महानगरपालिका निवडणूक : 'या' 12 पैकी एक कागदपत्र असेल, तरी मतदान करता येणार

मतदार

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोला आहे. राज्यातील 12 महानगरपालिकांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

नागरिकांना या निवडणुकीत मतदान करणाऱ्यासाठी जसं मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे, तसंच मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान ओळखपत्र दाखवणंही आवश्यक आहे.

जर निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र नसेल किंवा गहाळ झालं असेल, तर अशावेळी काय करावं असाही प्रश्न काही मतदारांना पडतो. याबाबतच निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या माहिती संचलनालयाने माहिती दिली.

महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने मतदान ओळखपत्र नसेल, तर ओळखीचा पुरावा म्हणून 12 पर्यायी कागदपत्रांची यादी जारी केली आहे. यात आधार कार्डापासून अनेक दस्तावेजांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयाने म्हटलं, "मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे."

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

'हे' आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे

1) भारताचे पारपत्र (पासपोर्ट)

2) आधार ओळखपत्र

3) वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

4) आयकर विभागाचे पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड)

5) केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्र (फोटो) सह दिलेली ओळखपत्रे

6) राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्‍यामधील खातेदाराचे छायाचित्र (फोटो) असलेले पासबूक

7) सक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला

8) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)

9) निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.)

10) लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

11) स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र

12) केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड

लाल रेष
लाल रेष

मतदान यादीत नाव आहे का, हे कसं तपासायचं?

तुम्हाला वाटू शकतं गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नोंदणी झाली, तेव्हा तुमचं नाव होतं, मग यावेळी करायची गरज आहे की नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की, दरवेळी निवडणूक आयोगाकडून आपल्या याद्या अद्ययावत केल्या जातात.

बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं. त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहावं.

केंद्रीय निवडणूक आयोग मतदारांची यादी 'Voters Service Portal' या मतदार यादीमध्ये देत असतं. या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा.

या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

मतदान ओळखपत्र हरवलं असेल, तर काय कराल?

काहीजण असे असतात ज्यांचं व्होटर आयडी कार्ड हरवलं आहे किंवा नाव, पत्ता अशा गोष्टी बदलायच्या आहेत.

त्यासाठी तुम्ही https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटवरचा फॉर्म 8 डाउनलोड करू शकता आणि आवश्यक कागदपत्रांसह तो जमा करू शकता.

सगळ्या गोष्टी योग्य असतील तर तुम्हाला कमीत कमी सात दिवसांनी व्होटर आयडी कार्ड मिळेल. अर्थात जास्तीत जास्त किती वेळ लागेल याची काही मर्यादा नाही.

तुमच्या मनात काही शंका असतील तर 1950 या नंबरवर कॉल करू शकता किंवा निवडणूक आयोगाच्या नॅशनल ग्रिव्हन्सेन्स सर्विस पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकता.

मतदार

फोटो स्रोत, Getty Images

तसंच, मतदानओळखपत्र हरवल्यास आणखी एक पर्याय म्हणजे पोलीस तक्रारीचा.

जर तुमचं ओळखपत्र हरवलं असेल तर 25 रुपये भरून आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची पोचपावती जोडून इलेक्शन रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेऊन जमा करावा.

मतदार यादीमध्ये नाव दुरुस्ती

जर तुमचं नाव यादीमध्ये आहे पण ते चुकलं असेल तर फॉर्म 8 भरून रजिस्ट्रेशन करता येतं. जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलात आणि तुम्हाला तुमचं नाव तिथं नोंदवायचं असेल तर फॉर्म 6 भरावा लागतो.

जर कुणाच्या नावावर तुमची हरकत असेल तर फॉर्म 7 भरावा लागतो.

हे फॉर्म तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मिळतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)