गर्दी, ताण आणि साचलेला राग: मुंबईत लोकलमध्ये माणसांचे 'स्फोट' का होत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
'वेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलांशी लग्न करत नाहीत...', बदलापूरचा मुलगा असेल तर नोकरीवर नको म्हणतात...' एका व्हायरल व्हीडिओमधली प्रवाशांची ही वाक्यं. त्यांच्या या अशा असंख्य समस्यांचं एकच कारण म्हणजे त्यांना रोज खचाखच गर्दीतून करावा लागणारा प्रवास.
मुंबईमध्ये दररोज काही लाख लोक उपनगरांमधून कामासाठी येतात आणि तितकेच लोक संध्याकाळी बाहेर जातात.
या प्रवासाचं मुख्य साधन उपनगरी रेल्वेगाड्या म्हणजे लोकल असल्या तरी पुणे नाशिकमधून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या, बेस्ट आणि खासगी बसेस, ॲपबेस्ड कार, चारचाकी गाड्या आणि दुचाकी यांचाही त्यात समावेश आहे. या सर्वांनाच साधारणतः एकाचप्रकारचा गर्दीचा आणि पर्यायानं त्याच्या परिणांमाचा अनुभव येतो.
सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून कामाचा ताण, अध्येमध्ये गर्दीत संकोच पावलेली पर्सनल स्पेस, कोलाहल एकत्र डोक्यात घेऊन लोक प्रवास करतात.
कधी याच प्रवासात लोकलमध्ये चढता उतरताना पडणारे लोक पाहातात तर कधी रुळ ओलांडताना होणारे अपघात पाहावे लागतात. ही सगळी दुःखद चित्रं डोक्यात साठत जातात. हतबलता, राग, तणाव अशा अनेक भावना आणि विचारांची गर्दी मनात साचत जाते.

फोटो स्रोत, Getty Images
आता या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्याचं कारण म्हणजे गेल्या काही काळात मुंबई उपनगरी लोकलमध्ये होत असलेल्या भांडणं, मारामाऱ्यांच्या घटना. जानेवारी महिन्यात या भांडणांनी कळस गाठला ते म्हणजे थेट हत्येपर्यंत याची मजल गेली.
याच गर्दीत उतरण्यावरून झालेल्या वादातून एका प्राध्यापकांची हत्या झाली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव अलोककुमार सिंह (वय 32 वर्षे) असे आहे, तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव ओंकार एकनाथ शिंदे (वय 27 वर्षे) असं आहे.
बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्ता खुपेरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मालाड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. मालाडला रेल्वे स्थानकावर उतरताना आरोपी आणि अलोककुमार यांच्यात उतरण्यावरून वाद झाला."
"संध्याकाळच्या वेळेत गर्दी असतेच. उतरण्याच्या वेळेला वाद झाला आणि त्यातून आरोपीने पोटात एक वार केला. वार केलेलं शस्त्र अद्याप मिळालं नाही, पण आरोपीने चिमटा होता असं सांगितलं.
आम्ही सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने 25 जानेवारीला एक प्रेसनोट काढत या खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला 24 तासांच्या आत अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणला असं म्हटलं.
आता हा खटला चालेल. त्यातून पुढे काहीतरी बाहेर येईल. आरोपीचीही बाजू कोर्टात मांडली जाईलच. पण या सगळ्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला हे सत्य कायम उरतंय.
अर्णवची आत्महत्या
दोनच महिन्यांपूर्वी कल्याणच्या अर्णव खैरेलाही अशाच भांडणामुळे मोठ्या तणावाला सामोरं जावं लागलं.
ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्याने अर्णवला धक्का लागत होता. त्यामुळं समोर असलेल्या एका व्यक्तीला अर्णवने, 'थोडा आगे हो जाओ', असं म्हटलं.
अर्णववर गर्दीचा ताण येत होत असल्यामुळे, त्याने त्यांना अशाप्रकारे विनंती केली. पण त्याचवेळी गर्दीतील एका प्रवाशाने अर्णवच्या कानाखाली मारली.

फोटो स्रोत, Getty Images
"मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायला लाज वाटते का?" अशी विचारणा अर्णव करण्यात आली. तर इतर सहकारी प्रवाशांनीही अर्णवला मारहाण केली आणि घाबरवलं.
कॉलेजमध्ये जाण्यासाठी अर्णवला मुलुंड येथे उतरायचं होतं, मात्र तो घाबरून ठाण्यातच उतरला. त्यानंतर लगेचच घाबरलेल्या अवस्थेत तो घरी आला. अर्णवने आई - वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
त्यानंतर पुन्हा ठाण्यावरून लोकल पकडून तो मुलुंडच्या दिशेने कॉलेजला गेला. कॉलेजमध्ये तब्येत बरी नसल्याने प्रॅक्टिकल अर्धवट सोडून तो घरी निघाला.

फोटो स्रोत, UGC
घरी येताना वडिलांनी त्याला दुपारी कॉल केला. बरं वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं, सकाळची घटना त्याने पुन्हा वडिलांना सांगितली. त्या घटनेने तो मानसिक तणावात होता. सर्व घटना सांगून त्याने पुढे फोन बंद केला आणि तो घरी आला.
यानंतर सायंकाळी वडील कामावरून परतल्यानंतर सातच्या सुमारास घराचा दरवाजा बंद दिसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा त्यानं आत्महत्या केल्याचं लक्षात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
एकेवेळीस शाब्दिक चकमकी, रागीट हावभावापर्यंत असलेला प्रवाशांचा राग शिव्या देणं, ढकलाढकली, धक्काबुक्कीपासून थेट एकमेकांना इजा पोहोचवणे ते जीवच घेण्यापर्यंत गेला हे यातून दिसतं.
तसंच महिलांच्या डब्यातल्या भांडणांचे अनेक व्हीडिओही अधूनमधून समाजमाध्यमांत दिसत असतात. वेगळे डबे करणं, डबे वाढवणं, कार्यालयांच्या वेळा बदलणं असे केलेले उपायही या गर्दीच्या रेट्यापुढे चालत नसल्याचं दिसून येतंय किंवा त्यांचे दृश्य स्वरुपात फायदे समोर आलेले नाहीत.
गर्दीमुळे ताण कसा वाढतो?
मुंबईचा रोजचा प्रवास हा केवळ वेळखाऊ नाही, तर मानसिकदृष्ट्याही थकवणारा ठरतो. लोकल ट्रेन, बस किंवा रस्त्यावरची गर्दी या सगळ्याचा थेट परिणाम माणसाच्या मनःस्थितीवर होतो.
सततची गर्दी म्हणजे वैयक्तिक अवकाशावर (personal space) होणारं अतिक्रमण. हा अतिक्रमणाचा अनुभव मेंदूला 'धोका' म्हणून जाणवतो आणि त्यामुळे तणाव संप्रेरक (stress hormones) वाढतात.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधनात असं दिसून आलं आहे की गर्दी, उशीर, अनिश्चितता आणि नियंत्रणाचा अभाव या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर चिडचिड, राग आणि आक्रमक वर्तन वाढतं.
गर्दीच्या प्रवासात श्वास घ्यायला कमी जागा, सततचा लागणारा धक्का, आवाज, कोलाहल आणि घामाघूम झालेले लोक यामुळे शरीर सतत 'alert mode' मध्ये राहतं. परिणामी, लहानसहान गोष्टींवरही संताप उफाळून येतो.
याशिवाय, प्रवासात आलेला ताण हा कामाच्या ठिकाणी आणि घरीही "spill over" होतो. म्हणजेच सकाळचा वाईट प्रवास संपूर्ण दिवसाची मनःस्थिती बिघडवू शकतो.
मुंबईसारख्या शहरात, जिथे लाखो लोक रोज अशाच परिस्थितीत प्रवास करतात, तिथे ही चिडचिड वैयक्तिक न राहता सार्वजनिक समस्या होते तिचाजिचा परिणाम सामाजिक संबंध, आरोग्य आणि एकूणच शहराच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो.
लोकलमध्ये राग का उफाळून येतो? क्रश स्ट्रेस म्हणजे काय?
मुंबई लोकलमध्ये प्रवास म्हणजे केवळ गर्दी नव्हे, तर सततचा 'क्रश स्ट्रेस'. मानसशास्त्रीय संशोधनानुसार, अतिगर्दीच्या ठिकाणी माणसाला स्वतःच्या हालचालींवर आणि सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण नसल्याची भावना येते. हाच "lack of control" राग आणि चिडचिड वाढवणारा महत्त्वाचा घटक ठरतो.
लोकलच्या डब्यात श्वास घ्यायला जागा नसणे, वारंवार धक्के बसणे, घाम, आवाज आणि उशीर या सगळ्या गोष्टी मिळून शरीरात तणाव वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. ऑस्ट्रियामधील एका अभ्यासात असे आढळले की गर्दीच्या ट्रान्झिट स्पेसमध्ये गेल्यावर शरीरातील तणावाची जैविक लक्षणे (त्वचेचा विद्युत प्रतिसाद, तापमान बदल) स्पष्ट वाढतात.

फोटो स्रोत, Getty Images
इंडोनेशियातील गर्दीच्या ट्रेन प्रवाशांवर झालेल्या अभ्यासातही गर्दी जितकी जास्त, तितके प्रवाशांमधील आक्रमक वर्तन आणि संताप वाढल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रवासाचा परिणाम फक्त त्या क्षणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो ऑफिसमधील वागणूक, निर्णयक्षमता आणि घरी नातेसंबंधांवरही परिणाम करतो यालाच "spillover effect" म्हणतात.
तज्ज्ञांच्या मते, गर्दीचा परिणाम क्षणिक नसून साचत जाणारा असतो. दररोजचा ताणतणावाचा प्रवास मेंदूला 'alert mode' मध्येच ठेवतो. त्यामुळे अगदी किरकोळ स्पर्श, आवाज किंवा ढकलाढकलीही भांडणाला सुरुवात करू शकतो. संशोधनातून दिसून आले आहे की प्रवासातील तणाव हा ऑफिसमधील कामगिरी, निर्णयक्षमता आणि घरी नातेसंबंधांवरही परिणाम करतो हाच तो परिणाम त्रास वाढवतो.
अशाप्रकारचे रागानं, ताणानं, चिंतेनं भरलेले फुगे आपण लोकलमध्ये कोंबलेले असतात. या फुग्याला अगदी लहानशा टाचणीनंही धक्का बसून स्फोट होऊ शकतो.
दिवसभरातला राग, एकूण कामाचा ताण, प्रवासातली गर्दी, चिडचिड हे सगळं आत खदखदत राहातं आणि लहानशा कारणानं तो बाहेर येतो. संतापामुळे झालेल्या घटनेचे परिणाम मात्र भयावह असू शकतात याची उदाहरणं आपण पाहिलीच आहेत.
शहरी प्रवास, सततचा ताण आणि चिडचिड
याबाबत पनवेलस्थित डॉ. रिषभ वर्मा यांनी बीबीसी मराठीशी विस्तृत चर्चा केली आणि यासंदर्भात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली.
ते म्हणाले, दररोजचा शहरी प्रवास हा नकळतपणे मोठा मानसिक ताण निर्माण करतो. कायद्याचा अभाव, ढिसाळ झालेली नागरी शिस्त, प्रचंड गर्दी, अनिश्चितता आणि स्वतःच्या नियंत्रणाबाहेर असलेली परिस्थिती यामुळे मन कायम 'hyper‑alert' अवस्थेत राहतं. हा ताण दीर्घकाळ टिकला की मानसिक ऊर्जा झपाट्याने खर्च होते.
त्यामुळे दिवसभर फारसं काम झालेलं नसलं तरीही प्रचंड थकवा, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवते. अशा स्थितीत अगदी छोट्या गोष्टीही रागाचा स्फोट घडवू शकतात.
शहरी जीवन, दीर्घकालीन ताण आणि सहनशक्ती घटण्याची प्रक्रिया
पण प्रवास करताना माणसं भांडणं आणि एकमेकांवर हात उचलण्यापर्यंत का जातात? त्यांचा राग हिंसेपर्यंत कसा जातो असं विचारल्यावर डॉ. रिषभ वर्मा म्हणाले,
शहरातलं भरपूर ताण-तणाव असलेलं जीवन सगळ्यांसाठी सोपं नसतं. सततचं कामाचं दडपण, प्रवासातील संघर्ष, आर्थिक ओझं आणि 'survival mode'मध्ये जगण्याची सवय हळूहळू भावनिक नियंत्रणावर परिणाम करते.
रोजच्या छोट्या-छोट्या टोचणाऱ्या अनुभवांमध्ये (micro‑aggressions) मनाची बरीच ऊर्जा खर्च होते. त्यामुळे एखादा संघर्ष समोर आला, तर तो हाताळण्याची मानसिक ताकद उरलेली नसते. मेंदूतील 'feel‑good chemicals' आधीच कमी झाल्याने सहनशक्ती कमी होते आणि प्रतिक्रिया अधिक तीव्र होतात.
डॉ. रिषभ वर्मा पुढे सांगतात, "अतिगर्दीत म्हणजे लोकल ट्रेन, बस, प्लॅटफॉर्म पर्सनल स्पेस म्हणजे प्रत्येक व्यक्तिचं म्हणून असलेलं स्वतंत्र अवकाश सतत भंग पावतं. हा रोजचा साचलेला त्रास म्हणजे जणू अस्वस्थतेचा थेंब‑थेंबाने भरत जाणारा समुद्रच असतो.
एखाद्या क्षणी तो उसळतो. अशा परिस्थितीत लोक अधिक आक्रमक, कमी सहानुभूतीशील आणि 'vent out' करण्याच्या शोधात असतात. ही एखाद्या व्यक्तिमत्त्वाची समस्या नसून सामूहिक मानसिक थकव्याचं लक्षण आहे.
थेरपी, समुपदेशन किंवा वैद्यकीय मदत हा यावर आरोग्यदायी मार्ग असू शकतो; पण सहज आणि झटपट वाटणारा मार्ग म्हणून अनेक जण आक्रमकतेकडे वळतात."

याबद्दल नवी मुंबईतल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात मानसोपचार विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पार्थ नागडा यांनी अधिक माहिती दिली. ते सांगतात, "सामान्यतः पुरुष राग अधिक उघडपणे आणि स्फोटक पद्धतीने व्यक्त करतात, तर महिलांमध्ये तोच ताण चिंता, अस्वस्थता किंवा passive‑aggressive वर्तनाच्या स्वरूपात आत साचतो. झोपेचा अभाव, दारूचे वाढते सेवन, कामावर कार्यक्षमता कमी होणं, सततची चिंता किंवा panic attacks ही धोक्याची लक्षणं मानली पाहिजेत."
रागामागची भावना, नियंत्रण हरपण्याची चिन्हं आणि उपाय
आता आपला हा रागाचा समुद्र कुठपर्यंत भरलाय, कुठपर्यंत त्याच्या लाटा उसळल्यात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
त्यामुळे त्याची काही लक्षणं आहेत का असा प्रश्न विचारल्यावर डॉ. रिषभ वर्मा म्हणाले, "राग ही बहुतेक वेळा मूळ भावना नसून भीती, अपमान, असहाय्यता आणि दडपलेली निराशा यांचं आवरण असतं. काही जण fight‑or‑flight (एकतर लढा किंवा पळून जा) प्रतिसादात हिंसेकडे झुकतात, तर काही मागे हटतात. हा निर्णय मेंदू काही क्षणांत वैयक्तिक अनुभवांवर आधारित घेतो."
"झोपेचा अभाव, दारू, दीर्घकालीन ताण यामुळे impulse control (आवेगावरचं नियंत्रण) अधिक कमकुवत होतं. सतत प्रवासाविषयी नकारात्मक विचार, धडधड, झोप न लागणं, व्यसनांचा आधार घेणं ही इशारे देणारी लक्षणं आहेत. अशावेळी मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं. जसं व्यायाम शरीरासाठी, तसं थेरपी ही मनासाठी असते. मन हीदेखील एक स्नायू आहे. त्याचा योग्य वापर आणि काळजी घेतली तरच तो सक्षम राहतो.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. पार्थ नागडाही अशाचप्रकारे उपाय सुचवतात. ते म्हणाले, "यावर उपाय म्हणून चालणं, व्यायाम, श्वसनावर आधारित तंत्र, माइंडफुलनेस यांसारख्या साध्या पण प्रभावी सवयी उपयोगी ठरू शकतात. सार्वजनिक ठिकाणी दृष्टीच्या टप्प्यात असलेली पोलीस व्यवस्था, तसेच राग नियंत्रणासाठी व्याख्यानं, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आवश्यक आहेत. जर वेळेत लक्ष दिलं नाही, तर शहरांमध्ये भावनिक थकवा, वाढती चिंता आणि हिंसाचाराची साखळी निर्माण होण्याचा धोका आहे. अनियंत्रित राग कधीच 'नॉर्मल' नसतो. तो मानसिक आरोग्य अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्याची गरज असल्याचं स्पष्ट संकेत देतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











