'माझा जीव वाचला कारण AI ने माझा ब्रेस्ट कॅन्सर वेळीच ओळखला' - साध्या डोळ्यांना न दिसणारा कॅन्सर AI ने शोधून काढला

इव्होन कूक
फोटो कॅप्शन, संशोधनामुळे इव्होन कूक यांच्या कॅन्सरचे वेळेत निदान झाले
    • Author, केन बँक्स
    • Role, स्कॉटलंड रिपोर्टर, अ‍ॅबरडीन
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

एका नवीन अभ्यासानुसार AI च्या मदतीने ब्रेस्ट कॅन्सरचे निदान 10% जास्त अचूकपणे होऊ शकते. एबरडीन युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

या टीमने 10,000 पेक्षा जास्त महिलांच्या तपासणीमध्ये 'AI सॉफ्टवेअर'चा वापर करून पाहिला. यामुळे डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कॅन्सर शोधणे सोपे झाले.

महत्त्वाचे म्हणजे या तंत्रज्ञानामुळे महिलांना त्यांच्या तपासणीचे रिझल्ट्स आता खूप लवकर मिळू शकतील.

एबरडीनमध्ये राहणाऱ्या 60 वर्षांच्या इव्होन कूक यांनी या AI संशोधनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. याच तंत्रज्ञानामुळे त्यांच्यातील ब्रेस्ट कॅन्सर वेळेत ओळखून त्यावर उपचार करणे शक्य झाले. त्या म्हणाल्या, "मी स्वतःला खूप नशीबवान समजते की हे वेळीच लक्षात आले."

या अभ्यासाचे निकाल सकारात्मक आल्यामुळे आता याचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. आता UK मधील इतर अनेक शहरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणीसाठी AI चा वापर कसा करता येईल याची मोठी चाचणी घेतली जाईल.

खेरॉन (Kheiron) या मेडिकल टेक्नालॉजी कंपनीने हे 'मिया' (Mia) नावाचे AI टूल बनवले आहे. मॅमोग्राम स्कॅनमध्ये कधीकधी अशा काही छोट्या आणि कठीण जागा असतात ज्या मानवी डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत पण हे सॉफ्टवेअर त्या अचूकपणे शोधून काढते.

'नेचर कॅन्सर' या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार या तंत्रज्ञानामुळे कॅन्सर शोधण्याचे प्रमाण 10.4% ने वाढू शकते. इतकेच नाही तर यामुळे डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी होईल आणि महिलांना त्यांच्या तपासणीचे निकालही लवकर मिळतील असे देखील लक्षात आले आहे.

संशोधक म्हणतात की हे खूप महत्त्वाचे आहे कारण जर कॅन्सरचे वेळीच निदान झाले तर त्यावर लवकर उपचार करता येतात आणि रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते.

इव्होन कूक 2023 मध्ये त्यांच्या नेहमीच्या ब्रेस्ट चेकअपसाठी (मॅमोग्राम) गेल्या होत्या. तिथे वेटिंग रूममध्ये त्यांनी एक पाटी पाहिली ज्यावर लिहिले होते की "कॅन्सर तपासणीत मदत करण्यासाठी आम्ही AI चा वापर करत आहोत आणि यात सहभागी होणे अथवा न होणे हे ऐच्छिक आहे."

मॅमोग्राम रिपोर्टमध्ये मानवी डोळ्यांना न दिसणारे छोटे बदल किंवा धोके हे AI सॉफ्टवेअर शोधून काढते
फोटो कॅप्शन, मॅमोग्राम रिपोर्टमध्ये मानवी डोळ्यांना न दिसणारे छोटे बदल किंवा धोके हे AI सॉफ्टवेअर शोधून काढते

इव्होन म्हणाल्या, "मी एका मिनिटासाठीही विचार केला नाही आणि लगेच होकार दिला. मला वाटले की जर AI मुळे तपासणी अधिक चांगली होणार असेल तर नकार का द्यायचा?"

काही दिवसांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून एक पत्र आले ज्यात त्यांना पुन्हा काही टेस्ट्स करण्यासाठी बोलावले होते.

इव्होन म्हणाल्या, "कदाचित लोकांना उगाच घाबरवायचे नसेल म्हणून त्या पत्रात फक्त एवढेच लिहिले होते की तुमची पहिली तपासणी स्पष्ट नसल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा काही टेस्ट्स कराव्या लागतील."

"जेव्हा मी दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की AI मुळेच त्यांना काहीतरी संशयास्पद आढळले आहे. माझी पुन्हा तपासणी झाली आणि डॉक्टरांनी खात्री केली की AI ने दिलेला निकाल अगदी बरोबर होता. माझ्या शरीरात दुसऱ्या स्टेजचा (Grade 2) एक छोटासा ट्युमर होता जो इतका लहान होता की साध्या डोळ्यांना तो शोधणे अशक्य होते."

कॅन्सर शरीरात पसरू शकला असता

इव्होन म्हणाल्या, "मी खूप नशीबवान आहे की मी या संशोधनात सहभागी झाले आणि माझा आजार अगदी सुरुवातीलाच सापडला." त्यानंतर लगेच त्यांच्यावर औषधोपचार आणि एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्या पुढे म्हणाल्या, "जर AI ने तो छोटा ट्युमर तेव्हाच शोधला नसता तर तो कदाचित तीन वर्षांनंतरच्या माझ्या पुढच्या चेकअपमध्ये सापडला असता. किंवा तो इतका मोठा झाला असता की मला स्वतःलाच त्याची गाठ जाणवू लागली असती.

तसं झालं तर शरीरात कॅन्सर पसरला असता. मला केमोथेरपी घ्यावी लागली असती आणि बरं होण्यासाठी बराच कालावधी गेला असता. त्याने माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम घडला असता.

प्रोफेसर जेराल्ड लिप
फोटो कॅप्शन, प्रोफेसर जेराल्ड लिप म्हणाले की, या शोधामुळे आरोग्य क्षेत्रात AI चा वापर कसा करावा या चर्चेला नवी दिशा मिळेल

स्कॉटलंडमधील ब्रेस्ट स्क्रीनिंगचे संचालक प्रोफेसर जेराल्ड लिप यांनी सांगितले की या निकालांमुळे हे सिद्ध झाले आहे की AI मुळे कॅन्सर लवकर शोधणे सोपे झाले आहे आणि डॉक्टरांवरील कामाचा ताणही कमी झाला आहे.

ते पुढे म्हणाले, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI नसते तर डॉक्टर या कॅन्सरला इतक्या लवकर शोधू शकले नसते. आता येणाऱ्या काळात हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष कामात AI चा वापर कसा करायचा हे एक मोठे आव्हान असेल. पण आमच्या या शोधामुळे आरोग्य क्षेत्रात AI चा वापर करण्याबाबतच्या चर्चेला एक नवी दिशा मिळेल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.