून सगळ्यांना सांभाळून घ्यावं...पण हे करताना आपण स्वतःचाच बळी देतो. पण आता हे थांबवायला हवं.
पुरुषांचे सतत चोचले पुरवणं किंवा त्यांच्या सोयीसाठी स्वतःला त्रास करून घेणं बंद करायला पाहिजे. महिलांनी स्वतःच्या सुखाचा बळी देऊन दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचा जीव जाळणं आता तरी थांबवायला पाहिजे.
मेलिसा - मग तुमच्या या सगळ्या अभ्यासाचा हेतू काय? आपण यातून नक्की काय धडा घ्यावा?
लिया - सगळ्यात आधी तर हे अपराधीपणाचं भूत डोक्यातून उतरवा. प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे हे मानणं आधी थांबवा. ते म्हणतात की, मी एक छोटा प्रयोग केला होता.
काही महिलांना त्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी मी स्वतः पैसे दिले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या महिलांना ते पैसे स्वतःवर खर्च करणं जिवावर येत होतं.
त्यांना ते पैसे घरच्यांना देऊन टाकायचे होते जेणेकरून मुलांचे किंवा नवऱ्याचे लाड पुरवता येतील. स्वतःसाठी काहीतरी घेताना अपराधी वाटत होतं. पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतः आनंदी आणि रिलॅक्स नसाल तोपर्यंत तुम्ही घराला खऱ्या अर्थाने आनंद देऊच शकणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मेलिसा म्हणतात की, म्हणजे आपण बायकांना लहानपणापासून असंच तयार केलंय की त्यांनी स्वतःला नेहमी सगळ्यात शेवटी ठेवायचं आणि एकदा का बाई आई झाली की स्वतःसाठी वेळ काढणं किंवा चार पैसे खर्च करणं तिला एखाद्या गुन्ह्या सारखं वाटू लागतं.
जणू काही ती स्वतःवर खर्च करून आपल्या मुलांचंच नुकसान करतेय. हे किती भयानक खोटं आपल्या गळी उतरवलं गेलं आहे.
मेलिसा - मग त्या पैशांचा काही उपयोग झाला का?
लिया - हो, नक्कीच. जेव्हा त्या महिलांनी ते पैसे स्वतःसाठी खर्च केले तेव्हा त्यांच्या डोक्यावरचं ओझं थोडं हलकं झालं. अर्थात त्यांचे सगळेच प्रश्न सुटले असं नाही पण त्यांचा ताण नक्कीच कमी झाला.
सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला तो त्यांच्या विचारांत. "मी सुद्धा महत्त्वाची आहे" आणि स्वतःला वेळ देणं ही काही चुकीची गोष्ट नाही हे त्यांना मनापासून पटलं. स्वतःकडे बघण्याचा हा नवा दृष्टिकोन मिळणं हाच त्यांच्यासाठी मोठा बदल होता.
मी ज्या महिलांना पैसे दिले त्यातली एक होती कॅटरिना. तिने ते पैसे एका ट्रिप साठी खर्च केले. घरापासून दूर गेल्यामुळे साहजिकच तिच्या डोक्यात घरकामाचे विचार पूर्णपणे थांबले. तिने मला सांगितलं की, त्या पैशांमुळे तिला खर्चाची अजिबात काळजी करावी लागली नाही आणि ती त्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घेऊ शकली.
कॅटरिना जेव्हा घरी परतली तेव्हा तिने पाहिलं की तिच्या पतीने घराची सगळी साफसफाई केली होती. फ्रिजमध्ये गरजेचं सामान भरून ठेवलं होतं आणि कपड्यांच्या घड्या करून त्या व्यवस्थित जागच्या जागी ठेवल्या होत्या.
एकदा का आपल्याला हे समजलं की आपली 'मानसिक ताकद' नेमकी कुठे खर्च होत आहे तेव्हा आपण तिचा वापर अगदी विचारपूर्वक करू शकतो. हे डोक्यावरचं ओझं कमी करण्यासाठी कधी बाहेरून मदत घेणं गरजेचं असतं तर कधी स्वतःला वेळ देणं.खरं सांगू तर बऱ्याचदा या दोन्ही गोष्टींची एकाच वेळी गरज असते.
लिया - खरं तर संशोधनातून असं समोर आलं आहे की स्त्रिया जितक्या जास्त सक्षम आणि शिक्षित असतील तितक्या त्यांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतात. आणि जेव्हा स्त्रिया बाहेर काम करतात तेव्हा घरातल्या कामांची वाटणी सुद्धा अधिक समान पद्धतीने व्हायला लागते.
यामुळे त्यांचे आपापसातील संबंध सुधारतात आणि पुरुषांनाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे जेव्हा आपण स्त्रियांना सक्षम करण्याचा विचार करतो तेव्हा तो फक्त त्यांच्या फायद्याचा नसून आपल्या पूर्ण समाजाच्या आणि कुटुंबाच्या फायद्याचा असतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























