जेव्हा एका मराठी माणसाला स्टीफन हॉकिंग यांचं पत्र...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. सुभाष देसाई
- Role, तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक, कोल्हापूर
हॉकिंग यांच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचं मराठीमध्ये 'कालाची जन्मकथा' या नावानं 1990ला डॉ. सुभाष देसाई यांनी भाषांतर केलं.
देसाई यांना हॉकिंग यांना भेटण्याची वेळ मिळाली होती, पण निव्वळ योग्यवेळी पत्र न मिळाल्यानं त्यांची ही भेट हुकली. स्टीफन हॉकिंग यांची ही पत्र त्यांनी आजही जपून ठेवली आहेत.
दुपारी एका व्याख्यानाला जायचं म्हणून मी त्याची तयारी करत होतो. पण व्हॉट्स ऍपवरील एका ग्रुपमध्ये बातमी येऊन पडली 'महान संशोधक स्टीफन हॉकिंग यांचं निधन."
सुरुवातीला विश्वास बसला नाही. खात्रीकरून घेण्यासाठी मी टीव्ही सुरू केला. टीव्हीवर हॉकिंग यांच्या निधनाची ब्रेकिंग न्यूज सुरू होती. मी मटकन खाली बसलो. माझं मन पुन्हा 1991मध्ये गेलं.
ते वर्ष मी कधीच विसरू शकत नाही. निव्वळ पत्र मिळण्यात झालेल्या गोंधळामुळे हॉकिंग यांना भेटण्याची माझी संधी हुकली होती.
तरुण वयात या महान संशोधकाला भेटण्यासाठी केलेला जीवाचा अटापिटा आणि संधी मिळूनही भेट होऊ शकली नाही, याची पुढं आयुष्यभर लागून राहिलेली खंत, हे सारं चित्र माझ्या डोळ्यासमोर आज जसंच्या तसं उभं राहिलं.
1990ला मी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून माझी पीएचडी पूर्ण केली होती. पीएचडीचा माझा प्रबंध होता 'रेफरन्स ऑफ सायंटिफिक कनक्लुजन टू रीलिजन.' या प्रबंधासाठी मी स्टीफन हॉकिंग यांचा ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचा अभ्यास केला होता. हॉकिंग नावाच्या या अवलियाशी माझं नातं जुळलं ते या पुस्तकामुळेच.

फोटो स्रोत, Subhash Desai
माझे जवळचे स्नेही, संशोधक डॉ. आर. व्ही. भोसले त्यावेळी फिजिकल रीसर्च लॅबरॉटरीमध्ये कार्यरत होते.
माझा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, मी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईमचं मराठीमध्ये भाषांतर करावं. मराठी भाषांतर तपासून देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती.
हे भाषांतर करण्यासाठी मी रायटर हाऊसकडून परवानगीही मिळवली. हे भाषांतर करत असताना मोठं आत्मिक समाधान मिळालं. हे काम सुरू असतानाच माझ्या मनात पक्क ठरवलं होतं की जीवनात एकदा तरी हॉकिंग यांना भेटायचंच.
हॉकिंग यांना भेटण्यासाठी 1991ला मी युरोपला जायचं ठरवलं. युरोपचं आणखी एक आकर्षण होतं ते म्हणजे पॅरिस.
चित्रकलेची आवड असल्यानं जगाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पॅरिसला भेट देणं मला आवश्यक होतं.
पैसा ही अडचण होतीच. युरोपमध्ये एक महिना राहण्यासाठी किमान 70 ते 80 हजार खर्च येणार होता. माझी एक मुदत ठेव होती आणि काही मित्रांनी केलीली मदत यामुळे पैशांची जुळणी झाली.
युरोपला जायची तयारी पूर्ण होताच मी सर्वप्रथम स्टीफन हॉकिंग यांच्या कार्यालयाला पत्र पाठवलं आणि त्यांची भेट मागितली.
एवढा मोठा संशोधक मला कशाला भेटणार हा विचार मनात होताच. मी युरोपला निघेपर्यंत त्यांच्या कार्यालयातून कोणताच पत्रव्यवहार झाला नव्हता.

फोटो स्रोत, Facebook/Dr Subhash Desai
पण मी आशा सोडली नव्हती. माझे एक उद्योजक स्नेही निवास पोवार यांना मी माझ्या कार्यालयात लंडनवरून काही पत्र येतं का, यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं आणि युरोपच्या प्रवासाठी बाहेर पडलो. मी युरोपला पोहचलो असतानाच इंग्लंडवरून एक पत्र माझ्या कार्यालयात येऊन पडलं होतं.
पोवार यांनी तातडीनं हे पत्र लंडनना त्यांच्या एका स्नेह्याकडे पाठवलं आणि हा निरोप मला देण्याची व्यवस्था केली.
लंडनमधल्या या व्यक्तीकडे मला काही वस्तू द्यायच्या होत्या. लंडनमधल्या हॉटेलमध्ये ही व्यक्ती मला भेटण्यासाठी आली. मी त्यांना सांगितलं, "मला स्टीफन हॉकिंग यांना भेटायचं आहे. त्यांच्या कार्यालयातून मला एक पत्र आलं आहे, ते पोवारांनी तुमच्याकडे पाठवलं आहे." यावर ती व्यक्ती मला म्हणाली, "आहो असं कधी होतं का? स्टीफन हॉकिंग यांची भेट अशी सहजासहजी मिळते का?"
मी हिरमुसला झालो. मलाही हे पटलं होतं की स्टीफन हॉकिंग माझ्यासारख्याला भेटणार नाहीत. दुसऱ्या दिवशी मी पॅरिस गाठलं. पॅरिसमध्ये माझा 15 दिवस मुक्काम होता. शेवटच्या दिवशी मला त्या व्यक्तीने संपर्क करून सांगितलं की हॉकिंग यांनी तुम्हाला भेटीची वेळी दिली आहे, लवकर निघून या.

फोटो स्रोत, Dr Subhash Desai
माझ्याकडचे सर्व पैसे संपले होते आणि पॅरीसमधून परत लंडनला येणं शक्य नव्हतं.
हॉकिंन यांनी पत्रात लिहिलं होतं, "तू जेव्हा युरोपला येशील तेव्हा तुला भेटायला आवडेल. मी जपानला जात आहे आणि माझ्याकडे वेळच नाही. यूकेमध्ये आलास की तुझ्या वेळेनुसार माझ्या कार्यालयात फोन कर."
मी दुखावलो होतो, नाराज झालो होतो आणि संतापलो ही होतो. त्या व्यक्तीनं वेळीच मला हे पत्र दिलं असतं तर मला या महान संशोधकाला भेटता आलं असतं.
पण माझ्या हाती फार काही नव्हतं. हताश मनानं मी भारतात परत आलो. या पत्रातल्या ओळी डोळ्यांसमोरून सतत फिरत होत्या.
पुढे माझ्या पीएचडी प्रबंधाचं पुस्तक आलं तेव्हा त्याची एक प्रत मी हॉकिंग यांना पाठवली. हॉकिंग यांनी पुन्हा मला एक पत्र पाठवलं.
हे पत्र त्यांच्या सचिवाच्या वतीनं पाठवण्यात आलं होतं. या पत्रात एक ओळ आहे, "त्यांनी त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास सांगितलं आहे. ते स्वतः लिहू शकत नाहीत, तुम्ही त्यांची अडचण समजू शकाल."
मोटर न्यूरॉन आजारामुळे ते स्वतः लिहू शकत नव्हते. त्यांच्याकडून मला भेटीसाठी जे पत्र आलं होतं त्यावर त्यांची सही आहे. त्यांच्या सहीचं पत्र माझ्याकडे आहे हा माझ्यासाठी मोठा ठेवाच आहे आणि तो मी आजही जपून ठेवला आहे.
काही वर्षांनंतर मी शिवाजी विद्यापीठातल्या माझ्या प्राध्यापक मित्रांना त्यांच्या सहीचं पत्र दाखवल. ते म्हणाले, "आहो हे पत्र तुम्ही सोन्याच्या फ्रेममध्ये ठेवलं पाहिजे."
माझं वय आता 70 झालं आहे. पण स्टीफन हॉकिंग यांची पत्र, त्यांची हुकलेली भेट माझ्या मनाच्या सोनेरी फ्रेममध्ये मी जपून ठेवली आहेत.
(शब्दांकन - मोहसीन मुल्ला)
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








