कोरोना व्हायरस: चेहऱ्याला हात लावल्यानं विषाणूंचा संसर्ग होतो का?

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फर्नांडो दुआरते
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मानव आणि इतर प्राण्यांमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे, ज्यावेळी एखादी आजार किंवा रोगाची साथ पसरते, त्यावेळी मानव आपल्या सुरक्षेबद्दल चिंतेत पडतो.

तसंच, मानव हा एकमेव असा प्राणी आहे, जो नकळतपणे त्याच्या चेहऱ्याला हात लावतो. हीच सवय कोरोना व्हायरसला पसरण्यास मदत करतेय.

Presentational grey line
BBC
Presentational grey line

पण मानव असं का करतात, ही सवय मानव रोखू शकतो का?

'चेहऱ्याला हात लावण्याची सवय'

एका दिवसात आपण अनेकदा आपल्या चेहऱ्याला हात लावत असतो.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

2015 साली ऑस्ट्रेलियात वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचा अभ्यास केला गेला. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही ही सवय असल्याचं या अभ्यासातून समोर आलं.

खरंतर वैद्यकीय विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तरी चेहऱ्याला हात लावल्यानं असणाऱ्या धोक्यांबाबत जागृत राहायला हवं होतं. मात्र, त्यांनी एका तासात किमान 23 वेळा आपापल्या चेहऱ्याला हात लावल्याचं समोर आलं. तोंड, नाक आणि डोळे या अवयवांना या विद्यार्थ्यांनी वारंवार स्पर्श केला.

चेहऱ्याला वारंवार हात लावणं धोकायदायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सांगतात.

कोरोना व्हायरस पसरल्यानंतर सतर्कता म्हणून ज्या सूचना देण्यात आल्यात, त्यात प्रामुख्यानं हात स्वच्छ ठेवण्याच्या सूचनेवरच जोर देण्यात आलाय.

आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो?

मानव आणि आणखी काही सस्तन प्राणी चेहऱ्याला हात लावण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. बहुधा, हा मानवी विकासाचाच एक भाग असेल.

सस्तन प्राण्यांमधील काही प्रजाती चेहऱ्यावरील कचरा, कीडे इत्यादी गोष्टी हटवण्यासाठी चेहऱ्याला स्पर्श करतात. मात्र, मानव किंवा इतर काही सस्तन प्राणी इतर कारणांसाठी चेहऱ्याला वारंवार स्पर्श करत राहतात.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकास्थित यूसी बार्कले विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक डाचर केल्टनर सांगतात की, "कधी कधी एकप्रकारे स्वत:ला गोंजारण्यासारखं असतं. तर कधी कधी आपण आपल्या चेहऱ्याला अशाप्रकारे स्पर्श करतो की, जसं एखाद्या नाट्यगृहात नाटकातील दृश्य बदलताना पडद्याला इकडून तिकडं नेलं जातं. आपणही तसंच आपल्या चेहऱ्यावरील भावना बदलण्यासाठी स्पर्शाचा वापर करतो."

वर्तनशास्त्राचा अभ्यास करणारे तज्ज्ञ असं मानतात की, चेहऱ्याला स्पर्श करण्याचा संबंध स्वत:च्या भावना नियंत्रित करणं किंवा स्वत:कडे इतरांचा लक्ष वेधण्याशी आहे.

चेहऱ्याला नकळतपणे विनाकारण स्पर्श करणं मानवजातीचं हे मूळचं वर्तन असल्याचं जर्मनीतल्या लिपजिश विद्यापीठातले मानसशास्त्रज्ञ मार्टन ग्रनवाल्ड सांगतात.

ग्रनवाल्ड पुढे सांगतात, "स्वत:च्या चेहऱ्याला स्पर्श करणं हे स्वत:च्याच एखाद्या नियमाप्रमाणं असतात. खरंतर चेहऱ्याला करण्यात येणारे हे स्पर्श सर्वसाधारण संवादासाठी बनलेले नसतात. शिवाय, हे स्पर्श नकळतपणे केले जातात."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

"या क्रिया भावनिक आणि मानसिक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शिवाय, ही सवय सर्वांना असतात," असंही ग्रनवाल्ड म्हणतात.

स्वत:च्या चेहऱ्याला स्पर्श केल्याचा परिणाम असा होतो की, अस्वच्छ गोष्टी आपल्या डोळे, तोंड, नाकात जातात. पर्यायानं त्या शरीरात जातात.

कोरोना व्हायरसशी संबंधितच बोलायचं झाल्यास, एखादी व्यक्ती शिंकल्यानंतर उडालेले थेंब दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात शिरतात.

तसंच, ज्या गोष्टीवर विषाणू असेल, अशा गोष्टीला स्पर्श केल्यानंतर त्याचा संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो.

कोरोना व्हायरसबाबत तर धोकादायक बाबा अशी मानली जातेय की, कोरोनाचे विषाणू कुठल्याही ठिकाणी 9 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात.

व्हायरस अधिक दिवस जिवंत राहण्याचा धोका

व्हायरस अधिक दिवस जिवंत राहू शकत असल्यानं आपण चेहऱ्याला स्पर्श करणं धोकादायक ठरू शकतं.

2012 साली अमेरिका आणि ब्राझिलमधील संशोधकांना असं लक्षात आलं की, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वस्तूंना सर्वसामान्य लोक एका तासात तीनपेक्षा अधिक वेळा स्पर्श करतात. हेच लोक आपल्या चेहऱ्याला तासाभरात 3.6 वेळा स्पर्श करतात.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

ऑस्ट्रेलियातल्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासात हेच आकडे कमी होते. कारण वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करताना ते वर्गात होते. कदाचित हे यामुळं असेल की, वर्गाबाहेर किंवा इतरत्र तुम्हाला स्पर्श करण्यासाठी अनेक गोष्टी असतात.

लीड्स विद्यापीठाच्या प्राध्यापक स्टेफेन ग्रिफिन यांना वाटतं की, "मास्क वापरल्यानं लोकांची आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्याची शक्यता कमी होते. अस्वच्छ हातांनी चेहऱ्यांना स्पर्श करणं संसर्गाचं मोठं कारण ठरतं."

मग आपण काय करू शकतो?

आपल्या चेहऱ्याला आपल्या हाताचा कमीत कमीवेळा स्पर्श होईल, यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे पाहूया.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांचे सहकारी म्हणून काम केलेले कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि वर्तनशास्त्राचे तज्ज्ञ मायकल हॉलस्वर्थ यांना वाटतं की, "चेहऱ्याला स्पर्श करू नये, असं वाटणं सोपं आहे. मात्र, ते अमलात आणणं कठीण आहे."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, चेहऱ्याला स्पर्श होऊ नये, यासाठी काही गोष्टी मदत करू शकतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे, आपल्याला माहिती असतं की, आपण कितीवेळा चेहऱ्याला स्पर्श करतो.

"जेव्हा चेहऱ्याला खाज सुटली असेल, तेव्हा स्पर्श करणं अनिवार्य होऊन जातं, त्यावेळी आपण उलट्या हातानं चेहऱ्याला स्पर्श करू शकतो. यामुळं संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. अर्थात, हा काही पूर्ण उपाय ठरत नाही," असंही हॉलस्वर्थ म्हणतात.

चेहऱ्याला स्पर्श करण्याची आवश्यकता कधी असते?

आपण आपल्या चेहऱ्याला का स्पर्श करतो, हे आपण शोधलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, असंही वर्तनशास्त्रातील तज्ज्ञांना वाटतं.

हॉलस्वर्थ याबाद्दल सांगतात की, "आपल्याला कुठल्या कारणामुळं चेहऱ्याला स्पर्श करावा वाटतो, हे आपण ओळखलं पाहिजे. तरच आपण त्यावर उपाय करू शकतो. जे लोक वारंवार डोळ्यांना स्पर्श करतात, ते चश्मा वापरू शकतात."

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

आपण आपल्या हातांना व्यस्त ठेवण्यासाठी काही ना काही करत राहू शकतो. मऊ चेंडूंसारख्या वस्तूंचा वापर करू शकतो, ज्यामुळं आपले हात व्यस्त राहू शकतात. मात्र, असं करत असताना, सहाजिकच हात वारंवार स्वच्छ करावे लागतील.

हॉलस्वर्थ यांना वाटतं की, "चेहऱ्याला स्पर्श करण्याची क्रिया एखादी व्यक्ती वारंवार करत असेल, तर मित्रांना किंवा इतरांना सांगून, ते आठवण करून द्यायला सांगू शकतात."

कोरोना व्हायरस

मग अशावेळी हातमोजे वापरायचे का, असाही प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, हातमोजे वापरणं धोकायदायक ठरू शकतात, कारण ते स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. अन्यथा, त्यातूनच विषाणूंचा प्रसार होऊ शकतो.

हात धुणं सर्वात उत्तम उपाय

स्वच्छ पाण्यानं नीट हात धुणं यापेक्षा उत्तम उपाय नाहीय. अर्थात, त्याचसोबत सतर्कता बाळगणंही आवश्यक आहे.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसवरील लस आणि औषधांची वाट पाहत बसण्यापेक्षा हात धुवणं, चेहऱ्याला वारंवार स्पर्श न करणं अशा गोष्टींच्या मदतीनं आपण आपला बचाव करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनीही 28 फेब्रुवारी 2020 च्या एका संमेलनात सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)