रानगवा: 1000 किलोपर्यंत वजन मात्र लाजाळू प्राणी आणि खातो गवत

पुणे, रानगवा, प्राणी
फोटो कॅप्शन, पुण्यात आलेला रानगवा
वाचन वेळ: 3 मिनिटे

प्रचंड आकारामुळे माणसाला भीती वाटू शकतो पण रानगवा मात्र लाजाळू असतो. गवत, पानं खाऊन जगतो.

पुण्यात बुधवारी कोथरुड भागातल्या महात्मा सोसायटीत रानगवा शिरला. पोलीस, अग्निशमन दल, वनविभाग यांनी बघ्यांच्या गर्दीला प्रतिकार करत या रानगव्याची सुटका करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. भुलीचं इंजेक्शन देऊन तसंच जाळीचा वापर करून त्याला रोखण्यात आलं. भूगावच्या प्राणी केंद्रात त्याला नेण्यात आलं. मात्र रानगव्याने तिथे प्राण सोडले.

मानवी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांच्या निमित्ताने प्राणी विरुद्ध माणसं हा संघर्ष अनेक महानगरांमध्ये तीव्र होताना दिसतो आहे. पुण्यातल्या गच्च लोकवस्तीच्या भागात आलेल्या रानगव्याविषयी फार माहितीही लोकांना नव्हती.

सुरुवातीला अनेकांना म्हैसच वाटली, मात्र रंग, चेहरा आणि आकारमान पाहून हा वेगळा प्राणी असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं. रानगव्याची गुणवैशिष्ट्यं काय असतात हे आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून जाणून घेतलं.

पुण्यातल्या शहरी भागात आलेला गवा नर होता. त्याचं वजन जवळपास 700 ते 800 किलो एवढं होतं. पाच ते साडेपाच फूट एवढी त्याची उंची होती.

पुणे शहरालगतच्या मुळशी, वेल्हा, पुरंदर हे तालुके आहेत. या भागात दाट झाडी आणि डोंगरारांगा आहेत. पुण्याच्या काही भागात बिबट्या आला होता. सात वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात गवा आला होता.

पुणे, रानगवा, प्राणी

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, रानगवा

"पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण 700-1000 किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असतो," असं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितलं.

त्यांनी रानगव्याच्या गुणवैशिष्ट्यांसंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, "पुण्यात घडलेल्या प्रकारातही गव्यासमोर पाचशेहून अधिक माणसं होती. त्यांच्यापैकी एकालाही छोटी जखमही झाली नाही. गव्याने त्यांना काहीही केलं नाही. म्हैस असती तर उपस्थित लोकांपैकी एखाद्याला फ्रॅक्चर किंवा गंभीर जखम झाली असती. रानटी म्हशी आक्रमक असतात, त्या एकत्र येऊन सिंहावर हल्ला करू शकतात पण गवा तसं करत नाही. कळपाने राहतात."

पुणे, रानगवा, प्राणी

फोटो स्रोत, DESHAKALYAN CHOWDHURY

फोटो कॅप्शन, रानगवा

"प्राणी मानवी वस्तीत येतात तेव्हा गोंधळलेले, घाबरलेले असतात. गर्दी न करता त्यांना मोकळीक दिली तर वनविभाग योग्य ती कार्यवाही करून संबंधित प्राण्याला त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी किंवा जवळच्या जंगलात सोडून देतात. गर्दीला रोखण्यात पोलीस तसंच स्थानिक प्रशासनाची भूमिकाही मोलाची असते.

"पाण्याचा फवारा मारणं तसंच प्राण्याला रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये अग्निशमन दलाची महत्त्वाची असते. या विभागांमधील समन्वयातून प्राण्याला परत सुरक्षितपणे जंगलात पाठवता येऊ शकतं. सर्वसामान्य माणसांनी अशा परिस्थितीत घरी राहावं," असं पेठे यांनी सांगितलं.

पुणे, रानगवा, प्राणी

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, पुण्यात गव्याचा मृत्यू झाला.

पुणे शहरालगतच्या मुळशी, वेल्हा, पुरंदर हे तालुके आहेत. या भागात दाट झाडी आणि डोंगरारांगा आहेत. पुण्याच्या काही भागात बिबट्या आला होता. सात वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरात गवा आला होता.

महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी रानगव्याबद्दल सविस्तर महिती दिली. ते म्हणाले, "रानगवा हा तृणभक्षी वन्यप्राणी आहे. बांबूची पानं, गवत खातो. बोव्हिड हे त्याचं मूळ कुळ. गायीगुरं, म्हशींचही हेच कुळ असतं. या कुळातला सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे गवा.

"इंग्रजीत त्याला Indian Gaur किंवा Indian Bison असं म्हटलं जातं. नर गव्याचं जसं वय वाढत जातं तसा तो काळ्या रंगाचा होतो तर मादी गव्याचा रंग तपकिरी असतो. पिल्लं पिवळसर रंगाची असतात. गवे साधारणत: कळपात वावरणारे असतात. ते निशाचर असतात."

पुणे, रानगवा, प्राणी

फोटो स्रोत, XAVIER GALIANA

फोटो कॅप्शन, रानगवा

"गव्याची घाणेंद्रियं तीक्ष्ण असतात. त्यामुळे वास तीव्रतेने कळतात मात्र ऐकण्याची क्षमता आणि दृष्टी तितकी सक्षम नसते. प्रचंड शरीर आणि वास ओळखण्याची हातोटी हे गव्याचं गुणवैशिष्ट्य असतं," असं खरे यांनी सांगितलं.

"पूर्ण वाढ झालेल्या गव्याचं वजन हजार किलोपर्यंत असू शकतं. गव्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पायांचा रंग. पायात मोजे घालावे तसा हा रंग असतो. त्याला स्टॉकिंग्ज म्हणतात. हा रंग गव्याला म्हशींपासून वेगळा करतो. नोव्हेंबर ते मार्च हा गव्यांचा प्रजननकाळ असतो.

"गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. गव्यांमध्ये आपापसात मारामारी होतात पण मुद्दाम त्यांनी माणसावर हल्ला केला असं होत नाही. पुण्यात आलेल्या गव्याने कोणालाही जखमी केलं नाही. कात्रजच्या केंद्रात त्याच्या जखमांवर उपचार करून त्याला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात नेणार होते. मात्र प्रचंड गर्दी, आवाज याने तो गोंधळून गेला आणि त्याचा दुर्देवी मृत्यू झाला."

पुण्याच्या आसपास गव्यांचा अधिवास ऐकिवात नाही. बुधवारी पुण्यात शिरलेला गवा आपल्या कळपापासून भरकटला असावा असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)