ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड, वयाच्या 92 व्या वर्षी निधन

फोटो स्रोत, J. Quinton/WireImage/Getty
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज (12 एप्रिल) वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांना शनिवारी (11 एप्रिल) कार्डिॲक अरेस्टनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती बीबीसी मराठीला दिली.
आशा भोसले या फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार येणाऱ्या इतर आजारांशीही झुंज देत होत्या. 'मल्टी ऑरगन फेल्युअर'मुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉ. समदानी यांनी सांगितलं.
त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आपल्या मधूर आवाजाने चाहत्यांच्या ह्रदयावर राज्य करणारी 'स्वरसम्राज्ञी' म्हणून आशा भोसले यांच्या नावाचा लौकिक आहे.
मराठी, हिंदीसह अनेक भाषांमधून प्रेमगीत, गझल, भावगीत, भजन, लावणी, कव्वाली, डिस्कोपासून तर रिमिक्स इत्यादी विविध प्रकारची गाणी त्यांनी गायली. यातल्या प्रत्येक गाण्याची स्वतःची एक गोष्ट आहे. त्यांच्याबाबत अधिक जाणून घेऊयात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
भजन ते कॅबरे, सर्व प्रकारच्या गाण्यांना साजेसा आवाज
8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती.
वयाच्या 90 व्या वर्षापर्यंतही त्यांचं गायन सुरू होतं. हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.
रफी, मुकेश आणि किशोर यांच्यापासून ते बॉय जॉर्ज आणि आदित्य नारायण यांच्यापर्यंतच्या कलाकारांसोबत त्यांनी गाणी गायली. 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमीसाठी नामांकन मिळालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आशा भोसले यांनी 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली.
संगीत तज्ज्ञ राजीव विजयकर यांच्या मते, "काळाबरोबर चालणाऱ्या हे आशा भोसले यांचं वैशिष्ट्य. फक्त जुन्याच गोष्टी चांगल्या असतात असा हट्ट त्यांनी कधीही धरला नाही. त्यांच्या आवाजात भजनं जेवढी सुरेल वाटतात तेवढाच त्यांचा आवाज कॅबरे सारख्या गाण्यांनाही शोभतो."
"गायनातीव वैविध्य ही त्यांची ताकद आहे आणि त्यामुळेच त्या इथपर्यंत पोहोचल्या. उदाहरणार्थ, 'आगे भी जाने ना तू...' हे गाणं पाहिलं तर, त्यात एक प्रकारचं तत्त्वज्ञान आहे शिवाय ते एक नाईट क्लब साँगसुद्धा आहे. आशा भोसलेंच्या या गाण्यात विलक्षण वेदना आहे. नाईट बारमध्ये चित्रित केलेल्या गाण्यात अशा भावना ओतणं हे अवघड काम आहे, जे आशा भोसले यांनी करून दाखवलं."

फोटो स्रोत, Getty Images
1943 मध्ये मराठी चित्रपटांमधून पार्श्वगायनाची सुरुवात
1943 मध्ये मराठी चित्रपटांमधून आशा भोसले यांनी पार्श्वगायनाची सुरुवात केली होती.
1945 मध्ये आशा यांना हिंदी गाणी मिळायला सुरुवात झाली. तेव्हा किशोर कुमार आणि आशा भोसले दोघेही नवीन होते.
संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश संगीत क्षेत्रातलं एक मोठं नाव होतं. आशा भोसले आणि किशोरदा दोघेही गाणं रेकॉर्ड करण्यासाठी खेमचंद प्रकाश यांच्या स्टुडिओत पोहोचले. तिथे म्युझिक रेकॉर्डिस्ट रॉबिन बर्न पण उपस्थित होते.
दोघांनी गायला सुरुवात केली- अरमान भरे दिल की लगन तेरे लिए है.

फोटो स्रोत, NIKITA PUBLICATION
पुढचा किस्सा अनेक पुस्तकं आणि आशा भोसलेंनी दिलेल्या मुलाखतींमध्ये आहे.
झालं असं होतं की, गाण्याचं रेकॉर्डिंग मध्येच थांबवण्यात आलं आणि रॉबिन बर्नजी यांना म्हटलं की, हे गायक काही कामाचे नाहीत.
ते गाणं नंतर तलत महमूद आणि गीता दत्त यांनी 'जान पहचान' चित्रपटात राज कपूर आणि नर्गिससाठी गायलं.
दोघांनाही रिजेक्ट करण्यात आलं. आपला आज यावर विश्वास बसणार नाही, पण स्वतः आशा भोसलेंनी 'मोमेंट्स इन टाइम' या सीरिजमध्ये आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून हा किस्सा शेअर केला होता.
यामध्ये त्या सांगतात, "या घटनेनंतर काही वर्षांनी आम्ही दोघं एक गाणं रेकॉर्ड करत होतो- आँखो में क्या जी, रुपहला बादल. अचानक किशोरदा थांबले आणि त्यांनी मला म्हटलं की, पाहा, व्हिलन बसलाय. त्यांचा रोख रॉबिन बॅनर्जी यांच्याकडे होता. त्यांनीच आम्हाला गाण्यातून काढून टाकलं होतं."
"जाताना किशोरदांनी म्हटलं, 'रॉबिनदा, आम्हाला ओळखलं का? तुम्ही आम्हाला काढून टाकलं होतं.' मी त्यांचा हात पकडून म्हटलं की, दादा जाऊ दे ना...असे होते किशोरदा."

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला आलेल्या अडचणींनंतरही आशा भोसलेंनी जे यश मिळवलं त्याबद्दल संगीत क्षेत्रातील जाणकार राजीव विजयकर सांगतात, "आशा भोसले यांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्या काळासोबत राहिल्या. जुनं ते सोनं असं त्यांनी कधी मानलं नाही. त्यांच्या आवाजात भजन जितके चांगले वाटतात, तितकेच कॅबरेही. वैविध्य हीच त्यांची ताकद आहे आणि त्या जोरावर त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत."
"तुम्ही 'आगे भी जाने न तू' गाण्याचं उदाहरण घ्या. हे गाण नाइट क्लब नंबर आहे, पण त्यात एक प्रकारचं तत्वज्ञानही आहे. त्यांच्या या गाण्यात एक दर्दही आहे. नाइट क्लबमध्ये चित्रीत केलेल्या या गाण्यात असे भाव आणणं अवघड होतं, आशा भोसले यांनी हे साध्य केलं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























