CAA : पदराचा झेंडा करणाऱ्या आया पोरांबाळांसाठी घाबरत कशा नाहीत? ब्लॉग

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे
YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

हिजाबवाल्या, जीन्सवाल्या, पंजाबी ड्रेस घालणाऱ्या, साडी नेसणाऱ्या सगळ्याच बाया-पोरी दिसत राहिल्या गेले दोन आठवडे. पोलिसांच्या लाठ्या खाताना, रडताना, भांडताना, विरोध करताना आणि पोलिसांना फुलं देतानाही.

देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहेत. आणि दोन आठवड्यानंतरही त्या आंदोलनांचा जोर ओसरताना दिसत नाहीये. त्यातही हिरिरीने पुढे दिसल्या त्या बायकाच.

'आचल का परचम' (पदराचा झेंडा) फडकवणाऱ्या अनेक जणी पाहिल्या आणि वाटलं चुक-बरोबर याची चिकित्सा नंतर करूत, पण हे असं बाहेर येऊन जीवाचे वडे घालताना भीती नाही वाटली या बायांना? नाही, घाबरायची सवय असते आपण बायकांना, म्हणून विचारतेय.

"औरतो की राह हमेशा अलग होती है," दिल्लीच्या शाहीन बागमध्ये भेटलेली हिदा सांगते. आहे नववीची, एकदम अभ्यासू वाटणारी पोरगी. मैत्रिणी चश्मिश म्हणून चिडवतात असं सांगते आणि खळाळून हसते. पण त्या वयात तिला कळलंय, विरोध करायचा बाईचा रस्ता वेगळा असतो.

Protest

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीच्या शाहीन बाग भागात गेल्या 15 दिवसांपासून शेकडो महिला निदर्शनासाठी बसतात. रात्रीबेरात्री, थंडीवाऱ्याच्या उघड्यावर. शाहीन बागच्या मुख्य मार्केटचा भाग हा. आसपास पाहाल तर मोठ्यामोठ्या ब्रॅण्डसची शोरूम्स. कपडे, ज्वेलरी, परफ्युम्स, बुट... हे ब्रॅण्डस वापरणाऱ्या, मिरवणाऱ्या लोकांना माहीतही नसेल की त्या वस्तू विकणाऱ्या दुकानांसमोर काय गोंधळ माजलाय.

शाहीन बागला गेले तेव्हा असे अनेक उच्चभ्रू मार्केट, बाजार, रेस्टॉरन्ट आणि मॉल्स लागले. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या गर्दीने भरलेले. रोषणाई तर नजर दिपवेल अशी. आणि शाहीन बागला पोहचले तेव्हा...

रोषणाई तिथेही होती. येणाऱ्याना कळावं आंदोलन कुठे चालू आहे ते कळण्यासाठी. गाडी मुख्य रस्त्यावरच सोडून द्यावी लागते. पोलिसांची एक गाडी औषधाला दिसते. पण त्यांच्या हालचालीतही कोणती गती नाही, तणाव नाही. गणपतीच्या गर्दीत पोलिसांची जी बॉडीलँग्वेज असते ना, तशीच काहीशी. चेहऱ्यावर एकच भाव, 'फॅमिलीवाले हैं.'

Protest

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीत जी काही आंदोलनं झाली तिथे सगळीकडे पोलीस बंदोबस्त, काही ठिकाणी लाठीचार्ज, अश्रूधूर आणि यातलं काहीही झालं नाही तर प्रचंड फौजफाटा मग शाहीन बागला वेगळं वातावरण का असा प्रश्न मनात येईतो एका चिंचोळ्या गल्लीतून वळले. पुढे मोकळी जागा. हमरस्ता असावा बहुतेक. अवतीभोवती तीच ती सगळी शोरूम्स आणि रस्ताभर पळणारी लहान पोरं. (आंदोलन असो किंवा भाजीमार्केट, आयांचा हात सोडून पळण्यात पोरांचा हात धरणारं कोणी नाही).

लांब एका टोकाला स्टेज. त्यावर कोणी गाणी गातंय, कोणी शायरी म्हणतंय, मधल्या मोकळ्या मैदानात शेकडो बायका बसल्यात, चहुबाजूंनी नायलॉनच्या दोऱ्या बांधून तीही 'चौकट' पक्की केलीय. बाजूने पुरुष उभे आहेत आणि परिसरात जिथे जागा असेल तिथे उभ्या, दुकानाच्या पायऱ्यांवर बसलेल्या बायका.

protest

फोटो स्रोत, Getty Images

रंगीत हिजाब, काळे बुरखे, जाळीच्या नकाबांमध्ये जीन्स पॅन्टवाल्या मोकळ्या केसांच्याही दिसतात. जास्त गर्दी आयांचीच आहे.

त्यांची मुलं कधी स्वेटर काढून टाकतात, कधी टोप्या. कधी अनवाणी पायांनी रस्ताभर पळतात आणि त्यांच्या मागे आया. पण मग मुलांना आणयचंच कशाला अशा मरणाच्या थंडीत? गप घरात बसायचं. कशाला हवं आंदोलन वगैरे?

याच प्रश्नांवर रेहाना चवताळून उठते. "आज बाहेर नाही आले तर उद्या हे लोक आम्हाला देशाबाहेर करतील. माझ्या अडीच वर्षांच्या मुलीचं भविष्य डिटेंन्शन कँप असेल. श्रमजीवी माणसं आहोत आम्ही, नाही पुरं पडलो सिस्टीमला म्हणजे?"

रेहानाची अडीच वर्षांची मुलगी तिच्या खांद्यावर असते. आज रेहानाने तिला फुल पॅक करून आणलंय आणि दर पाच मिनिटाला ती पोरगी टोपी काढणार आणि रेहाना परत चढवणार असा खेळ सुरू असतो. सगळे कागदपत्रं जागेवर असले तरी आपण सुरक्षित राहाणार का, आपलं काय होईल, मुलाबाळांचं काय होईल ही धास्ती प्रत्येक आईच्या चेहऱ्यावर दिसते. मग तिच्या मुलांचं वय अडीच असो की पंचवीस.

protest

आम्ही इतरांना प्रश्न विचारत असतो तेव्हा हीदाची आई सारखी म्हणत असते, माझ्या मुलीला विचारा प्रश्न. तिला CAA NRC विषयी सगळं माहितेय. पोरांना इंग्लिश मीडियममध्ये घालून आपल्याला येत नसलं तरी पदर बांधून मुलांचा अभ्यास घेणारी कष्टकरी आई आठवली.

रोज चालणाऱ्या आंदोलनाला एक दुसरी बाजूही आहे. एरवी घराबाहेर न पडणाऱ्या, न पडता येणाऱ्या बायकांना रात्रभर बाहेर राहाता येतंय. तेही राजेरोसपणे. एकीला सोबत म्हणून दुसरी येते, नणंदेपाठोपाठ भावजयी येते. घरातल्या बायका आणि पोराबाळांच्या गलक्यामुळे फॅमिली फंक्शनसारखं फॅमिली आंदोलन वाटतं हे. मिनी जत्राच म्हणा ना.

त्याच परिसरात राहाणाऱ्या रुकसार खानम गृहिणी आहेत. गेले दोन आठवडे त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. स्वयंपाकपाणी करून आंदोलनाच्या ठिकाणी यायचं, रात्र 2-3 पर्यंत, कधी कधी रात्रभर थंडीत कुडकुडत बसायचं. तिथेच झोपायचं. सकाळ झाली की घरी परत आणि कामाला जुंपायचं.

protest

फोटो स्रोत, Getty Images

कशाला करता विचारलं तर म्हणतात, "एवढ्या बायका रोज येतात, माझ्या शेजारणी, जावा येतात मी घरात कशी बसून राहू? एकीला सोबत म्हणून दुसरीला जायलाच हवं."

समोर बायकांचं राज्य असलं तरी स्टेजवर गर्दी पुरुषांचीच. तिथूनच घोषणा, गाणी, मधूनच टोकाचे वाटणारे विचार ऐकू येत असतात, तुम्ही काय करावं याचे सल्ले कानी पडतात. बायकांचं आंदोलन म्हणतात म्हणता कचकन दाताखाली खडा आल्यासारखं होतं. कोणाला विचारलं तुम्ही का जात नाही स्टेजवर मतप्रदर्शन करायला, तुमचे विचार मांडायला तर कशानुशा हसतात.

पण तेजतर्रारही बऱ्याच आहेत. गुलाबी-निळ्या हिजाबात असतात पण डोळे लाल झालेले असतात. त्यातलीच एक मेडिकलची विद्यार्थीनी आफिया अक्रम.

आफीया अक्रम
फोटो कॅप्शन, 'आहेत ना तुमच्याकडे पैसै, मग ते कोणाला तरी मदत करायला वापरा ना.'

"हे नाही शिकवलं ना कधी आम्हाला कॉन्स्टिट्युशनमध्ये. आणि हा कायदा काय फक्त मुसलमानांना त्रासदायक आहे, नाही ना. उद्या हिंदूही भरडले जातील यात. गरीब सगळेच आहेत. पोटापाण्याची विवंचना सगळ्यांना आहे. प्रत्येक घरात कागदपत्रं असतील का? जे चालू होतं ते काय वाईट होतं? सगळ्या देशाला वेठीला धरायची काय गरज? आणि आहेत ना तुमच्याकडे पैसै, मग ते कोणाला तरी मदत करायला वापरा ना. जे परिस्थितीने गंजले आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना शिकवण्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी पैसै वापरा ना. तुम्हाला कागदपत्रं हवेत ना, मग त्यांना निदान कागदपत्रं मिळवण्याइतकं शिक्षण तर द्या..."

एका दमात ही मुलगी देशातल्या मुस्लीम समाजाच्या परिस्थितीवर भाष्य करून जाते.

20 दिवस ते वय वर्ष 80 यातल्या सगळ्या वयाच्या बायका तिथे आहेत. पण तरुण मुलींची उर्जाच वेगळी. कुठे स्टेजवरच्या घोषणेला प्रतिसाद देत असतात, कुठे हसतखिदळत असतात तर कुठे स्वयंसेवक बनून आंदोलनातल्या इतर जणींना चहा, दुध, बसायला गादी, लहान मुलांसाठी ब्लँकेट असलं काहीबाही आणून देत असतात.

पण अशा तरण्याताठ्या मुलींना गरजच काय आंदोलन वगैरे करायची? रात्रीबेरात्री रस्त्यांवर बसतात कोणी वाईट म्हणेल याची भीती नाही वाटत? आणि मुख्य म्हणजे बाईच्या जातीला काय करायचं आंदोलन बिंदोलन, गप घरी बसावं, बाकीचं काय ते पुरुष बघून घेतील, दोन्ही बाजूंचे. हे प्रश्न विचारायचा अवकाश, दणादणा उत्तर मिळत जातात.

protest

फोटो स्रोत, Getty Images

"औरत होना अपने आप में एक बहादुरी हैं," 19-वर्षांची आम्रीन ठणकावून सांगते. "बाई असणं यासारखं दुसरं साहस नाही, शौर्य नाही. इतिहास काढून बघा, सगळ्यात जास्त कुर्बान्या बायकांनी दिल्यात, मग त्या कोणत्या जातीच्या असोत वा धर्माच्या. ज्या बाईच्या पोटातून साऱ्या दुनियेचा जन्म झाला ती अटीतटीच्या वेळेस मागे कशी हटेल? ऐसी हर एक लडाई औरतोंने लडी हैं, और जीती भी हैं."

अशा आम्रीन दिसत राहाव्या, बोलत राहाव्या असं वाटतं. फक्त या आंदोलनामध्ये नाही, जगात सगळीकडे. पर्यावरणापासून ते स्टॉक एक्चेंजपर्यंत जागत्या रहाव्यात असं वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)