कमी झालेली लैंगिक इच्छा टेस्टोस्टेरॉनचे उपचार घेऊन वाढवता येते का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

स्पाईस वर्ल्डच्या स्पाईस गर्ल्स या चित्रपटात गेरी हॅलिवेल आणि ॲलन रीव्ह्झ
फोटो कॅप्शन, स्पाईस वर्ल्डच्या स्पाईस गर्ल्स या चित्रपटात गेरी हॅलिवेल आणि ॲलन रीव्ह्झ
    • Author, रुथ क्लेग
    • Role, वरिष्ठ आरोग्य रिपोर्टर
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

ॲलन रीव्ह्झ 1990 च्या दशकात नियमितपणे स्टेजवर सादरीकरण करायचे. 'द ड्रीमबॉईज'चा सदस्य म्हणून ते हजारो लोकांसमोर सादरीकरणाचा भाग म्हणून अंगावरचे कपडे काढत असत. त्यानंतर ते इतके लोकप्रिय झाले होते की, ते आणि त्यांच्याबरोबरचे पुरुष नर्तक, स्पाईस गर्ल्स या प्रसिद्ध पॉप ग्रुपच्या स्पाईस वर्ल्ड या चित्रपटात दिसले होते.

त्यावेळेस ॲलन 24 वर्षांचे होते. त्यांनी मान्य केलं होतं की "अनेकांना ते आकर्षक वाटत होते."

मात्र, ॲलन रीव्ह्झ त्यांच्या वयाच्या तिशीत येईपर्यंत एका वेगळ्याच परिस्थितीत सापडले होते. त्यांची मन:स्थिती खालावलेली होती आणि त्यांची कामवासना किंवा लैंगिक इच्छा तर जवळपास संपलीच होती.

"मला बरं वाटत नव्हतं," असं ते म्हणतात.

ॲलन रीव्ह्झ आता 52 वर्षांचे आहेत. ते म्हणतात की लैंगिक इच्छा नसण्याचा त्यांच्या दीर्घकालीन नात्यांवर हानिकारक परिणाम होऊ लागला.

"एका काळात तर आम्ही सेक्सशिवाय 3-4 महिने राहिलो. मला त्यात रसच नव्हता," असं ते म्हणतात.

"याप्रकारच्या गोष्टीमुळे जोडप्यांचं ब्रेकअप होऊ शकतं."

ॲलन रीव्ह्झ आता लंडनमध्ये फिटनेस आणि लाईफस्टाईल कोच म्हणून काम करतात. त्यांनी या समस्येतून बाहेर पडण्यासाठी टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरेपी (टीआरटी) घेण्यास सुरुवात केली. ते म्हणतात की त्यामुळे त्यांची कामवासना परत आली. त्यामुळे ते चिडचिड करणाऱ्या वृद्ध माणसापासून वयाच्या विशीत परत आल्यासारखं वाटणारी व्यक्ती झाले. ती "खूपच असामान्य गोष्ट होती," असं ते म्हणतात.

महिलादेखील टेस्टोस्टेरॉन घेण्याकडे वळत आहेत.

2021 ते 2024 दरम्यान टेस्टोस्टेरॉनच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये 135 टक्के वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Fragile Films/ Icon Entertainment International/ Polygram Filmed Entertainment

रॅचेल मेसन या 37 वर्षांच्या आहेत. त्या मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीवर ब्लॉग लिहितात. त्या म्हणतात की, त्यांच्यामधील ऊर्जेची पातळी, एकाग्रता आणि लैंगिक इच्छा यासाठी टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन 'आश्चर्यकारक' ठरला आहे.

टेस्टोस्टेरॉनसाठीच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये वाढ झाली आहे. केअर क्वालिटी कमिशननं संकलित केलेल्या, एनएचएस बिझनेस ऑथोरिटीच्या ताज्या आकडेवारीनुसार 2021 ते 2024 दरम्यान टेस्टोस्टेरॉनच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये 135 टक्के वाढ झाली आहे.

एनएचएस ही युकेमधील सार्वजनिक आरोग्यसंबंधी यंत्रणा आहे.

युकेमध्ये लैंगिक इच्छा कमी होत जात असल्याचं दिसून येत असतानाच टेस्टोस्टेरॉनच्या प्रिस्क्रिप्शनमधील ही वाढ झाली आहे.

नॅशनल सर्व्हेज ऑफ सेक्शुअल ॲटिट्यूड्स अँड लाईफस्टाईल्स (नॅटसल) दर दशकात 10,000 हून अधिक लोकांना प्रश्न विचारतं.

या वर्षाच्या अखेरीस त्यांची नवीन आकडेवारी समोर येईल. नॅशनल सर्व्हेज ऑफ सेक्शुअल ॲटिट्यूड्स अँड लाईफस्टाईल्सनुसार सेक्सची वारंवारता (सेक्स करण्याची फ्रिक्वेन्सी) सातत्यानं कमी होत चालली आहे.

यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, 1990 मध्ये, 16 ते 44 वर्षे वयोगटातील लोक महिन्यातून सरासरी 5 वेळा सेक्स करत असल्याचं नोंदवण्यात आलं होतं. 2000 पर्यंत हे प्रमाण 4 वेळावर आलं आणि 2010 पर्यंत ते 3 वेळावर आलं.

या वर्षाच्या अखेरीस पुढील आकडेवारी समोर येणार आहे. संशोधकांना अशी अपेक्षा आहे की ही घसरण सुरूच राहील. अर्थात ते या घसरणीमागचं एकमेव कारण दर्शवत नाहीत.

या पार्श्वभूमीवर, वादविवाद सुरू आहेत. टेस्टोस्टेरॉनचं शरीरातील प्रमाण वाढवल्यामुळे लैंगिक इच्छा सुधारू शकते का, की खऱ्या फायद्यांपेक्षा बहुतांश उत्साह फक्त प्रचार, नफा आणि मानसिक परिणामांवरच (प्लासिबो) केंद्रीत आहे?

लैंगिक इच्छेचं कमी होत असलेलं प्रमाण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ॲलन रीव्ह्झ यांना लैंगिक इच्छा कमी होण्याचा आलेला अनुभव हा वाढत्या प्रमाणात सामान्य होत चाललेल्या ट्रेंडचं एक उदाहरण असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

सोझिग क्लिफ्टन नॅटसलच्या शैक्षणिक संचालक आहेत. त्या म्हणतात, "गेल्या काही वर्षांमध्ये, आम्हाला सर्वच वयोगटातील लोकांमध्ये लैंगिक इच्छेत लक्षणीय घट दिसून आली आहे.

"उदाहरणार्थ, 1990 च्या दशकात लग्न न करता सोबत राहणाऱ्या जोडप्यांच्या संख्येच्या तुलनेत आता अशा जोडप्यांची संख्या कमी झाली आहे. यातून लैंगिक इच्छा कमी झाल्याचं स्पष्ट होऊ शकतं. मात्र आम्ही जेव्हा त्या गटाकडे विशेषकरून पाहिलं, तेव्हाही घट झालेली दिसून आली."

खरं तर, लैंगिक इच्छा किंवा लैंगिक संबंध ठेवण्यातील वारंवारितेतील (फ्रिक्वेन्सी) काही सर्वात मोठी घट वृद्ध, विवाहित किंवा लग्न न करता सोबत राहणाऱ्या जोडप्यांमध्ये होती.

क्लिफ्टन म्हणतात की लैंगिक इच्छेत घट का होते आहे, हे निर्णायकपणे सांगता येणं कठीण आहे.

"आतापर्यंत आमच्याकडे असलेला कोणताही डेटा आम्हाला सांगू शकत नाही की, एक समुदाय म्हणून आपण आता पूर्वीइतका सेक्स का करत नाही," असं त्या म्हणतात.

यामागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणारे अनेक अभ्यास आहेत. यात डिजिटल जग हे एक प्रमुख कारण असू शकतं, कारण ते लोकांना गुंतवून ठेवणं आणि त्यापासून स्वत:ला संपर्क तोडणं कठीण होतं, तसंच ते आपल्याला करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देतं, हे त्या अभ्यासात अधोरेखित केलं आहे.

मेलिसा ग्रीन आणि त्यांचे पती, मार्कस

फोटो स्रोत, Melissa Green

फोटो कॅप्शन, मेलिसा ग्रीन आणि त्यांचे पती, मार्कस

आपल्या ताणतणावाची पातळीदेखील साधारणपणे 30 वर्षांपूर्वी होती, त्यापेक्षा जास्त आहे. तोदेखील एक घटक असू शकतो, असं डॉ. बेन डेव्हिस म्हणतात. ते डॉक्टर आणि सेक्स थेरेपिस्ट आहेत.

ते म्हणतात, "लोकांच्या आयुष्यात बरंच काही घडतं आहे. लोकांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाच सहभाग आहे, हे स्पष्ट आहे. मात्र त्याचबरोबर तणाव, नैराश्य, एकाकीपणादेखील वाढतो आहो. या सर्व गोष्टींमुळे लैंगिक इच्छा कमी होते."

तसंच आणखी एक शक्यता आहे, ज्यामुळे खूप ऑनलाइन रस निर्माण झाला आहे. तो एक मोठा व्यवसाय बनला आहे. टेस्टोस्टेरॉनच्या कमी पातळीचा लैंगिक इच्छेवर परिणाम होऊ शकतो.

"पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी निश्चितच कमी होते आहे," असं प्राध्यापक जेफ्री हॅकेट म्हणतात. ते कन्सल्टंट युरोलॉजिस्ट आहेत आणि ब्रिटिश सोसायटी फॉर सेक्शुअल मेडिसिनचे (बीएसएसएम) सदस्य आहेत.

ते पुढे म्हणतात, "लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह यात झालेली वाढ, लोकांमधील वाढती बैठी जीवनशैली, या सर्व कारणांमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते आहे. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणं, हे आपली लैंगिक इच्छा कमी होण्यामागचं एक कारण असेल."

गेल्या 20 वर्षांमध्ये पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी मोजणाऱ्या अनेक मोठ्या स्वरुपातील अभ्यासातून असं दिसून आलं आहे की पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाली आहे.

मात्र हॅकेट यांनी या गोष्टीवर भर दिला आहे की हे चित्र सूक्ष्म आहे. टेस्ट्रोस्टेरॉनची पातळी कमी असल्यामुळे लैंगिक इच्छा कमी होण्याची शक्यता वाढते. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की ज्यांच्यात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असेल, त्या प्रत्येकामधील लैंगिक इच्छा कमी असेल.

ही गुंतागुंत असूनदेखील, ट्युब स्टेशन्स, बस स्टॉप आणि सोशल मीडिया फीड्स आता वेगवेगळ्या जाहिरातींनी भरलेले आहेत. उदाहरणार्थ, लैंगिक इच्छा कमी झाली आहे का? स्मरणशक्ती किंवा एकाग्रता कमी झाली आहे का (ब्रेन फॉग)? थकल्यासारखं वाटतं का? मग टेस्टोस्टेरॉनची तपासणी करण्याची वेळ आली आहे! तुमच्या जोडीदारातील ऊर्जा किंवा लैंगिक इच्छा संपली आहे का? हे त्याच्या हार्मोन्समुळे असू शकतं!

तर, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरेपी (टीआरटी) हा खरोखरंच लैंगिक इच्छा कमी होण्यावरचा उपाय ठरू शकतो का?

टेस्टोस्टेरॉननं 'मला माझं आयुष्य परत दिलं'

मेलिसा ग्रीन जवळपास एक वर्षापासून टेस्टोस्टेरॉन घेत आहेत. त्या म्हणाल्या की, त्यामुळे 'त्यांना फक्त जीवन जगण्याचा उत्साह, जोशच परत मिळाला नाही', तर त्यामुळे त्यांचा संसारदेखील वाचला.

त्या 43 वर्षांच्या आहेत. त्या म्हणतात की त्यांची लैंगिक इच्छा कमी झाल्याचा त्यांच्या नात्यावर मोठा परिणाम होत होता.

त्या पेरिमेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीपूर्व स्थितीत असल्यानं, त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आधीच, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीद्वारे (एचआरटी) एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन लिहून दिलं होतं. मात्र ग्रीन यांचं म्हणणं आहे की डॉक्टरांनी त्यांची टेस्टोस्टेरॉनची पातळी तपासली नाही. डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यांना अतिरिक्त हार्मोनची आवश्यकता नाही.

रॅचेल मेसन म्हणतात की त्यांच्यासाठी टेस्टोस्टेरॉन 'आश्चर्यकारक' ठरलं आहे

फोटो स्रोत, Rachel Mason @raysecommunity

फोटो कॅप्शन, रॅचेल मेसन म्हणतात की त्यांच्यासाठी टेस्टोस्टेरॉन 'आश्चर्यकारक' ठरलं आहे

एनएचएसचं म्हणणं आहे की, ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ केअर एक्सलन्सच्या मार्गदर्शनाचं पालन करतं.

त्यात म्हटलं आहे की एचआरटी चाचणीनंतर महिलांसाठी टेस्टोस्टेरॉनचा विचार केला पाहिजे. लैंगिक इच्छा कमी होण्यामागचे इतर सर्व संभाव्य घटक किंवा कारणं वगळण्यात आली आहेत. ज्यांना समस्या जाणवते आहे त्यांनी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, असं ते पुढे म्हणतात.

अखेर, ग्रीन एका खासगी क्लिनिकमध्ये गेल्या. त्यांनी रक्ताच्या चाचण्या केल्या. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्या शरीरत हार्मोनची पातळी कमी झाली आहे. चाचणीचे निष्कर्ष पुन्हा डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांना आता एनएचएसवर काही टेस्टोस्टेरॉन दिलं जातं आणि एका खासगी प्रिस्क्रिप्शनद्वारे एक छोटा टॉप अप दिला जातो.

त्या म्हणतात, "यामुळे मला माझं आयुष्य परत मिळालं आहे. काही बाबतीत, मला असं वाटतं की मी माझ्या वयाच्या विशीत परतले आहे. माझ्यातील ऊर्जा वाढली आहे. मी अधिक मानसिकदृष्ट्या अधिक सतर्क, सक्रिय झाले आहे. माझी लैंगिक इच्छा परतली आहे."

टेस्टोस्टेरॉनचा लैंगिक इच्छेवर होणाऱ्या परिणामाबद्दल काहीजण मोकळेपणानं, उत्साहानं बोलत असले, तरी काहीजण म्हणतात की त्याचे नको असलेले किंवा दुष्परिणाम झाले आहेत.

चेरील ओ'मॅली एक वर्षापासून टेस्टोस्टेरॉन घेत होत्या. त्या म्हणतात की, रजोनिवृत्तीच्या वेळेस त्यांनी गमावलेली काही ऊर्जा यामुळे परत मिळवण्यास मदत झाली असली तरी, त्यामुळे त्यांची लैंगिक इच्छा खूपच वाढली. त्यातून त्यांच्यामध्ये अत्यंत रागाच्या, आक्रमक भावना निर्माण झाल्या.

"मी खरोखरंच उत्तेजित होत होते. मला माझ्या पतीबरोबर सेक्स करायचा होता. मात्र त्याचवेळी मला त्याला तिरस्कार वाटला."

"त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येतं की ही काही योग्य स्थिती नाही. मी अशी नव्हते. मला नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं वाटलं."

"सध्या, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झालेल्या हजारो पुरुषांचं निदान किंवा उपचार करण्यासाठी एनएचएस सज्ज नाही," असं व्हॉये वैद्यकीय संचालक जेफ फोस्टर म्हणतात

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, "सध्या, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झालेल्या हजारो पुरुषांचं निदान किंवा उपचार करण्यासाठी एनएचएस सज्ज नाही," असं व्हॉये वैद्यकीय संचालक जेफ फोस्टर म्हणतात

रॅचेल मेसन म्हणतात की त्या जेव्हा टीआरटीबद्दल पोस्ट करतात, तेव्हा त्यांना आढळतं की "अनेक महिला टेस्टोस्टेरॉन घेण्यास खूप घाबरतात. त्यांना चिंता वाटते की त्या पुरुषी होतील, त्यांच्या चेहऱ्यावर केस येतील आणि त्या स्त्रीत्व, स्वत:चं व्यक्तिमत्व गमावतील."

मेसन म्हणतात की त्यांच्या मनगटावर एक 'विशिष्ट केसाळ भाग' आहे. तिथे त्या दररोज टेस्टोस्टेरॉन जेल लावतात. मात्र त्या हार्मोनचे उपचार त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत.

शरीरावरील वाढत्या केसांबरोबर, टीआरटीचे इतर अनेक दुष्परिणाम असू शकतात. महिलांच्या बाबतीत आढळणारे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे, शरीरावर केसांची जास्त वाढ होणं, मुरुम येणं आणि वजन वाढणं.

हे दुष्परिणाम डोस कमी केल्यावर किंवा बंद केल्यावर दूर करता येतात. टेस्टोस्टेरॉन थेरेपीमध्ये अलोपेसिया आणि आवाज खोल, दमदार आणि गंभीर होणं हे दुष्परिणाम सहसा आढळत नाहीत.

पुरुषांच्या बाबतीत, वजन वाढणं, वेदना जाणवणं, दीर्घकाळ इरेक्शन राहणं, पुरुषी पॅटर्नचं टक्कल पडणं आणि मूडमध्ये बदल होणं हे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे शुक्राणूंचं उत्पादन कमी होऊ शकतं. त्याचा प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यासंदर्भात असे उपचार आहेत, ज्यांची मदत होऊ शकते. मात्र त्याबाबत वैद्यकीय सल्ल्याची शिफारस केली जाते.

'हा पैसे कमावण्याचा सोपा मार्ग'

एनएचएसचे काही डॉक्टर्स आणि दुय्यम काळजी सल्लागारांनी बीबीसीला सांगितलं की, गुंतागुंतीच्या समस्येवरील तत्काळ उपाय म्हणून काही खासगी क्लिनिक टीआरटी विकून नफा कमावत आहेत.

डॉ. पॉला ब्रिग्ज एनएचएसच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्यासाठीच्या कन्सल्टंट आहेत. डॉ. पॉला याचं वर्णन 'पैसे कमावण्याचा सोपा मार्ग' असं करतात. यात लोकांना आवश्यकता नसलेल्या गोष्टींसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात.

"हे नियंत्रणाबाहेर आहे. निरोगीपणा, आरोग्य उद्योगानं हा गॅप निर्माण केला आहे आणि त्याचा वापर करून देत पैसे कमावत आहेत," असं त्या म्हणतात.

'हे अपमानास्पद आहे'

मात्र, खासगी क्लिनिक म्हणतात की, एनएचएस जी सेवा पुरवण्यात अपयशी ठरतं आहे, ती सेवा उपलब्ध करून ते लोकांचं जीवन सुधारत आहेत.

जेफ फोस्टर एनएचएसचे डॉक्टर आहेत आणि लाखो-कोट्यवधी रुपयांची उलाढाल किंवा महसूल असलेल्या व्हॉय या खासगी संस्थेचे वैद्यकीय संचालक आहेत. जेफ म्हणतात की खासगी क्षेत्र उपचारांबाबतची पोकळी भरून काढतं आहे.

"सध्या, एनएचएस टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झालेल्या हजारो पुरुषांचं निदान किंवा उपचार करण्यासाठी सज्ज नाही."

ॲलन रीव्ह्झ आता फिटनेस आणि लाईफस्टाईल कोच आहेत

फोटो स्रोत, Alan Reeves @coachalreeves

फोटो कॅप्शन, ॲलन रीव्ह्झ आता फिटनेस आणि लाईफस्टाईल कोच आहेत

टीआरटी उपचार एनएचएसद्वारे उपलब्ध आहेत आणि बहुतांशपणे ते एन्डोक्रिनोलॉजिस्ट (हार्मोन तज्ज्ञ) किंवा युरोलॉजी क्लिनिककडून दिले जातात.

मायकल कोक्सिस, 2016 पासून बँलन्स माय हार्मोन्स या त्यांच्या कंपनीद्वारे टीआरटी उपचार देत आहेत. ते म्हणतात की गेल्या काही वर्षात याच्यासाठीची मागणीत 'अतिशय वेगानं' वाढ झाल्याचं त्यांनी पाहिलं आहे.

कोक्सिस म्हणतात की, त्यांना काही रुग्णांनी एनएचएसद्वारे चाचण्या केल्या आहेत. त्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांच्यामधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे त्यांनी खासगी क्लिनिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

"एनएचएसनं टेस्टोस्टेरॉनच्या निश्चित केलेल्या पातळीपेक्षा त्यांच्यामधील टेस्टोस्टेरॉनची पातळी थोडी जास्त असू शकते. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की, टीआरटीमुळे त्यांना फायदा होऊ शकत नाही."

"हे तितकं सोपं किवा स्पष्ट नाही, त्यात अधिक गुंतागुंत आहे."

पुरुषांमध्ये वयाच्या 30 ते 40 वर्षांदरम्यान जवळपास 1 टक्का टेस्टोस्टेरॉन कमी होण्यास सुरुवात होते. एनएचएसच्या सल्ल्यानुसार, हा वय वाढण्याच्या किंवा वृद्धत्वाच्या वाटचालीतील एक सामान्य भाग आहे. त्याचा लैंगिक इच्छेवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

ॲलन रीव्ह्झ यांना सुरुवातीला एनएचएसकडून टीआरटी देण्यात आली. त्यांच्या दोन चाचण्यांमध्ये 10 एनएमओएल/एल (नॅनोमोल्स प्रति लिटर) आणि 12 एनएमओएल/एल ची पातळी दिसून आली. त्यानंतर त्यांना 3 आठवड्यांच्या अंतरानं, 4 इंजेक्शनचा कोर्स देण्यात आला.

मात्र चौथ्या टप्प्यानंतर ॲलन रीव्ह्झ यांना सांगण्यात आलं की हा उपचार आता सुरू राहू शकत नाही, 'तेही कोणतंही स्पष्टीकरण न देता.'

"त्यामुळे मी पुन्हा त्यात स्थितीवर आलो. त्याच वेळेस मी खासगी क्लिनिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला," असं ते म्हणतात.

मग, पुरुषांच्या बाबतीत टेस्टोस्टेरॉनची निरोगी किंवा चांगली पातळी कोणती? तुम्ही हा प्रश्न कोणत्या संस्थेला विचारता आणि कोणता अभ्यास वाचता, त्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे.

"मी टेस्टोस्टेरॉन घेणं थांबवल्यामुळे मला खूपच आराम पडला आहे," चेरिल ओ'मॅली म्हणतात

फोटो स्रोत, Cheryl O'Malley

फोटो कॅप्शन, "मी टेस्टोस्टेरॉन घेणं थांबवल्यामुळे मला खूपच आराम पडला आहे," चेरिल ओ'मॅली म्हणतात

बीएसएसएमच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय अभ्यासांमधून अर्थ लावण्यात आला आहे. त्यात असं सूचित करण्यात आलं आहे की ज्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी 12 एनएमओएल/एल पेक्षा कमी असेल, त्यांना टीआरटी उपचार दिले पाहिजेत. कदाचित त्यांच्यामध्ये हायपोगोनॅडिमची लक्षणं दिसतील. या स्थितीत पुरुषांच्या वृषणामध्ये या महत्त्वाच्या सेक्स हार्मोनचं पुरेसं उत्पादन होत नाही.

एनएचएसची मार्गदर्शक तत्वं किंवा सल्ला प्रत्येक ट्रस्टच्या (एनएचएस ट्रस्ट या युकेतील वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या प्रादेशिक संस्था आहेत) बाबतीत वेगवेगळा असतो. मात्र त्यात असं म्हटलं आहे की ज्या पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी 6 ते 8 एनएमओएल/एल च्या खाली असेल, त्या पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता असू शकते.

महिलांच्या बाबतीत, वयाच्या 20 ते 40 वर्षांदरम्यान टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते आणि मग रजोनिवृत्तीच्या वेळेस ती स्थिरावते. हार्मोनची पातळी कमी होणं ही सामान्य बाब आहे. मात्र हार्मोनच्या पातळीत घसरण होण्याचा लैंगिक इच्छा आणि एकूणच आरोग्यावर किती परिणाम होतो, हा प्रश्न आहे.

यासाठी चाचण्या उपलब्ध आहेत. मात्र अचूक रीडिंग घेणं कठीण आहे. कारण महिलांसाठी देखील टेस्टोस्टेरॉन महत्त्वाचं असलं तरी, त्यांना आवश्यक असलेलं प्रमाण खूपच कमी असतं. जरी ते प्रिस्क्राईब करण्यात आलं तरीदेखील ते 'ऑफ-लेबल' (म्हणजे नियामक संस्थांनी त्याला विशिष्ट उपचारासाठी अधिकृत मंजूरी दिलेली नसते) असलं पाहिजे. कारण सध्या एनएचएसमध्ये महिलांसाठी कोणतेही परवाना असलेले उपचार उपलब्ध नाहीत.

ब्रिग्ज, टीआरटीबद्दलच्या चर्चांबद्दल सावध किंवा जागरुक आहेत. त्या म्हणतात की त्यांनी अशा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहिली आहे, जे त्यांना सांगतात की त्यांना टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता आहे, कारण त्यांना ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं आणि त्यांची लैंगिक इच्छा संपली आहे.

"ते मला सांगतात की त्यांनी त्यांचा अभ्यास केला आहे. अनेकदा त्याचा अर्थ असा होतो की सोशल मीडियावर या हार्मोनबद्दल पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर या हार्मोनचा जीवन बदलणारा परिणाम त्यांनी पाहिला आहे."

"हे एखाद्या सेलिब्रिटीसाठी फायद्याचं ठरलं म्हणून ते सर्वसामान्य लोकांसाठी उपयोगाचं ठरेल असं नाही."

2021 ते 2024 दरम्यान टेस्टोस्टेरॉनच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये 135 टक्के वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2021 ते 2024 दरम्यान टेस्टोस्टेरॉनच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये 135 टक्के वाढ झाली आहे.

त्या म्हणतात की चेशायर आणि मर्सीसाईड या त्यांच्या स्थानिक भागात टेस्टोस्टेरॉनची तपासणी करू इच्छिणाऱ्या रुग्णांची डॉक्टर्सकडे गर्दी होते आहे.

त्या म्हणतात, त्यातील अनेकजण असे आहेत जे टीआरटीचं प्रिस्क्रिप्शन घेऊन जातात. मात्र काही महिन्यांनी परत येतात आणि म्हणतात की ते घेण्याचा फारसा परिणाम झाला नाही.

त्या पुढे म्हणतात, या उपचाराचा काहीजणांना फायदा होतो. ज्या लोकांना वाटतं की त्यांना टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता आहे, त्यातील फार थोड्या लोकांना प्रत्यक्षात त्याचा वैद्यकीय फायदा होतो.

महिलांच्या बाबतीत आतापर्यंतचे क्लिनिकल पुरावे असं सूचित करतात की ज्या महिला रजोनिवृत्तीनंतरच्या स्थितीत (पोस्टमेनोपॉझल) असतात आणि ज्यांची लैंगिक इच्छा कमी झालेली असते, अशांवर उपचार करताना टीआरटी प्रभावी असते.

ब्रिग्ज म्हणतात की खासगी क्लिनिककडून होणाऱ्या जाहिरातींमुळे "हा विषय प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा मोठा झाला आहे."

"आवश्यकता असताना टीआरटी उपचार घेण्याच्या मी विरोधात नाही. मात्र त्याची अती जाहिरात करण्याच्या मी विरोधात आहे."

डॉ. बेन डेव्हिसदेखील टीआरटीचा एक प्लासिबो इफेक्ट आहे. म्हणजे त्याचा एक मानसिक परिणाम आहे. यामुळे कधीकधी रुग्ण खासगीरित्या किंवा वैयक्तिक पातळीवर अशी औषधं घेतात आणि त्यासाठी पैसे मोजतात, ज्यांची त्यांना आवश्यकता नसते.

चेरिल ओ'मॅली यांनी टेस्टोस्टेरॉन घेणं थांबवलं आहे. त्या म्हणतात की त्यांना हे उपचार घेताना जाणवलेला आत्यंतिक राग आणि वाढलेली लैंगिक उत्तेजना कमी झाली आहे. आता त्यांची लैंगिक इच्छा, त्यांना आरामदायी किंवा सोयीची वाटते अशा पातळीवर परत आली आहे.

त्या म्हणतात, "मी ते उपचार घेणं बंद केल्यामुळे आता मला अतिशय दिलासा मिळाला आहे, हायसं वाटतं आहे."

'हा काही सोपा, चमत्कारिक उपाय नाही'

"काहीजणांच्या बाबतीत औषधं, उपचारांमुळे खूप मोठा बदल घडू शकतो," असं डेव्हिस म्हणतात.

मात्र ते पुढे म्हणतात की, ही बाब फक्त रुग्णाला योग्य ती औषधं देण्यापेक्षा, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा अधिक आहे.

ते म्हणतात, "रुग्णांची लैंगिक इच्छा कमी होण्यामागं नेमकं काय कारण आहे, त्यामागे त्यांच्या जोडीदाराबरोबर असलेलं त्यांचं नातं असू शकतं का, ते स्वत:कडे कसं पाहतात ते असू शकतं का, ते सध्या ज्याप्रकारे लैंगिक संबंध ठेवत आहेत, त्यामुळे आता त्यांना त्यात रस राहिलेला नाही का? या सर्व मुद्द्यांची रुग्णांबरोबर चर्चा करण्यासाठी डॉक्टरांना कदाचित वेळ नसतो."

ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीची लैंगिक इच्छा कमी होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात. त्यावर टेस्टोस्टेरॉन हाच एकमेव उपाय नाही.

अर्थात, ॲलन रीव्ह्झ गेल्या 7 वर्षांपासून टीआरटी उपचार घेत आहेत. त्यांना बॅलन्स माय हार्मोन्स या खासगी क्लिनिकनं टेस्टोस्टेरॉन प्रिस्क्राईब केलं आहे. ते म्हणतात की त्यांचं आयुष्य नाट्यमयरित्या सुधारलं आहे.

ते म्हणतात, "माझी लैंगिक इच्छा परत आली आहे. इतकी की सुरुवातीला 10 दिवस मला दररोज रात्री सेक्स करायचा होता. मात्र आता तो आवेग शांत झाला आहे आणि मी चांगल्या स्थितीत आहे."

तरीदेखील, रीव्ह्झ यांना वाटतं की, 'हा काही सोपा, चमत्कारिक उपाय नाही' आणि तुमच्या जीवनशैलीत इतर बदल केल्याशिवाय टेस्टोस्टेरॉन घेण्यात काही अर्थ नाही.

ते म्हणतात, नाहीतर, हे 'जुन्या, खराब स्थितीतील कार'मध्ये फेरारीचं इंजिन ठेवण्यासारखं आहे.

"आता माझ्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. ते काही प्रमाणात टेस्टोस्टेरॉनमुळे आहे, तर काही अंशी माझ्यामुळे आहे," असं ते म्हणतात.

अतिरिक्त वार्तांकन : नॅट राईट

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)