जेरुसलेम हिंसाचार : हमासच्या धमकीनंतर इस्रायलचा हवाई हल्ला

फोटो स्रोत, EPA
जगभरातील देशांनी पुन्हा एकदा इस्रायल आणि पॅलेस्टाइनला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय संघाने इस्रायल आणि पॅलेस्टाइननं लवकरात लवकर तणाव कमी करण्याचा आग्रह केला आहे.
सोमवारी (10 मे) रात्री पॅलेस्टाइनमधील काही कट्टरपंथीयांकडून जेरुसलेमवर रॉकेटनं हल्ला करण्यात आला. त्यानंतर या भागात हिंसाचार वाढला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलनंही गाझा पट्टीमध्ये काही ठिकाणी हल्ले केले.
कट्टरपंथी संघटना हमासचे किमान तीन लोक या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा इस्रायली लष्करानं केला आहे.
जेरूसलेममध्ये अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायली सुरक्षा दलांसोबत झालेल्या संघर्षामध्ये शेकडो पॅलेस्टिनी जखमी झाल्यानंतर सोमवारी (10 मे) कट्टरपंथी संघटना हमासनं हल्ला करण्याची धमकी दिली होती.
कट्टरपंथी संघटनेद्वारा करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं की, हमासनं आपली मर्यादा ओलांडली आहे आणि इस्रायल याला पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देईल.
जेरुसलेममध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली पोलिसांमध्ये सोमवारी (10 मे) सलग तिसऱ्या दिवशी चकमक झाली आहे.

फोटो स्रोत, Reuters
शहरातील अल-अक्सा मशिदीजवळ आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर ग्रेनेडनं हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
जेरुसलेमध्ये ज्यू लोकांनी काढलेल्या नॅशनलिस्ट मार्चपूर्वी ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात 20हून अधिक इस्रायली पोलीस आणि शेकडो पॅलेस्टिनी जखमी असल्याची बातमी आहे.
आज जेरुसलेम दिनाच्या औचित्यानं निघणाऱ्या फ्लॅग मार्चदरम्यान शहरात हिंसा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जेरुसलेम दिन हा 1967मध्ये इस्रायलकडून पूर्व जेरुसलेम परत मिळवण्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी ज्यू तरूण मुस्लीम भागातून एक मार्च काढतात.
पण हे म्हणजे जाणूनबुजून उसकावण्याची कृती असल्याचं बहुतेक पॅलेस्टिनी नागरिकांवना वाटतं. या दिवशाच्या आयोजन सोहळ्यात अनेकदा हजारोंची गर्दी पाहायला मिळाली आहे.
या दिवशी ज्यू लोक जुन्या जेरुसलेममधील वेस्टर्न वॉलपर्यंत मार्च काढतात. वेस्टर्न वॉलला ज्यू लोकांमध्ये एक पवित्र स्थळ मानलं जातं.

फोटो स्रोत, Reuters
आताचा हिंसाचार अल-अक्सा मशिदीजवळ घडून आला आहे. अल-अक्सा मशीद जुन्या जेरुसलेम शहरात आहे. ही मशिद मुस्लीम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. पण याच ठिकाणी टेंपल माऊंट हे ज्यू धर्मीयांचं पवित्र स्थळसुद्धा आहे.
वाद काय?
इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे. पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही. दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं.
गेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे. ईस्ट जेरुसलेमवर हक्क सांगणाऱ्या ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हिसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे.

फोटो स्रोत, Reuters
दोन्ही समुदायांतल्या वादामुळे या परिसरात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडताना दिसतात.
इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती, पण हिंसाचाच्या घटनांमुळे तिला स्थगिती देण्यात आली आहे.
नमाजानंतर हिंसाचार
7 मे रोजी रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिक जमा झाले होते.
इस्रायल पोलिसांचा दावा आहे, की नमाजनंतर इथे हिंसाचाराला सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

फोटो स्रोत, Reuters
त्यानंतर अक्सा मशिदीतील विश्वस्तांनी मशिदीच्या स्पीकरवरून शांतता राखण्याचं आवाहन केलं. पोलिसांनी स्टन ग्रेनेडचा वापर थांबवावा. तरूणांनी संयम बाळगावा आणि शांतता राखावी, असं आवाहन मशिदीतून करण्यात येत होतं.
आंतरराष्ट्रीय संघटनांनीही या परिसरातील तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.
येथील वाढत्या तणावामुळे आपण चिंताग्रस्त झालो आहोत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने एका प्रसिद्धीपत्रकामार्फत दिली आहे.
मध्य-पूर्वेत संयुक्त राष्ट्रांचे विशेष समन्वयक म्हणून काम पाहणारे टॉर वेनेस्लँड यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी जुन्या जेरुसलेममधील जैसे थे स्थितीचा सर्वांनीच सन्मान करावा, असं वेनेस्लँड म्हणाले. तसंच इस्रायलने तिथून कोणालाही हटवू नये. आंदोलनकर्त्यांविरोधात बळाचा वापर करताना त्यांनी संयम बाळगावा, असंही वेनेस्लँड यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








