उद्धव ठाकरे सरकारचा खातेवाटपाचा तिढा सुटता सुटेना; कृषी-महसूल खातं कोणाला मिळणार?

फोटो स्रोत, Getty Images
महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. महत्त्वाच्या खात्यांवरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात खलबतं सुरु आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेली बैठक तब्बल चार तास चालली. गुरुवारी (आज) सकाळी खातेवाटपासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तिन्ही पक्षातील नाराजांची संख्या वाढताना दिसते आहे.
महत्त्वाच्या खात्यांवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं समजतं आहे. हा तिढा सोडवण्यासंदर्भात गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अनेक बैठका झाल्या.

फोटो स्रोत, Twitter
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, "काही बदल, चर्चा हा अपरिहार्य भाग असतो. तीन पक्षांचं सरकार आहे, आमची आघाडी आहे. त्यावेळी एकत्र बसून चर्चा करायची असते. तो टप्पा सुरू आहे. आधीच्या सरकारचं बघितलं तर मंत्रिमंडळ बनतं, खातेवाटपावर चर्चा सुरू राहते. दोन-तीन दिवस वेळ लागतो. त्याच धर्तीवर आताही चर्चा सुरू आहे."
राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, "गुरुवारी सकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. खातेवाटप लवकरात लवकर होईल. खातेवाटप जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. ते लवकरच खातेवाटप जाहीर करतील."
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "शिष्टसंकेतानुसार खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्याबद्दल चर्चा करणे योग्य नाही."

फोटो स्रोत, Getty Images
मिड डे वृत्तपत्राचे शहर संपादक संजीव शिवडेकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "खातेवाटप लांबलं आहे ही गोष्ट खरी आहे. जातीय समीकरणं, जिल्हानिहाय समीकरणं हे सगळं बघून निर्णय घ्यावा लागतो. कुठच्या खात्यात लोकांची जास्त कामं करून घेता येतील आणि बदनामी कमी होईल तेही पाहिलं जातं. मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन ही खातं स्वीकारण्याकडे फारसा कोणाचा कल नसतो. त्यातच तीन पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू असल्याने वेळ लागणं साहजिक आहे."
"गृह, महसूल, शहर विकास, अर्थ, नियोजन ही महत्त्वाची खाती आहेत. प्रत्येक पक्ष ही खाती आपल्याकडे असावी यासाठी आतूर असणार आहे. खातं गमावलं तर एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू होईल. विरोधक याचीच वाट बघत आहेत. खातेवाटप होताना आणि झाल्यानंतर त्यावरून चर्चा सुरूच राहील. सरकारमधलेच लोक त्या खात्यांवर आक्षेप घ्यायला सुरुवात करतील.
कृषी आणि महसूल खातं मिळावं अशी काँग्रेसची मागणी आहे अशीही चर्चा होत आहे.
भाजपला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार आलं आहे. सत्ता जाऊ नये यासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत. पक्ष तीन आहेत आणि मंत्रिपदं मर्यादित आहेत. प्रत्येकजण आपापलं मेरिट सांगण्याचा प्रयत्न करतोय."

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे "मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने प्रत्येक पक्षात असंतोषांची संख्या वाढते आहे. मलईदार खाती मिळावीत यासाठी रस्सीखेच आहे. महत्त्वाचं खातं मिळावं यासाठी मोठ्या नेत्यांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केलं जात आहे," असं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या, "ज्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्यांना झुकतं माप मिळू शकतं. अनेकांचे सगेसोयरेही आहेत. काहीजण अटीतटीच्या लढतीत निवडून आले आहेत. त्यामुळे निकष वाढले आहेत."
"काही मंत्र्यांनी कोणतंही मंत्रिपद चालेल अशी भूमिका घेतली आहे. काही मंत्र्यांना कुठलं खातं मिळेल हे कळवण्यात आलं आहे. गृह खातं उपमुख्यमंत्र्यांकडे असावं असाही एक प्रवाह आहे. महसूल खातं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मिळेल अशी लक्षणं आहेत. महत्त्वाचं खातं निष्कलंक नेत्याकडे असावं यासाठीही प्रयत्न आहे," असं त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








