गोपीचंद पडळकर बारामतीतून भाजपचे उमेदवार, अजित पवार यांच्याविरोधात लढवणार विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, BBC/Facebook
धनगर समाजातले नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिले की पडळकर हे बारामतीत भाजपचे उमेदवार असतील.
फडणवीस म्हणाले, "गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे. ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं. मी त्यांच्यावर सोडतो, पण माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची सीट लढली पाहिजे. तुमची जर मान्यता असेल तर मी पक्षाशी बोलतो. गोपीचंदजींना बारामतीत उतरवून बारामीत आपण जिंकून दाखवू."
बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारच असतील, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी जाहीर केलं होतं. त्यामुळे बारामतीत यावेळी अजित पवार विरुद्ध पडळकर असा सामना रंगेल.
'पडळकर बळीचा बकरा'
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "भाजपकडे उमेदवार नसल्यामुळेच गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा बळीचा बकरा करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून बारामतीमध्ये तळ ठोकून होते. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की ते बारामतीतून लढतील पण ते उभे राहिले नाही आणि पडळकरांचं नाव पुढे केलं. पडळकर यांच्या उमेदवारीला आम्ही आव्हान पण समजत नाहीत. भाजपकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळेच वंचितचा उमेदवार त्यांना घ्यावा लागला आहे."
लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांची मतं धनगर समाजाच्या नाराजीमुळे कमी झाली होती, असं जाणकार सांगतात. आता त्याच समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे अजित पवारांसमोर आव्हान उभं राहू शकतं. यावर मलिक म्हणतात, "भाजपने गेल्या पाच वर्षांत या समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे हा समाज त्यांच्या उमेदवाराला मतदान करेल की नाही याबाबत शंका आहे."
भाजप प्रवक्ते माधव भांडारी म्हणतात, "ही तुल्यबळ लढत होईल. पडळकर चांगली फाइट देतील."
गोपीचंद पडळकर यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप राष्ट्रवादी करत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यावर भंडारी म्हणाले, "ते लवकरच कळेल कोण बळीचा बकरा आहे."
धनगर आरक्षण
भाजप सरकारने धनगरांना ST आरक्षण दिलं नाही, म्हणून याआधी पडळकरांनी भाजपवर टीका केली होती. आंदोलनंही केली होती. त्यावेळी पडळकर म्हणाले होते, "सरकार आम्हाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत. पण जर आता धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करून आरक्षण लागू झालं नाही तर महाडमधून अंदाजे 20-25 लाख धनगर लोक आपल्या शेळ्या, मेंढ्या, गुराढोरांसह मोर्चा काढतील आणि विधानभवनावर धडकतील," असं पडळकर यांनी सांगितलं.
त्याविषयी तुम्ही इथे वाचू शकता - '..तर लाखो धनगर आपल्या शेळ्या-मेंढ्यासह विधानभवनावर धडकतील'
लढत कशी होईल?
अजित पवार विरुद्ध गोपीचंद पडळकर ही लढत एकतर्फी होईल असं स्थानिक पत्रकारांना वाटतं. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकल्ला आहे आणि त्याला भेदणं भाजपसमोर मोठं आव्हान राहील. भाजपकडून बारामती मतदारसंघात दरवेळी नवा उमेदवार दिला जातो आणि तिथं पवार यांचा विरोध हा एक मुद्दा सोडला तर दुसरा कोणताच मुद्दा नसतो, असं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या निवडणुकीला बाळासाहेब गावडे यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. तरीदेखील अजित पवार हे 90,000 मताधिक्यांनी निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांना बारामती विभागातून अंदाजे सव्वा लाख मतं पडली होती. हीच मतं त्यांच्या विजयात निर्णायक ठरली.
आमची सत्ता आल्यावर 100 दिवसांत धनगर आरक्षण देऊ असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. आता मुख्यमंत्री याविषयी बोलायला तयार नाहीत. पाच वर्षांपूर्वी धनगरांच्या विविध संघटना एकत्र होत्या. पण आता अनेक संघटना आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादीसोबत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ हे राष्ट्रवादीत गेले आहेत. बापूसाहेब सोलनकर हे देखील राष्ट्रवादीत गेले आहेत.
कोण आहेत गोपीचंद पडळकर?
गोपीचंद पाडळकर हे दुष्काळी भागातल्या आटपाडीचे आहेत. या आटपाडीतलं पडळकरवाडी हे त्यांचं गाव, ज्याचं वैशिष्टय म्हणजे इथल्या एकूण 100 कुटुंबांमध्ये 40 जण डॉक्टर आहेत.

खानापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा निवडणूकही लढवली आहे. 2009 मध्ये 'रासप'चे रिपब्लिकन डावे लोकशाही आघाडीतले उमेदवार मधून आणि 2014 मध्ये भाजपतर्फे पराभूत झाले, पण त्याच वेळेस वाढत गेलेल्या धनगर आरक्षण आंदोलनात त्यांचं नेतृत्व पुढे येत गेलं.
2012पासून ते आंदोलनात जास्त सक्रीय झाले. त्यामुळेच आता धनगर समाजाची अधिक मतं असलेल्या या पट्ट्यात त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.
पाडळकरांचं राजकारणाव्यतिरिक्त नवं काम म्हणजे आता या निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात ते चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि अभिनेतेही झाले आहेत. 4 एप्रिललाच त्यांचा पहिला मराठी चित्रपट 'धुमस' राज्यभर रिलीज होतोय. एकदम दक्षिण भारतीय स्टाईल ॲक्शन चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








