प्रताप सरनाईक यांनी उध्दव ठाकरेंना पत्र लिहिण्याची ही आहेत तीन कारणं?

प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, शिवसेना, भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, प्रताप सरनाईक
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलंय. या पत्रात सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शिवसेनेने पुन्हा जुळवून घ्यावे असं मत व्यक्त केलं आहे.

या पत्रात प्रताप सरनाईक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर काही आरोपही केले आहेत. सरनाईक त्यांच्या पत्रात म्हणतात, "कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांची कामं होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आपला पक्ष जर कोणी कमकुवत करत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे असे माझे वैयक्तिक मत आहे. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिला जाणारा नाहक त्रास थांबेल."

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रताप सरनाईक यांनी आता हे पत्र का लिहिलं असावं? असा प्रश्न उपस्थित होतोय. हे पत्र लिहिण्यामागे नेमकी काय कारणं असावीत, याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

1. तपास यंत्रणांचा ससेमिरा

'टॉप्स सिक्युरिटी' गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. 24 नोव्हेंबर 2020 ला प्रताप सरनाईक यांचं घरं, कार्यालय, हॉटेल्स या विविध ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर पुत्र विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक आणि स्वतः प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून सरनाईक यांच्या विविध मालमत्तेवर छापे टाकले जातायेत.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

गेले अनेक दिवस प्रताप सरनाईक हे सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. त्यामुळे भाजपकडून काही दिवसांपासून प्रताप सरनाईक फरार असल्याचा आरोपही केला जात होता. शिवसेनेच्या वर्धापनदिनी सरनाईक हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसले.

त्याच्या दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र समोर आलं. या पत्रात सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख करत म्हटलं आहे, "पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जर शिवसेनेने जुळवून घेतलं तर प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, अनिल परब या आपल्या सहकाऱ्यांना होणारा नाहक त्रास थांबेल.

प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, शिवसेना, भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Facebook/Pratap Sarnaik

फोटो कॅप्शन, प्रताप सरनाईक

याबाबत 'लोकमत'चे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "प्रताप सरनाईक यांच्यामागे लागलेला तपास यंत्रणांचा ससेमिरा थांबवण्यासाठी हे पत्र लिहिण्यात आल्याचं प्रामुख्यानं दिसतंय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिण्यासाठी सध्याचं राजकीय वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे त्यांनी ही संधी साधली असावी."

2. सरकारमध्ये प्रताप सरनाईकांना पद मिळालं नाही

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री पदापासून जुन्या नेत्यांना डावलण्यात आलं. नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली. प्रताप सरनाईक यांचं मंत्रिपदासाठी नाव समोर येत होतं. पण प्रत्यक्षात सरनाईक यांच्या पदरात काहीच पडलं नाही.

प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, शिवसेना, भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक

याउलट सरनाईक यांच्याबरोबर एकत्र राजकीय सुरुवात केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीत महत्त्वाचे मंत्री झाले. त्यानंतर सरनाईक यांनी शिवसेनेचे आमदार म्हणून सुशांत सिंह राजपूत प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणारे रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याबाबत हक्कभंग आणण्याची भूमिका घेतली.

यानंतरच प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांना कायम अडचणींना सामोरं जावं लागलं का?

"ठाण्यातून एकनाथ शिंदे हे इतकं मोठं नेतृत्व असताना एकाच ठिकाणी दोन मंत्रिपदं देणं कठीण होतं. हे सरकार आल्यापासून प्रताप सरनाईक यांना अडचणींना तोंड द्यावं लागतय हे खरं आहे," असं संदीप प्रधान सांगतात.

3. शिवसेनेतील नाराज नेत्यांच्या फळीचं नेतृत्व?

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची कामं होतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आमदारांची कामं होत नाहीत, असा समज गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या काही आमदारांमध्ये झाला असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. अशा आमदार आणि नेत्यांच्या मनातील ही भावना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे का?

प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक, शिवसेना, भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, प्रताप सरनाईक

याबद्दल बोलताना संदीप प्रधान म्हणतात, "सरकारमध्ये सर्वांचीच कामं होत नाहीत. कामं होत नाही म्हणून कॉंग्रेसचीही नाराजी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं होत आहेत. काही प्रमाणात शिवसेनेची कामं होत आहेत. एका विशिष्ट कारणासाठी सत्ता बदल होत नसतो. त्याचा चारही बाजूंनी विचार करावा लागतो. त्याच्या परिणामांचा विचार करावा लागतो. एका आमदाराच्या मागणीमुळे कोणताही निर्णय घेता येत नाही."

"प्रताप सरनाईकांनी हे पत्र लिहिणं यात त्यांचा व्यक्तिगत हेतू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा त्रास हाच त्याचा केंद्रबिंदू आहे," असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.

"राष्ट्रवादी आपले कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सरनाईकांनी म्हटलं आहे. ज्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना ठाकरेंच्या नाराजीनंतर पुन्हा सेनेत पाठवले. त्यामुळे खूप मोठं असं काही घडलं नाही. नाराज नेत्यांचं नेतृत्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी त्याचा केंद्रबिंदू हा व्यक्तिगत असल्याने त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही", असंही अभय देशपांडे यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)