आहार, Diet : कामामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बिघडतायत का?

ऑफिसमध्ये काम करताना खाणारी मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 6 मिनिटे

तुम्हाला कामामुळे दिवसभर फिरावं लागत असेल, पाळ्यांनुसार काम करावं लागत असेल किंवा खूप ताणाचं काम असेल, किंवा इतरही काही कारणं असतील, या सगळ्याचा तुमच्या आहारावर परिणाम होण्याची शक्यता असते.

गेली दोन वर्षं घरातून काम केल्यानंतर आता अनेक जण पुन्हा ऑफिसांमध्ये जाऊ लागले आहेत, त्यामुळे जेवणाच्या जुन्या सवयीही पुन्हा अवतरल्या आहेत- पॅक केलेलं सँडविच कामाच्या टेबलावर बसल्या-बसल्या खाणं, सोयीनुसार मधेच कधीतरी छोटंमोठं खाणं आणि फसफसणारी पेयं पिणं, अशा गोष्टी सुरू होतील. हॉटेलांमधली वर्दळ आता वाढू लागली आहे, तर किराणा दुकानांमधील विक्री पुन्हा कोरोनापूर्व काळाइतकी खाली येऊ लागली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कामाचा कर्मचाऱ्यांच्या आहारावर आणि एकंदर आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यताही वाढली आहे.

तणाव

अॅमी टोलोफरी या नोंदणीकृत सार्वजनिक आरोग्यविषयक पोषणतज्ज्ञ आहेत आणि कोव्हेन्ट्री विद्यापीठात याच विषयाच्या व्याख्यात्याही आहेत. अतितणाव असलेल्या वातावरणात काम केल्याचा आपल्या आहारावर परिणाम होऊ शकतो, असं त्या म्हणतात. "मूड आणि फूड यांच्यात घनिष्ठ संबंध असतो, हे आपण जाणतो. आपण कोणत्या खाद्यपदार्थांची निवड करतो, याचा संदर्भ इथे महत्त्वाचा ठरतो."

"तणावामुळे आपल्या शरीरातील कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं, त्यातून ग्लुकोजसंदर्भातील सहनशक्ती कमी होऊन भूक वाढण्याची शक्यता असते. याचा अर्थातच आपल्या आहारावर परिणाम होतो."

कामाच्या ठिकाणी तणावामुळे आपल्याला त्रस्त किंवा अस्वस्थ वाटत असेल, आणि मनस्थिती चांगली राहावी यासाठी आपण जास्त साखर असणारे अन्नपदार्थ व पेयं यांचं सेवन करत असू, तर त्यातून एक दुष्टचक्र निर्माण होऊ शकतं. रक्तातली साखर आधी एकदम वाढते आणि मग अपरिहार्यपणे खाली येते, त्यातून थकलेपणा व त्रस्तता वाढते.

रक्तातील साखरेची पातळी सतत वर-खाली होत असेल, तर मनस्थितीविषयीच्या समस्या निर्माण होतात- त्यातून निराशा व चिंताग्रस्तताही उद्भवू शकते. अशा वेळी मनस्थिती ढासळल्यामुळे कामाच्या ठिकाणचा ताण हाताळण आणखी बिकड होतं आणि हे दुष्टचक्र सुरू राहतं.

कामाच्या ठिकाणचं वातावरण

उल्स्टर विद्यापीठातील अन्नविज्ञान व तंत्रज्ञान या विषयाच्या व्याख्यात्या डॉ. किर्स्टी पाउरशहिदी यांनी निवाससेवा पुरवणारी हॉटेलं आणि अन्नसेवा उद्योग या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांशी कामाच्या दरम्यान खाण्यासंदर्भात चर्चा केली. या अभ्यासाचा भाग म्हणून त्यांनी एका हॉटेलमधल्या आचाऱ्याची मुलाखत घेतली. तर, रात्रपाळीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सूप व सँडविच तयार करून त्यांना सुदृढ अन मिळेल असा आमचा प्रयत्न असतो, असं तो म्हणाला. "पण कर्मचारी बहुतेकदा हे अन्नपदार्थ फेकून द्यायचे आणि बाहेर जाऊन खाऊन यायचे."

"मी आता पिझ्झा खायला चाललोय, असं एका माणसाने म्हटलं की बाकीचे त्यात सामील होतात," असं पाउरशहिदी सांगतात. आपलं कामाचं ठिकाण शहरी भागात असेल, तर हे अधिक सर्रास दिसतं. शहरांमध्ये खाण्यापिण्यासाठी बाहेरच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

तयार खाद्यपदार्थ किंवा अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांवर भर दिल्याने आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लिव्हरपूल जॉन मूअर्स विद्यापीठाने केलेल्या एका प्रयोगातून असे दिसून आले की, बाहेरचं तयार अन्न दिवसातून दोनदा खाल्ल्याने वजन वाढतं आणि हृदयवाहिन्यांशी संबंधित आजाराची जोखीमसुद्धा वाढते. या प्रयोगात सहभागी झालेल्या 50 टक्के प्रतिसादकांच्या बाबतीत ही लक्षणं दिसून आली. तर, काहींना दोन आठवड्यांनी झोप धड लागेनाशी झाली, थकल्यासारखं व उमेद गेल्यासारखं वाटायला लागलं.

कामाच्या ठिकाणी पोषक आहाराची सुविधा करून दिली आणि ती वापरली गेली, तर कर्मचाऱ्यांचं आरोग्य सुधारू शकतं.

खाण्याच्या अनियमित वेळा

तुमचं काम सतत व्यग्र ठेवणारं असेल, तर नियमितपणे ब्रेक घेणं शक्य होत नाही. कामाच्या ओझ्यामुळे आपल्याला अगदी थोडासाही वेळ काढता येत नाही, असं काही लोकांना वाटू शकतं. काहीवेळा असा मोकळा वेळ घेतला, तर उत्पन्नात घट होणार असते; किंवा काही वेळा देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांनी असा वेळ काढू नये यासाठी तजवीज केली जाते.

"कामाच्या ठिकाणी अधेमधे मोकळा वेळ देण्याचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे, तशा प्रकारची कार्यसंस्कृती जोपासली जायला हवी," असं टोलोफरी म्हणतात.

खाण्याच्या वेळा अनियमित असल्या तर रक्तामधील साखरेच्या प्रमाणात चढउतार दिसू शकतात, शिवाय रात्रीची झोप बिघडते आणि कामाच्या दरम्यान विश्रांती न घेतल्यामुळे थकवाही वाढतो.

ऑफिसमध्ये काम करताना खाणारी मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

पाउरशहिदी यांनी या संदर्भात अभ्यास करताना आरोग्य व सामाजिक सेवा या क्षेत्रांमधील लोकांच्याही मुलाखती घेतल्या. त्या सांगतात, "शरीरातील पाणी टिकवून ठेवणं ही एक मोठीच समस्या होती... काही वेळा बाथरूमला जायलाही वेळ काढता येत नसल्याचं त्या लोकांनी सांगितलं. त्यामुळे मग त्यांना पाणी पिण्यापासून परावृत्त केलं जातं." शरीरातील पाणी कमी झालं, तर थकवा येतो, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, बोधक्षमता खालावते आणि निर्णयक्षमतेलाही बाधा पोचते.

रात्रपाळी व फिरत्या पाळ्या

पाळीनुसार काम करणाऱ्या कामगारांच्या आहाराची तपासणी करणारे अनेक अभ्यास डॉ. पाउरशहिदी यांनी केले आहेत. 2020 साली केलेल्या एका अभ्यासात त्यांना असं आढळलं की, 'दिवसाच्या वेळी ठरलेल्या तासांमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वजन वाढण्याची शक्यता जास्त असते... विशेषतः पाच वर्षांहून अधिक काळ पाळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींबाबत ही जोखीम जास्त असते..."

टोलोफरी म्हणतात, "पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोषक आहार कमी प्रमाणात मिळत, त्यांच्या जेवणात फळं व भाजीपालासुद्धा कमी प्रमाणात असतो, आणि साखर व संपृक्त चरबी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात, हे दाखवणारी बरीच आकडेवारी उपलब्ध आहे." सकाळच्या ठरलेल्या नियमित वेळांव्यतिरिक्त पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पोषक आहार मिळणं अडचणीचं ठरू शकतं, कारण त्यांच्या कामाच्या ठिकाणी कॅन्टिन असेल तरी रात्रीच्या वेळी ते बंद असू शकतं, तसंच बाहेरची उपहारगृहंसुद्धा अशा वेळी बंद असण्याची शक्यता असते.

भाजीपाला

फोटो स्रोत, Getty Images

या समस्येचा संबंध केवळ अन्नाच्या गुणवत्तेशी नाही, तर आपली शरीरं अन्नावर कशी प्रक्रिया करतात याच्याशीसुद्धा आहे. आपण कधी झोपायचं, कधी उठायचं आणि कधी खायचं व सक्रिय राहायचं, हे ठरवणारं एक जैविक घड्याळ आपल्या शरीराने निश्चित केलेलं असतं. आहारतज्ज्ञ व साउथ ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील पीएच.डी.ची विद्यार्थिनी यान यिन फोई यांनी रात्र पाळीच्या कर्मचाऱ्यांच्या आहारासंदर्भातील हस्तक्षेप या विषयावर काही अभ्यास केला आहे.

"आपल्या शरीराच्या तालबद्धतेमध्ये इन्शुलिन व ग्लुकोज यांच्या संदर्भातील संवेदना महत्त्वाची असते आणि रात्रीच्या वेळी ही संवेदना सर्वांत खालावलेली असते," असं फोई सांगतात. "दिवसात उशिरा जेवण्याऐवजी लवकर जेवलं किंवा किमान शक्य तेवढं अन्न दिवसाच्या सुरुवातीला खाणं हृदयाच्या आणि चयापचयक्रियेच्या दृष्टीने लाभदायक असतं, असं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे."

पाळीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्या संदर्भात काही धोरण निश्चित करण्यापूर्वी अधिक संशोधनाची गरज आहे, असं फोई सांगतात (त्या स्वतः या संदर्भात काम करत आहेत). "रात्रपाळीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं मुख्य जेवण रात्री उशिरा घेण्याऐवजी लवकर घेतलं, आणि मध्यरात्री भूक लागल्यावर कमी कॅलरी असणारे पण जास्त फायबर असणारे अल्पोपाहाराचे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले, तर ते त्यांना लाभदायक ठरण्याची शक्यता आहे."

काम कसंही असलं तरी सुदृढ कसं राहायचं?

नियोजन करा

जेवणासंदर्भातील नियोजन कळीचं असतं, यावर सर्व तज्ज्ञांची सहमती आहे. विशेषतः सकाळच्या नियमित वेळांना काम करायची सोय नसेल, तर त्यात निवडीला फारसा वाव नसतो. फोई म्हणतात, "रात्रपाळीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य व दुग्धजन्य पदार्थ, यांवर जाणीवपूर्वक भर द्यायला हवा."

कामाच्या ठिकाणी चौरस आहार मिळणं शक्य नसेल, तर डब्यात भरून असं अन्न घेऊन जावं. "अख्खी फळं, सुका मेवा, दही, दूध, यातून कमी कॅलरी असणारी पण आवश्यक व्हिटॅमिन व खनिजं असणारी पोषणमूल्यं आपल्या शरीराला मिळतात."

गाइज् अँड सेंट थॉमस हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ जॅस्मिन कार्बन असं सुचवतात की, मशरूमसदृश पदार्थ, डाळी, कमी चरबी असणारं मांस, यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावं. घाईगडबड असेल तर शिजवलेली अंडी, फळं, सॅलड असे पदार्थ सोबत ठेवावेत.

सजगपणे खाणं

टोलोफरी म्हणतात, "सजगपणे खाणं महत्त्वाचं असतं, हे दाखवणारं बरंच संशोधन होतं आहे. जेवण संथपणे केल्याने पचनक्रियेला फायदा होतो आणि आपण भुकेविषयी व भूक भागल्याविषयी अधिक सजगपणे विचार करतो. लोकांनी जाणीवपूर्वक एका ठिकाणी बसून लक्ष विचलित न करता खायचा प्रयत्न करायला हवा."

ऊर्जा मिळवायला काय गरजेचं आहे याचा विचार करावा

सफरचंद, डोनट

फोटो स्रोत, Getty Images

टोलोफरी म्हणतात, "प्रत्येक जण वेगळा असतो आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात पोषक तत्त्वं गरजेची असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एकाच प्रकारचा आहार उपयोगी नसतो... दिवसभर टेबलापाशी बसून काम करावं लागत असेल, तर शरीरातील कॅलरी फारशा खर्चच होत नाहीत... अशा वेळी दही, फळं इत्यादींसारखे अधिक प्रथिनं असणारे पदार्थ प्राधान्याने खाणं उपयोगी ठरतं."

"रात्रपाळी सुरू होण्यापूर्वी भरपेट जेवण केलं, तर त्या व्यक्तीला झोपाळल्यासारखं वाटण्याची शक्यता असते," असं कार्बन म्हणतात. "त्यामुळे जास्त प्रथिनं असणारं, कर्बोदकं कमी असणारं अल्पोपाहारासारखं जेवण समतोलपणे व कमी प्रमाणात घेणं इष्ट ठरतं."

कामाला पूरक ठरेल अशा खाण्याच्या वेळा

शक्य तितक्या नियमितपणे खाणं चांगलं आणि रात्री उशिरा खाण्यापेक्षा दिवसाच्या आरंभीच्या वेळेत खाणं सर्वांत चांगलं, असं पाउरशहिदी म्हणतात. पण हे करणं शक्य नसेल, तर "तुम्हाला सर्वाधिक सोयीचं असेल तशा प्रकारच्या खाण्याच्या वेळा निश्चित करा", असं कार्बन सुचवतात.

तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत असाल, तरी "झोपेला प्राधान्य मिळेल असं पाहा आणि झोपेच्या किमान दोन तास आधी जेवा, म्हणजे अन्न पचायला पुरेसा वेळ मिळतो आणि चांगली झोप यायला मदत होते. कॅफिन सहा ते सात तास टिकतं, त्यामुळे आपल्या ठरलेल्या झोपायच्या वेळेपूर्वी त्याची पातळी खाली येणं महत्त्वाचं असतं. अल्कोहोल टाळा आणि थकवा येऊ नये व कामात लक्ष लागावं यासाठी कामादरम्यान पाणी पित राहा," असं टोलोफरी सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)