'मी कधीही स्वयंघोषित 'विश्वगुरु'चं कौतुक केलं नाही'; मुंबई विद्यापीठ वादावर नसीरुद्दीन शाह काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमाच्या 'आमंत्रण नाट्या'वरून प्रख्यात अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहेत.
मुंबई विद्यापीठाने आधी एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आणि नंतर ऐनवेळी कार्यक्रमास येऊ नका, असा निरोप दिल्याचे नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले.
विद्यापीठाने यामागचं कारण स्पष्ट केलं नाही किंवा माफीही मागितली नाही, असंही ते म्हणाले. नसीरुद्दीन शाह यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या एका लेखात आपलं मत मांडलं आहे.
दरम्यान मुंबई विद्यापीठाने यावर स्पष्टीकरण देत असं काही झालं नसल्याचं म्हटलं आहे.
विद्यापीठाच्या उर्दू विभागानं नसीरुद्दीन शाह यांच्याशी कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाबाबत किंवा कार्यक्रम रद्द करण्याबाबत काहीही संपर्क केला नसल्याचं विद्यापीठानं निवेदनाद्वारे म्हटलं आहे.

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP via Getty Images
नसीरुद्दीन शाह यांनी हा अनुभव आपल्यासाठी अपमानास्पद आणि निराशाजनक होता, असं लेखात म्हटलं.
नसीरुद्दीन शाह यांच्या या लेखावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसत आहे. परंतु, भविष्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हटलंय या लेखात?
नसीरुद्दीन शाह म्हणाले, "मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाने 1 फेब्रुवारीला जश्न-ए-उर्दू कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचं आमंत्रण त्यांनी मला दिलं होतं. पण मला दिलेले आमंत्रण मागे घेण्यात आलं. हा एक असा कार्यक्रम होता जिथे मी जाण्यासाठी इच्छुक होतो, कारण मला विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा होता."

फोटो स्रोत, Getty Images
"माफी तर दूरच, त्यांनी यामागचं कारणही सांगितलं नाही. 31 जानेवारीच्या म्हणजे कार्यक्रमाच्या आदल्या रात्री मला येऊ नका, असं सांगणं त्यांना कमी अपमानास्पद वाटलं असेल म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांना मीच कार्यक्रमाला येण्यास नकार दिल्याचे जाहीर करून जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं."
त्यांनी पुढे लिहिलं, "सत्य बोलण्याचं धाडस त्यांच्यात नाही हे आश्चर्यकारक नाही. परंतु विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मी उघडपणे देशविरोधी वक्तव्यं करतो, हे यामागचं कारण आहे."
"जर त्यांचा यावर विश्वास असेल, तर मी त्या संबंधित व्यक्तीला खुलं आव्हान देतो की, मी माझ्या देशाला कमी लेखलंय असं माझं एखादं तरी वक्तव्य त्यांनी दाखवावं," असंही त्यांनी म्हटलं.
विद्यापीठानं काय म्हटलं?
मुंबई विद्यापीठानं या संपूर्ण प्रकरणात एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आलेल्या बातम्या आणि परस्परविरोधी विधानांच्या पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती पसरू नये म्हणून निवेदन दिल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे.
विद्यापीठाच्या उर्दू विभागाने नसिरुद्दीन शाह यांच्याशी कार्यक्रमातील सहभागाबाबत किंवा कार्यक्रम रद्द करण्याबाबत काहीही संपर्क केला नसल्याचं विद्यापीठानं निवेदनात म्हटलं आहे.
नसीरुद्दीन शाह यांच्या कार्यक्रमातील सहभागासंदर्भातील सर्व चर्चा आयोजक संस्था बझ्म-ए-अहबाब फाऊंडेशनने केली होती.
त्यामुळं अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना आमंत्रित करणे किंवा सदर कार्यक्रम रद्द करणे याबाबत मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाचा कोणताही संबंध नाही, असं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे.
'विश्वगुरुचं कौतुक करत नाही'
मी कधीही स्वयंघोषित 'विश्वगुरु'चं कौतुक केलं नाही, असं नसीरुद्दीन यांनी आपल्या लेखात म्हटलं. मात्र, त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही.
पण टीकात्मक शैलीत त्यांनी म्हटलं, "खरंतर, मी त्यांच्या (विश्वगुरु) वर्तनावर टीका केली आहे. त्यांचा आत्ममुग्ध किंवा गर्विष्ठ स्वभाव मला दुखावतो आणि गेल्या 10 वर्षांत त्यांनी केलेलं एकही काम मला प्रभावित करू शकलेलं नाही."
"मी अनेकदा सत्ताधारी व्यवस्थेने केलेल्या अनेक गोष्टींवर टीका केली आणि यापुढेही करत राहीन. आपल्या देशात नागरी भावना आणि इतरांबद्दल संवेदनशीलतेची कमतरता पाहूनही मी अनेकदा खंत व्यक्त केली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी लिहिलं, "मी इतर अनेक विषयांवरही मोकळेपणाने बोलतो, कारण ही अशी गोष्ट आहे की ज्या दिशेने आपण जातोय, त्याचा माझ्यासारख्या लोकांना त्रास होतो. जिथे विद्यार्थी कार्यकर्त्यांना कोणत्याही खटल्याशिवाय वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवलं जातं. पण दोषी ठरलेल्या बलात्कारी आणि खुनी लोकांना नेहमी जामीन मिळतो."
"जिथे गोरक्षकांना निष्पाप लोकांना मारण्याची मोकळीक आहे, जिथे इतिहास पुन्हा लिहिला जात आहे आणि पाठ्यपुस्तकांची सामग्री बदलली जाते. जिथे विज्ञानातही हस्तक्षेप होत आहे आणि जिथे एक मुख्यमंत्री 'मियां'ला त्रास देण्याच्या गोष्टी करतो. ही द्वेषभावना अखेर किती काळ टिकू शकते?"
नसीरुद्दीन यांनी शेवटी लिहिलं, "हा तो देश नाही जिथे मी मोठा झालो आणि जिथे मला देशावर प्रेम करणं शिकवलं गेलं. आता 2 मिनिटांची द्वेषभावना 24 तासांच्या द्वेषात बदलली आहे."
"या परिस्थितीची तुलना जॉर्ज ऑर्वेल यांच्या 1984 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाशी करणं अतिशयोक्ती ठरेल का? कारण या पुस्तकात 'महान नेत्या'ची स्तुती न करणंही देशद्रोह समजला जात?"
'लोक काय म्हणत आहेत?'
नसीरुद्दीन शाह यांच्या नातेवाईक आणि सीपीआय (एम) च्या नेत्या सायरा शाह हलीम यांनी हा लेख त्रासदायक असल्याचे म्हटलं.
त्यांनी एक्सवर लिहिलं, "हे खरंच दुःखद आहे की, एखादा साहित्यिक महोत्सव किंवा महाविद्यालयीन परिसंवाद विचारांच्या उत्सवाऐवजी 'राष्ट्रवादाची परीक्षा' स्थळ बनलं आहे. माझे काका नसीरुद्दीन हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत."
"त्यांनी भारतीय चित्रपट आणि रंगभूमी समृद्ध करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिले आहे. पण आज त्यांची प्रासंगिकता, कोण आयोजकाची किती चापलुसी करतो किंवा 'विश्वगुरु'चं किती कौतुक करतो, यावर ठरवली जाते."

फोटो स्रोत, @sairashahhalim/X
इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी नसीरुद्दीन यांच्या लेखाची लिंक शेअर करत लिहिलं, "महान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी मुंबई विद्यापीठाने दिलेले आमंत्रण मागे घेण्यावर आपली प्रतिक्रिया दिली; त्यांची इतकी नैतिक स्पष्टता आणि धैर्य, बॉलिवूडमधील त्यांच्या समकालीन कलाकारांमध्ये नाही."
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक्सवर लिहिलं, "नसीरुद्दीन शाह यांना मुंबई विद्यापीठाने दिलेले आमंत्रण मागे घेतलं. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार विद्वान-कार्यकर्ते आनंद तेलतुंबडेंचं कालाघोडा फेस्टिव्हलमधील भाषण रद्द करण्यात आलं."
सार्वजनिक मंचावर कोण बोलू शकतो आणि कोण नाही? हे आता जमाव आणि त्यांचे समर्थक ठरवणार का? हा लोकशाहीसाठी धोका नाही का? हे खरोखरच लाजीरवाणं आहे!"
अर्नब रे नावाच्या एका युजरने लिहिलं, "मी नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत आहे. कोणालाही त्यांच्या विचारांमुळे किंवा मतांमुळे बोलण्यापासून रोखलं जाऊ नये."
'यापूर्वीही झाले आहेत वाद'
2021 मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी तालिबानबाबत एक विधान केलं होतं, ज्यामुळे ते मुसलमानांच्या निशाण्यावर आले होते.
त्यावेळी अफगाणिस्तानवर सत्ता मिळवणाऱ्या तालिबानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या मुसलमानांचा नसीरुद्दीन शाह यांनी निषेध केला होता. त्या व्हीडिओत शाह यांनी हे चुकीचं उदाहरण असल्याचं म्हटलं होतं.
2023 मध्येही एका मुलाखतीमुळे नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका झाली होती. पाकिस्तानमध्ये आता सिंधी भाषा बोलली जात नाही, असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पण त्यानंतर त्यांनी लगेचच फेसबुकवर माफी मागितली आणि ही आपल्याकडून 'चूक' झाली आणि हे 'चुकीचं विधान' असल्याचं सांगितलं.
त्याच मुलाखतीत त्यांनी असंही म्हटलं की, मराठीत फारसी भाषेचे शब्दही आहेत, पण अनेक लोकांनी याचा अर्थ त्यांनी मराठीला कमी लेखलं असा काढला. त्यांनी याबद्दलही स्पष्टीकरण दिलं.
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांनी त्याच वर्षी एका मुलाखतीत काश्मीर फाइल्ससारख्या चित्रपटांना एवढी लोकप्रियता मिळणं खूपच निराशाजनक आहे, असं म्हटलं होतं.
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, आजकाल जितका कोणी अंध राष्ट्रवादी आहे, तितकाच तो लोकप्रिय आहे आणि देशातही हेच सुरू आहे.
नसीरुद्दीन शाह म्हणाले, "फक्त आपल्या देशावर प्रेम करणं पुरेसं नाही. आपण एक काल्पनिक शत्रू निर्माण करतो. या लोकांना समजत नाहीत की, ते जे काही करत आहेत, ते खूप हानीकारक आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











