अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातली 'ही' वनस्पती महाराष्ट्रात कशी आली? ही निसर्गाला कशी घातक ठरतीये?

जलपर्णी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

शांत पाणी, त्यावर सगळीकडे पसरलेली हिरवळ की जराही पाणी दिसू नये, नागपुरातील अंबाझरी तलावाच्या काठावरून दिसणारं हे दृश्य मनमोहक वाटतं. अनेकांना वाटतं की पाण्यावर किती सुंदर वेल तरंगतेय. पण, ही हिरवळ डोळ्यांना सुखावणारी असली तरी ती निसर्गासाठी तितकीच धोकादायक आहे.

आपण ज्या हिरवळीबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे जलपर्णी.

या जलपर्णीनं 2022 ला नागपुरातील अंबाझरी तलावावत पहिल्यांदा दिसली आणि आता बघता बघता अख्खा तलाव हिरवागार केलाय. पण, त्यामुळे अंबाझरी तलाव आपलं अस्तित्व गमावून बसेल का? तलाव मृत होईल का? अशी भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे हा तलाव वाचवण्यासाठी नागरिकांनी मोहीम सुरू केली आहे. तलावाच्या आजूबाजूला जलपर्णीच्या फोटोंसह अंबाझरी तलाव वाचवा असे बॅनर लागलेले दिसतात.

गेल्या तीन वर्षांत अंबाझरी तलावावर त्याचा परिणाम झाल्याचंही इथले नागरिक सांगतात. अंबाझरी जलसंवर्धन समितीचे सदस्य अविनाश केवटे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, आम्ही या तलावात 15-20 किलोच्या मासोळ्या पाहत होतो. पण, आता पाच किलोच्या वर मासोळी दिसत नाही. याचा अर्थ त्यांची वाढ होत नाही. आम्ही दररोज सकाळी इथं येतो. पण, आधीसारखी झुंडीनं मासोळ्या दिसत नाहीत. कारण, जलपर्णीमुळे या मासोळ्या वर येतच नाहीत.

इतकंच नाहीतर या जलपर्णीमुळे आजूबाजूच्या परिसरात डासांचा त्रास वाढल्याची तक्रारही इथले नागरिक करत होते.

फक्त नागपुरातील अंबाझरी तलाव या जलपर्णीच्या विळख्यात अडकला असं नाही. सांडपाण्याचा अंश असलेले अनेक तलावांमध्ये जलपर्णी वाढतेय. महाराष्ट्रातल्या गोदावरी, कृष्णा नदीचे पात्र सुद्धा जलपर्णीनं झाकले गेलेय.

पण, ही जलपर्णी तलावांतील जैवविविधतेला कशी धोकादायक आहे? तिचा तलावातील इकोसिस्टमवर काय परिणाम होतो? ती समूळ नष्ट करायची असेल तर काय करायला हवं? अशा सगळ्या मुद्दयांची चर्चा आपण करणार आहोत.

पण, त्याआधी भारतात झपाट्यानं पसरत असलेली ही जलपर्णी नेमकी काय आहे आणि ती भारतात नेमकी कुठून आली? हे बघुयात.

जलपर्णी भारतात कशी आली?

जलपर्णीला इकॉर्निया असं म्हटलं जातं. तसेच या पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतीला "टेरर ऑफ बेंगाल" सुद्धा म्हटलं गेलं. कारण, 1930 च्या दशरात पश्चिम बंगालमधील तलावांमध्ये, नद्यांमध्ये जलपर्णीनं धुमाकुळ घातला होता. त्यामुळे बंगाल सरकारनं 1936 ला बंगालमधील सगळ्या नद्या आणि तलावातील जलपर्णी काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तसेच कुठल्याही व्यक्ती जलपर्णी आपल्या गार्डनमध्ये लावता येणार नाही, किंवा त्याचं प्रमोशन करता येणार नाही असे कडक नियम या कायद्याद्वारे करण्यात आले होते.

बंगालमधूनच ही वनस्पती भारताच्या इतर भागात पसरल्याचं सांगितलं जातं. पण, जलपर्णी ही मूळतः दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील आहे. तिथल्या जैवविविधतेत या वनस्पतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिचे नैसर्गिक शत्रू आहेत. पण, ही वनस्पती भारतात आली तेव्हा तिचे नैसर्गिक शत्रू आले नाहीत. त्यामुळे भारतात या वनस्पतीवर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलंय.

जलपर्णी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

ही वनस्पती भारतात कशी आली याबद्दल काही थेअरीज सांगितल्या जातात. त्यापैकी एका ब्रिटीश महिलेनं ब्रिटीशांच्या काळात बंगालमध्ये ही वनस्पती आणली होती ही थेअरी विश्वसनीय वाटते, असं राज्य जैवविविधता मंडळाचे माजी सदस्य आणि वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अमित सेटीया सांगतात.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "भारतातील ही काही नेटीव्ह वनस्पती नाही. भारतात ब्रिटीशांची सत्ता होती तेव्हा एका ब्रिटीश महिलेनं आपल्यासोबत ही वनस्पती त्यांच्या गार्डनमध्ये लावायला आणली होती. कारण, याला खूपच सुंदर असे फुलं लागतात. ही फुलं बघून सामान्य भारावून जातील इतके सुंदर दिसतात. तसेच फुलांचा काळ संपल्यानंतर वर्षभर हिरवीगार पानं दिसतात. त्यामुळे ती महिला पश्चिम बंगालमध्ये ही वनस्पती घेऊन आली होती. त्यानंतर पुढच्या सहा वर्षांत तलाव, नद्यांमध्ये ही जलपर्णी पसरली. आपण या थेअरीवर यासाठी विश्वास ठेवू शकतो की त्यावेळी बंगालमध्ये या जलपर्णीला काढून टाकण्यासाठी कायदा तयार केला होता."

जलपर्णीचा तलावातील इकोसिस्टमवर कसा परिणाम होतो?

सध्या जलपर्णी भारतातील अनेक तलाव आणि नद्यांमध्ये पसरलेली दिसतेय. जलपर्णी पाण्याचा पृष्ठभाग पूर्णपणे व्यापते. त्यामुळे सूर्यप्रकाश पाण्याच्या आतील जीवांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे माशांची नीट वाढ देखील होत नाही.

तलावातील जैवविविधतेचे अभ्यासक आणि फाऊंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंटचे संचालक मनिष राजनकर सांगतात, "जलपर्णी तलावातील ऑक्सिजन कमी करते. तसेच काठापासून तर फ्लोटींग प्लांटपर्यंत सगळ्या वनस्पतींचा एकमेकांसोबत संबंध आहे.

"चवरा नावाचा एक फ्लोटींग प्लांट आहे. त्याला पांढरे फुले येतात. त्याच्यावर किडे येतात. ते किडे खायला मासे येतात. ते मासे खायला स्थलांतरित पिंटेल पक्षी येतो. ही सगळी साखळी परस्परावलंबनची आहे."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

पुढे राजनकर सांगतात, "एकाही घटकाचा संबंध तुटला किंवा जलपर्णीचं आक्रमण झालं तर सगळी घडी विस्कटते. फक्त पाणी किंवा प्रदूषणाचं नुकसान नाहीतर या जैवविविवधतेवर अवलंबून असणाऱ्या सगळ्या घटकांचं नुकसान होतं. जलपर्णी पाण्यावर अवलंबून असणाऱ्या जीवसाखळीसाठी धोकादायक आहे."

मनिष राजनकर भंडारा, गोंदिया या भागात मृत झालेले तलाव जीवंत करण्याचं काम करतात. मासेमारी करणाऱ्या ढीवर समुदायाला यामधून रोजगार मिळावा या उद्देशानं ते काम करतात.

"एकदा तयार झालेलं बीज 20-28 वर्ष राहतं"

आक्रमक वनस्पती म्हणून जलपर्णीची ओळख आहे. म्हणजेच ही वनस्पती वाढायला लागली ती तिथल्या जैविविधतेत असलेल्या स्थानिक वनस्पतींवर आक्रमण करून ते संपवण्याचं काम करते. एकूणच जैवविविधता संपली की तो तलाव मृत होतो, असंही राजनकर सांगतात.

या जलपर्णीमुळे निर्माण होणारे धोके बघता तलावांमधून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही महापालिका यावर कोट्यवधी रुपये खर्च करतात. नागपर महापालिकेनं सुद्धा जेसीबी वापरून अंबाझरी तलावातील जलपर्णी काढण्याचं काम सुरू केलं आहे.

तलावातील जलपर्णी काठाला कधी जमा होईल याची वाट पाहिली जाते. त्यानंतर काठावर जेसीबी लावून ही जलपर्णी काढून काठाशेजीर तलाव परिसरात टाकली जाते. ही वाळली की नंतर ते बाहेर नेऊन टाकायची असं सध्या महापालिकेचं धोरण आहे.

पण, आता जलपर्णी तलावातून काढली की पुढच्या वर्षी पुन्हा तलाव हिरवागार होतो, अशी नागरिकांची तक्रार आहे.

जलपर्णी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यामागे कारण म्हणजे जलपर्णीचं बीज एखाद्या तलावात किंवा नदीत एकदा तयार झालं की ते 20-28 वर्षांपर्यंत त्या इकोसिस्टममध्ये असतं, असं डॉ. अमित सेटीया सांगतात.

पुढे ते म्हणतात, "वर्षानुवर्ष सातत्यानं प्रभावीपणे प्रयत्न केले तरच जलपर्णी समूळ नष्ट होऊ शकते. ते करायचं असेल तर जलपर्णीचं प्रजनन समजून घेणं गरजेचं आहे.

या वनस्पतीला बीजधारणा झाली की त्या बियांची लाँजिटिव्हीटी 20-28 वर्ष असते. म्हणजे या वनस्पतीला आज फुलं, फुळं लागले तर पुढच्या 20-28 वर्षापर्यंत ते बीज या इकोसिस्टममध्ये राहणार आहेत. आज काढलं तरी पुढच्या वर्षी ही वनस्पती परत दिसेल. त्यामुळे समूळ नष्ट करण्यासाठी एक दीर्घकालीन धोरण बनवणं गरजेचं आहे.

जेव्हा पावसाळा संपताच या वनस्पतीला फुलं येतात तेव्हाच ही वनस्पती काढून टाकली पाहिजे. म्हणजे एक वर्ष आपण त्याची फळधारणा आणि फुलधारणा रोखली तर पुढच्या 20 वर्षांसाठी फायद्याचं असेल. पण, आधीच वनस्पती खूप पसरली असेल तर दरवर्षी आपल्याला या वनस्पतीचे प्रजनन रोखायला पाहिजे. साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात या वनस्पतीला फुलं लागतात. त्याआधीच ही वनस्पती काढून टाकण्यासाठी प्रभावीपणे मोहीम राबवायला हवी."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.