वैभव सूर्यवंशी : आर्थिक अडचणींमुळे वडिलांना सोडावं लागलं क्रिकेट, मुलाने कमी वयातच गाठले मोठे यश

फोटो स्रोत, ICC/ICC via Getty Images
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धमाका केला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने भारताकडून सर्वाधिक वेगवान शतक करण्याच विक्रम केला आहे.
वैभवनं तडाखेबाज फलंदाजी करत 80 चेंडूंमध्ये 175 धावा केल्या.
आजवरच्या अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात वैभवचं हे शतक दुसरं सर्वाधिक वेगवान शतक ठरलं आहे.
वैभव आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो आणि तो पहिल्यांदा २०२४ मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपये देऊन खरेदी केलं होतं.
आयपीएल लिलावाच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या तरुण खेळाडूला खरेदी करण्यात आलं आहे. त्यानंतर वैभवने पुढच्या आयपीएलमध्ये वैभवने दमदार कामगिरी केली होती.
झिम्बाब्वे येथे सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड खेळत आहेत. वैभव सूर्यवंशीने 71 बॉल्समध्ये तब्बल 151 धावा केल्या आहेत आणि यासाठी त्याने 15 षटकार आणि 15 चौकार खेचले आहेत.
काही वर्षांपूर्वली आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये बोली लावण्याची स्पर्धा लागली होती.
अखेर राहुल द्रविड मेंटॉर असलेल्या राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावून तेव्हा 13 वर्ष 8 महिने वय असलेल्या वैभवला त्यांच्या संघात घेतलं. वैभवची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.
वैभवला राजस्थान रॉयल्समध्ये घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेक लश मॅक्क्युलम म्हणाले की, "आमच्या नागपूरच्या हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये वैभव आला आहे. तिथे त्याने चाचणी दिली आणि आम्हा सगळ्यांनाच प्रभावित केलं.
त्याच्याकडे अचाट क्षमता आहे आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देखील त्याच्याकडे आहे."
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना महेंद्रसिंग धोनीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मारलेला खणखणीत षटकार नीट आठवत असेल.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात धोनीने भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मात्र, या विजयाच्या पाच दिवस आधी म्हणजेच 27 मार्च 2011 रोजी वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला.
वैभवने बिहार संघातर्फे वयाच्या 12 व्या वर्षी पदार्पण केलं. पदार्पणानंतर अल्पावधीतच वैभवने त्याची चुणूक दाखवून दिली.
19 वर्षाखालील खेळाडूंच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना वैभवने 58 बॉल्समध्ये शतक झळकावलं होतं. युवा कसोटीमध्ये भारताकडून खेळताना वैभवने सर्वाधिक वेगवान शतक झळकावलं.
वैभवने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "वैभव 9 वर्षांचा असताना त्याला बिहारच्या समस्तीपूरमधल्या क्रिकेट क्लबमध्ये दाखल केलं. तिथे दोन-अडीच वर्षे सराव केल्यानंतर आम्ही विजय मर्चंट ट्रॉफीसाठी 16 वर्षांखालील संघाच्या ट्रायल्स देण्याचं ठरवलं. त्यावेळी माझ्या वयामुळे मला निवडण्यात आलं नाही."

फोटो स्रोत, BCA
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वैभव समस्तीपूरचा आहे. त्याने आतापर्यंत पाच रणजी सामने खेळले आहेत. याचवर्षी वैभवने बिहार विरुद्ध मुंबईच्या सामन्यात रणजी पदार्पण केलं. सध्या वैभव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळतो आहे. त्याने 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानविरुद्ध टी-20मध्ये पदार्पण केलं.
वैभवने बिहारमध्ये झालेल्या रणधीर वर्मा अंडर-19 स्पर्धेत एक त्रिशतकही झळकावलं आहे. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा हा वैभवचा आदर्श आहे. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर वैभवला वेळोवेळी मार्गदर्शन करतो.
क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वैभवचे वडील संजीव हेदेखील क्रिकेट खेळाडू होते. मात्र, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते मोठ्या पातळीवर खेळू शकले नाहीत.

फोटो स्रोत, rajasthanroyals/facebbok
राजस्थान रॉयल्सने वैभवला त्यांच्या संघात घेतल्यानंतर संजीव सूर्यवंशी म्हणाले की, "मी निशब्द आहे. मला काय बोलू सुचत नाहीये. आमच्या कुटुंबासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटत होतं की त्याची निवड होईल पण त्याला संघात घेण्यासाठी एवढी स्पर्धा असेल असं नव्हतं वाटलं."
वैभवच्या लहानपणाबाबत बोलताना संजीव म्हणाले की, "मला आता सगळ्या गोष्टी आठवत आहेत. मला स्वतःला क्रिकेटचं वेड होतं. पण वयाच्या 19व्या वर्षी मला मुंबईला जावं लागलं. तिथे मी अनेक कामं केली. एका नाईट क्लबमध्ये बाउन्सर म्हणूनही काम केलं. मुंबईत राहत असताना मला अनेकदा वाटायचं की माझं नशीब कधी बदलेल? पण आता माझ्या मुलाने ते शक्य करून दाखवलं आहे. भविष्यात काय होईल हे मला माहिती नाही पण किमान आता मला त्याच्या क्रिकेटसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत."
राजस्थान रॉयल्सबाबत बोलताना संजीव म्हणाले की, "राजस्थान रॉयल्सने अनेक तरुण खेळाडूंना घडवलं आहे. त्यामध्ये संजू सॅमसन, ध्रुव जुरेलसारखे खेळाडू राजस्थानने तयार केले. मला असं वाटतं वैभवही तसाच घडेल."
वैभवने आतापर्यंत पाच रणजी सामने खेळले आहेत. मात्र अजूनही रणजीमध्ये तो मोठी खेळी करू शकलेला नाही. पाच सामन्यांमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने सर्वाधिक 41 धावा केल्या आहेत आणि एकूण तो 100 धावाच करू शकला आहे.
शनिवारी (23 नोव्हेंबर)रोजी राजकोटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना, त्याने राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी याला दोन षटकार खेचले आणि सहा चेंडूंत 13 धावा काढून तो बाद झाला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











