'या बारीनं भरती होईन म्हणायचा, पण माझा वाघ गेला', पोलीस भरतीदरम्यान मृत्यू झालेल्या दीपकच्या आईचा टाहो

फोटो स्रोत, Sanjib Roy
"सकाळी पाच वाजता पळायला जायचा. घरात सारखा अभ्यास करत राहायचा. आई, या बारीनं मी भरती होईन, जिंकूनच येईन, असं म्हणायचा. माझा वाघ लय हुशार होता, माझा वाघ निघून गेला."
जयश्री वाव्हळे सांगत होत्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं.
जयश्री वाव्हळे या दीपक वाव्हळे यांच्या आई आहेत.
बीडच्या परळी येथील दीपक भास्कर वाव्हळे या तरुणाचा पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाला.
काय घडलं?
बीड जिल्हा पोलीस दलाच्या 174 पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी (11 फेब्रुवारी) ही घटना घडली.
बुधवारी (11 फेब्रुवारी) पहाटे 5 वाजेपासून बीड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. दीपक या प्रक्रियेत सहभागी झाला होता.
दुपारी 12.30 च्या सुमारास 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर दीपकला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलिसांनी त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
कुटुंबीय काय म्हटलं?
दीपक वाव्हळे यांचे कुटुंब बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील मांडखेल गावात राहतं. वाव्हळे कुटुंबीय भूमिहीन आहे. दीपकचे वडील ट्रॅक्टरवर चालक आहेत तर आई आणि भाऊ दोघेही मजुरी काम करतात.
अक्षय वाव्हळे हा दीपक वाव्हळे यांचा लहान भाऊ आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना अक्षय म्हणाला, "माझा भाऊ 26 वर्षांचा होता. गेल्या काही वर्षांपासून तो पोलीस भरतीची तयारी करत होता. तो दररोज सकाळी ग्राऊंडवर प्रॅक्टिससाठी जायचा. गावातच प्रॅक्टिस करायचा. त्याला पोलीस व्हायचं होतं. पण तो आम्हाला सोडून गेला. माझा भाऊ मला सोडून गेला. त्याचं स्वप्नं स्वप्नच राहिलं."

फोटो स्रोत, Sanjib Roy
"काल आम्हाला पोलिसांचा फोन आला की तुमचा मुलगा चक्कर येऊन पडलाय. आम्ही दवाखान्यात गेलो तिथं आम्हाला समजलं की भाऊ गेला म्हणून. पोस्टमॉर्टम करून आम्ही त्याचा मृतदेह रात्री 9 वाजता घरी आणला," अक्षय पुढे म्हणाला.
अक्षय आणि दीपक हे दोघेच भाऊ. त्यातल्या दीपकचा मृत्यू झाल्यामुळे मजुरी करणाऱ्या वाव्हळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
मयत दीपक वाव्हळेचे वडील भास्कर वाव्हळे म्हणाले, "सगळ्या घरात तोच मोठा होता. कर्ता होता. काल दिवसभर बाहेरच होतो. पोलिसवाल्याचा फोन आला तेव्हा बीडला गेलो आणि मग हे कळालं."
पोलिसांनी काय म्हटलं?
याप्रकरणी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलंय की,
"दुपारी 12.55 वाजता दीपक वाव्हळे या उमेदवारानं1600 मीटर धाव पूर्ण केल्यानंतर विश्रांती घेतली. त्यानंतर तो फिनिशिंग पॉईंटलगत असलेल्या मेडिकल रूमकडे चालत जाताना दिसून आला. त्यावेळी मेडिकल टीम त्याच्यासोबत उपस्थित होती. मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टरांकडून त्यास प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यास आयव्ही (IV) देण्यात आले. तसेच तपासणी दरम्यान नाडी (Pulse) कमी असल्याचे आढळून आल्याने तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली.
"दुपारी 1.14 वाजता संबंधित उमेदवारास रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले."

फोटो स्रोत, Sanjib Roy
याप्रकरणी शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेत झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत सर्व संबंधित बाबींची तपासणी करण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक कार्यालयाने म्हटले आहे.
ग्रामीण तरुणांमध्ये वर्दीचे आकर्षण
गावात बरेच तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यात असल्याचं अक्षयने सांगितलं.
पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील लाखो तरुण दररोज धावताना, भरतीसाठीचा सराव करताना दिसतात. पोलीस भरतीसाठी जीवतोड तयारी करताना दिसतात.
ग्रामीण भागात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुणांचा कल पोलीस भरतीकडे असतो.

फोटो स्रोत, shrikant bangale
भारत धनले परभणीच्या पाथरीमध्ये कबड्डी आणि पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यायाम शाळा चालवतात.
काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना धनले म्हणाले होते, "खेड्यातून जी मुलं येतात, एकतर गरीब परिस्थिती असते, त्यामुळे जास्त शिकू शकत नाहीत. त्यामुळे मग बारावी पास झाल्यानंतर मुलं पोलीस भरतीच्या तयारीला लागतात. पोलीस भरती आणि वर्दीविषयी ग्रामीण मुलांना एक आकर्षण असतं."
(परळीहून संजीब रॉय यांनी दिलेल्या माहितीसह)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











