BBC ISWOTY: बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ची नामांकनं जाहीर, तुमच्या आवडत्या खेळाडूला इथे मत द्या

महिला खेळाडू

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 4 मिनिटे

बीबीसी न्यूजने आज दिल्लीत झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर' या पुरस्कारासाठी यावर्षी निवड करण्यात आलेल्या पाच नामांकनांची घोषणा केली.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा क्षेत्रातले तज्ज्ञ आणि बीबीसीच्या संपादकांनी या नावांची निवड केली आहे. पुरस्कारासाठी मतदान आता सुरू झालं आहे आणि तुम्ही बीबीसीच्या भारतीय भाषा सेवांचे प्लॅटफॉर्म किंवा बीबीसी स्पोर्ट्स वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूसाठी मतदान करू शकता.

मतदान करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

पाच नामांकनं आहेत:

  • द्युती चंद , क्रीडा प्रकार : अॅथलेटिक्स
  • कोनेरू हंपी , क्रीडा प्रकार : बुद्धिबळ
  • मनू भाकेर , क्रीडा प्रकार : नेमबाजी (एअरगन शूटिंग)
  • रानी, क्रीडा प्रकार : हॉकी
  • विनेश फोगाट, क्रीडा प्रकार : कुस्ती (फ्रीस्टाईल रेसलिंग)
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

या पुरस्कारांविषयी बोलताना बीबीसीच्या भारतीय भाषा सेवा प्रमुख रूपा झा म्हणाल्या, "यावर्षीची ISWOTY विजेती ठरवण्यासाठी जगभरातले लोक सहभागी होतील आणि या अनिश्चित काळात गेमचेंजर म्हणून काम करणार्‍या सर्वोत्कृष्ट महिला स्पोर्ट्स स्टारला मतं देतील, अशी मी आशा करते."

बीबीसीचे एशिया पॅसिफिक विभागातले बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख इंदू शेखर म्हणतात, "आम्ही या प्रतिष्ठित क्रीडा पुरस्काराचं दुसरं वर्ष साजरं करण्यास तयार आहोत, याचा मला आनंद वाटतो आणि 'स्पोर्ट्स हॅकेथॉन' आणि 'इंडियन गेमचेंजर सीरिज'च्या माध्यमातून प्रतिभावान आणि उदयोन्मुख महिला खेळाडूंची ऑनलाईन उपस्थिती वाढवण्याचं आमचं लक्ष्य आहे."

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरच्या दुसऱ्या हंगामासाठी नामांकनांची घोषणा होताना पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशी म्हणाली, की "बीबीसीच्या या उपक्रमामुळे लोकांना क्रीडाक्षेत्रातील महिलांविषयी अधिक माहिती मिळतेय. त्यामुळे लोकांमध्ये माझ्या खेळाविषयी विशेष कुतूहल निर्माण झालंय - पॅरा बॅडमिंटन."

तर माजी ऑलिम्पियन पी. टी. उषा म्हणाल्या की, "पुरेशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी न होता आल्याने माझे पदक हुकले. आता परिस्थिती सुधारत आहे, पण आम्हाला अजूनही त्यावर काम करायची गरज आहे."

नामांकित खेळाडूंच्या प्रतिक्रिया

नामांकनांची यादी जाहीर झाल्यानंतर नामांकनं मिळालेल्या खेळाडूंनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

द्युती चंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, द्युती चंद

द्युती चंद : "बीबीसी पुरस्काराच्या दुसऱ्या वर्षीही मला नामांकन मिळालं, याचा मला आनंद आहे. भारतात हल्ली लोकांमध्ये खेळाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे, हे बघून खूप छान वाटतंय. कितीतरी खेळाडू आज स्वतःचा ठसा उमटवत आहेत, पैसे कमावत आहेत आणि देशाची शानही वाढवत आहेत."

मनू भाकेर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनू भाकेर

मनू भाकेर : "हे नामांकन म्हणजे माझी स्वतःची माणसं माझी पाठ थोपटत असल्यासारखं आहे आणि म्हणून हे नामांकन माझ्यासाठी खूप खास आहे. लोक माझ्या कामगिरीचं कौतुक करतात आणि माझी कठोर मेहनत त्यांना दिसते, हे माझ्यासाठी खूप आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देते."

कोनेरू हंपी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोनेरू हंपी

कोनेरू हंपी : "पुरस्कारापेक्षा नामांकन मिळणं हेच माझ्यासाठी मोठं यश आहे. मला वाटतं खेळात जिंकणे किंवा हरणे याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या खेळाचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे आणि तेही या कोरोनाकाळात. बीबीसी ISWOTY पुरस्कार सोहळा आम्हाला आनंदित होण्याची आणि जगातल्या इतर खेळाडू आणि लोकांसोबत आनंद साजरा करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे."

रानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रानी

रानी : "महिला खेळाडूंचा त्यांच्या कामगिरीमुळे गौरव होत आहे, ही बाब प्रेरणा देणारी आहे. मी प्रत्येक महिलेला विनंती करते की, त्यांनी एक तरी खेळ खेळावा, कारण खेळामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते."

विनेश फोगाट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विनेश फोगाट

विनेश फोगाट : "पूर्वी कुस्तीकडे बघून माझ्या गावातली लोकं विचारायची, 'तुम्ही मुलींना हे काय शिकवताय?' पण आता घरी मुलगी जन्माला आली की ते म्हणतात आम्ही हिला कुस्तीपटू बनवणार आणि ते खरंच तसं करतातही. आमच्या पदकातून आम्ही हा बदल घडवला आहे आणि आम्ही मुलींच्या आयुष्यात बदल घडवू शकत असू तर हे माझ्यासाठी एखाद्या पदकापेक्षा कमी नाही."

मतदान कसं करायचं?

मतदान मोफत आहे आणि BBC News, BBC Hindi, BBC Marathi, BBC Gujarati, BBC Punjabi, BBC Tamil, BBC Telugu या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मतदान करू शकता.

24 फेब्रुवारी रात्री साडेअकरा वाजता (1800 GMT) मतदान बंद होईल.

8 मार्च रोजी होणाऱ्या व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात BBC ISWOTY पुरस्काराच्या विजेतीची घोषणा होईल. त्यासोबतच जीवनगौरव पुरस्कार आणि उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारांचाही घोषणा होईल.

बीबीसी स्पोर्ट्स हॅकेथॉन - (18 फेब्रुवारी)

बीबीसीने 'स्पोर्ट्स हॅकेथॉन'चीही घोषणा केली आहे. यात 50 भारतीय महिला खेळाडूंच्या इंग्रजी आणि 6 भारतीय भाषांमध्ये 300 हून अधिक विकिपीडिया नोंदी तयार केल्या जातील. बीबीसी हॅकेथॉनमध्ये दिल्ली, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पाँडेचेरीमधल्या 13 संस्थांमधील पत्रकारिता विभागातील विद्यार्थी सहभागी होतील.

हॅकेथॉनची छोटीशी झलक म्हणून भारताच्या पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी जोशी यांच्या इंग्रजीतील विकिपीडिया प्रोफाईलमध्ये आणि क्रीडा प्रवासात अधिक तपशील जोडण्यात आला आहे. तसंच हा तपशील आता हिंदीमध्येही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेतही हे दाखवण्यात आलं - Manasi Joshi_English, Manasi Joshi_Hindi.

18 फेब्रुवारी रोजी बीबीसीच्या भारतीय भाषा सेवांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पोर्ट्स हॅकेथॉन लाईव्ह बघता येईल.

दि इंडियन गेमचेंजर्स : भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या पाच महिला खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास या विशेष मालिकेतून उलगडणार आहे. अनेक प्रकारच्या अडथळ्यांची शर्यत पार करत या महिला खेळाडू खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरल्या आहेत.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)