उर्मिला मातोंडकर : राष्ट्र सेवा दल ते शिवसेना व्हाया बॉलिवूड आणि काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता.
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त जागांसाठी कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे समजत होतं. ही जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली असल्याने उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अजूनही यावर निर्णय झाला नाही.
यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी 2019 लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. नुकताच त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेत्री कंगना राणावत यांच्या भूमिकांना आव्हान दिल्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या.
मुंबई पोलिसांवर टीका केल्यानंतर कंगना राणावत यांनी मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कंगनावर निशाणा साधला.
कंगना राणावतला भाजपचं तिकीट हवं असल्यामुळे तिने असा प्रकार सुरू केल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला.
कंगना राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. उर्मिलाच्या प्रतिक्रियांवर कंगना राणावतने उर्मिला मातोंडकर 'सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री'असल्याचं म्हटलं होतं.

हा वाद सुरू असताना उर्मिला मातोंडकर यांनी "बदल्याची भावना मानवाला जळवते. संयम हाच बदल्याच्या भावनेवर नियंत्रण आणण्यासाठीचा उपाय आहे. शिवाजी महाराज अमर रहे," असं वाक्य लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला.
कंगना राणावतने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरही थेट आरोप केले होते. शिवाय, तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका केली.
अशावेळी उर्मिला मातोंडकर या मोजक्या अशी अभिनेत्रींपैकी एक होत्या, ज्यांनी कंगना राणावतला प्रत्युत्तर दिलं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही याचा फायदा झाला.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित 12 जागा रिक्त असताना, यात कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे उर्मिला मातोंडकर यांची नवी राजकीय कारकीर्द सुरू होण्याची शक्यता आहे.
'माझ्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार'
उर्मिला मातोंडकर यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 साली एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. त्यांचं वास्तव्य मुंबईत आहे.
उर्मिला मातोंडकर यांचे वडील श्रीकांत मातोंडकर यांचा अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग होता. ते कामगार नेतेसुद्धा होते आणि ते राष्ट्र सेवा दलाशी संबंधित होते.

फोटो स्रोत, Getty Images
माझ्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आहेत, असं उर्मिला मातोंडकर यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माध्यमांना मुलाखती देताना आपली बांधिलकी साने गुरूजी आणि राष्ट्र् सेवा दलाच्या विचारांशी असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं होतं.
1980 साली बालकलाकार म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी श्रीराम लागू यांच्या 'झाकोळ' या मराठी चित्रपटापासून काम करण्यास सुरुवात केली. तर त्याचवर्षी त्यांनी'कलयुग' या हिंदी चित्रपटातही काम केलं.
साधारण 2007 पर्यंत उर्मिला मातोंडकर सिनेमांमधून मुख्य अभिनेत्री म्हणून दिसत असत.
बालकलाकर ते बॉलिवूड अभिनेत्री
1983 साली प्रदर्शित झालेल्या मासूम चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं आणि त्या प्रकाशझोतात आल्या.
1990 आणि 2000 नंतरच्या दशकात नरसिम्हा, रंगीला, जुदाई, सत्या, दौड, खुबसूरत, भूत, जंगल, प्यार तूने क्या किया यांसारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
2014 मध्ये उर्मिला मातोंडकर काही वर्षांच्या ब्रेकनंतर 'आजोबा' या मराठी चित्रपटात झळकल्या.
उर्मिला मातोंडकर यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
काश्मीरमधील उद्योगपतीशी लग्न
उर्मिला मातोंडकर यांनी 3 मार्च 2016 रोजी काश्मिरी उद्योगपती आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीर यांच्याशी विवाह केला. ते उर्मिला यांच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/URMILA MATONDKAR
लग्नानंतर उर्मिला यांनी DNA ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं, "आम्ही आमच्या लग्नात फक्त कुटुंबीय आणि मित्रांना बोलावलं होतं. कारण लग्न साध्या पद्धतीनं व्हावं अशी आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे ते अत्यंत खासगी पद्धतीनं झालं."
या दोघांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं झालं होतं. त्यांच्या लग्नाला प्रसिद्ध व्यक्तींपैकी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये प्रवेश आणि राजीनामा
27 मार्च 2019 रोजी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता.

फोटो स्रोत, INSTAGRAM/URMILAMATONDKAROFFICIAL
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा 2019 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान होतं.
या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला होता. यानंतर सहा महिन्यातच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)








