अजित पवारांच्या विमान अपघातासंबंधी रोहित पवारांनी उपस्थित केले 'हे' 11 प्रश्न

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू अपघाताने झाला नसून, तो घातपात असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांनी आज (10 फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांसमोर एक प्रझेंटेशन सादर करत, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेड (अहिल्यानगर) मतदारसंघातील आमदार आहेत. तसंच, ते अजित पवार यांचे पुतणे आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघातासंबंधी विविध माध्यमातून माहिती मिळवल्याचं सांगत, रोहित पवारांनी प्रामुख्यानं व्हीएसआर ही विमान कंपनी, अॅरो ही हँडलर कंपनी आणि विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमीत कपूर या तिघांवर संशय व्यक्त केला.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणा अतिशय संथपणे काम करत असल्यामुळेच या प्रकरणी आपल्याला माहिती काढावी लागली, असं रोहित पवार यावेळी म्हणाले. तसंच, सगळ्या यंत्रणांद्वारे शोध घेतला, तर सत्य लवकर बाहेर येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि सरकारवर आपला कोणताही आरोप नसल्याचंही रोहित पवारांनी या सादरीकरणादरम्यान सांगितलं.
दरम्यान, अजित पवारांच्या विमानाचा अपघात घडला, त्याच दिवशी (28 जानेवारी) व्हीएसआर या विमान कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांनी 'विमानात काहीही तांत्रिक बिघाड नव्हता आणि पायलटही अनुभवी होता' असं सांगितलं होतं.
मात्र, रोहित पवारांच्या आजच्या (10 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेनंतर बीबीसी न्यूज मराठीने व्हीएसआर कंपनीचे दुसरे मालक आणि संचालक कॅप्टन रोहित सिंग यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचा फोन बंद असल्यानं संपर्क होऊ शकलं नाही. परिणामी व्हीएसआर कंपनीची प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यांची बाजू आल्यास इथे अपडेट करण्यात येईल.
दरम्यान, बीबीसी मराठीचे प्रतिनिधी आशय येडगे यांनी (मंगळवारी सायंकाळी) व्हीएसआर कंपनीच्या दिल्लीतील महिपालपूर येथील कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण हे कार्यालय पूर्णपणे बंद असल्याचं आढळून आलं.
रोहित पवारांनी या संपूर्ण विषयी काय आरोप केले आणि त्यासाठी त्यांनी काय आधार सांगितला, हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
रोहित पवारांनी पत्रकार परिषद आणि प्रेझेंटेशनमध्ये केलेल्या दावे आणि आरोपांची बीबीसी न्यूज मराठीने स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.
1) VSR कंपनीच्या मालकाच्या दाव्यावर रोहित पवार काय म्हणाले?
अजित पवार यांचा अपघात झाला, ते विमान Learjet-45 प्रकारचं विमान होतं. VSR कंपनी च्या माध्यमातून ही विमानसेवा पुरवली जाते.
रोहित पवारांनी एका ग्रामपंचायतीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवत, "विमान हवेतच तिरकं झालं म्हणजे त्यात काहीतरी बिघाड असावा," अशी शंका व्यक्त केली.
विमानात तांत्रिक बिघाड नव्हता हा कंपनी मालकाचा दावा खोटा असल्याचं रोहित पवार म्हणाले.

"टेक ऑफ पूर्वी चेकअप झालं होतं का?" असा प्रश्न उपस्थित करत, रोहित पवारांनी "विमानाचा टेकलॉग (Techlog) कुठे आहे आणि विमानाचा एअरवर्दी रिपोर्ट (Airworthy Report) कुठे आहे?" असे प्रश्न विचारले.
टेकलॉगमध्ये मेंटनन्ससंबंधी माहिती असते तर एअरवर्दी रिपोर्टमध्ये विमान हवेत उडण्यास योग्य आहे की नाही, याचा तपशील असतो.
याबरोबरच, टेक-ऑफपूर्वी विमान चेक करणारे कर्मचारी कोण होते? याची माहिती आणि त्यांची चौकशीही गरजेची असल्याचं रोहित पवार म्हणाले.
"रोहित पवारांनी याबाबत अत्यंत गंभीर शंका उपस्थित केली. हे सगळे खोटे रिपोर्ट तयार केले जाऊ शकतात, त्यामुळं या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेजही पाहावे लागतील," असं रोहित पवार म्हणाले.
2) 2023 च्या अपघातावरून टीका
यात कंपनीच्या याच प्रकारच्या विमानाचा मुंबईत 2023 मध्ये अपघात झाला होता. त्याबद्दल काही माहिती मांडतही रोहित पवारांनी कंपनीवर गंभीर आरोप केले.
"14 सप्टेंबर 2023 ला झालेल्या या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस आणि कमी व्हिजिबलिटी (दृश्यमानता) यामुळं विमान रनवेवरुन घसरल्याचं कारण दिलं होतं.
"या अपघाताच्या चौकशीचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा रिपोर्ट दाबण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. हा रिपोर्ट समोर आला असता तर त्यावर कारवाई झाली असती आणि अजित पवारांचा अपघात टाळता आला असता," असा दावा रोहित पवारांनी केला.

पण EASA म्हणजे युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं याची गंभीर दखल घेतली होती, असं रोहित पवारांनी सांगितलं.
"EASA ने level -1 त्रुटी असल्याचे कारण देत VSR चा परवाना रद्द करण्यात आला. त्यांनी अशा प्रकारची कारवाई केली तर मग VSR ची विमानं आजही कशी उडवली जातात? त्यांना अजूनही परवानगी का दिली जाते?" असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.
28 जानेवारीला, म्हणजे अजित पवारांच्या विमानाच्या अपघातानंतर काही तासांनी जेव्हा पत्रकारांनी VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांना 2023 च्या घटनेबाबतही विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, "2023 मध्ये जे झालं होतं, तेव्हा पाऊस झाला होता आणि लो-व्हिजिबिलिटीची समस्या होती."
3) VSR आणि पायलटबाबतचे गंभीर आरोप काय?
VSR कंपनीमध्ये काम करणारे माजी पायलट, इंजिनिअर आणि या कंपनीबरोबर काम केलेले DGCA चे काही अधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर कंपनीबाबत गंभीर माहिती मिळाल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
पायलटला उड्डाणानंतर ठराविक वेळेचा गॅप किंवा विश्रांती द्यावी लागते, पण याबाबत कंपनी नियमांचं उल्लंघन आणि कागदपत्रांवर वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार करत असल्याचं रोहित पवार म्हणाले.
विमानातील सर्वात महत्त्वाचं कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर वारंवार बंद ठेवलं जातं, तसंच विमान आणि दरम्यान पाळली जाणारी चेकलिस्ट वापरण्याची पद्धत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
तसंच, विमानांच्या देखभालीकडं कंपनीकडून दुर्लक्ष केलं जातं, असा आरोपही त्यांनी केला.
"विमान लँडिग करताना पहिल्यांदा शक्य झालं नाही तर विमानानं गो राऊंड घेतला म्हणजे दुसरा प्रयत्न केला. पण दुसऱ्यांदा त्यांनी रनवे दिसल्याचं सांगितलं असलं तरी त्यांना ते दिसलं नसावं कारण त्यांना पुढं दुसरीकडं जायचं होतं आणि कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का?" असा गंभीर प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.

"दुसऱ्या विमानतळावर लँडिंग करण्यासाठी गेले असते तर विमानाचे दुसरीकडे बुक केलेले 10 लाख रुपये भाडे बुडाले असते म्हणून इथेच व्हिजिबिलिटी नसताना विमान उतरण्याचा प्रयत्न केला गेला का?" असं रोहित पवार म्हणाले.
विमा पुढे कुठे जाणार होते, याची माहितीही या आरोपासाठी रोहित पवारांनी याठिकाणी दिली.
"विमान जेव्हा तिरकं होतं, तेव्हा त्याचा इशारा देणारं Stall Warning System विमानात असतं. पण अजितदादा प्रवास करत असलेल्या विमानात ही यंत्रणा बंद होती अशी आमची पक्की माहिती आहे. काही लोकांनी आम्हाला याची माहिती दिली नोकऱ्या जातील म्हणून नाव घेऊ नका असं ते लोक म्हणाले," असं रोहित पवारांनी सांगितलं.
"VSR कंपनी त्यांच्या कंपन्यांचं मेंटनन्स स्वतः करत होते. मग त्यासाठी त्यांच्याकडं तज्ज्ञ होते का? त्यांच्याकडे तसे अधिकार आहेत का? ते करणारे कर्मचारी कोण?" असे प्रश्न उपस्थित करत, "चौकशी पुढं जात नसल्याने आम्हाला याप्रकारे माहिती मिळवावी लागत आहे," असं रोहित पवार म्हणाले.
4) 'इंधन बॉम्ब'बद्दल रोहित काय म्हणाले?
रोहित पवारांनी याठिकाणी एक गंभीर आरोप केला. या कंपनीबाबत एक माहिती मिळाली असल्याचं रोहित पवार म्हणाले.
"पैसे वाचवण्यासाठी म्हणून VSR अनेकदा विमानासोबत अतिरिक्त इंधन कॅनमध्ये भरून नेतात अशी खात्रीलायक माहिती आहे," असं रोहित पवार म्हणाले. याच्या खात्रीसाठी सीसीटीव्ही तपासावे लागतील, असंही त्यांनी म्हटलं.
"स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीत झालेल्या या अपघातात चार ते पाच ठिकाणी स्फोट झाला होता. मग कदाचित त्यादिवशी अतिरिक्त इंधन असू शकतं आणि दादा बसले होते त्याच्या मागच्या बाजूला या इंधनाच्या कॅन होत्या का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अशा प्रकारचं इंधन असेल तर तो एक प्रकारचा बॉम्बच असतो, असंही रोहित पवार म्हणाले.
"आजही अनेक व्हीआयपी या कंपन्यांची विमानं वापरतात, त्यामुळं यावर कारवाई होणं गरजेचं आहे," असं रोहित पवार म्हणाले.
या VSR कंपनी संदर्भात समोर आलेल्या बाबी पाहता, या प्रकरणी क्लिअरन्स इंजिनीअर, क्वालिटी इंजिनीअर आणि मेंटनन्स इंजिनीअर यांना ताब्यात घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी रोहित पवारांनी केली.
तसंच, कंपनीच्या मालकावर तसेच संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या कंपनीवर तत्काळ बंदी घालावी, अशीही मागणी रोहित पवारांनी केलीय.
5) बुकींग कंपनीवरही केले गंभीर आरोप
रोहित पवारांनी Arrow अॅरो या VVIP व्यक्तींच्या विमान बुकींगसाठीच्या कंपनीवरही आरोप केले गेले आहेत.
"व्हाट्सअॅप ग्रुपद्वारे ही बुकींग केली जाते आणि त्या ग्रुपममध्ये कंपनीचा हँडलर, कंपनीचे मालक आणि VVIP व्यक्तींचे PA यांच्यासह विमान संचनालय महाराष्ट्रचे संचालक हेही असतात," अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
रोहित पवारांनी ही माहिती देताना या बुकिंगसाठी व्हाट्सअॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगचा स्क्रीनशॉटही याठिकाणी दाखवला. या ग्रुपमध्ये एका हँडलरला सर्व VIP प्रवाशांची इत्यंभूत माहिती असायची, तो हँडलर कोण होता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
6) 'मोठा नेता' अन् 'कन्सलटंट'बद्दल काय म्हणाले?
अजित पवारांचा अपघात हा घातपात असू शकतो अशी मला सुद्धा शंका आहे, असं रोहित पवार म्हणाले.
"नियोजनानुसार अजित पवार 27 जानेवारीला संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते. नंतर तिथून ते बारामतीला येणार होते. त्यासाठी ताफाही तयार होता. पण उशीर झाल्यानं त्यांनी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला होता," असं रोहत म्हणाले.
"अजितदादांना भेटण्यासाठी एक मोठे नेते येणार होते. पण ते उशिरा आले, त्यानंतर चर्चेत वेळ गेला. त्यामुळं वेळ गेला आणि त्यामुळं अजितदादांना विमान बुक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. माझ्या माहितीनुसार पूर्व विदर्भातील एक नेत्याच्या फाईलवर सही करायची होती. ती फाईल मंत्रालयात होती, त्यामुळं दादांनी ती फाईल बोलावली आणि त्यात उशीर झाला. यात अधिक खोलवर जाऊन चौकशी करावी लागेल," असंही रोहित पवार म्हणाले.

फोटो स्रोत, FB/Rohit Pawar
रोहित पवारांनी यावेळी बोलताना आणखी एका मुद्द्यावर गंभीरपणे भाष्य केलं.
"गेल्या काही महिन्यांत माझी अजितदादांबरोबर अनेकदा महत्त्वाची चर्चा व्हायची. तेव्हा काही अधिकारी कर्मचारी आमच्या विश्वासातले आहे. तेव्हा त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याठिकाणी राजकीय कन्सल्टंटचा काहीच फायदा होत नसल्यानं त्यांचं शेकडो कोटींचा करार रद्द करावा लागत असल्याची चर्चा सुरू असल्याचं समजलं होतं. शिवाय बारामतील हॉस्टेलला मी दादांना भेटलो, तेव्हा दादांनी काही लोकांना, 'शहाणपणा करू नका, आम्हाला राजकारण शिकवू नका. तुम्ही फक्त सर्व्हे करा, राजकारण कसं करायचं आम्हाला माहिती आहे' अशी चर्चा झाली होती", असं रोहित पवार म्हणाले.
7) विमानाची वेळ का बदलली?-रोहित पवार
"विमानाची उड्डाणाची नियोजित वेळ सकाळी 7 वाजताची होती. पण मग विमान 8.10 ला का निघाले? विमानाची वेळ का बदलण्यात आली? कोणामुळे उशीर झाला? ऐनवेळी पायलट का बदलले?" असेही अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.
"आधी पायलट साहील मदान आणि को. पायलट यश अशी नावं ई मेलमध्ये आली होती. नंतर दुसऱ्या दिवशी नावं बदलली आणि पायलट सुमित कपूर आणि को. पायलट शांभवी पाठक हे दोघं विमानत होते. पायलट बदलण्याचं कारण वाहतूक कोंडीत अडकले, असं सोशल मीडियातून किंवा काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. टेकऑफ पूर्वी मुख्य पायलट किमान 20 मिनिटं तर को-पायलट किमान 35 मिनिट आधी पोहोचणं अपेक्षित असतं."

"विमान प्रवासाची पूर्वीची नियोजित वेळ 7 वाजता होती तर पायलटने 6.30 वाजता येणे अपेक्षित होते, मग एवढ्या सकाळी कुठे ट्रॅफिक होते? एवढ्या सकाळी ट्राफिक होती का? दोन्ही पायलट राहायला कुठे होते? कोणत्या मार्गाने येत होते? त्या मार्गावर ट्राफिक होती का?" असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.
जे पायलट आले नाहीत त्यांचे CDR काढण्यात यावेत, सीसीटीव्ही तपासावे, असं रोहित पवार म्हणाले.
"एकच पायलट ट्राफिकमध्ये अडकला असेल, तर दोन्ही पायलट का बदलले गेले? दोन्ही पायलटला ऐनवेळी बदलले, तेव्हा त्यांच्या सर्व टेस्ट केल्या होत्या का? त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत? मुख्य पायलट आंतरराष्ट्रीय फ्लाईटवरून आले होते, हे खरे आहे का? कुठल्या देशातून आले होते?" अशा शंकाही रोहित पवारांनी मांडल्या.
8) मुख्य पायलट सुमित कपूर यांच्यावरील आरोप
रोहित पवारांनी मुख्य पायलट सुमीत कपूर यांच्याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले. "त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी गंभीर उल्लंघन प्रकरणी तीन वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती," असा दावा करत, रोहित पवारांनी याबाबत दिली.
रोहित पवार म्हणाले, "एका मोठ्या नेत्याला (मंत्र्याला) नांदेडला घेऊन जाताना याच पायलटने कशा प्रकारच्या हरकती केल्या होत्या, हे VSR कंपनी जनतेला सांगणार का? सुमित कपूर यांचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट असताना देखील त्यांना अजित दादा सारख्या VVIP व्यक्तीच्या विमान उड्डाणासाठी कसे बोलवण्यात आले?"
तसंच, "पायलटचे ब्रेथ अॅनलायझर टेस्ट (मद्यपान केलं आहे का हे तपासण्यासाठी) चे CCTV फुटेज देण्यात यावे," अशी मागणीही त्यांनी केली.
9) सरकारी अहवालातील वेळेच्या विसंगतीवर बोट
"अजित पवार ज्या विमानातून जात होते ते एका मिनिटाला 15 किलोमीटर अंतर कापतं. त्यामुळं अशा परिस्थितीत प्रत्येक सेकंदाची माहिती महत्त्वाची असते," असं सांगत रोहित पवारांनी वेगवेगळ्या अहवालांतील वेळेच्या विसंगतीवर बोट ठेवलं.
"केंद्राच्या अहवालानुसार, विमान संपर्कात आल्याची वेळ सकाळी 8.18 मिनिटे होते. पण बारामती ATC नुसार 8.19 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे," असं रोहित पवार म्हणाले.
तसंच, आगीचे लोट दिसण्याच्या वेळेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
"केंद्राच्या विमान मंत्रालयाच्या अहवालात आगीचे लोट 8.44 वाजता दिसल्याचं म्हटलं आहे, पण ATC ट्रान्स्क्रिप्टमध्ये पायलटचा शेवटचा आवाज 8.44.13 वाजता आल्याचा उल्लेख आहे. म्हणजे विमान कोसळून आगीचे लोट यायला पुढचे दहा सेकंद गेले असावेत," असा दावा रोहित पवारांनी केला.

10) रनवे 11 च्या आग्रहाबाबत प्रश्नचिन्हं
बारामती विमानतळावर रनवे 11 आणि रनवे 29 अशा धावपट्टीच्या दोन्ही बाजूने विमान उतरवता येते. यापैकी 11 क्रमांकाचा रनवे टेबल टॉप प्रकारातला आहे तर 29 क्रमांकाचा रनवे टेबल टॉप नाही.
"सकाळी 8.27 वाजता विमानाच्या लँडिंगसाठी रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली. त्यानुसार ATC कडून 29 साठी परवानगी देण्यात आली. पण परत 8.29 वाजता रनवे 11 ची परवानगी मागण्यात आली. ATC कडून त्याला परवानगी दिली. मग पायलटने रनवे क्रमांक 11 चा आग्रह का धरला? शिवाय, 8.36.38 वाजता विमानातून Go Around करत रनवे 29 कडे जात असल्याचे सांगितले, पण तरीही परत विमान रनवे 29 वर न उतरता रनवे 11 वर उतरवण्याची परवानगी मागितली. रनवे 29 हा टेबल टॉप प्रकारातला नव्हता. त्यामुळं विमानाचा अँगल चुकला असता तरी विमान क्रॅश होण्याची शक्यता नव्हती. मग रनवे 11 चा आग्रह पायलटने का धरला?" असं रोहित पवार म्हणाले.
11) शेवटचं संभाषणाबाबत रोहित पवारांनी काय दावा केला?
"विमान उतरवण्यासाठी व्हिजिबिलिटी किमान 5 किलोमीटर असणे गरजेचे आहे. उपलब्ध माहितीनुसार 8.31.11 यावेळेला पायलटने व्हिजिबिलिटी विचारली असता एटीसीने 3 किमी असल्याचं स्पष्ट सांगितलं होते. तरीही विमान लँडिंगसाठी विमान बारामतीकडे का नेण्यात आलं? 8.31 ला विमान यवतच्या पुढे असावे तिथून परत पुण्याकडे जाण्याचा निर्णय का घेण्यात का आला नाही?" असं रोहित पवार म्हणाले.
तसंच, "8.44.13 यावेळेला को-पायलट शांभवी पाठकचा शेवटचा आवाज "OH SHIT OH SHIT" असा आहे. त्यानंतर काही सेकंदात विमान कोसळले. पण मुख्य पायलट मात्र एक शब्दही बोलत नव्हते. अपघात होण्याच्या शेवटच्या 3-4 मिनिटांत मुख्य पायलट एक शब्दही बोलले नव्हते. त्यामुळं मृत्य समोर असतानाही मुख्य पायलट गप्प असणे, याचा अर्थ काय घ्यायचा?" असं रोहित पवार म्हणाले.
'पारदर्शक तपासातून सत्य समोर आणावं'
सरकारनं या प्रकरणी योग्य संस्थांकडून तपशीलवार चौकशी करावी आणि पारदर्शक तपास करून सत्य सर्वांसमोर आणावं, अशी मागणी रोहत पवारांनी केली आहे.
"VSR कंपनीच्या मागील अपघातांनंतरही कंपनीवर कारवाई झालेली नाही. त्यामुळं कुठल्याही शंकांना जागा राहू नये म्हणून त्रयस्थ संस्थेकडून विशेष चौकशी करण्यात यावी," असं म्हणत रोहित पवारांनी अमेरिका आणि फ्रान्सच्या कंपन्यांची नावं सूचवली.
"एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ही संस्था DGCA च्या अखत्यारित आहे. या संस्थेद्वारे तपास केला तर लोकांच्या मनात शंका राहू शकते. त्यामुळे AAIB सोबतच इतर आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देखील तपास करावा," अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
DGCA ने निवेदनात काय सांगितलं होतं?
विमान अपघाताच्या दिवशीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सकाळी 8:43 वाजता विमानाला रनवे 11 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. याच्या अवघ्या एका मिनिटानंतर, म्हणजेच सकाळी 8:44 वाजता, एटीसीला रनवेजवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या.'
निवेदनात असेही नमूद करण्यात आलं आहे की, 'संपूर्ण घटनाक्रमात महत्वाची बाब म्हणजे अपघातापूर्वी कोणताही 'मेडे' कॉल किंवा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन किंवा संकटाची सूचना एटीसीला देण्यात आली नाही.'
'या अपघाताचा तपास आता नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे सोपवण्यात आला असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.'
तर एटीसीची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार, घटनांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे त्यानुसार, '28 जानेवारी 2026 रोजी विमान VI-SSK ने सकाळी 8:18 वाजता प्रथमच बारामती एटीसीशी संपर्क साधला. यानंतर विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आलं.'
'या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाहीये, आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर आहे. त्यानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (व्हिज्युअल वेदर कंडिशन्स) लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर विमानाने रनवे 11 वर अंतिम अप्रोच घेतल्याची माहिती दिली; मात्र क्रूने रनवे दिसत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी 'गो-अराउंड' केला.'
दुर्घटनेच्या दिवशी 'VSR'च्या मालकांनी काय माहिती दिली होती?
अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला, ते विमान 'VSR व्हेंचर्स लिमिटेड' या कंपनीचे होते. विमान अपघातानंतर काही तासांनी दिल्लीत या कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांना पत्रकारांनी घटनेबाबत विचारलं होतं.
त्यावेळी विजय कुमार सिंग म्हणाले होते की, "पायलटनं विमान रनवे 29 ला अॅप्रोच केलं होतं. पण तिथं विमान उतरवणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्याने पुन्हा रनवे 11 वर उतरवण्याचा प्रयत्न केला. हीच माहिती मला आतापर्यंत मिळालीय."
"घडलेल्या घटनेबाबत आम्हाला अत्यंत दु:ख आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रती सहानुभूती आहे."
"प्राथमिकदृष्ट्या, पायलटला रनवे दिसला नसल्यानं ही घटना घडलीय. रनवे दिसत नसेल तर पायलट विमान उतरवत नाहीत. या विमानाचा पायलट अत्यंत अनुभवी होता. त्याला 16 हजारांहून अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव होता. शिवाय, को-पायलटलाही 1500 तास विमान चालवण्याचा अनुभव होता. कॅप्टननं सहारा, जेटलाईट, जेट एअरवेजसोबतही काम केलं होतं."
विमानाच्या स्थितीबाबत बोलताना विजय कुमार सिंग म्हणाले होते की, "एअरक्राफ्ट अत्यंत नीट देखभाल केलेला होता. एअरक्राफ्टमध्ये काहीही अडथळे नव्हते. एअरक्राफ्टमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता."

रोहित पवारांनी आज (10 फेब्रुवारी) केलेल्या आरोपांनंतर बीबीसीने व्हीएसआर कंपनीचे मालक-संचालक कॅप्टन रोहित सिंग यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचा फोन बंद आहे. त्यामुळं कंपनीची प्रतिक्रिया मिळालेली नाही.
दरम्यान, बीबीसी न्यूज मराठी रोहित पवारांनी केलेल्या आरोप आणि दाव्यांवर VSR व्हेंचर्स लिमिटेड कंपनीची बाजू मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची बाजू आल्यास इथे अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











