कोरोना मुंबई : कोव्हिड-19 वर मात करण्यासाठी मुंबईकरांमध्ये तयार झालेली 'हर्ड इम्युनिटी' आहे काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
बहुतांश मुंबईकरांमध्ये कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती होत असून त्यांची 'हर्ड इम्युनिटी' वाढल्याचं स्पष्ट झालंय. झोपडपट्टीत राहणाऱ्या 57 टक्के आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या 18 टक्के लोकांच्या शरीरात ही रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचं सिरो (SERO) सर्व्हेक्षणात आढळलंय.
मुंबई महापालिका, निती आयोग आणि टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
'कोरोनाची साथ हळूहळू नियंत्रणात येतेय'
मुंबईतील तीन वॉर्डमध्ये सिरो (SERO) सर्वेक्षण करण्यात आलं होतं. आर-उत्तर, एम-पश्चिम आणि एफ-उत्तर या वॉर्डमध्ये लोकांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या 57 टक्के आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या 18 टक्के लोकांच्या शरीरात ही रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय.
या सर्व्हेक्षणाबाबत बीबीसी मराठीशी बोलताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "40 टक्के जनतेची अॅंटीबॉडी चाचणी पॉझिटिव्ह आहे. कोव्हिडची लक्षणं दिसून न येणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. मुंबईमध्ये आपण लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होण्याच्या दिशेने चाललो आहे. याचाच अर्थ मुंबईत कोरोना व्हायरसची साथ हळूहळू नियंत्रणात येत आहे."
ही हर्ड इम्युनिटी डेव्हलप होणं हाच त्यावरचा एक उत्तम उपाय असू शकतो असं जगभरातले संशोधक सांगत आहेत.
पण हर्ड इम्युनिटी म्हणजे काय आणि कोरोनासारख्या आजारामध्ये केवळ हर्ड इम्युनिटी तारणहार ठरू शकते का?
हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?
हर्ड या इंग्लिश शब्दाचा अर्थ - कळप किंवा समूह
इम्युनिटी - म्हणजे रोग प्रतिकारकशक्ती
हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची रोग प्रतिकारकशक्ती.
म्हणजे जेव्हा समाजातल्या भरपूर लोकांच्या शरीरात एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा त्या रोगाचा परिणाम कमी होऊ लागतो. विशेष म्हणजे त्यासाठी 100 टक्के लोकांच्या शरीरात ही शक्ती निर्माण होण्याची गरज नाही. 70-एक टक्के लोकांच्या शरीरात ती तयार झाली तरी साथ आटोक्यात येते.
हर्ड इम्युनिटी कशी काम करते?
समजा एका गावात 100 लोक आहेत. त्यांपैकी 75 लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. त्यामुळे 5 लोकांचा बळी गेला आणि उरलेले 70 लोक बरे झाले. याचा अर्थ त्या 70 लोकांच्या शरीरात आता कोरोना व्हायरसला नष्ट करू शकणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्या गावात बाहेरून कुणी रोगी आला, तरी या 70 लोकांना आता लागण होऊ शकणार नाही.


याचाच अर्थ हर्ड इम्युनिटीमुळे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाणाऱ्या रोगाचा प्रसार मंदावतो. अशामध्ये ज्या लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांच्यापर्यंतही हा आजार पोहोचण्याची शक्यता कमी होते, कारण त्यांच्या आजूबाजूला इम्युनिटी चांगली असणाऱ्या लोकांची ढाल तयार झालेली असते. म्हणूनच परिणामी या लोकांनाही संरक्षण मिळतं.
ही हर्ड इम्युनिटी फक्त संसर्गजन्य रोगांच्या म्हणजेच एका माणसाकडून दुसऱ्याला होऊ शकणाऱ्या रोगांच्या बाबतीतच काम करते.
कशी तयार होते हर्ड इम्युनिटी?
हर्ड इम्युनिटी तयार होण्याचे 2 मार्ग आहेत.
पहिला मार्ग - नैसर्गिक पद्धत
दुसरा मार्ग - लसीकरण म्हणजेच व्हॅक्सिनेशन
हर्ड इम्युनिटी तयार होण्याची नैसर्गिक पद्धत
एखाद्या रोगाची साथ पसरायला लागली की त्याचा संसर्ग अनेकांना होतो. ज्यावेळी समाजातल्या मोठ्या गटाला या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि ही लोकसंख्या यातून बरी होते, तेव्हा या लोकांच्या शरीराराला रोगाशी कसं लढायचं हे माहीत होतं. म्हणजेच त्यांच्या शरीरारात या रोगासाठीची इम्युनिटी तयार होते.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

म्हणूनच या साथीची दुसरी लाट आली किंवा परत संसर्गजन्य परिस्थिती निर्माण झाली, तरीही हा रोग गंभीर स्वरूप धारण करू शकत नाही. कारण बहुतेकांचं शरीर त्याला प्रतिकार करतं आणि रोग पसरण्यावर मर्यादा येतात.
हर्ड इम्युनिटी तयार व्हायला किती वेळ लागतो, याविषयी राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, "हर्ड इम्युनिटी संपूर्ण समाजामध्ये कधी तयार होईल, हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. ती 6 महिन्यांमध्ये होईल की वर्षामध्ये होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्या त्या आजाराचा प्रसाराचा वेग, आणि तो प्रसार टाळण्याकरता समाजाने केलेले उपाय, त्या उपायांमधली परिणामकारकता किती आहे त्याच्यानुसार ही हर्ड इम्युनिटी कधी तयार होईल हे ठरत असतं."

फोटो स्रोत, Getty Images
लसीकरणाने कशी तयार होते हर्ड इम्युनिटी?
रोगाचा प्रतिबंध करणारी एखादी प्रभावी लस जर तयार झाली आणि ती लोकसंख्येच्या 70 ते 80 टक्के लोकांना देण्यात आली, तर मग अशा प्रकारची हर्ड इम्युनिटी तयार होते आणि ज्या 30 किंवा 20 टक्के लोकांनी लस घेतलेली नाही त्यांनाही रोगापासून आपोआप संरक्षण मिळतं.
पण ही लस कशी काम करते, एखाद्या ठणठणीत व्यक्तीला लस टोचण्यात येते तेव्हा तिच्या शरीरामध्ये त्या रोगाचा काही अंश किंवा विषाणूच्या जेनेटिक कोडचा काही भाग सोडला जातो. यामुळे काय होतं? तर या अंशामुळे तुम्हाला त्यावेळी तो रोग होत नाही, किंवा रोगाची लक्षणंही दिसत नाहीत. पण शरीरातली रोग प्रतिकार शक्ती जागी होते आणि रोगासाठीचा 'रिस्पॉन्स' तयार करते.
त्यामुळे जर भविष्यात या विषाणूचा हल्ला आपल्यावर झालाच तर त्याच्याशी कसं लढायचं, हे शरीराला माहिती असतं.
दोन्ही पद्धतींमधले तोटे
हर्ड इम्युनिटीचे जसे फायदे आहेत, तसेच यात काही तोटेही आहेत.
नैसर्गिकरीतीने हर्ड इम्युनिटी निर्माण होण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणातल्या लोकसंख्येला हा संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन व्हावं लागतं. म्हणजे जवळपास 70% लोकांपर्यंत हा आजार पोहोचतो. त्यातून बहुसंख्य बरे होतात, पण यादरम्यान अनेकांचा मृत्यूही होतो. म्हणजे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये 1 टक्का जरी रुग्णांचा मृत्यू झाला तरीही हा आकडा सव्वा कोटींच्या वर जातो.
शिवाय एकदा या रोगातून बरं झालेल्याची इम्युनिटी किती काळ टिकते, हे देखील अजून स्पष्ट नाही.
लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी तयार करायची असेल तर मुळात त्यासाठी आपल्याकडे लस उपलब्ध असणं गरजेचं आहे. कोव्हिड-19 साठीची लस अद्याप उपलब्ध नाही. जगभर त्यासाठीचं संशोधन सुरू आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे कोव्हिड-19 साठीचे विशेष दूत डेव्हिड नबारो यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसीला मुलाखत दिली होती.
त्यात त्यांनी म्हटलं होतं, "सगळ्या अंदाजांनुसार सुरक्षित आणि परिणामकारक लस विकसित व्हायला किमान 18 महिने लागतील. आणि अशा अनेक लसींची आपल्याला गरज असेल. त्यानंतर लसींचं उत्पादन आणि वापर सुरू होईल. जगभरातल्या 7.8 अब्ज लोकांपर्यंत ही लस पोहोचायला आणखी वर्षभराचा कालावधी लागेल."

फोटो स्रोत, Prakash singh
म्हणजे ही लस सगळ्यांपर्यंत पोहोचायला पुढची किमान अडीच वर्षं लस लागतील. शिवाय लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी लोकसंख्येतल्या ठराविक टक्के लोकांना लस द्यावी लागते. या प्रमाणाला म्हणतात - थ्रेशहोल्ड (Threshold). ही टक्केवारी जर खाली आली, तर आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो.
हर्ड इम्युनिटीवर कोणत्या देशानं भर दिलाय?
जगभरातले देश लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारत असताना एका देशाने मात्र लॉकडाऊन न लावता लोकांसाठी फक्त काही मर्यादा घालून दिल्या. हा देश होता स्वीडन.
1 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या युरोपीय देशात लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगण्यात आलं.
वयोवृद्धांना जपण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वं सांगण्यात आली, पण रोजच्या व्यवहारांवर बंधन घालण्यात आलं नाही. वैज्ञानिक आणि संशोधकांनी अभ्यासानंतर सुचवलेल्या गोष्टी आपण अंमलात आणत असल्याचं तिथल्या सरकारने म्हटलं आणि लोकांनी याला पाठिंबा दिला.
मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 26% लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता तिथल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. राजधानी स्टॉकहोममध्ये राहणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना संसर्ग होईल असाही अंदाज होता. पण कठोर निर्बंध लावलेल्या देशांत राहणाऱ्या लोकांपेक्षा स्वीडनमधल्या लोकांची इम्युनिटी जास्त असेल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
अर्थात, यावर टीकाही झाली. स्वीडीश सरकारची धोरणं योग्य नसल्याचं सांगणाऱ्यांमध्ये काही वैज्ञानिकही होते. त्यातच आता स्वीडनमधल्या 'केअर होम्स'मधल्या वृद्धांच्या मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. म्हणूनही टीका होतेय. 19 मे पर्यंत स्वीडनमध्ये 3,698 मृत्यू झाले होते. यापैकी बहुतेकांचं वय 70 वर्षांपेक्षा जास्त होतं.
पण आपण हे सगळं हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यासाठी केलं नाही, तर सौम्य स्वरूपाचे निर्बंध लावले तर त्याचं पालन दीर्घकाळ होऊ शकतं, म्हणून असं करण्यात आल्याचं स्वीडीश पब्लिक हेल्थ एजन्सीचं म्हणणं आहे.
ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्याऐवजी गोष्टी सुरू राहू द्याव्या, असा सुरुवातीला मतप्रवाह होता. पण जर युकेमध्ये लॉकडाऊनसारखी पावलं उचलण्यात आली नाहीत तर ऑगस्ट महिन्यापर्यंत 81% लोकांना कोरोनाचा संसर्ग होईल आणि सुमारे 5,10,000 जणांचा बळी जाईल असं सांगणारा रिपोर्ट इम्पिरियल कॉलेजने सादर केल्यानंतर युके सरकारने आपलं धोरण बदललं.
हर्ड इम्युनिटी भारतात शक्य आहे का?
हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी लोकांनी त्या विषाणूला 'एक्स्पोज' व्हावं लागतं. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार यापूर्वी कांजिण्यांसारख्या अनेक रोगांच्या बाबत पूर्वी लोक स्वतःची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्वतःला या रोगाला एक्स्पोज करायचे.
पण कोव्हिड-19 बाबत हे शक्य नाही. कारण आतापर्यंतच्या इतर रोगांपेक्षा कोव्हिडचं स्वरूप गंभीर आहे. या विषाणूमुळे होणारा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि यामध्ये जीव जाण्याची शक्यता असते.
वयाने ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजाराशी लढत असल्याने इम्युनिटी कमी असणाऱ्यांना या रोगाचा धोका जास्त आहे.

फोटो स्रोत, EPA
भारतामध्ये तरूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हर्ड हर्ड इम्युनिटी तयार करण्यात या तरुण लोकसंख्येची भूमिका महत्त्वाची असू शकेल. पण सोबतच भारतातली लोकसंख्येची घनता, राहणीमान, पायाभूत सुविधा, इतर रोगांचा लोकसंख्येतला प्रादुर्भाव या सगळ्यांसोबतच - एकत्र कुटुंब पद्धतीसारख्या सांस्कृतिक गोष्टींचीही भूमिका यात महत्त्वाची आहे.
कारण अशा प्रकारे हर्ड इम्युनिटी तयार करताना तरुणांना ज्येष्ठांपासून वेगळं ठेवावं लागेल. आणि भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती प्रचलित आहे, त्यामुळे ज्येष्ठांना जास्त धोका निर्माण होतो.
शिवाय अशी हर्ड इम्युनिटी निर्माण होत असताना जाणाऱ्या बळींचा आकडा मोठा असेल, आणि हा राजकीय मुद्दा ठरेल.
हर्ड इम्युनिटीमुळे आटोक्यात आलेले रोग
याचं सगळ्यांत मोठं उदाहरण म्हणजे - गोवर, ज्याला इंग्रजीत Measles म्हणतात. 1968 मध्ये गोवरसाठीची लस तयार झाली. आता भारतात मीझल्स - रुबेला असं मिळून MR व्हॅक्सिन किंवा मीझल्स - मम्प्स - रुबेला - MMR व्हॅक्सिन दिलं जातं, यासाठीची मोहीम राबवली जाते.
2000 ते 2017 या कालावधीमध्ये गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 80 टक्क्यांनी कमी झाल्याचं भारत सरकारच्या नॅशनल हेल्थ पोर्टलवर म्हटलेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अशाच प्रकारच्या लसीकरण मोहीमांमुळे भारत 1977 मध्ये देवी मुक्त झाला. यानंतरच भारतात लसीकरणाची एक मोठी मोहीम सुरू झाली ज्याद्वारे BCG, OPV, DPT, थायरॉईड - पॅराटायफॉईडच्या लसी लहान बाळांना देण्यात येऊ लागल्या.
पोलिओ निर्मूलनासाठीची मोहीमही भारतामध्ये अजूनही राबवण्यात येतेय ज्याद्वारे 5 वर्षांखालच्या मुलांना पोलिओचे ड्रॉप्स देण्यात येतात.
एवढी प्रभावी लस कोव्हिडसाठी यायला वेळ लागेल. तोवर हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी कोट्यवधी लोकांना हा आजार होऊ देणं हे महागात पडू शकतं. त्यामुळे आपल्या हातात एवढंच आहे की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं, हात धुवायला हवे आणि आपल्या घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्यायला हवी.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








