कोरोना व्हायरस : परिस्थिती अधिक चिघळण्याचा WHOचा इशारा

कोरोना

फोटो स्रोत, Sopa Images

फोटो कॅप्शन, कोरोना
वाचन वेळ: 3 मिनिटे

ठोस पावलं उचलली नाही तर कोरोना विषाणूची परिस्थिती आणखी चिघळेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने 13 जुलैच्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, जगातले अनेक देश कोरोनाचा सामना करताना चुकीच्या दिशेने जात आहेत.

डॉ. टेड्रॉस पुढे असंही म्हणाले होते की कोरोना विषाणू संसर्गाच्या नवीन केसेस मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की जे उपाय सांगण्यात आले आहेत त्यांचं योग्य पालन होत नाहीय.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कोरोनाचा धोका संपलेला नाही असं म्हटलंय. 26 जुलैला देशाला संबोधून केलेल्या 'मन की बात' कार्यक्रमात मोदी म्हणाले की, "कोरोनाचं संकट टळलेलं नाही. सगळ्यांना इथून पुढे काळजी घ्यावीच लागणार आहे."

भारतातली कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहे. देशातला कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेचौदा लाखांवर पोहोचला असून मृतांची संख्या 32 हजारांवर गेली आहे. त्यामुळे WHO च्या महासंचलकांनी काही दिवसांपूर्वी दिलेला इशारा भारताला आजही लागू पडतोय.

जागतिक आरोग्य संघटनेने काय म्हटलं?

WHO च्या 13 जुलैच्या पत्रकार परिषदेत डॉ. टेड्रॉस म्हणाले, "कोरोना विषाणूची जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभरातले नेते ज्या पद्धतीची पावलं उचलत आहेत त्यातून संमिश्र संदेश जात असल्याने लोकांचा विश्वास कमी होऊ लागला आहे."

कोरोना
लाईन

ते म्हणाले, "सध्या हा विषाणू जगभरातल्या लोकांचा क्रमांक एकचा शत्रू आहे. मात्र, अनेक सरकारं आणि लोकांची कृती बघून तर तसं वाटत नाही."

सोशल डिस्टंसिंग पाळणं, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणं आणि गरजेच्या ठिकाणी मास्कचाा वापर करणं, अशा उपायांना गांभीर्याने घेतलं पाहिजे. नाहीतर नजिकच्या भविष्यात परिस्थिती पूर्वीप्रमाणे सामान्य होईल, असं वाटत नसल्याचा इशाराही डॉ. टेड्रॉस यांनी दिला.

"बेसिक गोष्टींचं पालन केलं नाही तर एकच मार्ग आहे. कोरोना थांबणार नाही. जागतिक आरोग्य संकट दिवसेंदिवस चिघळत जाईल."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना

जागतिक आरोग्य संघटनेनेचे आपातकालीन संचालक डॉ. माईक रायन यांनी सांगितलं की अमेरिकेत लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथील करण्यात आल्याने आणि काही भाग खुला करण्यात आल्याने 'संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर' झाला आहे.

कोरोना विषाणूमुळे लॅटिन अमेरिकेत 1 लाख 45 हजार मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात चाचण्याच होत नसल्याने ही संख्या यापेक्षा अधिक असण्याची दाट शक्यता आहे.

दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. ब्राझिलमध्ये अध्यक्ष बोलसोनारो यांनी कोरोना विषाणूची साथ आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाय योजना राबवायला नकार दिल्याने तिथेही कोरोनाचं संकट अधिक गडद होताना दिसतंय.

मोठी शहरं बंद केल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. मात्र, कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी काही विशिष्ट भागांमध्ये लॉकडाऊन करणं गरजेचं आहे, असं डॉ. रायन यांनी म्हटलं आहे.

जगभरातल्या सरकारांनी स्पष्ट आणि कठोर धोरणांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं. याविषयी सांगताना डॉ. रायन म्हणाले, "जनतेला परिस्थितीचं गांभीर्य कळायला हवं आणि उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं, त्यांनाही सुलभ व्हायला हवं."

लस किंवा प्रतिकारशक्ती

कोरोना विषाणूचं समूळ उच्चाटन होईल किंवा येत्या काही महिन्यात कोरोना विषाणू संसर्गावर लस येईल, या अपेक्षा अवास्तविक असल्याचं सांगताना डॉ. रायन म्हणाले, "आपण या विषाणूसोबत रहायला शिकायला हवं."

पुढे त्यांनी असंही सांगितलं की कोरोना संसर्गातून बरं झालेल्यांच्या शरीरात या विषाणूविरोधातली रोगप्रतिकारक क्षमता तयार होते का आणि होत असल्यासं ती किती काळ टिकते, हे अजून स्पष्ट नाही.

यासंदर्भात सोमवारीच किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या शास्त्रज्ञांनी एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. कोरोना विषाणूविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती शरीरात जास्त दिवस टिकत नसल्याचा निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना चाचणी

यासाठी 96 लोकांवर संशोधन करण्यात आलं. शरीर अँटिबॉडीज तयार करून नैसर्गिकरित्या कोरोनाचा सामना कसं करतं आणि ही रोगप्रतिकारक शक्ती शरीरात किती दिवस टिकते, हे या संशोधनात तपासण्यात आलं.

संशोधनात सहभागी झालेल्या सर्वांच्याच शरीरात अँटिबॉडीज होत्या आणि त्या कोरोना विषाणूचा सामना करून त्यांना नष्ट करू शकत होत्या. मात्र, 3 महिन्यात या अँटिबॉडीजची पातळी कमी होत असल्याचं आढळलं.

या पत्रकार परिषदेत तज्ज्ञांनी हेदेखील सांगितलं की 10 वर्षांखालच्या मुलांना कोरोना विषाणूची अतिसौम्य लागण होत असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, 10 वर्षांवरच्या मुलांमध्ये एखाद्या तरुणांमध्ये जी सौम्य लक्षणं आढळतात तशीच लक्षणं दिसतात.

शिवाय, लहान मुलांच्या माध्यमातून संसर्ग पसरण्याचं प्रमाण कमी असलं तरी ते नेमकं किती आहे, हे अजून स्पष्ट नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)