मूळचे मुंबईचे 'हे' क्रिकेटर्स मुंबईत भारताविरुद्ध खेळणार; वानखेडेवर खेळण्याचं स्वप्न पाहणारे तिघे कोण?

शुभम रांगणे, सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग

फोटो स्रोत, ICC/Getty Images

फोटो कॅप्शन, शुभम रांगणे, सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग
    • Author, विनायक दळवी
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

एक दिवस वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप मॅचमध्ये खेळायचं... मुंबईच्या मुशीत घडलेला प्रत्येक क्रिकेटर हे स्वप्न पाहतो.

शुभम रांजणे, सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंगचाही त्याला अपवाद नाही. या तिघांचं स्वप्न आता पूर्ण होतंय, पण ते भारताकडून नाही, तर भारताविरुद्ध यूएसएकडून खेळणार आहेत.

7 फेब्रुवारीला ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी भारत आणि यूएसएच्या संघांमधली लढत वानखेडे स्टेडियमवर होते आहे आणि या तिघांसाठी, त्यांच्या कुटुंबीय आणि मित्र परिवारासाठी ती अगदी खास असणार आहे.

सौरभ नेत्रावळकर सांगतो, "मला एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. मी इथे क्रिकेट खेळायला शिकलो, इथे मुंबईतच मोठा झालो. वानखेडेवर खेळण्याची संधी मिळावी हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.

"अनेक आठवणी, भावना दाटून येत आहेत. मी माझे कुटुंबीय, मित्रांना तिथे पाहण्यास उत्सुक आहे आणि मला माझा सर्वोत्तम खेळ करायचा आहे."

खरंतर विश्वचषकाचे सामने जाहीर झाल्यापासूनच या क्षणाविषयी सगळ्यांना उत्सुकता वाटते आहे.

2 फेब्रुवारीला डीवाय पाटील स्टेडियमवर यूएसए आणि इंडिया-A टीम्स आमने-सामने आल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुभम रांजणे, 2 फेब्रुवारीला डीवाय पाटील स्टेडियमवर इंडिया-ए विरुद्ध सराव सामन्यात खेळताना.

वानखेडेवर भारताविरुद्ध खेळायचं आहे, हे कळल्यावर काय वाटलं, याविषयी शुभम रांगणे सांगतो, "जेव्हा मी ते ऐकले, तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले. हा काही साधा सामना नाही. हे माझे मूळ गाव आहे. माझे वानखेडे स्टेडियम, त्याच्या आठवणी."

"भारताविरुद्ध, वानखेडेवर, विश्वचषकात खेळणे, ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. वानखेडेमध्ये प्रवेश करताना अंगावर नेहमीच रोमांच उभे राहतात."

सूर्यकुमारचा साथीदार ते प्रतिस्पर्धी

विशेष म्हणजे शुभम एकेकाळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत मुंबईसाठी खेळायाचा. दोघं कधी रूममेट्सही होते.

म्हणूनच या सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार गमतीनं म्हणाला, "ते तर डॉलर कमवायला गेले आहेत. पण मी याकडे चांगल्या दृष्टीनं पाहतो."

"लोकांना संधी मिळते आहे, ते दुसऱ्या देशासाठी खेळत असले तरी ही एक चांगली संधी आहे. मी त्यांच्यासोबत बरंच क्रिकेट खेळलो आहे. मी मुंबईत खेळलो, मला इथली परिस्थिती कशी आहे, हे माहिती आहे. मजा येईल (त्यांच्याविरुद्ध) खेळायला."

शुभम रांजणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुभम रांजणे

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये शुभम सूर्युकमारच्या नेतृत्वाखालीही खेळला होता. त्या संघात या दोघांसोबतच शिवम दुबेही होता.

त्याविषयी शुभम सांगतो, "तो एक उत्तम अनुभव होता. ड्रेसिंग रूम शेअर करणे, खेळाडूंसोबत वेळ घालवणे, एकमेकांकडून शिकणे, यातूनच तुम्ही एक खेळाडू म्हणून घडत असता."

"आम्ही एकत्र क्लब क्रिकेट खेळलो आहोत, एकत्र प्रथम श्रेणी सामने खेळलो आहोत. आता परिस्थिती वेगळी आहे. आता आम्ही विरुद्ध संघांमध्ये आहोत," तो म्हणतो.

दोन सूटकेसमधलं आयुष्य

शुभमसाठी क्रिकेट केवळ आवडता खेळ नाही, तर एक वारसा आहे. तो रांजणे परिवारातला तिसऱ्या पिढीचा क्रिकेटर आहे.

शुभमचे आजोबा वसंत रांजणे भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले होते, तर वडील सुभाष रांजणे, प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत.

शुभमच्या क्रिकेट वाटचालीची सुरुवात मुंबईत झाली. तो पारसी जिमखान्यातर्फे खोऱ्यानं धावा काढायचा.

जवळपास 10-12 वर्षं तो मुंबईत खेळला. इथल्या मैदानांवर त्यानं घाम गाळला, वेगवेगळे क्लब, वयोगटांचे संघ आणि अखेरीस मुंबईच्या सिनिअर संघात खेळण्याची संधीही मिळाली.

या शहरानं त्याला कणखर बनवले आणि स्पर्धात्मक क्रिकेटचा खरा अर्थ शिकवला.

पण पराकोटीची स्पर्धा असलेल्या या शहरात त्याला संधीसाठी बराच संघर्ष करावा लागला. बराच काळ राखीव खेळाडूंच्या बेंचवर घालवावा लागला.

काही काळ त्यानं गोव्याचंही प्रतिनिधित्व केलं, पण अखेर भारत सोडण्याचा निर्णय घेतला.

शुभम रांजणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुभम रांजणे

कोणत्याही प्रकारची हमी नसताना, स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी सातासमुद्रापलीकडे जाणे हा कठीण निर्णय होता, असं शुभम कबूल करतो.

"तुमचा देश, तुमचे प्रियजन, कुटुंब, मित्र यांना सोडून जाणे या सर्वांचा त्याग करणे सोपे नसते. तुम्ही तुमचे आयुष्य 2 सुटकेसमध्ये भरता, एका नवीन देशात सर्वकाही नव्याने सुरू करता. पुढे काय होणार आहे हे तुम्हाला माहीत नसते."

अमेरिकेत काहीही सहज मिळाले नाही. असोसिएट क्रिकेट म्हणजे कमी सोयीसुविधा आणि अधिक जबाबदारी. पण हळूहळू शुभमनं या संघात स्थान निर्माण केलं आणि वर्ल्ड कपचं तिकिटही मिळवलं.

हरमीत सिंगची कहाणीही काहीशी अशीच आहे.

वाद आणि वर्ल्ड कप - हरमीतचा प्रवास

2012 साली भारतानं अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा डावखुरा फिरकी गोलंदाज हरमीत सिंग त्या संघात महत्त्वाचा भाग होता.

तोवर मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात उदयाला येत असलेला हरमीत तेव्हा अचानक प्रकाशझोतात आला. ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर इयन चॅपेलनीही या मुलाचं भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटलं होतं.

पण मग वादांनी त्याला घेरलं. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात हरमीतचं नाव घेतलं गेलं, मात्र बीसीसीआयनं त्याच्यावरचे आरोप खरे नसल्याचं स्पष्ट केलं.

मग 2017 साली अंधेरी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर कार घुसवल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

त्यातून नाव क्लियर झाल्यावर हरमीत मैदानात खेळत राहिला, मात्र राष्ट्रीय टीमचं दार त्याच्यासाठी घट्ट बंद झालं होतं.

6 वर्षांपूर्वी त्यानं अमेरिकेला जायचा निर्णय घेतला आणि लवकरच तो यूएसए टीमचा भरवशाचा ऑलराऊंडर बनला.

हरमीत सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरमीत सिंग

2024 च्या अमेरिकेत झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यानं क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड मिलरच्या विकेट काढत लक्ष वेधून घेतलं होतं.

आता 33 वर्षांचा हरमीत आपल्या मूळ शहरात, वानखेडेवर जुन्या सहकाऱ्यांविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहे.

"मी या सामन्याची वाट पाहतो आहे. अमेरिकेनं मला बरंच काही दिलं आहे. मी ज्या संधीचा इथे शोध घेत होतो, ती मला यूएसएमध्ये मिळाली. मी या क्षणाचा आनंद लुटतो आहे आणि या संधीचं सोनं करण्याचा इरादा आहे," असं हरमीतनं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं.

"माझे काही बॅच मेट्स भारताकडून खेळतायत. आयुष्यातलं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी खेळत राहिलो, थांबलो नाही आणि आज इथे पोहोचलो आहे."

सौरभ नेत्रावळकरचं 'होम कमिंग'

सौरभ नेत्रावळकरचा प्रवास थोडासा वेगळा होता. क्रिकेटसोबतच त्याला अभ्यासाची आवड होती.

मुंबई रणजी संघात स्थान निश्चित होत नाही आणि भारतासाठी खेळण्याचा मार्ग मोकळा होत नाही, असं लक्षात आल्यावर त्यानं इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण खेलं आणि 2015 साली पुढच्या शिक्षणासाठी, मास्टर्ससाठी अमेरिकेत गेला.

पुढच्या शिक्षणासाठी सौरभ अमेरिकेला निघून गेला, त्यानं सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही केली. सोबतच क्लब क्रिकेट खेळत राहिला, त्यातूनच अमेरिकन संघाचं दार उघडलं. त्या प्रवासाविषयी सौरभ बीबीसी न्यूज मराठीला दिलेल्या मुलाखतीत भरभरून बोलला होता.

2024 च्या विश्वचषकात सौरभचा खेळ लक्षवेधक ठरला. त्या स्पर्धेत अमेरिकेनं पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवला, त्यात सौरभनं दोन विकेट्स काढत महत्त्वाचं योगदान दिलं होतं. तर भारताविरुद्धच्या लढतीत त्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मांची विकेट घेतली होती.

स्वप्नं पाहणं का सोडू नये आणि संधीचं सोनं कसं करावं याचं तो उदाहरण ठरला होता.

सौरभ नेत्रावळकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौरभ नेत्रावळकर

त्या अनुभवाविषयी सौरभ सांगतो, "त्या स्पर्धेनंतर आमचा अनुभव वाढला, टीम म्हणून आम्ही अधिक पक्व झालो आहोत. मेजर लीग क्रिकेटचे तीन सीझन्स झाले, आमच्या काही खेळाडूंना परदेशात फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तो अनुभवही कामी येईल.

"आम्ही 50 षटकांच्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या प्रयत्नात आहोत, लीगमध्ये टॉपवर आहोत."

आता एवढ्या वर्षांनी सौरभ घरच्या मैदानात, वानखेडेवर परतणार आहे.

"मला वाटतं, मी शेवटचं मुंबईत खेळलो, ते 2014-15 साली असावं. तेव्हापासून परिस्थिती बरीच बदलली आहे. खेळही खूप बदलला आहे," असं तो सांगतो.

मोनांक पटेल आणि सौरभ नेत्रावळकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोनांक पटेल आणि सौरभ नेत्रावळकर

शुभम, सौरभ आणि हरमीतप्रमाणेच मूळचा गुजरातचा मोनांक पटेल आणि मूळचा दिल्लीचा मिलिंद कुमार हे दोघंही यूएसएकडून खेळत आहेत.

मोनांक त्याविषयी सांगतो, "भारतात येणं आणि इथे वर्ल्ड कपमध्ये खेळणं भारी वाटतंय. लहानपणी मी नेहमीच विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न पाहात आलो आहे. पण मी भारतात वर्ल्ड कप खेळेन आणि अमेरिकेचं प्रतिनिधित्व करेन असं कधी वाटलं नव्हतं.

"मीच नाही तर संघातल्या अनेकांसाठी ही एक खास भावना आहे आणि आम्ही या विश्वचषकात खेळण्यासाठी खूपच उत्सुक आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)