बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुस्लीम लीगशी हातमिळवणी केली होती...

फोटो स्रोत, RajuParulekar
भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणीची तयारी दर्शवलीय.
जलील यांच्या या ऑफरनंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्यात, सोबत भाजपमधूनही शिवसेनेवर टीका सुरू झालीय.
"MIM ही भाजपची B टीम आहे. अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तींसोबत भाजप सत्तेत सहभागी झाला होता. तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे शक्य नाही. त्यामुळे MIM सोबत आघाडी करण्याचा प्रश्नच नाही, मेलो तरी MIM शी युती नाही," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत युती केली होती, याचा भाजपला विसर पडला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्हाला 'जनाब सेना' मग तुम्हाला 'हिजबुल सेना' म्हणायचं का, असं ते म्हणाले.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला, असंही भाजप नेते उद्या म्हणू शकतील. त्यांचं हिंदुत्व हे राजकारणापुरतं आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुस्लीम लीगशी हातमिळवणीचा इतिहास
शिवसेनेची एमआयएमबाबत भूमिका विरोधाची असेल, असा सूर शिवसेनेतूनच असला तरी इतिहासात डोकावल्यास शिवसेना विरोधी विचारांच्या पक्षांसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे दिसून येते.
अगदी आता महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांशी शिवसेनेनं आजवर संघर्ष केला होता, मात्र 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर जुळलेल्या सत्ता-समीकरणात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत जाऊन बसलीय.

फोटो स्रोत, Getty Images
असाच इतिहास मुस्लीम लीगबाबत आहे. इम्तियाज जलील यांनी शिवसेना सहभागी असलेल्या महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर शिवसेनेच्या मुस्लीम लीगसोबतच्या युतीच्या घटनेची अनेकांनी आठवण काढलीय.
तर आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत, शिवसेना आणि मुस्लीम लीगच्या त्या ऐतिहासिक युतीची गोष्ट.
मुस्लीम लीग-शिवसेना युती
1972-73 साली शिवसेनेनं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (रा. सू गवई गट) सोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवली. मात्र, महापौर करण्यास शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या.
यावेळी शिवसेनेनं मुस्लीम लीगचा पाठिंबा घेतला आणि शिवसेना नेते सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर झाले.
'मुस्लीम लीगच्या पाठिंब्यावरच सुधीर जोशी मुंबईच महापौर बनले होते, असं म्हटल्यास वावगं ठरू नये,' असं बाळ ठाकरे अँड राइज ऑफ शिवसेना पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार वैभव पुरंदरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर 1979 साली शिवसेना आणि मुस्लीम लीगचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते.
या दोन्ही पक्षांची जवळकी अगदीच अल्पायुषी ठरली. मात्र, शिवसेनेच्या इतिहासातील महत्वाची घडामोडी म्हणूनच या युतीकडे पाहिलं गेलं. कारण पुढे नव्वदच्या दशकात जेव्हा शिवसेनेनं हिंदुत्वाचं राजकारण करण्यास सुरुवात केली, तेव्हा विरोधकांकडून सेनेच्या मुस्लीम लीगसोबतच्या युतीच्या घटनेची आठवण करून दिली जात असे.
मस्तान तलाव पटांगणातली सेना-मुस्लीम लीगची सभा
या युतीची एक सभा मुंबईच्या नागपाड्यातील मस्तान तलाव पटांगणात झाली होती. हा सर्व परिसर भगव्या आणि हिरव्या झेंड्यांनी बहरला होता.
योगेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या 'शिवसेना : समज-गैरसमज' या पुस्तकात या सभेचा वृत्तांत दिला आहे.
नेबरहूड हॉलपासून मस्तान तलाव पटांगणातील व्यासपीठापर्यंत मुस्लीम तरुणांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वागत केलं होतं. 'शिवसेना जिंदाबाद', 'मुस्लीम लीग जिंदाबाद', 'बाळासाहेब जिंदाबाद' अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमला होता.
मस्तान तलाव पटांगणातील व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लीम लीगचे गुलाम मेहमूद बनातवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसंच, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, ठाण्याचे नगराध्यक्ष सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, झैदी, जिलानी, साबीर शेख, छनग भुजबळ, दत्ता नलावडे ही नेतेमंडळीही व्यासपीठावर उपस्थित होती.
या व्यासपीठावरून बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं भाषण त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.

फोटो स्रोत, Getty Images
बाळासाहेब भाषणात म्हणाले होते, "यापुढे शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकसाथ लढा उभारतील. आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने किंवा देवाणघेवाणीतून झालेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता कुठे निवडणूक नाही की काही नाही. ना आगे ना पिछे! कोणाच्या मतांचा विचार करायचा तर तसंही नाही.
आजच्या या जुलूसमध्ये मी सामील झालो. शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी सर्व जातीजमातीमधील बांधवांना आवाहन केलं होतं. धर्माच्या नावाखाली कोणीतरी भडकवतो. डोक्यात शांतता ठेवून आणि एक दिलाने काम कर. जातपात विसरून जा."
शिवसेनेच्या काही निवडक भूमिका
1966 सालच्या ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेनं पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्कात पहिली सभा आयोजित केली होती. या सभेला काँग्रेसचे नेते रामराव आदिक उपस्थित होते.
1968 साली शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढली. यावेळी सेनेनं मधू दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली होती.
1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला शिवसेनेनं समर्थन दिलं होतं.
1977 साली शिवसेनेनं काँग्रेसच्या मुरली देवरा यांना मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता.
1980 साली काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना श्रीवर्धन (रायगड) मतदारसंघात शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.
काँग्रेसपुरस्कृत प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. प्रतिभा पाटील यांना मराठी म्हणून, तर प्रणव मुखर्जी सेनेच्या पाठिंब्यासाठी थेट 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना भेटले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








