स्पेसएक्स रॉकेटच्या यशाचं महत्त्व काय? स्पेसएक्सची जगभरात चर्चा

स्पेसएक्स रॉकेटच्या ताज्या चाचणीची जगभरात का होते आहे चर्चा? स्पेसएक्स च्या यशाचं महत्त्व काय?

फोटो स्रोत, Reuters

    • Author, एस्मी स्टालार्ड हवामान आणि विज्ञान रिपोर्टर,
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इलॉन मस्क आणि त्यांची स्पेसएक्स कंपनी नेहमीच चर्चेत असतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात मोठा बदल घडवण्याचा मानस इलॉन मस्क कायम व्यक्त करत असतात.

स्पेसएक्सच्या मोहिमा आणि योजना त्याच दृष्टीकोनातून आखलेल्या असतात.

आता पुन्हा स्पेसएक्सच्या रॉकेटवर जगाचं लक्ष केंद्रित झालं आहे.

इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिप रॉकेटच्या ताज्या चाचणीची जगभरात चर्चा होत आहे.

या चाचणीच्या वेळेस स्टारशिप रॉकेटला लाँचपॅडवर परत सुरक्षित उतरण्यात आलं. अशाप्रकारे रॉकेटला लाँचपॅडवर सुरक्षित उतरवण्याची कमाल करणारी इलॉन मस्क यांची स्पेसएक्स ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे.

पाचव्या उड्डाण चाचणीत स्पेसएक्सचं अंतराळ यान अर्ध्या मार्गावर असतानाच त्याचा वेग कमी करण्यात आला. त्यानंतर रॉकेटच्या बूस्टरला ज्या जागेवरून आकाशात सोडण्यात आलं होतं त्याच जागी यशस्वीरित्या पुन्हा उतरवण्यात आलं.

या चाचणीमुळे स्पेसएक्सनं अंतराळ मोहिमांच्या संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

स्पेसएक्सची वेगानं आणि पुन्हा वापरता येणारे रॉकेट बनवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या यशस्वी चाचणीमुळे त्या दिशेनं स्पेसएक्सनं मोठी मजल मारली आहे.

ऐतिहासिक क्षण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बूस्टर सुरक्षितरित्या जमिनीवर उतरवून घेण्यात यश आल्यामुळे स्पेसएक्सच्या इंजिनीअर्सनी हा "ऐतिहासिक दिवस" असल्याचं म्हटलं आहे.

रॉकेटच्या खालच्या भागाला सुपर हेवी बूस्टर म्हटलं जातं. हे बूस्टर सफाईनं लाँचिंग पॅडवर उतरवणं ही अतिशय कठीण गोष्ट असते. मात्र तसं करण्यात स्पेसएक्सला यश आलं आहे.

बूस्टर लाँच करण्याआधी स्पेसएक्सच्या टीमनं या मोहिमेच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली होती. जर बूस्टर लाँचपॅडवर उतरण्याऐवजी मेक्सिकोच्या खाडीत कोसळलं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही असं या टीमनं म्हटलं होतं.

मागील चाचण्यांमध्ये यश मिळाल्यानंतर आता स्पेसएक्स प्रचंड, असामान्य कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते.

पहिली चाचणी अपयशी ठरल्यानंतर 18 महिन्यांच्या आतच बूस्टरच्या चाचणीत यश मिळालं आहे. पहिल्या चाचणीच्या वेळेस रॉकेट आकाशात झेपावल्यानंतर काही क्षणातच त्याचा स्फोट झाला होता.

स्पेसएक्सचं म्हणणं आहे की, आधीचं अपयश हे रॉकेट विकसित करण्याच्या योजनेचाच एक भाग होतं. म्हणजेच लवकरात लवकर रॉकेट विकसित करून ते लॉंच करताना त्यात अपयश मिळणार हे लक्षात घेतलेलं होतं.

मात्र, त्यातून शक्य असेल तितकी माहिती, डेटा गोळा करण्यावर भर होता. जेणेकरून स्पेसएक्सच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा वेगानं त्यांना त्यांची प्रणाली विकसित करता येईल.

पाचव्या चाचणीचे सुरुवातीचे टप्पे देखील मागील चाचण्यांसारखेच होते. म्हणजेच हवेत झेपावल्यानंतर 2.75 मिनिटांमध्ये बूस्टर अवकाशयानापासून वेगळं झालं होतं.

यानंतर बूस्टर चा टेक्सासमधील बोका चिका इथं असणाऱ्या लॉंच पॅडवर परतीचा प्रवास सुरू झाला होता.

लॅंडिंग साठी दोन मिनिटांचा अवधी होता. स्पेसएक्सची टीम जेव्हा शेवटची पाहणी करत होतं तोपर्यंत ही चाचणी यशस्वी होईल की नाही याबद्दल खात्री नव्हती.

ज्यावेळेस फ्लाइट डायरेक्टरनं चाचणी यशस्वी झाल्याचा संकेत दिला तेव्हा मिशन कंट्रोलमध्ये हजर असणाऱ्या स्पेसएक्सच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं.

@elonmusk

फोटो स्रोत, @elonmusk

कंपनीनं सांगितलं होतं की या चाचणीसाठी बारीक सारीक अशा हजारो प्रक्रिया पार पाडाव्या लागणार होत्या.

सुपर हेवी बूस्टर पृथ्वीच्या वातावरणात परतताच, त्याच्या रॅप्टर इंजिनानं त्याचा वेग कमी करण्यास सुरूवात केली. त्यावेळेस बूस्टरचा वेग काही हजार मैल प्रति तास इतका होता.

146 मीटर उंच लॅंडिंग टॉवरच्या जवळ पोहोचल्यावर बूस्टर हवेत जवळपास स्थिर झाला होता. बूस्टरच्या खालच्या भागातून जांभळ्या ज्वाला निघत होत्या. यानंतर अतिशय सावकाशपणे बूस्टर मेकॅनिकल आर्ममध्ये येऊन फिट झाला.

या रॉकेटचा अवकाशायानासाठीचा भाग आधीच वेगळा झाला होता आणि यामध्ये असणारं स्वंतत्र इंजिन कार्यरत झालं होतं. भविष्यातील अंतराळ मोहिमां मध्ये अंतराळवीर याच मॉड्यूल मध्ये बसून प्रवास करतील.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

हे अवकाश यान 40 मिनिटांनी हिंदी महासागरात कोसळलं.

स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी या चाचणीसंदर्भात एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, "अवकाश यान अचूक ठिकाणी उतरलं. दोन उद्दिष्टांपैकी दुसरं पूर्ण झालं."

या चाचणी दरम्यान फक्त अवकाश यानच अचूकपणे उतरलं नाही तर यानाचे काही भाग सुरक्षितरित्या वाचवण्यात देखील स्पेसएक्स ला यश आलं. हे करणं शक्य होईल अशी अपेक्षा करण्यात आली नव्हती.

लॉंच पॅडवरच बूस्टर पुन्हा सुरक्षितपणे उतरवल्यामुळे याप्रकारच्या मोहिमांमधील गुंतागुंत कमी होईल. त्याचबरोबर अवकाश मोहिमांचा आणि अवकाश यानांना पाठवण्याचा वेग वाढेल.

इलॉन मस्क आणि स्पेसएक्सची एक अत्यंत महत्त्वाकांश्री योजना आहे. या योजनेनुसार स्पेसएक्स ची रॉकेट सिस्टम एक दिवस मानवाला चंद्रावर घेऊन जाईल आणि त्यामुळे मानवजात 'बहुग्रहीय' होईल.

स्पेसएक्स आणि नासामधील करार

स्पेसएक्सच्या या यशामुळे नासा ही अमेरिकेचे अंतराळ संस्थादेखील खूष झाली आहे.

2026 पर्यंत चंद्रावर अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या लॅंडर या अवकाशयानाला विकसित करण्यासाठी नासानं स्पेसएक्स बरोबर 2.8 अब्ज डॉलरचा करार केला आहे.

तसं पाहता आता या मोहिमेसाठी फार अवधी राहिलेला नाही. त्यामुळे इलॉन मस्क यांची टीम रॉकेट रीलॉंच करण्यासाठी खूपच घाईनं काम करते आहे.

मात्र अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA)या अमेरिकन सरकारच्या एका विभागानं याआधी म्हटलं होतं की नोव्हेंबरच्या आधी कोणतंही यान लॉंच होणार नाही. जोपर्यंत कंपनीच्या परमिटची तपासणी होत नाही तोपर्यंत लॉंचिंग होणार नाही.

एफएए ही संस्थाच सर्व उड्डाणांना परवानगी देते.

मागील महिन्यात एफएए आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद उघड झाला होता. एफएएनं म्हटलं होतं की परवान्याच्या अटींची पूर्तता करण्यात अपयश आल्यामुळे आणि आधीच्या उड्डाणांसाठी परमिट न घेतल्याबद्दल ते स्पेसएक्स ला 6.33 लाख डॉलरचा दंड करणार आहेत.

परवाना देण्याआधी एफएए अवकाश मोहिमेची तपासणी करतं. विशेषकरून मोहिमेचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जातो.

एफएएनं केलेल्या दंडाबद्दल इलॉन मस्कनं या संस्थेवर खटला दाखल करण्याची धमकी दिली होती. तसंच स्पेसएक्सनं एका पोस्टमध्ये 'चुकीचं रिपोर्टिंग' केलं जात असल्याची टीका केली होती. कारण असं म्हटलं जात होतं की रॉकेटचा काही भाग पर्यावरण प्रदूषित करतो आहे.

re

फोटो स्रोत, Reuters

सध्या एफएए अवकाश मोहिम किंवा रॉकेट मुळे होणाऱ्या उत्सर्जनाच्या व्यापक परिणामांऐवजी फक्त रॉकेट लॉंच केल्यानंतर पर्यावरणावर होणाऱ्या तात्कालिक परिणामांचाच विचार करतं.

प्राध्यापक डॉ. एलॉईस मरैस युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये वातारवणीय रसायनशास्त्र आणि हवेची गुणवत्ता हे विषय शिकवतात.

त्याचं म्हणणं आहे की दळणवळणाच्या इतर साधनांच्या तुलनेत रॉकेटमुळे होणारं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी असतं. मात्र पृथ्वीवरील तापमान वाढवणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष दिलं जात नाही.

त्या म्हणतात, "काळा कार्बन हा सर्वात चिंतेचा विषय आहे. स्टारशिप रॉकेटमध्ये द्रव मिथेनचा वापर केला जातो आहे. हे एक नवीन प्रकारचं इंधन आहे आणि त्यामुळे यातून होणाऱ्या उत्सर्जनासंदर्भात आपल्याकडे फार थोडी माहिती आणि आकडेवारी आहे."

डॉ. मरैस म्हणाल्या की रॉकेटमधून उत्सर्जित होणाऱ्या काळ्या कार्बनबद्दल अधिक चिंता वाटण्यामागचं कारण म्हणजे विमानांच्या तुलनेत हे रॉकेट अधिक उंचावर उड्डाण करतात. त्यामुळे त्यातून होणाऱ्या उत्सर्जनाचा प्रभाव वातावरणात प्रदीर्घ काळ राहू शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमच प्रकाशन)