इस्रायल भारतातल्या 'या' 5,800 लोकांना तिकडे का बोलावतो आहे? वाचा

इस्रायल भारतातल्या या 5,800 लोकांना का बोलावतो आहे?

फोटो स्रोत, Rubaiyat Biswas

    • Author, इल्मा हसन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, आयझॉल, मिझोरम
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

ईशान्य भारतातील मिझोरम राज्यात राहणारे बेने मनाशे समुदायाचे लोक आता इस्रायलमध्ये स्थायिक होण्याची तयारी करत आहेत. हे लोक स्वत:ला ज्यू समुदायाच्या हरवलेल्या जमातींपैकी एकाचे वंशज मानतात.

इस्रायलच्या सरकारनं 2025 मध्ये एका योजनेला मंजूरी दिली होती. या योजनेनुसार भारतातील बेने मनाशे समुदायाचे सर्व लोक आगामी काळात इस्रायलमध्ये येऊ शकतात. काहीजण आधीच गेले आहेत.

भारतात सध्या या समुदायाचे जवळपास 5,800 लोक आहेत. फेब्रुवारी 2026 पासून ते इस्रायलला जाण्यास सुरुवात होऊ शकते.

हा समुदाय मुख्यत: मिझोरम आणि त्याच्या शेजारच्या मणिपूरमध्ये राहतो.

गेल्या 2 दशकांमध्ये जवळपास 4,000 बेने मनाशे लोक इस्रायलला गेले आहेत. एका प्रमुख राबाय म्हणजे ज्यू धर्मगुरूंद्वारे या समुदायाला ज्यू धर्माची 'हरवलेली जमात' म्हणून मान्यता दिल्यानंतर, 2005 मध्ये या समुदायातील लोकांची जायची प्रक्रिया सुरू झाली होती.

याचसंदर्भात मिझोरममध्ये राहणाऱ्या बेने मनाशे समुदायाच्या जवळपास 600 लोकांनी देखील इस्रायलला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या लोकांना इस्रायलला का जायचं आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी बीबीसीची टीम मिझोरमची राजधानी असलेल्या आयझॉलच्या अनेक भागात गेली.

'मलासुद्धा तिथेच मरायचं आहे'

बेने मनाशे समुदायातील 76 वर्षांचे मुसई हनामटे, मिझोरममधील माजी पोलीस अधिकारी आणि पैलवान आहेत. ते मिझोरमची राजधानी असलेल्या आयझॉलच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका मोठ्या घरात राहतात. त्यांच्या घरातील भिंतींवर कुटुंबासोबत काढलेले फोटो लावलेले आहेत. आम्ही त्यांना याच घरात भेटलो.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "मिझोरमची आम्हाला आठवण येईल. ही आमची जन्मभूमी आहे. मात्र हे आमचं शेवटचं स्थान नाही. त्यामुळेच आम्हाला वाटतं की आम्हाला इथून जावंच लागेल."

प्रार्थना करत असलेल्या मुसई हनामटे यांचे आई-वडील जवळपास 20 वर्षांपूर्वीच इस्रायलला गेले

फोटो स्रोत, Rubaiyat Biswas

फोटो कॅप्शन, प्रार्थना करत असलेल्या मुसई हनामटे यांचे आई-वडील जवळपास 20 वर्षांपूर्वीच इस्रायलला गेले

मुसई हनामटे यांचे आई आणि वडील जवळपास 20 वर्षांपूर्वीच इस्रायलला निघून गेले होते. आता त्यांच्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांना देखील तिथे जायचं आहे.

ते म्हणाले, "माझ्या आई-वडिलांचं तिथेच निधन झालं. त्यांना तिथेच दफन करण्यात आलं. मलादेखील तिथेच मृत्यू यावा."

त्यांचं म्हणणं आहे की त्यांना इस्रायलला फक्त चांगल्या आर्थिक भवितव्यासाठी जायचं नाही. तर हा त्यांची धार्मिक श्रद्धा आणि अस्मितेशी जोडलेला निर्णय आहे.

त्यांच्या मते, इस्रायलमध्ये सरकार त्यांना पेन्शन देईल. इतकंच नाही, तर त्यांना तिथे स्वत:चा व्यवसायदेखील सुरू करायचा आहे.

बेने मनाशे समुदाय काय आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बेने मनाशे समुदाय, मिझोरमच्या आदिवासी समुदायाचा भाग आहे. या समुदायाच्या लोकांना वाटतं की जवळपास 2,700 वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांना प्राचीन इस्रायलमधून हद्दपार करण्यात आलं होतं.

त्यांचा दावा आहे की हद्दपार झाल्यानंतर त्यांचे पूर्वज पूर्वेच्या दिशेनं गेले. नंतर चीनमधून ते भारताच्या ईशान्य भागात आले आणि इथल्या डोंगरांळ भागात स्थायिक झाले. त्यांचा हा इतिहास मौखिक परंपरेतून पुढे चालू राहिला. त्याचा कोणताही लेखी इतिहास नाही.

जाणकारांचं म्हणणं आहे की लेखी पुराव्यांच्या अभावामुळे या लोकांच्या इतिहासाबद्दल, मूळ गोष्टींबद्दल नवीन दावे निर्माण झाले.

विद्वानांचं म्हणणं आहे की मिझो किंवा चिन-कुकी समुदायांचा प्राचीन इस्रायलशी संबंध दाखवणारा कोणताही कागदोपत्री पुरावा सापडत नाही.

आयझॉलच्या सरकारी टी रोमाना कॉलेजमधील इतिहासाचे प्राध्यापक मलसावमलियामा बीबीसीला म्हणाले, "आमच्याकडे कोणताही लेखी पुरावा नाही. हा मौखिक इतिहास आहे. बेने मनाशे यांचे दावे चालीरीतींमधील काही साधर्म्यावर आधारित आहेत. मात्र त्यांचं मूळ इस्रायलमध्ये असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही."

तर मिझोरम विद्यापीठातील एक संशोधनात म्हटलं आहे की ज्यू धर्माशी साधर्म्य म्हणून सांगितल्या जाणाऱ्या अनेक चालीरीती, प्रथा उदाहरणार्थ पशूबळी किंवा किंवा पारंपारिक विधींची गाणी, डोंगराळ भागात राहणाऱ्या समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित होती.

प्रार्थना करत असलेल्या मुसई हनामटे यांचे आई-वडील जवळपास 20 वर्षांपूर्वीच इस्रायलला गेले

फोटो स्रोत, Rubaiyat Biswas

फोटो कॅप्शन, प्रार्थना करत असलेल्या मुसई हनामटे यांचे आई-वडील जवळपास 20 वर्षांपूर्वीच इस्रायलला गेले

दुसऱ्या बाजूला, बेने मनाशे समुदायाचं म्हणणं आहे की मिझो समुदायामध्ये शतकानुशतकं अशा काही प्रथा आहेत, ज्या ज्यू धर्माशी संबंधित प्रथांशी मिळत्याजुळत्या आहेत.

अर्थात, मिझोरममध्ये ज्यू धर्माचा औपचारिकरित्या स्वीकार केल्याची माहिती 20 व्या शतकाच्या शेवटीच मिळते. ते देखील मिशनरी आणि धर्मप्रचारकांच्या प्रभावामुळे झालं. ज्यू धर्मस्थळं 'सिनेगॉग' बनली. ते हिब्रू भाषा शिकले. ज्यू धर्मांच्या नियमांचं आणि परंपरांचं पालन केलं जाऊ लागलं.

मिझोरममध्ये राहणाऱ्या बेने मनाशे समुदायातीलच जेरेमाया हा बदल स्वीकारतात. त्यांच्या मते, "आम्ही 1976 मध्ये ज्यू धर्माबद्दल शिकण्यास सुरुवात केली. आम्ही 1995 च्या आसपास ज्यू धर्माच्या नियमांनुसार आमचं आयुष्य जुळवून घेण्यास सुरुवात केली. आमची आधी सुंता (खतना) झाली नव्हती. मात्र जेव्हा आम्हाला ज्यू धर्मातील नियमांबद्दल माहित झालं तेव्हा आम्ही सुंता केली."

काळानुरुप अशा गोष्टी समोर आल्या, ज्यात चालीरीती, प्रथा आणि ज्यू परंपरामधील साधर्म्य दाखवण्यात आलं. यात गीत, भजन, सण- उत्सव आणि धार्मिक विधींचा समावेश आहे.

लेखक पीसी बियाक्सामा यांनी बीबीसीला सांगितलं, "मिझो समाजात ख्रिश्चन धर्म हा मुख्य धर्म आहे. त्यामुळे बेने मनाशे समुदाय मुख्यप्रवाहातील समाज आणि मुख्यप्रवाहातील धर्मातून वेगळा झाला."

"त्यांचं म्हणणं होतं की मिझोरम आमचा नाही. आमचं घर इस्रायल आहे. ही जाणीव 1950 च्या दशकात आली. तोपर्यंत मिझोरममध्ये ख्रिश्चन धर्म चांगलाच प्रस्थापित झाला होता."

त्यांच्या मते, "त्यांनी (बेने मनाशे समुदाय) जेव्हा बायबलचा अभ्यास केला आणि इस्रायलींची संस्कृती पाहिली, तेव्हा काही वर्गांना अशी जाणीव झाली की ते ज्यू धर्मातील हरवलेली जमात असू शकतात. ही जवळपास 70 वर्षे जुनी जाणीव आहे."

बेने मनाशे समुदाय

फोटो स्रोत, Rubaiyat Biswas

ज्यू धर्मातील परंपरेत, ज्यू लोकांच्या इस्रायलमध्ये जाऊन स्थायिक होण्यास 'आलिया' म्हणतात. 'आलिया'चा अर्थ फक्त देश बदलणं नाही, तर इस्रायलच्या भूमीत धार्मिकदृष्ट्या वास्तव्यं करणं असादेखील होतो.

इस्रायलमध्ये एक कायदा आहे. याला 'लॉ ऑफ रिटर्न' म्हणतात. त्याच्यानुसार, ज्यू मानल्या जाणाऱ्या लोकांना तिथे जाऊन नागरिकत्व मिळण्याचा अधिकार मिळतो.

बेने मनाशे समुदाय याच अंतर्गत इस्रायलमध्ये जातो आहे.

डिसेंबर 2025 मध्ये रब्बाय, ज्यू एजन्सी फॉर इस्रायलचे सदस्य आणि इस्रायलच्या दूतावासातील प्रतिनिधींनी बेने मनाशे समुदायातील सदस्यांचं स्क्रीनिंग म्हणजे पडताळणी केली. वृत्तांनुसार, यादरम्यान मणिपूरमधून 1,000 हून अधिक आणि मिझोरममधून जवळपास 600 लोकांनी इस्रायलला जाण्यासाठी त्यांचं नाव दिलं आहे.

जेरेमाया सांगतात, "स्क्रीनिंगमध्ये हे तपासलं जातं की आमची ज्यू धर्मावर पूर्ण श्रद्धा आहे की नाही याची खातरजमा केली जाते. आमचा ख्रिश्चन धर्माशी काही संबंध तर नाहीना. तसंच ज्यू धर्माशी संबंधित प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात."

"त्यानंतर आमचा पासपोर्ट तयार केला जाईल. आमची नावं, ज्यू एजन्सींद्वारे इस्रायलच्या सरकारला पाठवली जातील. त्यानंतर हे निश्चित होईल की आम्ही कुठे राहणार."

जेरेमाया यांनीदेखील इस्रायलला जाण्यासाठी मुलाखत दिली आहे. समुदायाकडून ते 'आलिया' प्रक्रियेच्या प्रमुख समन्वयकांपैकी एक आहेत. मिझोरममध्ये ते एक प्रिंटिंग शॉप चालवायचे. जेरेमाया म्हणतात की इस्रायलला जाण्याची तयारी करताना त्यांनी त्यांचं सर्व सामान आणि मालमत्ता आधीच विकल्या आहेत.

दुसऱ्या बाजूला, अशाही बातम्या आहेत की इस्रायलमध्ये जाणाऱ्या बेने मनाशे समुदायासाठी तिथलं आयुष्य नेहमीच सोप नसतं. तिथल्या समाजात मिसळण्याची प्रक्रिया ही त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान असतं. इस्रायलमधील प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमध्ये भारतातून आलेल्या ज्यू स्थलांतरितांशी भेदभाव केल्याच्या प्रकरणांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

इस्रायलची मंजूरी आणि योजना

एका वृत्तानुसार, बेने मनाशे समुदाय इस्रायलला जाण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यात जवळपास 300 लोक इस्रायलला जातील.

जवळपास 1200 जण, 2026 च्या अखेरीपर्यंत इस्रायलला जाण्याची अपेक्षा आहे. इस्रायलच्या सरकारनुसार, 2030 पर्यंत जवळपास सर्व 5,800 लोक तिथे जातील.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीदेखील या पावलाला 'एक महत्त्वाचा निर्णय' म्हटलं आहे. इस्रायलचं सरकार भारतातून तिथे जाणाऱ्या बेने मनाशे समुदायातील लोकांना स्थायिक होण्यासाठी मदत करताना सुरुवातीला आर्थिक मदत करेल.

याचबरोबर हिब्रू भाषेचं शिक्षण, रोजगाराशी संबंधित मदत, तात्पुरतं घर आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांचे लाभ देखील दिले जातील.

इस्रायलच्या सरकारच्या वक्तव्यानुसार, या नव्या स्थलांतरितांना नोफ हागलील आणि उत्तरेकडील इतर शहरांमध्ये वसवण्यात येईल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं म्हणणं आहे की, यामुळे उत्तरेकडील आणि गॅलिली प्रदेश मजबूत होईल. याच भागांमध्ये इस्रायलचं सरकार ज्यू लोकांना पुन्हा वसवू इच्छितं.

हा प्रदेश कमी विकसित आणि कमी लोकसंख्येचा आहे. या भागात हिंसाचार होत राहिला आहे. वृत्तांनुसार, या प्रदेशावर लेबनॉनच्या हिजबुल्लाहबरोबरच्या संघर्षामुळे मोठा परिणाम झाला आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक लोकांनी इथून स्थलांतर केलं आहे.

बेने मनाशे समुदाय

फोटो स्रोत, Rubaiyat Biswas

गेल्या काही दिवसांमध्ये गाझामध्ये देखील इस्रायलनं हल्ले केले होते. यामध्ये हजारो लोक मारले गेले आहेत.

वेस्ट बँकमध्ये 2024 मध्ये भारतीय वंशाचा एक इस्रायली सैनिक मारला गेल्याच्या बातम्यांमुळे बेने मनाशे समुदाय चिंतेत आहे.

असं असूनही, बेने मनाशे समुदायचा इस्रायलला जाण्याचा दृढनिश्चय आहे.

मिझोरममधल्याच 31 वर्षांच्या या-एल इस्रायलमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. या-एल म्हणतात, "इस्रायल देवाची भूमी आहे. त्यामुळे तिथे जाण्याची खूप इच्छा आहे. मी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, घरातील सामानाची आवराआवर, जे सामान इथंच ठेवून जायचं आहे, ते वेगळं करणं."

त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 8 वर्षांचा आहे तर मुलगी 6 वर्षांची आहे. या-एल त्यांचे पती आणि मुलगा-मुलीसह वन बेडरुमच्या घरात राहतात. त्यांचा सर्व वेळ घर-कुटुंब सांभाळण्यात जातो. हे कुटुंब इथं चांगलं आयुष्य जगत आहे.

भिंतींवर मुलगा-मुलीचे फोटो असलेले पोस्टर लावलेले आहेत. त्यामध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संपूर्ण घरात त्यांची खेळणी विखुरलेली आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्थिरावलेल्या कुटुंबाची झलक दिसते.

31 वर्षांच्या या-एल इस्रायलला जाण्याच्या तयारीला लागल्या आहेत

फोटो स्रोत, Rubaiyat Biswas

फोटो कॅप्शन, 31 वर्षांच्या या-एल इस्रायलला जाण्याच्या तयारीला लागल्या आहेत

त्या सांगतात की, त्यांच्या मुलाला आणि मुलीला या निर्णयाबद्दल माहित आहे. विशेषकरून मुलानं म्हटलं आहे की तो आता इथे शाळेत जाणार नाही. या-एल म्हणतात, "त्यानं सांगितलं की त्याला आता तिकडे जाण्याची तयारी करायची आहे. तो इस्रायलमध्येच शाळेत जाईल."

त्यांना जेव्हा त्या प्रदेशात सुरू असलेला संघर्ष आणि भीतीबद्दल आम्ही विचारलं, त्यावर त्यांचं म्हणणं होतं की कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल त्यांना कोणतीही भीती वाटत नाही.

त्या म्हणाल्या, "आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही. माझ्या पतीनं सांगितलं आहे की आवश्यकता भासल्यास ते गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षात भाग घेण्यासाठीदेखील तयार आहेत."

रूथ (41 वर्षे) त्यांच्या शेजारी राहतात आणि त्यांच्या मैत्रीण आहेत. त्यांना 5 मुली आहेत. रूथ यांचे आई-वडील आणि सर्वात मोठी मुलगी आधीच इस्रायलमध्ये गेले आहेत. आता त्यांना त्यांच्या उर्वरित 4 मुलींसह इस्रायलला जायचं आहे. त्यासाठी रूथ यांच्या 18 वर्षे आणि 19 वर्षांच्या मुलींनी देखील इस्रायलला जाण्यासाठी मुलाखत दिली आहे.

रूथ म्हणतात, "बायबलमध्ये देखील लिहिलं आहे की इस्रायलला युद्धाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे याबाबतीत आमच्या मनात कोणताही संकोच किंवा भीती नाही. आम्हाला अजिबात भीती वाटत नाही, असं नाही. जर मोठे आवाज आले आणि आम्ही काही ऐकलं, तर आम्हाला भीती वाटू शकते."

"मात्र सध्या आमच्या मनात कोणतीही भीती नाही. तसंही एक दिवस आपल्या सर्वांना मरायचंच आहे. जर हेच आमच्या मृत्यूचं कारण ठरणार असेल तर मी तिथे मरण्याचीच निवड करेन. मग ते युद्धामुळे असो किंवा आणखी कोणत्या कारणानं असो."

इस्रायल आमचं 'घर' आहे

आयझॉलमध्ये स्थायिक झालेले बेने मनाशे समुदायातील जवळपास 400 लोक आनंदी आयुष्य जगत आहेत. तरीदेखील इस्रायलमध्ये जाणं, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

त्यासाठी ते त्यांचं घर, त्यांचा देश आणि त्यांच्या परिचयातील आयुष्यदेखील सोडण्यास तयार आहेत. बीबीसीशी बोलताना या समुदायातील लोकांनी सांगितलं की इस्रायलमध्ये जाऊन ज्यू धर्माचं पालन करणं त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे.

त्यांचा हा 'आलिया' अशा वेळेस होतो आहे, जेव्हा इस्रायल युद्ध, राजकीय तणाव आणि सामजिक विभाजनाच्या काळातून जातो आहे. असं असूनही या समुदायातील लोक म्हणतात की त्यांच्यासाठी धार्मिक श्रद्धा आणि ज्यू ओळख सर्वात महत्त्वाची आहे.

इस्रायल आमचं 'घर' आहे

फोटो स्रोत, Getty Images

रूथ म्हणतात, "आम्ही कधीही कुठेही प्रवास केलेला नाही. आम्ही सिलचरच्या पुढेदेखील गेलेलो नाही. पुढे आमचं भवितव्य कसं असेल, हे मला माहित नाही. आम्हाला तिथे गेल्यावर एकटेपणा जाणवू शकतो. मात्र आम्हाला आशा आहे की इतरांच्या मदतीनं सर्व ठीक होईल."

तर, या-एल म्हणतात, "आपण काय मागे सोडून जात आहोत? तिथे काय होईल, हा विचार मनात कधी आलाच नाही. कधीही दु:ख वाटलं नाही. आम्ही तिथे एकटे पडू असंही वाटलं नाही. अनेक वर्षांपासून आमची तिथे जायची इच्छा होती आणि आम्ही त्यासाठी तयारी करत होतो."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.