अंडर-19 वर्ल्डकप : भारताची सहाव्या विश्वचषकाला गवसणी, इंग्लंडवर 100 धावांनी मोठा विजय

भारत

फोटो स्रोत, Johan Rynners-ICC/ICC via Getty Images)

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

1983 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध काढलेल्या 175 धावांची आठवण करून देणारी आणखीन एक खेळी आज वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेमध्ये करून दाखवली आणि त्याचंच फलित म्हणून भारताच्या अंडर-19 संघाने सहावा वर्ल्डकप पटकावला आहे.

मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने झिम्बाबेमध्ये इतिहास घडवला आहे.

झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स मैदानात भारताने इंग्लंडच्या संघाचा 100 धावांनी पराभव केला. भारताने ठेवलेल्या 412 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावाच करू शकला.

इंग्लंडने त्यांच्या डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली.

सलामीवीर बेन डॉकिन्सने 56 बॉल्समध्ये 66 धावांची खेळी केली. तसेच त्यानंतर फलंदाजीला आलेल्या केलेब फाल्कनरने शतक झळकावलं पण पण उर्वरित फलंदाजांनी मात्र निराशा केली.

तत्पूर्वी पहिल्या डावात सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने 80 बॉल्स मध्ये 175 धावांची धमाकेदार खेळी करून भारताला धावांचा डोंगर उभारण्यात मदत केली.

अंडर-19 वर्ल्डकपच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणारा वैभव हा पहिला फलंदाज ठरला. अंडर-19 वर्ल्डकपच्या प्लेऑफ सामन्यात 350 हून अधिक धावांची नोंद करणारा भारत हा पहिला संघ आहे; यापूर्वीही हा विक्रम भारताच्याच नावावर होता. 2016 मध्ये नामिबियाविरुद्ध भारताने 249 धावा केल्या होत्या.

1988 ते 2024 याकाळात एकूण 15 अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा झाल्या आहेत. त्यामध्ये भारतीय संघाने सर्वाधिक म्हणजे तब्बल 5 वेळा हा चषक जिंकला होता. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाने 4 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

भारतीय संघाने याआधी 2000, 2008, 2012, 2018, 2022 मध्ये विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला आहे.

इंग्लडने फक्त एकदा, 1998 मध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे.

पहिल्या डावात भारताचा धावांचा डोंगर

भारतीय अंडर-19 पुरुष क्रिकेट संघाने विश्वचषकातलं भारतीय संघाचं वर्चस्व कायम ठेवलं आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर भारताने धावांचा डोंगर उभा केला होता.

टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी 50 ओव्हर्समध्ये 411 धावा केल्या.

14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या अंडर-19 संघातील गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक वेगवान दीडशे धावा करण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला.

त्याने हा टप्पा फक्त 71 बॉल्समध्ये गाठला, आणि याच स्पर्धेत याच मैदानावर इंग्लंडच्या बेन मेयस (इंग्लंड) ने स्कॉटलंडविरुद्ध केलेल्या 98 बॉल्सचा विक्रम मोडला.

वैभव सुर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

वैभव 80 बॉल्समध्ये तब्बल 15 चौकार आणि 15 षटकार खेचून 175 धावा करून बाद झाला. युवा एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता वैभवच्या नावावर आहे, त्याने डिसेंबरमध्ये आयसीसीए दुबई येथे यूएई अंडर-१९ संघाविरुद्ध मारलेल्या स्वतःच्या १४ षटकारांचा विक्रम मागे टाकला आहे.

त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यानेदेखील आक्रमक फलंदाजी करत 51 बॉल्स मध्ये 53 धावा केल्या.

अंडर-19 वर्ल्डकप सहभागी झालेला भारतीय संघ

फोटो स्रोत, Johan Rynners-ICC/ICC via Getty Images

फोटो कॅप्शन, अंडर-19 वर्ल्डकप सहभागी झालेला भारतीय संघ

सलामीला उतरलेला अ‍ॅरॉन जॉर्ज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर वैभव आणि आयुषने भारताचा डाव पुढे नेला. वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या विहान मल्होत्राने 36 बॉल्समध्ये 30 धावा केल्या.

त्यानंतर वेदांत त्रिवेदी देखील 36 बॉल्समध्ये 32 धावा करून बाद झाला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूने 31 बॉल्समध्ये 40 धावा केल्या.

त्यानंतर भारताचे फलंदाज झटपट बाद झाले पण शेवटी कनिष्क चौहानने 20 बॉल्समध्ये 3 चौकार आणि एक षटकार खेचून 37 धावा केल्या आणि भारताला 400 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

कनिष्क चौहान

फोटो स्रोत, Ashley Allen-ICC/ICC via Getty Images)

फोटो कॅप्शन, कनिष्क चौहान

भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी

भारताने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. मात्र 17 व्या ओव्हरमध्ये थॉमस रेव बाद झाला आणि मग इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतले, इंग्लंडने 3 धावांमध्ये तब्बल 4 विकेट गमावल्या.

दीपेश देवेंद्रन

फोटो स्रोत, Getty Images

भारताच्या आर.एस. अंबरीशने 9 ओव्हर्समध्ये 56 धावा देत 3 विकेट घेतल्या.

दीपेश देवेंद्रनने 6 ओव्हर्समध्ये 64 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना सूर गवसू दिला नाही. कर्णधार आयुष म्हात्रेने देखील 1 विकेट मिळवली.

इंग्लंडच्या केलेब फाल्कनर एकाकी झुंज देत संघाला लक्ष्याच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याने 67 बॉल्समध्ये आक्रमक फलंदाजी करत शतक (115) झळकावलं. पण त्याला इतर फलंदाजांची सोबत मिळू शकली नाही.

या वर्ल्डकपमधली भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली?

या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. साखळी आणि नॉकआऊट सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकही सामना न गमावता अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सुपर सिक्स सामन्यात भारताने पाकिस्तान अंडर-19 संघाचा 58 धावांनी पराभव केला, ज्यामुळे भारताची विजयी कामगिरी सुरूच राहिली आणि पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला.

अफगाणिस्तान विरुद्धच्या उपांत्य सामन्यात, भारताने युवा एकदिवसीय सामन्यांमधील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नवे केला.

अफगाणिस्तानने भारतासमोर ठेवलेलं 312 धावांचं आव्हान भारताच्या फलंदाजांनी अगदी आरामात पार केलं. या सामन्यात अ‍ॅरॉन जॉर्जने शतक झळकावलं होतं.

भारत

फोटो स्रोत, Ashley Allen-ICC/ICC via Getty Images

अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा इतिहास

भारतीय संघाने याआधी 2000, 2008, 2012, 2018, 2022 मध्ये हा वर्ल्डकप जिंकला आहे. या स्पर्धेने भारताला अनेक महान खेळाडू दिले आहेत.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर देखील भारताच्या अंडर-19 संघात खेळला आहे.

भारतीय अंडर-19 संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वात पहिल्यांदा हा वर्ल्डकप जिंकला होता. त्या स्पर्धेत युवराज सिंग मालिकावीर (प्लेयर ऑफ द टूर्नामेंट) ठरला होता.

2000 साली झालेला हा वर्ल्डकप जिंकण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका तर बजावलीच, पण पुढे 2007 आणि 2011 साली झालेल्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्डकपमध्ये देखील युवराजने भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.

विराट कोहली

फोटो स्रोत, STRDEL/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय अंडर-19 संघाने वर्ल्डकप जिंकला होता.

पुढची काही वर्षं भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकता आली नाही पण अखेर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा 2008 मध्ये हा वर्ल्डकप स्वतःच्या नावे केला.

त्यानंतर 2012 मध्ये उन्मुक्त चंद, 2018 साली पृथ्वी शॉ आणि 2022 मध्ये अखेरचा वर्ल्डकप यश धूलच्या नेतृत्वात भारताने या स्पर्धेत विजय मिळवला आहे.

अंडर-19 क्रिकेटमधून नावारूपास आलेल्या अनेक खेळाडूंनी पुढे भारतीय प्रौढ संघाकडून खेळताना मोठं नाव कमावलं आहे.

यामध्ये रवींद्र जडेजा, सुरेश रैना, शिखर धवन, के.एल. राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल, ईशान किशन यांसारख्या खेळाडूंचा समावेश होतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.